पूर्वी कधीतरी सिंगापूरच्या अर्बन प्लॅनिंग सेंटरमध्ये गेले होते. येत्या पन्नास वर्षांत सिंगापूरमध्ये काय काय होणार ते सर्व तिथे डिस्प्ले केलं होतं व्हिजिटर्ससाठी आणि स्थानिकांसाठी. तेव्हा वाटलं, की असं पाहिजे आपल्या देशात, प्रत्येक राज्यात आणि प्रत्येक शहरात. येत्या एका वर्षात, येत्या पाच वर्षांत, येत्या दहा वर्षांत आणि येत्या पंचवीस वर्षांत आपल्या शहरात ह्या ह्या गोष्टी अशा तऱ्हेने होणार आहेत हे आम्हा सर्वसामान्य नागरिकांसमोर ठेवलं, त्याप्रमाणे कामं होताना नागरिकांना दिसली, कालच्यापेक्षा आमचा आजचा दिवस चांगला होताना दिसला तर कशाला निवडणूकींसाठी मोठ्या प्रचारसभा घ्यायची वेळ येईल? फार अपेक्षा नाहीयेत. पण चांगले रस्ते, स्वच्छ पाणी, शुद्ध हवा, अखंडित वीज आणि शिक्षणापासून कुणीही वंचित राहणार नाही अशी निम्न आर्थिक स्तराला सामावून घेणारी एज्युकेशन सीस्टिम इतकं तरी हवं. आता पंतप्रधानांचा ‘इंडिया ॲट हंड्रेड’ म्हणजेच ‘2047 चा भारत’ असा एक ॲम्बिशियस प्लॅन आहे. ते आपल्या सर्वांसाठीच ‘समथिंग टू लूक फॉरवर्ड टू’ असेल. त्यामुळे आपल्यातला उत्साह जागृत होईल, आपल्या कार्यक्षमतेतही निचित फरक पडेल. देशाच्या बाबतीत पंचवीस आणि पन्नास वर्षांचं प्लॅॅनिंग असायलाच हवं आणि सरकार कोणतंही येवो देशाच्या विकासाची ठरलेली कामं पूर्ण झाली पाहिजेत. हे सर्वश्रुत आहेच की मोठमोठ्या कंपन्याही असं दहा, वीस, पन्नास वर्षांचं प्लॅनिंग करतात. कोविडने अर्थातच या प्लॅॅनिंगला शह दिला. एका बाजूला कोविड होता तर दुसरीकडे टेक्नॉलॉजिकल इन्व्हेन्शन्स. जग इतकं वेगाने बदलायला लागलं की भारतातल्या मोठ्या आयटी कंपन्यांनी तेव्हा जाहीरच केलं की ‘फर्गेट अबाऊट टेन इयर्स प्लॅॅनिंग. सध्या आम्ही फक्त पुढच्या एक किंवा दोन वर्षांकडेच बघतोय’. आम्हीसुद्धा पूर्वी किमान पुढची तीन वर्षं नजरेसमोर ठेवायचो, पण आता जेमतेम एका वर्षाच्या प्लॅनिंगवर समाधान मानतोय. त्या एका वर्षाच्या प्लॅनिंगमध्येही सर्व गोष्टी फूलप्रूफ नाही करता येत. सभोवताली एवढ्या गोष्टी बदलताहेत की टूरिझम आणि एअरलाईन इंडस्ट्री बहुत दूर की नहीं सोच सकते। आयटी रिव्हॉल्युशनच्या आधी बरं असायचं, ठरविलेल्या गोष्टी ठरल्याप्रमाणे व्हायच्या. हल्ली आज आपण एखादी गोष्ट ठरवली तरी उद्या एन्व्हायर्नमेंट इतकी बदललेली असते की पुन्हा नव्याने विचार करायला लागतो. इतक्या अनप्रेडिक्टेबल जगात आपण राहतोय की खंबीरपणे दमदार पाऊल टाकायला थोडं हडबडायला होतं. पूर्वी माणसं पण एकदम खंबीर असायची किंवा खंबीर राहू शकायची. ‘मोडेन पण वाकणार नाही’ अशी किंवा ‘हम करे सो कायदा’ वाली. आपल्या गत आयुष्याकडे नजर टाकली तर अशी कितीतरी करारी माणसं आपल्याला दिसतील. मला माझे काका, माझ्या मामाकडचे आईचे काका, तसंच हायस्कूलमधले एक शिक्षक पटकन डोळ्यापुढे उभे राहतात. त्यांचा दराराच असा होता की आपण कायम भीतीच्या सावटाखाली. आवाज करायचा नाही. मोठ्या आवाजात बोलायचं नाही. खळखळून हसायचं नाही. शाळेत त्या सरांपुढे मुलं अक्षरशः थरथर कापायची. शिस्त लावण्यासाठी, चुकीचं वागणाऱ्याला सरळ करण्यासाठी त्यांचं ते रूप चांगलं असायचं. पण कधीतरी वाटायचं की अरे एवढं काय त्यात. पण शेवटी ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’. अशी माणसं पूर्वीही होती आणि आजही आहेत जी ‘हम करे सो कायदा’ यावर इतकी ठाम असतात की वातावरण बदललंय, संदर्भ बदललेत हे लक्षातच घेत नाहीत. इथे बॉलिवूडच्या ‘कभी खुशी कभी गम’ चित्रपटातला डायलॉग आठवला, ‘एक बार कह दिया, तो बस कह दिया।’ या माणसांचं असं असतं की, माझा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची रेघ. काही झालं तरी ती बदलणार नाही.
कधी कधी माणसं स्वत: ही रेघ आखून घेतात तर कधी परिस्थिती वा पोझिशन त्यांचं व्यक्तिमत्व तसं बनवते. आमचा तसा ‘मॉम पॉप शॉप’ सारखा फॅमिली बिझनेस. सर्वजण सगळं करायचे किंवा कुणालाही काहीही काम करायला लागायचं असा. बिझनेस आकाराला आला, मोठा व्हायला लागला, तेव्हा पूर्वीचं ते स्टार्टअप स्वरूप सोडून प्रोफेशनलिझम आणण्याची, छोट्या कॉर्पोरेट स्ट्रक्चरमध्ये त्याचं रूपांतर करण्याची गरज भासली आणि जेव्हा मी तो कॉर्पोरेट हेडचा पदभार स्वीकारला तेव्हा जाणीव झाली की, अरे आता पूर्वीसारखं वागून नाही चालणार. आपण जे बोलू, जे डिसीजन्स देऊ ते प्रमाण मानले जात आहेत. आपलं वक्तव्य हे काळ्या दगडावरची रेघ ठरतंय... आणि जेव्हा ही जाणीव झाली तेव्हा ॲक्चुअली दचकायला झालं. आता मला प्रत्येक वेळी बोलताना खूप खबरदारी घ्यावी लागेल. निर्णय विचारपूर्वक आणि सर्व बाजूंचा विचार करून घ्यावे लागतील हे लक्षात आलं. जाणवलं की आपण जे काही करू, जी दिशा दाखवू त्यावर कंपनीची प्रगती ठरणार आहे, तेव्हा आपण आपली कार्यक्षमता वाढवली पाहिजे. संस्थेच्या आत आणि संस्थेच्या बाहेर काय चालू आहे त्याचा म्हणजे पास्ट- प्रेझेंट-फ्युचरचा ताळमेळ मला घालता आला पाहिजे. निर्णयक्षमता सुद्धा वाढवली पाहिजे. शिवाजीराव भोसलेंच्या व्याख्यानामधला एक संदर्भ आठवला, लीडर कसा असावा या बाबतीत. `लीडरचा एक पाय नेहमी संस्थेमध्ये असावा आणि दुसरा पाय संस्थेबाहेर असावा. दोन्ही पाय संस्थेच्या आत असले तर बाहेरच्या जगात काय चाललंय ते कळत नाही आणि दोन्ही पाय बाहेर असले तर संस्थेतली माणसं सोबत येत नाहीत’. हे सगळं होत असताना मला आणखी एक गोष्ट जाणवायला लागली की माझं ‘हम करे सो कायदा’ होतंय. आपण एखादा विचार मांडायचा आणि त्यावर सर्वजण चर्चा करून निर्णयाप्रति पोहोचायचो, ही पद्धत आजतागायत होती. आता मी जे सांगेन तो डिसीजन मानून टीम गोष्टी पुढे न्यायला लागली. ‘अरे हे असं का केलंत?’ असं विचारताक्षणीच ‘तुम्हीच तर सांगितलं होतं’ हे उत्तर मिळायला लागलं आणि माझ्या मनात धोक्याची घंटा वाजली. मी सांगितलेली प्रत्येक गोष्ट ‘काळ्या दगडावरची रेघ’ मानून प्रत्येकजण चालत होता. आणि ते घातक होतं आम्हा सर्वांसाठी आणि ऑर्गनायझेशनसाठीही. ‘तुम्हीच तर सांगितलं होतं’ ही मानसिकता तयार व्हायला काही दिवस, महिने, वर्षं लागली होती पण आता लगेच ‘त्याच्या विरूद्ध वागा, प्रश्न विचारा’ हे सांगणं सोप्पं आहे पण अंगिकारायला वेळ लागणार होता. मग ‘तुम्हीच तर सांगितलंत’ हे उत्तर आलं की मी विचारायला सुरुवात केली, ‘मी कधी सांगितलं? का सांगितलं? संदर्भ काय होता?.’ एकदा आमच्या सिनियर मार्केटिंग मॅनेजरला, प्रणोती जोशीला मी म्हटलं, ‘जरा ॲडव्हर्टायझिंग एक्सपेन्स पाठव’. तिने तो मेसेज कॉमन ग्रुपवर न पाठवता मला एकटीला पाठवला. फेअर इनफ. कारण विचारल्यावर तिने हेच उत्तर दिलं ‘तुम्हीच सांगितलं होतं’. एक दिवस सीनियर सेल्स मॅनेजर प्रियाका पत्कीने कोणतातरी डेटा फक्त मलाच पाठवला. म्हटलं ‘ग्रुपवर का नाही टाकलास?’ तर म्हणाली, ‘तिथे सगळेच आहेत म्हणून तुम्हाला एकटीलाच पाठवला’. तिच्या जागी ती बरोबर होती. वीणा वर्ल्ड सुरू झालं तेव्हा कॉन्फिडेन्शियालिटी महत्त्वाची वाटत होती. तेव्हापासून ही सवय लागली होती. आज बारा वर्षं झाली. कोविडने मध्ये दोन अडीच वर्ष खाल्ली. त्यात तर सगळंच जग अपसाइड डाऊन झालं. पण आम्हाला एकदा वीणा वर्ल्डच्या सुरुवातीला आणि कोविडनंतर अशी दोनदा नव्याने सुरुवात करायला मिळाली. आता जे मॅनेजर्स, सिनियर मॅनेजर्स आणि इन्चार्जेस आहेत, त्या सर्वांना रोल, रिस्पॉन्सिबिलीटी, ऑथॉरिटी, अकांऊटेबिलिटी, सर्व काही डेलिगेट करून टाकलं आहे. टोटल डिसेंट्रलायझेशन, त्यामुळे कंपनी वाढायला लागली चांगल्या प्रकारे. आता आम्ही रोज टीमला ॲक्सेसीबल असतो ते त्यांना कुठे अडकायला झालं तर किंवा इमर्जन्सीच्या वेळी. बाकी आम्ही आहोत, आणि ‘आम्ही नाहीही आहोत’ ही सवय आता टीमला लागलीय. पण तरीही जुनी सवय जात नाही त्याप्रमाणे ‘तुम्हीच तर सांगितलं होतं’ हे कधीतरी डोकं वर काढतं. ‘चेक द कॉन्टेक्स्ट’ हे मी टीममध्ये रूजवलं आहे. कोणत्या वेळी, काय परिस्थितीत निर्णय घेतला हे लक्षात घ्या. तोच निर्णय दुसऱ्या ठिकाणी जसाच्या तसा लागू पडत नाही हे मी इतक्या वेळा घोकून घेतलंय की आमची जनरल मॅनेजर शिल्पा मोरे मला चिडवते. पण बघा नं, कधीकधी आमची मुंबईची जाहिरात कोलकात्याला चालत नाही आणि अहमदाबादची जाहिरात बेंगळुरूला चालत नाही. म्हणजेच कॉन्टेक्स्ट बदलला तर कम्युनिकेशन बदलावं लागतं ते असं. आता ऑर्गनायझेशनची घडी नीट बसल्यावर, वेगवेगळ्या रिस्पॉन्सिबल टीम्स झाल्यावर त्या त्या रिस्पेक्टिव्ह टीमला ‘पिन टू एलिफंट’ माहीत असलं पाहिजे. त्यामुळे आता ऑर्गनायझेशनमध्ये ‘सर्वांना इन्व्हॉल्व्ह करा, 100% विश्वास टाका’ या विचाराने मार्गक्रमणा सुरू आहे.
‘काल काय केलं?’ यापेक्षा रॅपिडली चेंजिग जगात ‘आज काय करायला पाहिजे?’ हे महत्वाचं झालंय. ‘काळ्या दगडावरची रेघ’ आता बदललेल्या जगात चालणार नाहीये. नाक, कान, डोळे उघडे ठेवून निर्णय घ्यावे लागणार आहेत. काल घेतलेला निर्णय आज बदलावा लागू शकतो. तो बदल करण्यासाठीचा फ्लेक्झिबल माईंडसेट आपल्याला तयार केला पाहिजे. बदलत्या जगाबरोबर आपल्याला बदलायला हवं. आता ‘जो थांबला तो संपला’ याऐवजी ‘जो बदलला नाही तो संपला’ असं म्हणणं जास्त रास्त ठरेल. ‘काळया दगडावरची रेघ’ आता इतिहासजमा करायला हवी. ती रेघ पुसायला हवी.
वीणा वर्ल्ड सिनियर्स स्पेशल
मी मोहन करमरकर, वयाची 86 वर्षं पार करूनही माझं मन आजही प्रवासाच्या मोहात रमलेलं आहे. 2013 मध्ये माझी पहिली वीणा वर्ल्डची राजस्थान मेवाड टूर झाली आणि तेव्हापासून हा प्रवासाचा धागा जोडला गेला. मग प्रत्येक प्रवास मला नवा उत्साह देत राहिला. खरं सांगायचं तर वीणा वर्ल्ड म्हणजे केवळ टूर मॅनेजमेंट नाही, तर माझ्यासारख्या प्रवाशांच्या आनंदाचा साथीदार आहे. नीटनेटके आयोजन, सभ्य आणि हसतमुख टूर मॅनेजर्स, आणि सोबत भेटणाऱ्या वेगवेगळ्या भागातील प्रवाशांची रंगतदार सोबत हे सगळं अनुभवताना प्रत्येक टूर हा एक वेगळाच सोहळा वाटतो.
मी माझ्या पत्नीसोबत आत्तापर्यंत सिक्कीम दार्जिलिंग पेलिंग, शिमला-मनाली, गुजरात, आसाम मेघालय, डलहौसी अमृतसर धरमशाला, नैनिताल मसूरी अशा ठिकाणी फिरलोय. आसाम मेघालयला गेलो असता ब्रह्मपुत्रेची क्रुझ राईड केली. तो अगदी वेगळा अनुभव होता. मसूरीत वॉटरफॉलला गेलो होतो तो ही अनुभव अप्रतिम. वीणा वर्ल्डच्या सिनियर्स स्पेशल टूर्समध्ये मनाला खरी ऊब मिळते, कारण या टूर्समध्ये आम्हाला आमच्या गतीनं, निवांतपणे प्रवासाचा आस्वाद घेता येतो. टूरमध्ये निसर्ग, संस्कृती, लोकं सगळं अगदी जवळून अनुभवायला मिळतं. नवीन ठिकाणं, वेगवेगळ्या संस्कृती पाहत असताना, वेगळ्या भाषा ऐकताना ‘विविधतेत एकता’ अनुभवता येते. या सगळ्या टूर्सच्या आठवणी माझ्या हृदयात कायमच्या कोरल्या गेल्या आहेत.
प्रवासाची खरी मजा तर प्लॅनिंगमध्येच सुरू होते. त्या तयारीतच हुरूप येतो. आणि हो, प्रत्येक ठिकाणाहून येताना आम्ही आमच्या मुलामुलींसाठी छोटेखानी आठवण आणतोच. मग ती फ्रीज मॅग्नेट्स असतील किंवा तिथली काही स्पेशालिटी किंवा सोव्हेनिअर्स. ते बघताना प्रवास पुन्हा जिवंत होतो. शेवटी प्रवास म्हणजे काय? तर शिकणं, अनुभवणं आणि आठवणी जपणं. वीणा वर्ल्डमुळे प्रवास माझ्यासाठी केवळ छंद उरला नाही, तर जीवनाचा उत्सव झाला आहे.
माय प्रायव्हेट हॉलिडे!
माय चॉइस, माय पेस, माय बजेट, माय फॅमिली टाईम!
‘वीणा वर्ल्ड कस्टमाईज्ड हॉलिडेज्‘ सोबत मालदीव
धी समुद्राच्या निळ्याशार पारदर्शक पाण्यावर उभ्या असलेल्या व्हिलामध्ये रहायचं स्वप्न पाहिलंय? हे स्वप्न सत्यात उतरवायचं ठिकाण म्हणजे मालदीव. हिंद महासागराच्या मध्यभागी वसलेला हा बेटांचा स्वर्ग आज भारतीय प्रवाशांचं आवडतं हनिमून आणि लक्झरी डेस्टिनेशन ठरत आहे. नोव्हेंबर ते एप्रिल हा मालदीवला जाण्याचा सर्वोत्तम काळ. सूर्यकिरणांनी उजळलेलं आभाळ, शांत समुद्र आणि संथ वारे. इथल्या वॉटर व्हिलाज् मध्ये राहणं म्हणजे एक वेगळंच सुख. व्हिलाच्या डेकवरून तुम्हाला समुद्र दिसत राहतो. मनात विचार यायची खोटी, की तुम्ही स्वच्छ, निळसर पाण्यात डुबकी मारू शकता. कधी माशांचे थवे डोळ्यासमोरून जाताना दिसतात, तर कधी कासवाची झलक मन प्रसन्न करून जाते.
माले विमानतळावर उतरल्यावर काही काळातच स्पीडबोटने तुम्ही या स्वर्गीय बेटावर पोहोचता. तर काही हॉटेल्सवर पोहोचण्यासाठी तुम्ही सी प्लेनही घेऊ शकता. तिथे बऱ्याच रिसॉर्टस् वर सर्व काही ऑल-इन्क्लुसिव्ह आहे. सकाळी ताज्या सीफूडचा सुवास, दुपारी समुद्रकिनारी ग्लोबल पाककृतींचा आनंद, आणि सूर्यास्ताच्या छटांमध्ये रंगलेलं कॉकटेल. इथल्या डेकवर घेतलेला प्रत्येक घोट, प्रत्येक घास तुम्हाला सांगतो की ही सुट्टी खास आहे.
तुम्हाला पाण्यात रमणं आवडतं का? तर इथे कायकिंग, पेडल बोटिंग, स्नॉर्केलिंग हे सगळं मोफत आहे. क्रुझवरून डॉल्फिन पाहणं असो, वा वाळूतल्या बेटावरची खास पिकनिक, सागराच्या लाटांत केलेलं कायकिंग असो किंवा स्नॉर्केलिंगचं थ्रील, या सगळ्या ऍक्टिव्हिटीज् तुम्हाला वेगळाच आनंद देतात. शरीर-मनाला शांती हवी असेल तर समुद्र किनाऱ्यावरची समुद्राच्या गाजेत गुंगलेली स्पा सेशन्स जरूर अनुभवा. आणि शेवटच्या रात्री तारांकित आकाशाखाली समुद्रकिनाऱ्यावर घेतलेला कँडललाइट डिनर म्हणजे जणू आयुष्यभर लक्षात राहील असा क्षण. म्हणूनच हनिमून असो, ऍनिव्हर्सरी असो किंवा कोणतंही खास सेलिब्रेशन, मालदीव वॉटर व्हिला स्टे ही एक अशी सफर आहे, जिथला प्रत्येक क्षण आयुष्यभर तुमच्या आठवणीत राहील. मग वाट कसली बघताय? आजच आमच्या कस्टमाईज्ड हॉलिडेज् टीमशी संपर्क करा आणि मालदीव हे तुमचं नेक्स्ट डेस्टिनेशन ठरवून टाका.
देखो अपना देश!
तेलंगणा
तुम्ही कधी विचार केला आहे का, की आपल्या भारतात अजून किती रत्नं दडली आहेत? दक्षिणेकडचं तेलंगणा हे असंच एक रत्न आहे. इतिहास, परंपरा, निसर्ग आणि आधुनिकता यातलं सारं काही इथे आहे, पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे, हा प्रवास तुम्हाला भारतीय असल्याचा अभिमान नव्याने जाणवून देतो. 2014 साली या राज्याला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला असला तरी या भूमीचा इतिहास हजारो वर्षांपूर्वीचा आहे. सातवाहन, काकतीय आणि निजाम यांसारख्या साम्राज्यांच्या पाऊलखुणा आजही या प्रदेशात जिवंत आहेत.
हैदराबाद हे तेलंगणाचं हृदय. चारमिनार आणि गोलकोंडा किल्ल््याचे भव्य वास्तुशिल्प भारतीय प्रवाशांना स्वाभिमानाची आठवण करून देतात. चारमिनारच्या कमानीतून चालताना आपल्या परंपरेच्या खुणा पावलोपावली जाणवतात. गोलकोंडा किल्ल््याच्या प्रचंड भिंती आपल्याला आपला इतिहास किती वैभवशाली होता याची साक्ष देतात. निजामांच्या परंपरेतून आलेली हैदराबादी बिर्याणी जिभेवर चविष्ट मेजवानी तर डोळ्यांसमोर एक समृद्ध सांस्कृतिक वारसा उभा करते.
वारंगल किल्ला, काकतिया कला थोरानम यांसारखी ठिकाणे केवळ भूतकाळाची साक्षच देत नाहीत तर आपल्या संस्कृतीतील वैभवशाली अध्याय उलगडतात. नागार्जुनसागर श्रीशैलम व्याघ्र प्रकल्पासह अनेक अभयारण्ये, हिरवीगार जंगले आणि शांत तलाव प्रवासाला एक वेगळीच उंची देतात. असंख्य ट्रेकिंग ट्रेल्स आणि वन्यजीव निरीक्षणासाठी इथली योग्य असलेली स्थळे भारताच्या नैसर्गिक वैभवाची आठवण करून देतात.
इथल्या सणांमध्ये बोनालू आणि बथुकम्मा विशेष आकर्षणाचे आहेत. स्त्रियांनी फुलांच्या थाळ्यांनी सजवलेला बथुकम्मा उत्सव पाहताना प्रत्येक भारतीयाला आपल्या परंपरेबद्दल अभिमान वाटतो. उर्जेने भरलेले ढोल-ताशे, नृत्य आणि भक्तिभाव मनाला एक वेगळीच लय देतात. हे क्षण आपल्याला आठवण करून देतात की आपल्या देशातली संस्कृती किती जिवंत, किती रंगीबेरंगी आहे.
तेलंगणातील बाजारपेठा, रंगीबेरंगी हस्तकला आणि लोककला भारतीय पर्यटकांसाठी स्मरणात राहील अशी भेट ठरतात. शिक्षण, उद्योग आणि आयटीमध्ये प्रगती करतानाही या राज्याने आपल्या मूळ संस्कृतीची ओळख जपली आहे, हे त्याचं खरं वैशिष्ट्य. भारतीय प्रवाशांसाठी तेलंगणा म्हणजे केवळ पर्यटन नव्हे, तर आपल्या देशाच्या वैभवाची, समृद्ध परंपरेची आणि अखंडतेची जाणीव करून देणारा एक अनुभव आहे. प्रत्येक प्रवासात जर देशप्रेमाचा धागा गुंफायचा असेल, तर तेलंगणाची सफर नक्की करा.
अरेच्चा! हे मला माहीतच नव्हतं...
जगात काही ठिकाणं अशी असतात, जिथे पोहोचताच आपण भूतकाळाच्या हजारो वर्षांच्या प्रवासात हरवून जातो. इंग्लंडमधल्या विल्टशायर काऊंटीमध्ये एक अशी जागा आहे जी जगभरातील प्रवाशांना गूढतेच्या ओढीने खेचून नेते. तिचं नाव आहे स्टोनहेंज. विशाल हिरव्या कुरणांमध्ये उभ्या असलेल्या या दगडांच्या रांगांकडे पाहिलं की वाटतं हे कोणी उभारलं असेल? का? आणि एवढ्या शतकांनंतरही हे अजून इतकं भक्कम कसं? हे ठिकाण युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये गणलं जातं. सुमारे 4,000 ते 5,000 वर्षांपूर्वी म्हणजेच इ.स.पू. 3000 ते 2500 दरम्यान बांधलेलं स्टोनहेंज हे दगडी वर्तुळ आजही शास्त्रज्ञांसाठी कोडंच आहे. इथल्या प्रचंड दगडी खांबांची उंची 13 ते 30 फूटांपर्यंत आहे आणि वजन 25 टनांहून अधिक. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे दगड स्थानिक नाहीत, ते वेल्समधील प्रेसेली पर्वतांमधून म्हणजे 200 किलोमीटरवरून आणले गेले आहेत. आधुनिक यंत्रांशिवाय हे कसं केलं असेल हा प्रश्न आजही पडतो.
दरवर्षी हजारो पर्यटक इथे समर सोल्स्टिस पाहण्यासाठी येतात. दरवर्षी 21 जून रोजी सूर्य या दगडांच्या रेषेतून उगवतो. तो क्षण पाहताना असं वाटतं की जणू मानवाने हजारो वर्षांपूर्वीच आकाशातील गणित अचूक ओळखलं होतं.
इतिहासकार आणि संशोधकांपैकी काहींच्या मते ही प्राचीन खगोलशास्त्रीय वेधशाळा होती. सूर्य, चंद्र व ऋतूंचं गणित मांडण्यासाठी इथली रचना वापरली जात असे. काहींच्या मते हे पवित्र धार्मिक विधींसाठीचं स्थळ होतं. तर काहींच्या मते इथे प्राचीन वैद्यकशास्त्राच्या गुप्त उपचारपद्धतींचं केंद्र होतं. या रहस्यांमुळेच स्टोनहेंजला भेट देणं म्हणजे फक्त प्रवास नाही, तर पुरातन काळात जाण्याचा अनुभव आहे. आपण भारतीय प्रवासी म्हणजे हजारो वर्षांच्या संस्कृतीचा वारसा जपणारे, त्यामुळे ही सफर आपल्यासाठी खास ठरते आणि या वास्तूशी आपली नाळ जोडली गेल्यासारखं वाटतं.
इतिहासाची गोडी असो, निसर्गाची आवड असो किंवा गूढतेची भुरळ, स्टोनहेंज प्रत्येकाला काहीतरी देऊन जातं. आज लाखो पर्यटकांना स्वतःकडे खेचून आणणारं हे ठिकाण म्हणजे मानवाच्या कल्पकतेचा, चिकाटीचा आणि श्रद्धेचा ठेवा आहे. तेव्हा तुमच्या इंग्लंड प्रवासात स्टोनहेंज नक्की पाहा. ते दगड तुम्हाला त्या काळाशी बोलायला भाग पाडतील हे नक्की!
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.