Language Marathi

अॅम्प्लिफाय

आपण काय करतो आणि आपण काय करायला पाहिजे ही आपली स्वत:ची स्वत:शीच सततची लढाई आहे किंवा हा यक्षप्रश्‍न आहे. जागतिकीकरणातल्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी आपण ह्या प्रश्‍नाची जेवढी लवकरात लवकर उकल करू तेवढं आपलं मानसिक, शारीरिक, कौटुंबिक, व्यावसायिक, आर्थिक आयुष्य सुसह्य होणार आहे

सिडनी मुंबई असा ट्रांझिट टाइम धरून बावीस तासांचा प्रवास करून मुंबईला उतरले. सकाळचे आठ वाजले होते. घरी जाऊन फ्रेश होऊन ऑफिसला जावं की इतकी दगदग झाल्यावर झोप पूर्ण करावी हे द्वंद्व सुरु होतं मनातल्या मनात. लागलीच वुमन्स स्पेशल, सीनियर्स स्पेशलच्या पर्यटकांना भेटायला भुतानला जायचं होतं, आधीच ऑफिसमध्ये वेळ कमी मिळत होता त्यामुळे खरंतर ऑफिसला जाणं ही योग्य गोष्ट होती पण समोर हे ही दिसत होतं की ह्या झोपाळलेल्या, दमलेल्या अवस्थेत ऑफिसला जाऊन मी खरंच काही काम करु शकणार होते का? की तिथल्या टीमच्या उत्साहाला मी थकवा आणणार होते. हो, आपण उत्साही तर समोरची माणसं उत्साही, वातावरण उत्साही. आपण दमलेलो असलो की समोरचा माहोलही तसाच होतो. आमच्या टूर मॅनेजरच्या ट्रेनिंगमध्ये ह्याच गोष्टीवर भर दिला जातो की, ‘आपण उत्साह वाटण्याच्या व्यवसायात आहोत आणि तो आपण तेव्हाच वाटू शकतो जेव्हा आपल्याकडे तो मुबलक प्रमाणात असतो’. माझंही तसंच होतं त्या दिवशी, ऑफिसला जाणं ही गरज होती पण त्यासाठीचा उत्साह त्या थकलेल्या अवस्थेत आणायचा कुठून? त्याला एकच पर्याय होता आणि तो म्हणजे अ‍ॅम्प्लिफाय युवरसेल्फ; पटकन जीममध्ये जा, चालून ये, जॉगिंग कर किंवा स्विमिंगला जा. मग पुन्हा द्वंद्व, आता नऊ वाजता वॉकला जायचं म्हणजे उन्हात तापायला होणार, जीममध्ये? नको, कंटाळा येतो, स्विमिंग? बापरे!  थंडी सुरू झालीय, पाणी किती थंड असेल आणि सध्या सर्दी तापाची साथ पण सुरु आहे. ‘टू बी ऑर नॉट टू बी?’ लढा सुरू. आणि माझ्या मनातले सगळे निगेटिव्ह फोर्सेस शांतपणे ‘फ्रेश हो आणि ऑफिसला जा’ असं सांगत होते तर एकच विचार त्या गर्दीतून कसाबसा बाहेर येऊन मला सांगत होता, बाई ऑफिसला जाणार असशील तर एकतरी एक्सरसाईज कर आणि मग ऑफिसला जा, अन्यथा आजच्या दिवसातील तुझी गाडी रडतखडत पुढे जाईल. त्या झोपाळलेल्या अवस्थेत माझ्यातल्या थोेड्याफार प्रमाणात जागृत असलेल्या सदसद्विवेकबुद्धीने मला ढकललं स्विमिंगसाठी आणि मी

‘टू बी ऑर नॉट टू बी’ ह्या प्रचंड मोठ्या गोंधळाला बाजूला करीत थंड पाण्यात झोकून दिलं. मलाच माझ्यावर विजय मिळवल्यासारखं झालं आणि त्या स्विमिंगने खरोखर माझा थकवा कुठच्या कुठे पळाला आणि रोजच्या दैनंदिनीनुसार मी ऑफिसमधला तो दिवस उत्साहात कारणी लावला. बरं दिवसभर काम केल्यामुळे रात्री लवकर झोप आली आणि दुसर्‍या दिवशी पुन्हा माझं रूटीन व्यवस्थित झालं, जेटलॅगमधून बाहेर यायला त्रास झाला नाही.

थोडक्यात मी मला स्वत:ला अ‍ॅम्प्लिफाय केलं आणि ऑर्गनायझेशनला माझा जो काही वेळ द्यायचा होता तो पूर्णपणे दिला, सत्कारणी लावला. पाडगावकरांच्या कवितेप्रमाणे, ‘आयुष्य कण्हत कण्हत जगायचं की गाणं म्हणत’ यातल्या गाणं म्हणण्याच्या अर्थात आनंदी राहण्याच्या पर्यायाची सतत निवड करीत राहणं हे आपल्याला जमलं तर आयुष्याची अर्धी लढाई आपण जिंकली. निसर्गाने बोनस म्हणून दिलेल्या प्रत्येक दिवसाचं सोनं करणं आपल्या हातात आहे. त्या एकेका दिवसानेच तर आयुष्य बनलंय. तेव्हा कोणत्याही परिस्थितीत आपल्याला अ‍ॅम्प्लिफाय करायलाच हवं. परिस्थिती काय येणार आपल्या हातात नाही पण मन:स्थिती तर निश्‍चितपणे आपल्या पूर्ण कंट्रोलमध्ये आहे आणि जर आपण मन:स्थिती सशक्त करु शकलो तर परिस्थिती बदलता येते हे आपल्या आणि अनेकांच्या बाबतीत आपण पाहिलेलं आहे. मग का नाही तसं करायचं? तिच तर काळाची गरज आहे. जागतिकीकरणाने आपलं आयुष्य तांत्रिकदृष्ठ्या खूप सुलभ केलंय पण त्याचवेळी जीवघेणी स्पर्धा आणि जगाच्या प्रगतीचा सुपरफास्ट असा वेग आपल्याला अनेक आव्हानांना सामोरं जायला लावतोय. ‘फेस इट् ऑर फिनिश’चा हा जमाना आहे. फिनिश हा मार्ग तर आपल्याला मान्य नाही मग ‘फेस इट्’ हाच पर्याय अपरिहार्य असेल तर त्यासाठी आपल्या सर्वांनाच तयार व्हायला पाहिजे. कार्यालयाची, कुटुंबाची, शरीराची, मनाची घडी नीट बसवायलाच पाहिजे. जेवढ्या शक्य होतील तेवढ्या गोष्टी सोप्या करीत गेलं पाहिजे आणि मन तेवढंच खंबीर आणि सशक्त. अतिरेक करायचा नाही पण शिस्त काटेकोरपणा ह्या गोष्टी आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवून एका ऑर्गनाइज्ड लाईफस्टाईलची सवय करवून घ्यायला पाहिजे. हे लिहितेय तेवढं सोप्प नाहीये याची मलाही जाणीव आहे. ‘टू बी ऑर नॉट टू बी’ हे द्वंद्व सतत सुरूच राहणार आहे पण त्यातही आपल्याला योग्य तो निर्णय सातत्याने घ्यायची गरज लागणार आहे.

‘हाऊ टू मॅनेज’,‘कसं सगळं हे पेलायचं?’ कसं कोप अप करायचं? सध्या ह्यावरच विचार सुरू आहे कारण चार वर्षांपूर्वी जेव्हा वीणा वर्ल्ड सुरू झालं तेव्हा परिस्थिती वेगळी होती आपल्या सर्वांच्या पाठिंब्याने वीणा वर्ल्ड दिमाखात उभं राहीलं, सप्तखंडावर स्वार झालं आणि आता एक कॉर्पोरेट म्हणून मल्टिनॅशनलच्या स्पर्धेत उभं राहीलं. विविध देशांमधल्या ऑलरेडी एस्टॅब्लिश्ड कंपन्यांची स्पर्धा जेव्हा आपल्यासमोर एक आव्हान म्हणून उभी राहते तेव्हा ऑर्गनायझेशन म्हणून आपल्याला त्या जागतिक दृष्टीकोनातून आपल्याच संस्थेकडे तटस्थ म्हणून बघावं लागतं. येणारी आव्हानं काय असतील? आत्ता आपण काय करतोय? आपल्याला नक्की काय करायला पाहिजे? कोणते बदल आपल्या कामात, व्यक्तिमत्वात, आचरणात करायला पाहिजेत? ह्याचा अतिशय सकारात्मक दृष्टीकोनातून विचार करायला पाहिजे. ज्या तर्‍हेने पूर्वी काम केलं ती पद्धत कदाचित आज चालणार नाही ह्या सगळ्याचा विचार करणं, तो पटवून देणं, समोरच्यांनी तो स्विकारणं, येणार्‍या आव्हानांसाठी फक्त आपली स्वत:चीच नाही तर संपूर्ण वीणा वर्ल्ड टीमची मानसिकता तयार करणं हे रोजच्या कामांसोबत करावं लागणार आहे. शेवटी आपल्या प्रत्येकाकडे दिवसाचे चोवीस तासच आहेत, एकच ब्रेन आहे, दोनच हात आहेत, दोनच पाय आहेत त्यात तर बदल होणार नाही पण जीवनशैलीत बदल करून ह्या एका ब्रेनमधून, दोन पायांतून, दोन हातांतून आपण बरंच काही सकारात्मक असं करून घेऊ शकतो जर आपण प्रत्येकाने स्वत:ला, स्वत:च्या शक्तीला, स्वत:च्या विचारांना अ‍ॅम्प्लिफाय केलं तर.

लहानपणी आम्ही मथाणे ह्या गावी राहायचो, तेव्हा रेडिओ ही लक्झरी होती. रेडिओ ऐकायला माणसं एकत्र जमत, कान देऊन बातम्या ऐकत. कारण रेडिओचा आवाज अमूक एका पट्टीपर्यंतच मोठा व्हायचा. काही दिवसांनी

टेप रेकॉर्डर आला गावात, त्यानंतर लाऊडस्पीकर आणला आमच्या अरविंद काकांनी. अ‍ॅम्प्लिफायर ही गोष्ट तेव्हा कळली. असलेला आवाज आणखी मोठा करण्यासाठीचं ते यंत्र आवडलं आणि त्याचं नावही… ‘अ‍ॅम्प्लिफायर’. आज सभोवतालचा आवाज खूपच वाढलाय आणि लोक नॉइज कॅन्सलिंग हेडफोन्स वापरायला लागलेत ही गोष्ट वेगळी. मात्र बदललेल्या ह्या आवाजी, स्पर्धात्मक जगाच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी आपण आपल्या स्वत:ला एक अ‍ॅम्प्लिफायर लावायला पाहिजे जो आपले विचार, शक्ती, उत्साह, चैतन्य वाढवेल. लेट्स अ‍ॅम्प्लिफाय अवरसेल्व्हज् इन अ व्हेरी पॉझिटिव्ह वे!

 

गेल्या रविवारी चुकून खालील मजकूर लिहायचा राहीला होता. क्षमस्व!

व्हॉट्सअ‍ॅपद्वारे पैसे मिळविण्याचा मार्ग…

‘गो टू सेटिंग-टॅप ऑन ‘लिव्ह द ग्रूप’-गो टू वर्क’

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*