IndiaIndia
WorldWorld
Our Toll Free Numbers:

1800 22 7979

1800 313 5555

You can also call us on:

+91 22 2101 7979

+91 22 2101 6969

Foreign Nationals/NRIs travelling

Within India+91 915 200 4511

Outside India+91 887 997 2221

Business hours: 10AM - 7PM

Our Toll Free Numbers:

1800 22 7979

1800 313 5555

You can also call us on:

+91 22 2101 7979

+91 22 2101 6969

Foreign Nationals/NRIs travelling

Within India+91 915 200 4511

Outside India+91 887 997 2221

Business hours: 10AM - 7PM

सुंदरबन

16 mins. read

Published in the Sunday Sakal on 17 August 2025

आपल्या भारतात असं एक ठिकाण आहे, जिथे पाय ठेवताच आपण एका वेगळ्याच जगात पोहोचतो. हे जग असतं रहस्य, रोमांच आणि नैसर्गिक सौंदर्याने भरलेलं. जिथे गंगा, ब्रह्मपुत्रा आणि मेघना या नद्या एकत्र येऊन बंगालच्या उपसागराला मिळतात. तिथेच पसरलेलं आहे जगातलं सर्वात मोठं मँग्रुव्ह फॉरेस्ट, सुंदरबन. पश्चिम बंगालपासून थेट बांगलादेशापर्यंत पसरलेलं हे 38,500 चौरस किलोमीटर वरचं हिरवंगार, रहस्यमय जग म्हणजे निसर्गाचा अद्भुत चमत्कारच. इथली फॉरेस्ट सफारी जीपमधून केलेली नसते, तर पाण्यात बोटीच्या सहाय्याने केलेली असते. वळणावळणाच्या खाड्या, संथ वाहणारं पाणी आणि दूरवरून येणारा एखाद्या पक्ष्याचा निनाद ही अनुभूती खरोखरीच शब्दांत मावणारी नाही. सकाळी सूर्य उगवत असताना पाण्यात पडणारं त्याचं सोनसळी प्रतिबिंब, आजूबाजूची शांतता हे दृश्य डोळ्यात साठवून ठेवावं असंच आहे.

या जंगलाला सुंदरबन हे नाव पडलंय ते त्या ठिकाणी विपुल प्रमाणात आढळणाऱ्या सुंदरी या झाडांवरून. 80 हून अधिक मँग्रुव्हच्या प्रजाती, खारट पाण्याच्या खाड्या, चिखलाचे सपाट पट्टे आणि छोटी छोटी बेटं, हे दृश्य एखाद्या चित्रपटातील सेटपेक्षा कमी नाही. सुंदरबनचा रिअल हिरो आहे आपला ‌‘रॉयल बंगाल टायगर‌’. इथला वाघ हा इतर ठिकाणच्या वाघांसारखा आरामात बसणारा नाही, हा पाण्यातून पोहत बेटं बदलतो! वाघ दिसणं ही लॉटरीच, पण तो दिसो किंवा न दिसो, त्याच्या प्रदेशात बोट सफारी करणं म्हणजे अंगावर रोमांच उभे राहतील असा अनुभव. सुंदरबन फक्त वाघांसाठीच प्रसिद्ध नाही, तर इथे इतरही प्राण्यांच्या अनेक प्रजाती पहायला मिळतात. पक्षीप्रेमींसाठी तर सुंदरबन म्हणजे स्वर्गच. किंगफिशर, गरुड, बगळे आणि दुर्मिळ असे मास्क्ड फिनफूट इथे आपल्याला पहायला मिळतात. हिवाळ्यात सायबेरियातून येणारे स्थलांतरित पक्षी इथल्या आकाशात विविध रंगांची उधळण करतात. पण सुंदरबनची कथा फक्त जंगल आणि इथल्या प्राण्यांपुरतीच  मर्यादित नाही. इथे राहणारे मच्छीमार, मध गोळा करणारे लोक, आणि त्यांचं निसर्गाशी असलेलं नातं हे आपल्याला एक वेगळंच जग दाखवतं. त्यांच्या सहवासात आपल्याला कळतं की निसर्गाशी जुळवून घेत जगणं किती सुंदर आहे.

भारतीय पर्यटकांसाठी सुंदरबन म्हणजे साहस, नैसर्गिक सौंदर्य आणि सांस्कृतिक अनुभव यांचा परिपूर्ण संगम. इथे येणं म्हणजे एका अशा जगात पाऊल ठेवणं, जे दुर्मिळ आहे आणि तरल सुद्धा. तेव्हा तुम्हीही तुमच्या पुढच्या ट्रिपसाठी सुंदरबनची निवड जरूर करा आणि एकदा इथं जाऊन आलात की हा जंगलाचा जादूई प्रदेश तुमच्या मनातून कधीच जाणार नाही हे नक्की!

अरेच्चा! हे मला माहीतच नव्हतं...

तुम्हाला माहितीये? मेक्सिकोच्या युकातान पेनिन्सुलामध्ये वसलेलं ‌‘चिचेन इट्झा‌’ हे जगातल्या नव्या सात आश्चर्यांपैकी एक असून हे ठिकाण 2007 मध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये सामील झालं. इसवीसन 6व्या शतकात मायन संस्कृतीत बांधलं गेलेलं हे शहर त्या काळातील एक प्रमुख धार्मिक, व्यापारी आणि सांस्कृतिक केंद्र होतं. सुमारे 10 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेल्या या शहरात एकेकाळी जवळपास 35 हजार लोकं राहत असत. हे शहर तिथल्या हवामानाच्या अनुकूलतेमुळे केवळ धार्मिकच नव्हे तर व्यापारी आणि सांस्कृतिक जीवनाचाही केंद्रबिंदू बनलं होतं.

इथली सर्वात प्रसिद्ध रचना म्हणजे एल कॅस्टीलो किंवा कुकुल्कान मंदिर. ही पिरॅमिडची रचना सूर्य, चंद्र आणि ताऱ्यांच्या हालचालींशी सुसंगत आहे. या पिरॅमिडला एकूण 365 पायऱ्या आहेत, ज्या सौर वर्षाच्या दिवसांशी सुसंगत आहेत. दरवर्षी मार्च आणि सप्टेंबरमध्ये इक्विनॉक्सच्या दिवशी इथे सूर्यकिरणांच्या सावल्या अशा प्रकारे पडतात की त्या पायऱ्यांवरून सर्प उतरतोय असा भास होतो. हा देखावा पाहण्यासाठी हजारो पर्यटक या ठिकाणाला भेट देतात.

इथलं आणखी एक महत्त्वाचं ठिकाण म्हणजे ‌‘सेक्रेड सेनोते‌’ म्हणजे पवित्र जलकुंड. मायन लोकांच्या श्रद्धेनुसार इथे देवतांना अर्पण केलेल्या वस्तूंमध्ये सोन्याचांदीचे दागिने, जेड स्टोन आणि मानवी अवशेषही सापडले आहेत. या अवशेषांमधून प्राचीन मायन लोकांची विज्ञान, कला, धर्म आणि न्यायनिर्णयातील कुशलता पहायला मिळते. ज्या भारतीय पर्यटकांना सांस्कृतिक वारसा, स्थापत्य कौशल्य आणि खगोलशास्त्रात रस आहे, त्यांच्यासाठी चिचेन इट्झा अत्यंत प्रेरणादायी ठिकाण आहे. जसं भारतात कोणार्क सूर्य मंदिर किंवा हम्पीचे अवशेष प्राचीन भारताच्या वैभवाची साक्ष देतात, तसंच चिचेन इट्झा हे मायन लोकांच्या ज्ञान, श्रद्धा आणि कौशल्याची कहाणी सांगतं. तेव्हा तुम्हाला जर प्राचीन संस्कृतीचे चमत्कार प्रत्यक्ष पाहायला आवडत असतील, तर चिचेन इट्झा हे तुमच्या बकेट लिस्टमध्ये असायलाच हवं, कारण इथली प्रत्येक पायरी आणि इथला प्रत्येक दगड तुम्हाला हजारो वर्षांपूर्वीच्या जगाची सफर घडवतो.

शिस्त लावणारा श्रावण!

श्रावण महिना आला रे आला की आमच्यासारख्या अनेकांच्या पोटात खड्डा पडतो. आता महिनाभर व्हेज खायला लागणार. काहीजण हा त्याग अगदी मोठ्या मनाने गणपती विसर्जनापर्यत करतात. गणपती बाप्पाला खूश करण्याच्या अनेक गोष्टींपैकी ही एक गोष्ट. म्हणजे तसं श्रावणमास पाळलाच पाहिजे असं बंधन नाहीये. पण ‌‘आम्ही अगदीच नास्तिक नाही बरं का!‌’ हे इतरांना पटवून देण्याचा हा प्रयत्न. आमच्या मुलांच्या मते, ‌‘हे तुमचं नॉनसेन्स फॅड आहे. हे काय ह्या महिन्यात खायचं नाही, ह्या दिवशी खायचं नाही, एकतर तुम्ही पूर्ण व्हेजिटेरियन व्हा किंवा नॉन व्हेजिटेरियन. हे अधेमधे नको. याला काही अर्थ आहे का?‌’ त्यांच्या अशा विचारामुळे त्यांच्यासोबत बाहेर कुठे जेवायला गेलो तर चिडीचूप आम्ही सोमवार मंगळवार गुरूवार शनिवार कोणताही नॉनव्हेज न खायचा वार असला तरी खातो आणि दुसऱ्या दिवशी शाकाहारी बनून त्याचं प्रायश्चित घेतो. आम्ही पापभिरू माणसं ना, मग  देव रागावायला नको. तीन चार वर्षांपूर्वी धाकट्या मुलाला, राजला भेटायला सॅनफ्रान्सिस्कोला गेले होते ऐन श्रावण महिन्यात. आता तिथे हे श्रावणाचं - व्हेजिटेरियन प्रकरण काढलं तर याच्या डोक्याला ताप होईल म्हणून मी श्रावण महिन्यात व्हेजिटेरियन हा शब्दही काढला नाही. पण इथे घरी परत आल्यावर दोन महिने नॉनव्हेजचं नावही काढलं नाही. पापावरचा उतारा. आमची मुलं नील आणि राज लहान असताना एका वर्षी गणपतीच्या आदल्या दिवशी नील राजला सांगत होता, ‌‘दॅट डे हॅज कम राज, उद्या नॉनव्हेज नाही खाता येणार‌’. वर्षातल्या एका दिवशी सुद्धा नॉनव्हेज न खाणं किती कष्टदायी असतं बघा नं. हीच मुलं आता हेल्दी फूड च्या मागे लागलीयत ही गोष्ट वेगळी. टाईम टाईम की बात है।

सो, असाच एक श्रावण महिना दोन वर्षांपूर्वीही आला होता. पण त्या वर्षीची गोष्ट वेगळी होती. आधीच श्रावण महिना आला की पापभिरू नॉनव्हेजिटेरियन माणसांच्या पोटात खड्डा पडतो. त्या वर्षी तो डबल झाला, कारण त्यावर्षी अधिक महिना होता. म्हणजे दोन महिने किंवा गणपतीपर्यत असेल तर अडीच महिने नॉनव्हेज खायचं नाही हा दंडक सर्व आस्तिक नॉन व्हेजिटेरियन मंडळींना जळी-स्थळी- काष्ठी-पाषाणी दिसायला लागला. पोटात कालवाकालव व्हायला लागली. दुपारी ऑफिसेसमध्ये लंच टेबलवर एकच विषय श्रावण पाळणार की नाही? दोन महिने करावा लागेल हं. बघा बाबांनो, एवढा कंट्रोल आहे का तुमच्यावर? काहींनी माझ्यासारखं मुलांचं कारण देऊन त्या शाकाहारी अधिक श्रावणातून काढता पाय घेतला. काहींनी `आय डोन्ट बिलिव्ह इन धिस‌’ म्हणत आम्ही कसे मॉडर्न आहोत हे स्मार्टली इतरांच्या गळी उतरवून दाखवलं. जसा श्रावण नव्हे, डबल श्रावण जवळ यायला लागला तसं सर्व नॉनव्हेजिटेरियन मंडळींच्या मदतीला कुणीतरी एक गुरुजी आले आणि त्यांनी सांगितलं की ‌‘अधिक श्रावण आणि श्रावण हे दोन्ही  महिने शाकाहारी बनण्याची गरज नाही. यातला एक महिनाच महत्वाचा. तोच तुम्ही पाळा‌’ हे ऐकल्या ऐकल्या लंच टेबलवर सुटकेचे अनेक नि:श्वास सुटलेले ऐकायला मिळाले. कितीतरी नॉनव्हेजिटेरियन मंडळीचा जीव त्या चिकन फिश करीच्या भांड्यात पडला. अनेकांवर कोसळलेलं किती मोठ्ठ संकट टळलं होतं. त्या गुरूजींचे किती जणांनी आभार मानले असतील नाही.

मी पण श्रावण पाळायचा की नाही पाळायचा या द्विधा मनस्थितीत होते. टू बी ऑर नॉट टू बी? ने बऱ्यापैकी विचारात पाडलं होतं. कोविडनंतर माझी बुद्धी जरा तल्लख झालीय किंवा थोडं शहाणपण आपल्यात घुसलंय असं मला वाटतंय, कारण एका प्रॉब्लेमला अनेक सोल्युशन्स असतात ह्यावर माझा विश्वास बसलाय. कोविडमध्ये ‌’सूट्स‌’ सिरीयल पूर्ण बघितल्याचा हा फायदा. त्यात नाही का हार्वी स्पेक्टर सांगतो ‌‘देअर आर वन फिफ्टी सोल्युशन्स फॉर वन प्रॉब्लेम‌’. ओटीटी सिरिजचा कधी कधी चांगला परिणाम होतो तो असा. तर मी म्हटलं, ‌‘लेट्स डू समथिंग एल्स‌’ ह्या व्हेज-नॉनव्हेजमधून बाहेर येऊया. आयुष्याभर तेच केलं, आता जरा वेगळं काहीतरी करूया.

कोविडमध्ये घरबसल्या ओटीटीवर चांगलाच हात बसला होता. ऑफिसमधून घरी आल्यावर आधी टीव्हीचा रिमोट हातात घ्यायचा. एखादी सिरियल किंवा सिनेमा सिलेक्ट करायचा आणि आंघोळबिंघोळ करून टीव्हीपुढे येऊन बसायचं हा नित्यक्रम झाला होता. वाचन करायचं होतं, लिखाण होतं, पण टीव्हीची ओढ काही म्हणून काही करून देईना. टीव्ही बघणं अति होतंय, रात्रीची झोप पुरी होत नाहीये हे दिसत होतं, पण हे टीव्हीचं वेड, नव्हे व्यसन, काही कमी होत नव्हतं. ह्याला ॲन्टिडोटच हवा होता. देवाची भीती हा ॲन्टिडोट सर्वात पॉवरफूल. मी तोच आधार घेतला. ह्यावर्षी व्हेज-नॉनव्हेज या द्वंद्वात न अडकता या श्रावणाच्या डबल महिन्यात अगदी गणपती विसर्जनापर्यत टीव्ही बघायचाच नाही हे मी ठरवून टाकलं. दबंगगिरी.. `एक बार जो मैंने कमिटमेंट कर दी तो मैं अपने आप की भी नही सुनता‌’ सलमान खान झिंदाबाद! हे माझं बॉलिवूडप्रेम. असो. पण श्रावण महिन्याचा आधार, देवाची भीती आणि वाचन लिखाणाची पुनश्च आपोआप लागलेली आवड यामुळे मी गणपती विसर्जनापर्यंत टीव्ही पाहिलाच नाही आणि हे अडीच महिने होऊन गेल्यावर ती सवयच तुटल्यासारखी झाली. त्यानंतर कमीत कमी सहा आठ महिने मी टीव्ही रूममध्ये गेलेच नाही. वाचन, पॉडकास्ट ऐकणं, लिखाण, चिंतन, मनन हे वाढलं. पेपरमधले लेख पुन:श्च सुरू झाले ते वेळ मिळाल्यामुळेच. वेळच नाही आता टीव्हीचा रिमोट हातात घ्यायला. या श्रावणामुळे माझं फक्त टीव्हीचं वेडच नाही गेलं तर मला अनेक गोष्टी नव्याने शिकायला मिळाल्या. या श्रावणाने मला शिस्त लावली. अनेक हरवलेल्या गोष्टी गवसल्या. तेव्हापासून आजपर्यंत माझ्यावर टीव्हीचा कंट्रोल नाही तर माझा माझ्यावरच कंट्रोल आलाय.  थँक्स टू श्रावण आणि अधिक श्रावण!

या श्रावण महिन्यात मला त्या श्रावणाची आठवण झाली ज्याने मला त्यावेळी शिस्त लावली होती. माझं भरकटलेलं तारू पुन्हा सहीसलामत किनाऱ्यावर आणलं होतं. आता दोन वर्षांनी पुन्हा आपलं येरे माझ्या मागल्या झालंय. अगदी पूर्वी इतकं नाही पण रुटीन जरा ढेपाळलंयच. गेल्या आठवड्यात दोन वेळा मी हातात रिमोट घेऊन टीव्हीसमोर सोनी, नेटफ्लिक्स, जिओ, हॉटस्टार, युट्युब यांच्यासोबत पकडापकडीचा खेळ खेळत होते. मन कोणत्याही चॅनल वर स्थिर होईना. दोन तासांच्या धरसोडीनंतर वाटलंं की आपण नक्की करतोय काय? या दोन तासात किती काय छान करता आलं असतं. पण वेळ असाच निसटून जातो आणि मग लक्षात येतं की अरेरे जो कधीही परत मिळणार नाही तो वेळ आपण असाच वाया घालवला. पण तेव्हा असं वाटून काहीही उपयोग नसतो, कारण गेलेली वेळ परत येणार नसते. आता करायचं काय? शिस्तीचा उडालेला बोजवारा सावरायचा कसा? टीव्हीसमोर जाणंच नको असंही होत नाही, कारण दिवसभर आपण खूsssप काम करतो असा अवास्तव समज माझाच मी करून घेतलेला, त्यामुळे माझ्या या दमलेल्या थकलेल्या मनाला उतारा म्हणून टीव्ही पाहिलाच पाहिजे हा गैरसमज आणि पीअर प्रेशरही. खरंच, त्या शिस्तीवाल्या श्रावणात मी कोणाला तरी म्हटलं की 'मी टीव्हीच बघत नाही', तर समोरचे डोळे एकदम मोठे झाले एखाद्या एलियनला बघितल्यासारखे. 'टीव्ही बघत नाही? मग मन रिझवण्यासाठी तुम्ही करता तरी काय?' त्यावेळी मला एखादा घोर अपराध केल्यासारखं वाटलं. प्रवाहाविरुद्ध जाण्यासाठी खरंतर मी स्वतःला खंबीर करायला हवं होतं, पण ते बळ माझ्यात एकवटता आलं नाही मला. मी बळी पडले ओटीटी वाल्यांच्या मोहाला आणि माझ्या आयुष्यातला अमूल्य वेळ त्यांच्या चरणी अर्पण केला.

लिहितालिहिता जेव्हा मी माझ्या गत आयुष्याकडे वळून पाहिलं तेव्हा जाणवलं की, गेल्या अनेक वर्षांमधल्या श्रावण हा माझ्यासाठी एक 'रीसेट बटन' घेऊन आला होता. तो मला माझ्या सद्य परिस्थितीवर स्पॉटलाईट टाकून अनेक रिमाइंडर्स देत होता. तो माझ्या डोक्यातल्या कामांच्या गर्दीला, टाईमलाईन्स, मीटिंग्ज या सगळ्यांना बाजूला ठेवून मला थोडं थांबायला सांगत होता. जगाशी शर्यत करणारा वेग कमी करायला सांगत होता. आजही तो मला खिडकीत बसून पाऊस बघ, हलके गार वारे अंगावर घे, पावसाचा टिपटिप आवाज मनात साठवून घे, मातीचा सुगंध आणि सभोवतालची हिरवाई याचा अनुभव घे, दिवसातले काही क्षण का होईना, पण जगायला शिक हे अगदी पोटतिडकीने सांगत असतो. श्रावण खरंच माझ्या मनाला शिस्त लावतो. फक्त निसर्गातच नाही, तर तो माझ्या दिनक्रमात, विचारात, वागण्यात बदल घडवतो. यावर्षी सुद्धा जाता जाता तो मला शिस्त लावूनच जातोय. पुढच्या वर्षी पुन्हा भेटेपर्यंत तो बजावून चाललाय, 'वीक डेज मध्ये टीव्ही बघावासा वाटलाच तर एक तासापेक्षा जास्त बघायचा नाही. वीकेंड्सना बिंज वॉचिंग बंद! बाहेर ढकल स्वतःला आणि खऱ्या आयुष्याची मजा घे.' मी 'येस सर' म्हणत त्याची आज्ञा शिरसावंद्य मानण्याचं ठरवलंय. वर्षभरात थोडंफार इथे तिथे होईल, पण मग आहे ना तो पुढच्या वर्षी पुन्हा मला शिस्तीत आणायला. तोपर्यंत बाय-बाय माय डियर श्रावण! सी यू नेक्स्ट इयर!

वीणा वर्ल्ड सिनियर्स स्पेशल - वीणा वर्ल्ड वुमन्स स्पेशल

आम्ही सतीश आणि सविता पेडणेकर. सांगलीला राहतो. आमची 2013 सालची पहिली टूर होती, युरोपियन हायलाइट्स, 11 दिवसांची स्वप्नवत सफर! आजपर्यंत आमच्या मध्य प्रदेश, राजस्थान, कल्चरल तामिळनाडू या तीन भारतातल्या आणि तर युरोपियन हायलाइट्स, श्रीलंकन ज्वेल्स, ऑल ऑफ ईस्टर्न युरोप, इंग्लंड स्कॉटलंड आयर्लंड, बेस्ट ऑफ भूतान, बेस्ट ऑफ बाली या सहा परदेशातल्या टूर्स झाल्या आहेत. या प्रत्येक वेळेस वीणा वर्ल्डने आम्हाला दिलेलं अनुभवांचं गिफ्ट मनात कोरलं गेलं. बँकेतल्या नोकरीतून रिटायर झाल्यावर ठरवलं, आता जग पहायचं! पहिल्या युरोप टूरमधलं विंडरमियरचं शांत सौंदर्य, भव्य केंब्रिज युनिव्हर्सिटी, शेक्सपियरचं स्ट्रॅटफर्ड अपॉन एवन आणि प्लिटविस लेक्सचा स्वर्गीय नजारा आजही डोळ्यांसमोर आहे. लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर उभं राहण्याचा तो क्षण तर शब्दातीत! राजस्थानच्या मेवाड-मारवाडची रंगीबेरंगी राजेशाही, श्रीलंकेचे मोत्यासारखे समुद्रकिनारे, इंग्लंड स्कॉटलंड आयर्लंडचं निसर्गरम्य वैभव, भूतानची शांती, बालीच्या लाटांशी खेळणारे किनारे... प्रत्येक प्रवासाने आम्हाला नवचैतन्य दिलं. शुद्ध शाकाहारी असल्याने आमचं जेवणाकडे कमी लक्ष असतं. पण एकदा स्कॉटलंडमध्ये कॉस्मोपॉलिटन जेवणाचा घेतलेला अनुभव छान होता. आम्ही दोघंही सिनियर्स असूनही आम्हाला ग्रुप टूर्स आवडतात. त्या निमित्ताने तरुणांसोबत वेळ घालवता येतो आणि आम्हालाही ताजंतवानं वाटतं. वीणा वर्ल्डचे टूर मॅनेजर्स प्रत्येक ठिकाणाची ऐतिहासिक पार्श्वभूमी सांगतात. त्यामुळे ठिकाणं मनानेही अनुभवताही येतात. शेवटी प्रवास म्हणजे त्या प्रदेशाची संस्कृती, इतिहास, आणि त्या क्षणांशी जोडलेलं मनाचं नातं. पुस्तकात वाचललं प्रत्यक्ष डोळ्यासमोर पाहणं ही वेगळीच आनंदयात्रा असते.

येत्या जानेवारीत व्हिएतनाम-कंबोडियाला जायचा प्लॅन आहे. प्रवासाची ही वाटचाल अशीच सुरू राहो, कारण जग मोठं आहे आणि आमची अनुभव घेण्याची हौस त्याहून मोठी!

माय प्रायव्हेट हॉलिडे! माय चॉइस, माय पेस, माय बजेट, माय फॅमिली टाईम!

‌‘वीणा वर्ल्ड कस्टमाईज्ड हॉलिडेज्‌‍‌‘ सोबत हिमाचल ‌‘सिनीक ट्रेन्स इन युरोप‌’

युरोप हे नाव उच्चारलं की आठवतात बर्फाच्छादित शिखरं, हिरव्यागार व्हॅलीज्ा, तलावांमधलं स्वच्छ निळंशार पाणी आणि बरंच काही... पण कल्पना करा की हे सगळं तुम्ही एका खिडकीतून बघताय आणि तुमच्या सीटखाली रेल्वेची सौम्य थरथर जाणवत्ये. हातात गरम कॉफीचा कप, समोर एखाद्या पोस्टकार्डसारखं दृश्य.. हा प्रवास वाचतानाही “जादुई” वाटतो. हा आहे युरोपमधल्या सिनिक ट्रेन्स मधून केलेला प्रवास.

स्वित्झर्लंडमधल्या ‌‘ग्लेशियर एक्सप्रेस‌’ने केलेला प्रवास संथ असतो. झरमॅट ते सेंट मॉरिट्झ या आठ तासांच्या प्रवासात आपण 91 टनेल्स आणि 291 ब्रिजेस ओलांडून जातो. आल्प्सची शिखरं, ग्रीन मेडोज्ा, डीप व्हॅलीज्‌‍ हे सगळं तुमच्या डोळ्यांसमोर असतं. आणि त्यात एक्सलन्स क्लासमध्ये असाल तर विंडो सीट, शॅम्पेन, फाइव्ह कोर्स मील आणि प्रायव्हेट कन्सर्ज सर्व्हिसही मिळते.

‌‘बर्निना एक्सप्रेस‌’ने तुम्ही इटली ते स्वित्झर्लंड प्रवास करता. इथल्या मोठ्या पॅनोरॅमिक खिडक्या जणू तुमच्यासाठीच उघडलेल्या असतात. बर्फाच्छादित डोंगर, निळेशार तलाव, आणि गरम ऑर्गनिक हर्बल टी सोबत मिळालेलं स्विस चॉकलेट यामुळे प्रवास गोड आठवणींमध्ये बदलतो. याशिवाय मे ते ऑक्टोबरदरम्यानची ‌‘चॉकलेट ट्रेन‌’ ही चीज आणि चॉकलेट फॅक्टरीपर्यंत नेणारी चविष्ट सफर ठरते. ‌‘व्हेनिस सिम्प्लॉन ओरिएंट एक्सप्रेस‌’ मधून तुम्ही पॅरिस ते व्हेनिसचा लक्झरी प्रवास करू शकता. आर्ट डेको इंटरियर्स, मिशेलिन स्टार दर्जाचं जेवण, आणि ग्रँड सूटमध्ये प्रायव्हेट बटलर सर्व्हिस घेऊन केलेला हा प्रवास करताना आपण एखाद्या चित्रपटाचा भाग असल्यासारखं वाटतं. नॉर्वेच्या ‌‘फ्लॉम रेल्वे‌’मधून क्योसफॉसन वॉटरफॉल पाहताना श्वास रोखून धरावा लागतो. जर तुम्हाला जादू आवडत असेल तर स्कॉटलंडची जेकॉबाइट स्टीम ट्रेन म्हणजे पर्वणीच. कारण ही ट्रेन म्हणजे हॅरी पॉटरच्या हॉगवर्ट्स एक्सप्रेसची सफर.

हे सगळे ट्रेन जर्नीज्‌‍ म्हणजे प्रत्येक क्षण मनात साठवून ठेवणं आहे आणि वीणा वर्ल्ड प्रायव्हेट हॉलिडेज्‌‍ तुमच्यासाठी हा प्रत्येक अनुभव खास बनवतात. तेव्हा आता युरोप या वेगळ्या अँगलने सुद्धा पहा आणि तुमची युरोप जर्नी खास बनवा.

अराऊंड वर्ल्ड - ते मातातिनी

प्रवास म्हणजे फक्त स्थलदर्शन नाही, तो लोकजीवनाचा, संस्कृतीचा आणि  भावनेचा अनुभव असतो. असाच एक मंत्रमुग्ध करणारा अनुभव म्हणजे ‌‘ते मातातिनी‌’, न्यूझीलंडमधील माओरी परंपरेचा उत्कट सांस्कृतिक उत्सव! दर दोन वर्षांनी मार्च-एप्रिलमध्ये साजरा होणारा हा 5 दिवसांचा फेस्टिव्हल. हा चालू झाला 1972 साली. आजही या सोहळ्यात न्यूझीलंडच्या वेगवेगळ्या भागांतील हजारो कलाकार एकत्र येतात आणि पारंपारिक माओरी कला प्रकार जसे की हाका (युद्ध नृत्य), वायता (गाणी), पोई (पारंपरिक सादरीकरण) आणि मोटेआटिया (पारंपारिक मंत्र) सादर करतात. ते मातातिनी, म्हणजे असंख्य चेहरे. हा माओरी समुदायाच्या विविधतेचा, एकतेचा आणि सृजनशीलतेचा उत्सव आहे. भारतीय पर्यटकांसाठी, खासकरून सांस्कृतिक अनुभवांची आवड असणाऱ्यांसाठी, हा उत्सव म्हणजे अनुभवांचा खजिना आहे. इथे तुम्हाला स्थानिक खाद्यपदार्थ, माओरी हस्तकला तसंच सोव्हेनिअर स्टॉल्स पहायला मिळतात. त्यामुळे संपूर्ण वातावरणात सणासारखी झिंग असते. 2025 मध्ये ‌‘ते मातातिनी‌’ फेस्टिव्हलमध्ये 70,000 पर्यटक सहभागी झाले. पुढचा फेस्टिव्हल 2027 मध्ये आहे. तेव्हा तुम्हालाही जर लोककला, परंपरा आणि सांस्कृतिक अनुभवांची आवड असेल तर, एकदा तरी नक्की अनुभवा हे माओरी संस्कृतीचं रंगीबेरंगी जग!

August 14, 2025

Author

Veena Patil
Veena Patil

‘Exchange a coin and you make no difference but exchange a thought and you can change the world.’ Hi! I’m Veena Patil... Fortunate enough to have answered my calling some 40+ years ago and content enough to be in this business of delivering happiness almost all my life. Tourism indeed moulds you into a minimalist... Memories are probably our only possession. And memories are all about sharing experiences, ideas and thoughts. Life is simple, but it becomes easy when we share. Places and people are two things that interest me the most. While places have taken care of themselves, here are my articles through which I can share some interesting stories I live and love on a daily basis with all you wonderful people out there. I hope you enjoy the journey... Let’s go, celebrate life!

More Blogs by Veena Patil

Post your Comment

Please let us know your thoughts on this story by leaving a comment.

Looking for something?

Embark on an incredible journey with Veena World as we discover and share our extraordinary experiences.

Balloon
Arrow
Arrow

Request Call Back

Tell us a little about yourself and we will get back to you

+91

Our Offices

Coming Soon

Located across the country, ready to assist in planning & booking your perfect vacation.

Locate nearest Veena World

Listen to our Travel Stories

Veena World tour reviews

What are you waiting for? Chalo Bag Bharo Nikal Pado!

Scroll to Top