Language Marathi

डीटॉक्सिफाय

तंत्रज्ञानाच्या उद्रेकात, जागतिक स्पर्धेच्या वावटळीत रोज बदलणार्‍या जीवनशैलीत मानसिक संतुलन सांभाळणं ही तारेवरची कसरत झालीय. कमी वेळात जास्त काही करण्याची मागणी आहे येणार्‍या काळाची. आणि त्यासाठी आपण स्वत: आणि आपलं सभोवताल संतुलित करणं ही आपली जबाबदारी आहे. चला, आयुष्य  सिम्प्लिफाय करून आपल्या क्षमतांना अ‍ॅम्प्लिफाय करूया आणि देऊया येणार्‍या आव्हानांना टक्कर

जवळजवळ पंचवीस वर्षांनी इन्दौरला पोहोचले. वीणा वर्ल्डची पहिली वुमन्स स्पेशल मध्यप्रदेशात गेली होती, त्यातील मुलींना भेटायला गाला इव्हिनिंगसाठी माझं जाणं ठरलेलं असतं. इन्दौर एअरपोर्टला उतरले आणि ‘वेलकम टू द क्लीनेस्ट सिटी ऑफ इंडिया’ अशा भल्यामोठ्या होर्डिंगने स्वागत झालं सर्व प्रवाशांचं. अरे वा! समथिंग इंटरेस्टिंग! एकच दिवसासाठी आले होते, पुन्हा पुढच्या वेळी याच शहरात वुमन्स स्पेशलचा इव्हेंट असेल असं सांगता येत नाही त्यामुळे आज हे शहर डोळे भरून बघूया म्हणत मोबाईल बंद करून पर्समध्ये आत टाकला. मानतल्या सतत धावणार्‍या विचारांना बाजूला सारलं आणि लागले निरीक्षण करायला. खरंच शहर साफसुथरं होतं, रस्ते छान होते, स्वच्छ होते,

घरं टुमदार होती, बाय अ‍ॅन्ड लार्ज सर्व घरांना बाहेरून पूर्ण रंग लावलेले होते. आतून घर छान पण बाहेरून वीटा दिसताहेत, रंग नाहीये, अर्धवट बांधलेली घरं असा प्रकार दिसला नाही. बर्‍याच ठिकाणी बँकॉकला फिरतोय की काय असं वाटलं. बँकॉकसुद्धा दाटीवाटीचं शहर, जुन्या बिल्डिंग्ज, इलेक्ट्रिक वायरचं जाळं तिथेही आहे पण शहर स्वच्छ आहे. रस्त्यांना ठराविक वेळी अंघोळ घातली जाते. इन्दौरही तसंच भासलं. काही वर्षांपूर्वी मध्यप्रदेशच्या सहलींवरून तक्रारी यायच्या त्या ‘रस्ते खराब आहेत, आमची हाडं खिळखिळी झाली’ ह्याच्या. पण आता परिस्थिती पूर्ण बदललेली वाटली. असं छान सुंदर काही बघितलं की आपल्यालाही उत्साह वाटतो. माझ्यासोबत असलेल्या टूर मॅनेजरला सारंगला मी विचारलं की, ‘‘काय रे मी पंचवीस वर्षांपूर्वी फिरले होते मध्यप्रदेशात एवढं स्वच्छ नव्हतं तेव्हा, असंच आहे का सगळीकडे स्वच्छ साफ सुथरं’’ तर म्हणाला ‘‘बहुतेक सगळीकडे पण थोडं वरच्या साईडला गेलं झांसी-ग्वाल्हेरकडे की अस्वच्छता जाणवते’. त्याच संध्याकाळी आमचे ट्रान्सपोर्टर राकेश चोप्रा भेटायला आले. त्यांना मी म्हटलं की , ‘‘अहो मी आश्‍चर्यात पडलेय ह्या साफसुथर्‍या शहराला-इन्दौरला बघून. कसाकाय हा आमूलाग्र बदल झाला?’’ तर म्हणाले, ‘‘भोपाळला येऊन बघा ते सुद्धा असंच स्वच्छ आणि छान आहे, आवडेल तुम्हाला. रँकप्रमाणे ते दुसर्‍या नंबरचंं साफ सुथरं शहर आहे आपल्या भारतातलं’’. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे तिथल्या प्रशासनाने आधी हे सत्कार्य हाती घेतलं, आपल्याला एक एक करीत शहरं साफ स्वच्छ करायचीत जेणेकरून राज्यही स्वच्छ होईल हा एकच अजेंडा त्यांनी घेतला राजकारण बाजूला ठेवून आणि बघता बघता शहरं स्वच्छ व्हायला लागली. जशी शहरं स्वच्छ व्हायला लागली तसं स्थानिकांनाही ‘हे असं घडू शकतं’ हे बघून प्रशासनावर विश्‍वास बसला, आणि माणसं स्वयंप्रेरित होऊन प्रशासनाच्या ह्या स्वच्छता मोहीमेस मनापासून साथ देऊ लागली. वा! थोडक्या शब्दात त्यांनी मोठं गुपित किंवा ह्या स्वच्छता मोहीमेचं मर्म सांगितलं. प्रशासनातील ज्या कोणा व्यक्तीने हे कार्य सर्वप्रथम हाती घेतलं त्या व्यक्तीला सलाम. आपण बदल घडवू शकतो, लोकांना जनसमुदायाला आपल्या कर्माने आणि कतृत्वाने आपल्यासोबत घेऊ शकतो’ ह्या गोष्टीवर पक्का विश्‍वास असणार ह्या व्यक्तीचा. शहराला स्वच्छ करणार्‍या ह्या व्यक्तीचं मन कसं असेल ह्याचा विचार मी करू लागले. एका धेय्याने प्रेरीत होणारी ही माणसं निश्‍चितपणे आपल्या मनातील विचारांचं डीटॉक्सिफिकेशन-कन्सॉलिडेशन करीत असतील, त्याशिवाय इतके स्ट्राँग विचार येणारच कसे?

कोणतेही प्रशासक हे काही कालावधीसाठी त्या त्या शहरात येत असतील, त्यांची ठरलेली साचेबद्ध कामं करीत असतील, त्यात स्वत:चा एक ठसा उमटवून जात असतील पण असं सर्वव्यापी, सर्वसंतोषी, सर्वसाथीने काम करणं ठराविकांनाच शक्य होत असेल आणि त्यासाठी त्यांनी स्वत:च्या विचारांना प्रचंड कंट्रोलमध्ये ठेवलं असेल. कारण असं काही अशक्यप्राय काम हाती घ्यायचं म्हणजे  प्रथम ‘ह्या फंदात शहाण्याने पडू नये’, ‘हे वाटतं तितकं सोप्पं नाही’‘असं काही करण्याचं मनात आणणं म्हणजे दिवास्वप्न बघण्यासारखं आहे’ ‘मागच्या अमूक अमूक ने हे करण्याचा प्रयत्न केला होता पण त्याची वाट लागली’ अशा मोस्ट मोटिवेटिंग सल्ले देणार्‍या हितचिंतकांचा सामना करावा लागतो. त्यांच्या दृष्टीने अतिशय असाध्य अशी ही गोष्ट असते आणि त्यापासून तुम्हाला परावृत्त करायचं सत्कार्य करण्यासाठी देवाने त्यांची नेमणूक केल्याप्रमाणे ते तुम्हाला सतत असे हितकारक सल्ले देत असतात. आता ह्या हितकारक आप्तजनांना न दुखवणं, आपल्या धेय्यावर विश्‍वास ठेवून त्याचा पाठपुरावा करणं, जे अशक्य वाटतं ते करून दाखवणं आणि ह्या हितचिंतकांच्यातही शक्य झाल्यास हितोपदेशाची दिशा बदलायला लावणं आणि सकारात्मक बनवणं ही सगळी कामं ह्या अशा मोठमोठ्या कर्तृत्ववान माणसांना करावी लागतात. अशा देवतुल्य माणासांची कामं आपण सतत अभ्यासली पाहिजेत, त्यापासून प्रेरणा घेत राहिलं पाहिजे.

जेवढा खोलात जाऊन विचार करू तेवढा ह्या सर्व गोष्टींचा संबंध मनातल्या विचारांप्रतीच पोहोचतो. ‘विचार-कृती-आचार-सवय-जीवनशैली-यशापयश’ म्हणजेच गोष्टींचं मुळंच जर विचार असेल तर ह्या विचारांना संपूर्णपणे स्वच्छ करणं किंवा करीत राहणं अपरिहार्य आहे प्रत्येक व्यक्तीसाठी. एकदा का ती सवय लागली की मार्ग सुकर होत जातो. ‘डीटॉक्सिफिकेशन ऑफ बॉडी’ हे आजकाल सर्वत्र ऐकू येतं. डीटॉक्स ज्यूसेस, डीटॉक्स वॉटर… काय काय आणि किती गोष्टी व्हॉट्स अ‍ॅपवर फॉरवर्ड होत असतात. आपल्या शरीरात रक्त शुद्ध करण्याची एक नैसर्गिक पद्धत जगत्नियत्याने घालून दिलीय आणि त्यानुसार लिवर, किडनी, लंग्ज आपलं काम करीत असतात. फिजिकल डीटॉक्स आपल्याला मोफत मिळालाय म्हणायला हरकत नाही. पण मेंटल डीटॉक्सचा उपाय आपण स्वत:चा स्वत:च शोधून काढायचाय. एकदा का बालवयातली निरागसता संपली, शाळा कॉलेज कॉर्पोरेटच्या स्पर्धात्मक जगात आपला शिरकाव झाला की मनाच्या कवाडांमध्ये टॉक्सिन्सचा शिरकाव व्हायला सुरुवात होते. विचारांचा ताबा घेणार्‍या विषवल्लीला जर वेळेत लगाम घातला नाही तर ती विषवल्ली कधी आपल्याला संपवेल ह्याचा भरोसा नाही. आणि म्हणूनच प्रत्येक वेळी आपल्या घाईगर्दीच्या धावपळीच्या आयुष्यात थोडं थांबावं, शांत व्हावं, मागे वळून पहावं, वर्तमानाचा विचार करावा, भविष्यावर नजर टाकावी. काय करावं? काय करू नये? काय बरोबर? काय चूक? ह्याचा शांतपणे विचार करावा. निवांतपणे आडाखे बांधावे आणि पुन्हा आपल्या धावपळीच्या आयुष्याला नव्या दमाने सामोरं जावं. माझ्या व्यवसायामुळे-सततच्या प्रवासामुळे मला असा वेळ भरपूर मिळतो मग तो विमानप्रवासात असतो किंवा रोड जर्नीमध्ये.

मनात येणार्‍या विचारांना स्काय इज द लिमिट. त्यात बरे-वाईट, प्रशस्त-अप्रशस्त अशा विचारांची जी उत्पत्ती होत असते त्यात सतत क्लिन्सिंग करीत राहणं, डीटॉक्सिफाय करणं ही रोज आंघोळ करण्याइतकी महत्वाची गोष्ट आहे. फिजिकल आणि मेंटल क्लिनलीनेस हा रोज झालाच पाहिजे तरच आपल्या शरीराची आणि मनाची ताजगी कायम राहू शकेल आणि मगच आपल्या हातून चांगली कामं होऊ शकतील. वीणा वर्ल्डचं कॉर्पोरेट ऑफिस असलेल्या बिल्डिंग्ज समुहाचे निळकंठ बिल्डर्सचे मालक श्री मुकेष पटेल ह्यांनी एक कॅलेंडर दिलं होतं. कॅलेंडर चार वर्ष जूनं झालं पण मी त्याचं एकही पान उलटलं नाही. कारण त्याच्या पहिल्या पानावर जे लिहिलंय तेच सतत प्रेरणा देत राहतं. जीवनाचं उद्दिष्ट जाणवून देतं राहतं. त्या पहिल्या पानावर लिहिलंय

‘पिल्ग्रिमेज टू दी पिनॅकल ऑफ प्युरिटी’

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*