Language Marathi

दिव्यत्वाची जेथे प्रचिती…

एखादी गोष्ट आपल्याकडे असायला हवी, पण या ना त्या कारणानं ती आपल्याकडे नसते तेव्हा मनाच्या कोपर्यात कुठेतरी त्याची भुणभुण आपल्याला जाणवत राहते. सो कॉल्ड महत्वाचीअतिमहत्वाची, अधिक गरजेची कामं आपलं चित्त व्यापून टाकतात आणि त्या गोष्टीला प्राधान्य मिळत नाही. माझंही तसंच झालं, पण विलेपार्ले मुंबईच्या चेतना वाकडेंचं पत्र कारणीभूत ठरलं ही गोष्ट घडायला….

मागच्या आठवड्यात पुण्याला आमच्या सर्व प्रीफर्ड सेल्स पार्टनर्सची कॉन्फरन्स होती. दोन वर्षांतून एकदा भेटायचं, विचारांची देवाणघेवाण करायची, शंका-कुशंका, त्रुटी, चूका, ज्ञान, विज्ञान (अर्थातच पर्यटनाचं) ह्यावर चर्चा करायची, तोडगे काढायचे, एकमेकांना समजून घ्यायचं, नव्याने समाविष्ट झालेल्या पार्टनर्सनाही एकूणच वीणा वर्ल्ड म्हणजे काय हे माहीत करून द्यायचं ह्या सर्वातून ही कॉन्फरन्स आयोजित केली जाते आणि बर्‍यापैकी त्याचा हेतू साध्य होतो. या कॉन्फरन्समध्ये वीणा वर्ल्डचा मकसद काय? ह्यावर बोलताना मी म्हटलं, “अफोर्डेबल टूरिझमद्वारे आपल्याला भारतीयांना जग दाखवायचं आहे. ‘केल्याने देशाटन…मनुजा चातुर्य येतसे फार’ या सुभाषिताप्रमाणे आपण अनुभवलंय की पर्यटनाने माणसाचा व्यक्तिमत्व विकास होतो, आचारात विचारात बदल घडतो, एकूणच पर्यटन सर्वांच्या आयुष्यात आनंदाची पेरणी करतं. मग हे पर्यटन आपल्याला सगळ्यांना घडवता आलं पाहिजे. जो घरातून बाहेरच पडला नाही त्याला किमान गोव्याला घेऊन जाऊया. ज्याने गोवा पाहिलंय त्याला शिमला मनालीला नेऊया. ज्याने भारताचं पर्यटन सुरू केलंय त्याला नेपाळ भूतान किंवा थायलंडची वारी घडवूया आणि ह्या देशाबाहेर पाऊल टाकलेल्या पर्यटकाला त्यानंतर युरोप-अमेरिका-ऑस्ट्रेलिया ते अंटार्क्टिकापर्यंत अगदी पृथ्वीवर जिथे जिथे जाणं शक्य आहे तिथे तिथे घेऊन जाऊया. आणि पृथ्वी कमी पडली तर चंद्रावरच्या सहलींचं लक्ष्य आपण ठेवलेलंच आहे. करण्यासारखं खूप काही आहे जर आपण ह्या गोष्टी लक्षात घेतल्या तर”. हे बोलत असताना, फ्रॉम द बॅक ऑफ माय माईंड एक आवाज टकटक करीत होता आणि तो मला सांगत होता, ‘सर्वांसाठी सर्व काही म्हणजेच प्रत्येक घरासाठी आणि घरातल्या प्रत्येकासाठी वीणा वर्ल्डने पर्यटनाचं दार खूलं  केलंय म्हणताना कुणालातरी तू विसरतेयस, एवढी एक गोष्ट होऊ नये तुझ्याकडून गेल्या पाच वर्षात?’ बोलताना माझं मलाच खजिल व्हायला झालं. पुणे-मुंबई परतीच्या प्रवासात इमेल्स चेक करताना चेतनाताईंचं पत्र नजरेला आलं. कॉन्फरन्समध्ये बोलताना झालेली जाणीव आणि हे इमेल एकाच दिवसात दिसणं म्हणजे जणू ते संकेत देत होते की, ‘नाऊ नो मोअर एक्सक्यूजेस, यू हॅव टू अ‍ॅक्ट’.

चेतनाताईंच्या पत्राचा आशय होता की, ‘तुम्ही जर स्पेशली एबल्ड मुलांसाठी सहली सुरू केल्या, आणि त्यांना आपल्या भारतासोबतच जगाचं दर्शन घडवलंत तर अशा एखाद्या विद्यार्थ्याचा खर्च मी करायला तयार आहे’. वा! किती छान विचार नाही का. ह्या पत्राने अ‍ॅक्च्युअली आम्ही स्वतःला जास्त प्रवृत्त केलं सहली लाँच करायला. आमच्या प्रॉडक्ट डीपार्टमेंटने ऑलरेडी ‘टूर्स फॉर द स्पेशली एबल्ड’साठी सहलींचा कार्यक्रम तयार करून ठेवला होता. काय द्यायचं, कसं करायचं ह्यासाठी डिस्कशन्स झाली होती. फक्त कृती म्हणजे ह्या सहली लाँच करायच्या बाकी राहिल्या होत्या. ऑलरेडी उशीर झालेलाच आहे तेव्हा अधिक लांबण न लावता आज रविवार दिनांक १५ जुलै २०१८ रोजी वीणा वर्ल्ड ‘टूर्स फॉर द स्पेशली एबल्ड’ सहली जाहीर करीत आहे. आत्ता ह्या सहली आम्ही वयवर्ष तीस पर्यंतच्या स्पेशली एबल्ड व्यक्तिंसाठी मर्यादीत ठेवल्या आहेत. तूर्तास दोन भारतातल्या आणि तीन परदेशातल्या. एकंदरीतच हा उपक्रम कसा पुढे जातोय ह्यावर पुढे कुठे कुठे आमच्या स्पेशली एबल्ड पर्यटकांना घेऊन जाता येईल त्याची आखणी केली जाईल.

आज ह्या सहलीचा कार्यक्रम कसा असेल ह्याची थोडी कल्पना इथे द्यायला मला आवडेल. यावर्षी दिवाळीनंतर आम्ही भारतात उदयपूर जयपूर अशी राजस्थानची सहा दिवसांची सहल करतोय, तर परदेशात थायलंड म्हणजे बँकॉक पट्टायाला सहा दिवसांची सहल करतोय. तसेच नवीन वर्षात जानेवारीमध्ये अमृतसर वाघा बॉर्डर विथ फार्म स्टे आणि एप्रिलमध्ये परीक्षांनंतर दुसर्‍या आठवड्यात दुबई, सिंगापूर ह्या दोन सहलींचं आयोजन करतोय. त्या सहलीला प्रत्येक दहा स्पेशली एबल्ड पर्यटकांसोबत दोन वीणा वर्ल्डचे टूर मॅनेजर्स सहकार्यासाठी असणार आहेत जेणेकरून कोणताही त्रास वा अडचण आमच्या ह्या स्पेशली एबल्ड पर्यटकांना होणार नाही. वीणा वर्ल्डचे टूर मॅनेजर्स हे काळजी घेणारे, सदा हसतमुख असणारे आणि पर्यटकांच्या आनंदासाठी मेहनत घेणारे म्हणून प्रसिद्ध आहेतच त्यामुळे सगळं काही यथासांग पार पडणार ह्याविषयी आम्हाला खात्री आहे. तसेच ज्या ठिकाणी स्पेशली एबल्ड पर्यटक पर्यटनाला जाणार आहे तिथले आमचे स्थानिक पार्टनर्सही आनंदी झाले आहेत स्पेशली एबल्ड सहलींविषयी जाणून. एकूणच ह्या नव्याने दाखल झालेल्या सहलींनी वीणा वर्ल्डमध्ये उत्साह पसरवलाय. सहलीला येणार्‍या ह्या स्पेशली एबल्ड पर्यटकासोबत त्याची काळजी घेणारी घरातली एक व्यक्ती असणं महत्वाचं आहे. ह्या सहलींचा खर्च किती? स्पेशली एबल्डसाठी जास्त पैसे भरावे लागणार का? किंवा किती पर्यटक असणार ह्या सहलीला? हे प्रश्‍न साहजिकच तुमच्या मनात आले असणार. तर या सहलीला येणार्‍या स्पेशली एबल्ड पर्यटकाला तसेच त्याच्या सोबतच्या व्यक्तीला कोणताही जादा खर्च भरावा लागणार नाही. सहलीचा खर्च सर्वांना सारखाच असणार आहे. मात्र ज्या स्पेशली एबल्ड पर्यटकांची आर्थिक स्थिती तेवढी मजबूत नाही पण पर्यटनाची दूर्दम्य इच्छा आहे अशा स्पेशली एबल्ड पर्यटकाला सहलखर्चात चाळीस टक्के सवलत मिळेल *. पर्यटकांनी गौरविलेल्या जशा आमच्या इतर सहली आहेत तशाच तर्‍हेच्या  सुखसोयी त्यांना या सहलीत दिल्या जातील, त्यात काटछाट नाही. सहलीच्या कार्यक्रमात एखादं स्थलदर्शन जर कदाचित अडचणीचं होणार असेल तर ह्या सहलीसाठी त्याऐवजी वेगळं काहीतरी दिलं गेलं आहे जेणेकरून कुठेही एखादी गोष्ट आम्ही करू शकलो नाही असं वाटायला नको. कारण ‘आय कॅन डू इट – वुई कॅन डू इट’ हीच संकल्पना आहे ह्या सहलींची. सहल आनंदात आणि समाधानात पार पडणार आहे ह्यात शंकाच नाही. सहलीवर अजून आपल्याला काय काय करता येईल ह्यावरही सध्या आमच्या कार्यालयात टूर मॅनेजर्ससोबत प्रॉडक्ट टीम आणि डेस्टिनेशन्स मॅनेजमेंट टीमची चर्चा सुरू आहे, एव्हरीबडी इज रीअली लुकींग फॉरवर्ड टू द टूर्स फॉर द स्पेशली एबल्ड! वीणा वर्ल्ड इज ऑलरेडी मेकिंग द वर्ल्ड अफोर्डेबल, नाऊ लेट्स मेक इट अ‍ॅक्सेसीबल टू फॉर ऑल! (*T&C apply)

स्टीव्हन हॅाकिंगने व्हिलचेअर बाऊंड असूनही अँटार्क्टिकापासून अगदी झिरो पॉईंटपर्यंत जगाची प्रदक्षिणा पूर्ण केली. पदमश्री अरुणिमा सिन्हाने क्रूर आघातात गमावलेल्या पायाची पर्वा न करता माउंट एव्हरेस्ट पादाक्रांत केलं आणि जगातल्या आणखी सहा कठीण शिखरांवर विजयाची पताका रोवली. भारतीय लष्करातील मेजर देवेंद्र पाल सिंह यांनी तर आपल्या प्रोस्थेटिक लेगच्या (कृत्रिम पाय) सहाय्याने अनेक मॅरेथॉनमध्ये धावण्याचा विक्रम करीत भारताचे पहिले ‘ब्लेड रनर’ होण्याचा किताबही पटकवला. अमेरिकेच्या काइल मेनर्डने जगाच्या दृष्टीने विकलांग ठरलेल्या अवस्थेवर मात करीत मोठ्या हिमतीने किलिमंजारो ह्या आफ्रिकेतील पर्वतावर झेंडा रोवला. फिलाडेल्फियाच्या डेव्हन गालाहर हिने आपल्या प्रोस्थेटिक लेगच्या आधाराने आनंदात जगाची सफर करण्याचा मानस करीत, जिथे जाईल तिथे आपल्या पायावर त्या स्थळाचं नाव लिहून त्याचे फोटोज् व व्हिडीओज् सोशल मीडियावर वर पोस्ट केले. अजूनही सगळं जग स्पेशली एबल्ड व्यक्तींच्या पर्यटनासाठी तेवढं अनुकूल नाहीये. तरीही ही माणसं अशी आव्हानं पेलत असतील तर आपण हट्ट्याकट्या माणसांना कोणत्याही गोष्टीसाठी रडण्याचा किंवा कुरकूर करण्याचा खरंतर अधिकार नाही. म्हणूनच आज मनापासून म्हणावसं वाटतं, दिव्यत्वाची जेथे प्रचिती, तेथे कर माझे जुळती!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*