Language Marathi

जबाबदारी

कुमार गंधर्व प्रेक्षकांना मायबाप म्हणायचे. आम्ही पर्यटकांना म्हटलं पाहिजे किंवा ते आहेतच, कारण आमच्या भविष्याचं काय करायचं हे सर्वस्वी त्यांच्या हातात आहे. “जन्मदाते मायबाप ही आयुष्याची एक बाजू पण संपूर्ण आयुष्याचा विचार केला तर म्हटल्याप्रमाणे टेक सॅव्ही मायबाप, शिक्षण देणारे मायबाप, विचारांना योग्य दिशा देणारे मायबाप”… अशा अनेक मायबाप मंडळींवर आपण अवलंबून असतो.

मागच्या आठवड्यात वुमन्स स्पेशल आणि सीनियर्स स्पेशल निमित्ताने दुबई दौरा केला. गाला इव्हिनिंगला महिलांना किंवा ज्येष्ठ नागरिकांना प्रत्यक्ष भेटणं होतं, संवाद होतो, सहल कशी चाललीय ते कळतं आणि जशा महिला किंवा ज्येष्ठ नागरिक रीफ्रेश रीज्युविनेट होतात तशीच मी सुध्दा फुल्ल ऑन एनर्जी घेऊन येते त्या हसर्‍या चेहर्‍यांना बघून. आणि त्यामुळेच वीणा वर्ल्डची पुढची वाटचाल दमदार होण्यासाठीच्या माझ्या योगदानात उत्साह संचारतो. पर्यटनामुळे पर्यटकांच्या व्यक्तीमत्वात जी ट्रान्सफॉर्मेशन्स घडतात किंवा दिसतात ती खूप आनंद देऊन जातात. माझं त्याबाबतीलं निरीक्षण सतत सुरू असतं. ह्यात एक गोष्ट मला जाणवली, ती म्हणजे फोटो काढणं. हल्ली प्रोफेशनल कॅमेरा, साधा कॅमेरा सगळंच जवळजवळ काळाच्या पडद्याआड गेलंय आमच्यासारख्या सर्वसाधारण पर्यटकांसाठी. अर्थात, गळ्यात मोठेमोठे एक्स्पेन्सिव्ह एक्सक्लुझिव्ह कॅमेरे लटकवलेले फोटोग्राफीचे प्रेमी पाहिल्यावर त्यांच्याप्रती आदराने मन भरून येतं. हल्ली बाय अ‍ॅन्ड लार्ज सर्व पर्यटक मोबाईल कॅमेर्‍यावर धन्यता मानतात. मोठे एस एल आर, डी एस एल आर कॅमेरे न वापरण्यात आळस आणि नॉन टेक्नोसॅव्ही किंवा टेक्नॉलॉजिची भीती हाही भाग आहेच. असो, तर जनरली जेव्हा मोबाईलने फोटो काढले जातात तेव्हा अनेक गोष्टी जाणवतात.

मोबाईल कंपन्यांनी अ‍ॅक्च्युअली ‘फोन कम कॅमेरा जादा’ किंवा ‘फोटोवाला फोन’ किंवा ‘कॅमेरा फोन’ अशी क्रांती केल्याने त्यातला फोटो काढणं हा प्रकार अधिकाधिक सोप्पा होत गेला. स्पर्धेवर मात करण्यासाठी किंवा स्पर्धेत टिकून राहाण्यासाठी मोबाईलच्या अनेक फीचर्समध्ये कॅमेरा कायम अग्रस्थानी राहीला. आणि त्यामुळेच तो जास्तीत जास्त सोप्पा आणि चांगला होत गेला. ‘शॉट ऑन आयफोन’ ह्या जाहिरातीने अनेकांना घायाळ केलं किंवा करताहेत, मानसिक आणि आर्थिकदृष्ट्याही. तर अशा ह्या सोप्प्यात सोप्प्या मोबाईल फोनला वापरताना काही ज्येष्ठ महिलांची किंवा पुरूषमंडळींची दमछाक होते. पहिल्यांदा तो फोन सुरू करावा लागतो, नंतर त्यात कॅमेरा आयकॉन शोधावा लागतो, तो आयकॉन शोधून फोटो काढायच्या वेळेपर्यंत कधी कधी फोन लॉक होतो. मग पुन्हा ते सगळं ऑपरेशन करावं लागतं, बरं अशावेळी कोणी बघत असेल तर थोडं खजिल व्हायला होतं. फोटो काढल्यावर कॅमेरा पटकन खाली केला जातो त्यामुळे समोरचा फोटो न येता फोटोत भलताच अँगल कॅप्चर होतो. कधी कॅमेरा सेल्फी मोडवर असेल तर तो पुन्हा नॉर्मलला आणण्यासाठी काय करायचं ते माहीत नसतं अर्थात त्यावेळी बाजूला असलेली यंग मंडळी मदत करतात ही गोष्ट वेगळी. फोटो किती जवळून घ्यायचा? किती दुरून घ्यायचा हेही कळत नाही. हे मी लिहू शकते कारण मीही कॅमेरा सॅव्ही नसल्याने माझ्याही बाबतीत कधीतरी ह्या सगळ्या गोष्टी घडल्यात.

ज्यावेळी घरातली ज्येष्ठ मंडळी सहलीला निघतात किंवा मुलगा, मुलगी, नातवंडं आपल्या आई-बाबांना किंवा आजी-आजोबांना असे स्मार्ट फोन देतात तेव्हा तो सोप्प्या फीचर्सवाला मोबाईल फोन अधिक सोप्पा करून देण्याची जबाबदारी ही घराल्या यंगस्टर्सची आहे. पहिल्यांदा म्हणजे जेवढे आयकॉन्स ही ज्येष्ठ मंडळी वापरणार आहेत तेवढेच आयकॉन ओपन असावेत किंवा फोनच्या पहिल्या स्क्रीनवर असावेत. म्हणजे मगाशी मी म्हटलं त्यात कॅमेरा आयकॉन हा दुसर्‍या स्क्रीन पेजवर असतो, कुठेतरी अधेमध्ये असतो त्यामुळे शोधाशोध करावी लागते. अगदी प्रत्येक सहलीला हा अनुभव येतोच येतो. त्यामुळे मी तर म्हणेन, “आज रविवार आहे, यंगस्टर मंडळी घरी असतील तर आई-बाबांचा किंवा आजी-आजोबांचा फोन सॉर्टेड करून द्या. थोडा वेळ जाईल पण आपल्या ज्येष्ठ मंडळींचं आयुष्य सुसह्य होईल, नो डाऊट. फोन हा जर दैनंदिन जीवनाचा भाग असेल तर तो सोप्पा करून दिलाच पाहिजे.

छोट्या-छोट्या गोष्टी असतात. पहिल्यांदा म्हणजे आपल्या घरातील ज्येष्ठ नागरिकांना काय काय लागतं ते अभ्यासावं किंवा त्यांना त्यांच्या गरजेनुसार काय काय द्यायला पाहिजे ते आधी पहिल्या स्क्रीनवर आणावं, त्यानंतर ते फोन कसा वापरतात ते चेक करावं, त्यांना लागणारे अतिमहत्वाचे आयकॉन्स त्यांना सोयीच्या ठिकाणी स्क्रीनवर द्यावेत. मेसेज-व्हॉट्स अ‍ॅप-फोन-कॅमेरा, घड्याळ-कॅलेंडर-नोट्स-कॅल्क्युलेटर, सेटिंग्ज-सफारी-गुगल-मेल, यु ट्युब-फोटो-न्यूजपेपर-टी.व्ही, फेसबूक-फेसटाईम-स्काईप- मॅप, ग्रोसरी व शॉपिंग वापराप्रमाणे, एन्टरटेनमेंट- नेटफ्लीक्स, ओझी-हॉट स्टार-प्राइम व्हिडीयो असे नीट ग्रुप्स करून ते वापराप्रमाणे वर-खाली पहिल्या पानावर किंवा दुसर्‍या पानावर केले तर बर्‍यापैकी शोधाशोधीचा त्रास वाचेल. एखादं कपाट व्यवस्थित लावण्याचाच हा प्रकार. प्रत्येक वस्तूसाठी जागा आणि त्या त्या जागेवर प्रत्येक वस्तू. तसंच त्यांच्या उपयोगाच्या फ्रीक्वेन्सीनुसार वर-खाली, डाव्या-उजव्या बाजूला तो आयकॉन करून द्यायचा. तुम्ही म्हणाल, ‘ह्या गोष्टी काय आम्हाला समजत नाहीत का?’ पण सहलीवर जेव्हा काही पर्यटकांची ती दमछाक दिसते तेव्हा त्याबाबत काहीतरी करायला पाहिजे हे जाणवतं आणि त्या कळकळीतूनच ही जबाबदारी घरातल्या तरुणांवर सोपवायचं काम मी हक्काने सांगतेय.

आपल्या घरातली ज्येष्ठ मंडळी जेव्हा पर्यटनाला निघतात तेव्हा त्यांना ‘फोनस्मार्ट’ करणं (अर्थात हे फोन घेतल्या घेतल्याच झालं पाहिजे) घरातल्या तरुण मंडळींचं काम आहे तसंच त्यांना ‘स्मार्ट ट्रॅव्हलर’ करणं हे सुध्दा. आई-बाबांनी किंवा आजोबा-आजींनी कपडे कोणते घालावे, कसे घालावे, कसं स्मार्ट दिसावं ही जबाबदारीही तरुण मंडळींची आहेच. त्याने एकमेकांमधला संवाद वाढेल आणि आनंदही. थोडक्यात मोठ्यांच्या आयुष्याला नव्या युगात नव्याने आकार देणारे त्यांचे ‘मायबाप’ तरुणांनी बनायचंय. ‘टेक सॅव्ही मॉडर्न मायबाप’ म्हणूया आपण ह्या तरुण पिढीला.

कुमार गंधर्व प्रेक्षकांना मायबाप म्हणायचे. आम्ही पर्यटकांना म्हटलं पाहिजे किंवा ते आहेतच कारण आमच्या भविष्याचं काय करायचं हे सर्वस्वी त्यांच्या हातात आहे. “जन्मदाते मायबाप ही आयुष्याची एक बाजू पण संपूर्ण आयुष्याचा विचार केला तर वर म्हटल्याप्रमाणे, टेक सॅव्ही मायबाप, शिक्षण देणारे मायबाप, विचारांना योग्य दिशा देणारे मायबाप”…अशा अनेक मायबाप मंडळींवर आपण अवलंबून असतो. कुणीही संपूर्णपणे परफेक्शनिस्ट नाही किंवा कुणा एका माणसाला सर्व समजतं असं होऊ शकत नाही, त्यामुळे एकमेकांवर अवलंबून राहून आपल्याला आपलं वैयक्तिक आयुष्य पुढे न्यायचंय. प्रेक्षक, पर्यटक, टीम मेंबर्स, असोसिएट्स, मुलं, नातवंडं, पती-पत्नी अशा सगळ्यांनी मिळून बनलेल्या आयुष्यात आळीपाळीने मायबाप बनण्याची जबाबदारी येते किंवा ती पार पाडावी लागते. ‘इगो मध्ये आणून जबाबदारीची गल्लत होऊ द्यायची नाही’ टेक सॅव्ही नातवंडांप्रमाणे ज्याला जे चांगलं येतं ते त्याने मायबाप बनून दुसर्‍यांना द्यावं आणि दुसर्‍यांनी त्याच्या एक्सपर्टीजला मानून ते आनंदाने स्विकारावं अशी छान लेन-देन झाली तर… खर्‍या अर्थाने, ‘एकमेका साह्य करू, अवघे धरू सुपंथ’, अशी कुटुंब-समाज-देश- वाटचाल सुरळीत होईल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*