Published in the Sunday Tarun Bharat on 17 August 2025
...इथे समुद्र क्षणात शांत असतो, तर क्षणात अशक्य कोटीतील खवळलेला. आमचं हे एक्सपीडिशन आव्हानात्मक होतं, पण काही त्रास झाला नाही. आम्ही व्यवस्थित जेवू शकलो, प्रसंगी हातातली प्लेट सांभाळताना थोडी कसरत करावी लागत होती...
ट्रायपॉडवर कॅमेरा ठेवून मी शांतपणे उभी होते. छोट्याशा, पण लक्ष वेधून घेणाऱ्या त्या दृश्याने मी मोहित झाले होते. एक पेंग्विन अतिशय काळजीपूर्वक छोटे दगडगोटे गोळा करीत होता. प्रत्येक दगड निवडून आणि विशिष्ट हेतूने उचललाय हे दिसत होतं. दुसऱ्या दगडाच्या शोधात त्याची पाठ वळली की दुसरा एक पेंग्विन येऊन त्या गोळा केलेल्या दगडगोट्यातून त्याला हवा तो दगड शिताफीने पळवत होता. चोरीचा हा सिलसिला बराच काळ सुरू होता. अखेर पहिल्या पेंग्विनच्या ही लबाडी लक्षात आलीच. मग त्या दोघांमध्ये थोडी वादावादी झाली. त्या वादाचा उलगडा एक्सपीडिशन संपवून क्रूझवर परतल्यावर झाला. आमच्या एक्सपीडिशन लीडरने पेंग्विनच्या प्रजननाची गोष्ट सांगितली. त्या सर्व प्रक्रियेत घरटं बांधणं हा अतिशय महत्त्वाचा भाग असतो. त्यावर त्यांचं सहजीवन अवलंबून असतं आणि त्यासाठीच सुरू होता मगाशी चालू असलेला आटापिटा.
तो निवांत, नैसर्गिक आणि तरल क्षण माझ्या कायम आठवणीत राहिला आहे. असे क्षण आपला प्रवास अर्थपूर्ण करतात. फार पूर्वी म्हणजे टूर मॅनेजर म्हणून काम करत असताना मी पर्यटकांच्या अनेक ग्रुप्सना एकापेक्षा एक हटके ठिकाणी घेऊन गेले आहे, पण त्यापैकी कशाचीही तुलना अंटार्क्टिकाशी होऊ शकत नाही. तिथला प्रत्येक क्षण कोणता ना कोणता वेगळाच अनुभव देऊन जातो. डोळे बंद करून अशा एखाद्या संस्मरणीय प्रवासाचा विचार करायचा झाला तर माझ्या डोळ्यासमोर अंटार्क्टिकाच येईल!
अंटार्क्टिकाच का?
अंटार्क्टिका हे साधंसुधं ठिकाण नाहीये. अजूनही जिथे रोज काहीतरी नवीन सापडतं अशी ही भूमी आहे. तिथे गजबजलेली शहरं नाहीत, गर्दी नाही की व्यावसायिक खरेदीच्या जत्रा नाहीत. इथे आवर्जून येणाऱ्यांना त्या जागेचा आणि तिथल्या वातावरणाचा अनुभव घ्यायचा असतो. काळवेळाची गणितं न मानणारी अशी ही जागा. पृथ्वीवरील इतर भागांप्रमाणे अंटार्क्टिकामध्ये सीमा, स्थानिक लोक, सरकार यातलं काही नाही. विशेष म्हणजे त्या भागावर कोणा एका देशाची मालकीही नाही. अंटार्क्टिका कराराने हा भाग संरक्षित करण्यात आला आहे. या करारानुसार, संशोधन आणि पर्यावरणीय संवर्धन करण्यासाठी हा प्रदेश राखीव ठेवण्यात आला आहे. अंटार्क्टिका हा खऱ्या अर्थाने सगळ्या जगाचा भाग आहे. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने अंटार्क्टिकामधील प्रवासावर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यातच, या संपूर्ण भागाच्या रचनेमुळे तिथल्या प्रवेशावरही मर्यादा आहेत. म्हणूनच इथे जाण्याची ओढ सर्वात जास्त असते. जगातला प्रत्येक कानाकोपरा छायाचित्रात बंदिस्त होऊन समाजमाध्यमांवर प्रकटलेला आहे. परंतु, अंटार्क्टिका मात्र अजूनही त्या दृष्टीने प्रकाशझोतात न आलेला प्रदेश आहे.
उशुआया : पांढऱ्याशुभ्र प्रदेशाचे प्रवेशद्वार
अंटार्क्टिकाच्या बहुतांश मोहिमा अर्जेंटिनातील उशुआयामधून सुरू होतात. मीही तिथूनच सुरुवात केली. अर्जेंटिनातील उशुआया हे जगातलं सगळ्यात दक्षिणेकडचं शहर आहे. प्रसन्न हवा, पर्वतराजी आणि रंगीबेरंगी बंदरे यामुळे या शहराला एक वेगळाच तजेला मिळालेला आहे. खऱ्या अर्थाने हे जगाचं टोक आहे. इथे या एक्सपीडिशनसाठी आवश्यक असलेली चालताना आधार देणारी स्टिक, हातमोजे यांसारख्या आवश्यक गोष्टी भाड्यानेही मिळतात. अर्थात, आता तर भारतातून निघतानाही आपण अंटार्क्टिका एक्सपीडिशनसाठी आवश्यक असणाऱ्या सगळ्या गोष्टी अतिशय सहजपणे सोबत घेऊन जाऊ शकतो.
जहाजाची निवड - आकार व उद्देश महत्त्वाचा!
अंटार्क्टिकाचा प्रवास म्हणजे जगाच्या शेवटच्या खंडात, पूर्णपणे बर्फाळलेल्या किनाऱ्यावरचा, अतिशीत हवेत, पेंग्विन्स जवळून पाहत केलेला प्रवास. आणि म्हणूनच आपण कोणतं जहाज निवडतो याला महत्त्व आहे. आपण या प्रवासासाठी छोटेखानी क्रुझची निवड करणं कधीही उत्तम. मोठी जहाजं एक-दोन दिवसच अंटार्क्टिकामध्ये राहू शकतात. तसंच, त्यांच्यावरून प्रत्यक्ष जमिनीवर उतरण्याचा अनुभव क्वचितच मिळतो. बर्फाळ दऱ्या, हिमनग यांचं दुर्बिणीतून दर्शन घ्यायचं असेल तर अशा क्रुझने जावं.
'वीणा वर्ल्ड'मधून मी, नील, सुधीर आणि वीणा अशा चौघांनीही अंटार्क्टिकाला भेट दिली आहे. आमच्या टूर मॅनेजर्सनीही हा भाग पाहिलेला आहे. इथे येण्याचा उत्तमातील उत्तम अनुभव आपल्या गेस्ट्सना मिळावा हाच आमचा प्राथमिक उद्देश असतो. म्हणूनच वीणा वर्ल्डच्या अंटार्क्टिका मोहिमा या छोट्या आणि विशिष्ट उद्देशाने आखलेल्या असतात. छोटेखानी जहाज निवडताना सुद्धा त्या जहाजावरून किनाऱ्यावर चढ-उतार करता येऊ शकेल यासाठी सोबत छोट्या बोटी असाव्यात, यावर आमचा कटाक्ष असतो. आमच्या टूर्समध्ये जनरली सहा ते सात दिवसांचा कार्यक्रम आखलेला असतो. या टूरमध्ये अंटार्क्टिक पेनिन्सुला आणि साऊथ शेटलँड आयलंडस् अनुभवण्याची संधी मिळते. छोटेखानी जहाजामुळे आपल्याला अंटार्क्टिकाचा अत्यंत जवळून अनुभव घेता येतो. आम्ही तर बर्फावर उतरून पेंग्विन्सच्या कॉलनीज् मधून प्रवास केला आहे. हिमनगाच्या शेजारी थांबून सील आणि व्हेल माशांच्या हालचाली जवळून पाहिल्या आहेत.
जहाजावरचा अनुभव
जहाजावरचा रोजचा दिवस हा निसर्गाच्या कलांनी आखलेला असतो. समुद्राच्या त्यावेळच्या परिस्थितीचा अंदाज घेऊन किनाऱ्यावर उतरण्याची वेळ निश्चित केली जाते. अंटार्क्टिकामधील हवामान कधीही आणि अतिशय वेगानं बदलू शकतं. त्यामुळे या एक्सपीडिशन वरच्या सर्व पाहुण्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिलं जातं. स्वाभाविकच ठरलेल्या कार्यक्रमात सतत बदल होणं हा इथला नित्यक्रम असतो.
जहाजावरून झोडियाक क्रुझेसच्या मदतीने खाली किनाऱ्यावर उतरता येतं आणि दुर्गम भागातील किनारे आणि बर्फाच्छादित पर्वतरांगा पाहता येतात. एके दिवशी आम्हाला एक मोठा हिमनग तुटून पडताना दिसला. तो पाण्यात इतक्या जोरात आदळला की समुद्रात त्या ठिकाणी फट पडल्यासारखं जाणवलं. हा अंटार्क्टिकाची खूण पटवणारा आठवणीत राहण्यासारखा अनुभव होता.
अंटार्क्टिकावरचा आणखी एक अनुभव म्हणजे पोलार प्लंज. आयुष्यात क्वचितच मिळणारा हा अनुभव घेण्याची संधी मला मिळाली. मी काही सहप्रवाशांबरोबर सगळा धीर एकवटून ही प्लंज मारली. त्या थंडगार पाण्याने आम्हाला आमच्या अस्तित्त्वाची खऱ्या अर्थानं जाणीव करून दिली.
अशाच एका संध्याकाळी मी डेकवर उभी असताना आकाशाचे रंग अचानक बदलायला लागले आणि मला संधीप्रकाशाचं विलोभनीय दृश्य दिसलं. शेजारीच व्हेल्सही बागडत होते. तो एक अवर्णनीय आणि अद्भुत असा आनंदाचा क्षण होता.
वेशभूषा
बऱ्याच जणांना अंटार्क्टिकाला जाण्याची इच्छा असते, परंतु तेथील थंड हवामान सहन होईल की नाही याविषयी त्यांच्या मनात शंका असते. अंटार्क्टिकाला जाणाऱ्या क्रुझ तिथल्या एक्सपीडिशन्ससाठी उन्हाळ्याचीच निवड करतात. त्यासोबत योग्य साधनं असतील तर आपलं हे एक्सपीडिशन अतिशय संस्मरणीय होतं. या एक्सपीडिशनवर जायचं तर कपडे, शूज हे वॉटरप्रुफ असावे लागतात. कान झाकलेले असणं इथे अत्यावश्यक असतं.
ड्रेक पॅसेज ओलांडणं : एक चित्तथरारक प्रवास.
ड्रेक पॅसेजपर्यंतचा प्रवास म्हणजे एक वेगळाच अनुभव असतो. त्यात आपल्या शारीरिक आणि भावनिक क्षमतांची चांगलीच कसोटी लागते. इथे समुद्र क्षणात शांत असतो, तर क्षणात अशक्य कोटीतील खवळलेला. आमचं हे एक्सपीडिशन आव्हानात्मक होतं, पण काही त्रास झाला नाही. आम्ही व्यवस्थित जेवू शकलो, प्रसंगी हातातली प्लेट सांभाळताना थोडी कसरत करावी लागत होती. खवळलेल्या समुद्रातल्या त्या जेवणात प्रेम होतं आणि पोषणही. आम्हाला अशा खवळत्या समुद्रात भरपेट देऊ केलेलं हे जेवण म्हणजे हा प्रवास त्या क्रुझवरच्या किचन स्टाफसाठी नित्याचाच असल्याची हमीही होती.
अंटार्क्टिकावर पाय ठेवले...शब्दातीत अनुभव
आयुष्यात प्रथमच अंटार्क्टिकावर पाय ठेवला तो अनुभव शब्दातीत आहे. बर्फाची जाणीव... तजेलदार हवा मी मनसोक्त अनुभवली आणि लक्षात आलं की, अंटार्क्टिकावर आलेल्या जगातल्या मोजक्याच लोकांपैकी आपण एक आहोत. त्यावेळी मी टूर मॅनेजर होते. माझ्यासोबत आलेल्या पाहुण्यांच्या भावनाही मी निरखून पाहत होते. ते सगळे भावनाविवश झाले होते. पहिले काही क्षण त्यांचा आपण अंटार्क्टिकावर आहोत यावर विश्वासच बसत नव्हता. त्याक्षणी खात्री पटली की हे केवळ पर्यटनस्थळ नाही, तर हा एक जबरदस्त अनुभव आहे.
अंटार्क्टिकाची शिकवण
अंटार्क्टिका हे ठिकाण आपल्याला अंर्तबाह्य बदलून टाकतं. पेंग्विनच्या शिस्तबद्ध कॉलनीज्, बुद्धिमान व्हेल मासे, आपल्याच धुंदीत राहणारे सील यांच्या सोबतीने केलेल्या प्रवासातून मला जगण्याबद्दलचा निर्मळ, निखळ दृष्टिकोन मिळाला. आपल्याला त्या प्राण्यांविषयी आदर आहे हे आपल्या वावरण्यातूनच त्यांनाही जाणवत असावं. ती भूमी, तिथली शांतता, त्याची विस्तीर्णता यातून आपल्याला सहनशीलता आणि नम्रतेची शिकवण मिळते. हे ठिकाण आपल्याला निरामय शांततेचा अनुभव देतं. आपल्याला विचार करायला, अंतर्मुख व्हायला अवधी मिळतो. थोडक्यात, हा प्रवास, ते क्षण आपल्यासोबत कायम राहतात.
अंटार्क्टिकाला एखादा ग्रुप घेऊन जाणं ही केवळ व्यावसायिक जबाबदारी नसते, तर तो एक सन्मान असतो. आमच्या टूर मॅनेजर्ससाठी हा अत्यंत अभिमानाचा क्षण असतो. संपर्कात आलेल्या प्रत्येकाला हा खंड आमूलाग्र बदलून टाकतो आणि कुतुहल जागं करतो. योग्य नियोजन, सुयोग्य जहाज आणि उत्तम मार्गदर्शन मिळालं तर अंटार्क्टिकाची भेट अविस्मरणीय ठरते. जगाविषयीची आपली जाणीव प्रगल्भ होते.
अशा या पृथ्वीवरच्या सगळ्यात शांत, कोणत्याही हस्तक्षेपापासून दूर असलेल्या, जिथे काळही थांबून राहिला आहे अशा या जागी जाऊन अंटार्क्टिकाच्या बर्फावर उभं राहण्याची आणि स्वत:लाच नव्याने भेटण्याची संधी घ्यायला तुम्हालाही नक्कीच आवडेल, नाही का?
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.