...दर तासाला कोंबड्याचे आरवणे ऐकू येत होते. याचाच अर्थ मी जिवंत होते, मी त्या आनंदात होते! बसल्याबसल्या मी त्या संपूर्ण चौकावरून नजर फिरवली...
काही दिवसांपूर्वी ॲपल कंपनी बद्दलची एक बातमी वाचली. रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण मोजण्याच्या कसल्याश्या पेटंटवरून कंपनीने ॲपलची घड्याळे माघारी बोलावली. एक साधेसुधे वेळ सांगणारे घड्याळ. पण भविष्यात हे असं मनगटावर बांधलेलं तंत्रशुद्ध गोष्टी लीलया शक्य करणारं उपकरण निर्माण होईल, असं कधी कोणाला वाटलं होतं का? वेळ सांगण्यापलीकडे, आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित अनेक गोष्टी करण्याची घड्याळाची क्षमता अगदी अलीकडच्या काळात विकसित झालेली आहे. मुळात, घड्याळशास्त्राचा किंवा वेळेची मोजदाद करण्याच्या पद्धतीचा उगम इजिप्तमध्ये झाला. पृथ्वीच्या नैसर्गिक 24 तासांच्या चक्राच्या निरीक्षणात त्याचा उगम आहे. ही गोष्ट आहे थेट इसवीसन पूर्व 1450 मधली.
सन 1410 मध्ये उभारलेल्या एका प्राचीन शहराच्या नगर चौकात मी उभी होते. तिथे वास्तूरचना आणि खगोलशास्त्र यांच्या अजोड मिलाफातून साकारलेली एक उत्तम कलाकृती न्याहाळत होते. माझं मन अंचब्याने भरलं होतं तर, मेंदू आश्चर्याने थक्क झाला होता. मी त्या कलाकृतीला मनापासून दाद दिली. त्याचं कारणही तसंच होतं. प्रथमच मी घड्याळाचा असा प्रकार पाहिला होता. त्या घड्याळाशेजारी असलेला माणसाचा सांगडा, त्याच्याकडे पाहणाऱ्याला पृथ्वीवर शिल्लक असलेल्या मर्यादित काळाचं स्मरण करून देत होता.
प्राग शहरातील टाऊन हॉलमध्ये असलेल्या प्राग खगोलीय घड्याळासमोर म्हणजेच ओर्लोजच्या समोर उभी राहून मी त्या घड्याळाकडे पाहत होते. हे जगातील सगळ्यात जुनं आणि अजूनही कार्यरत असलेलं खगोलीय घड्याळ आहे. रोमन सम्राट चौथ्या चार्लस् च्या राजवटीत, बोहेमियन सुवर्ण युगाच्या शेवटच्या दशकात हे घड्याळ बसविण्यात आलं. ते केवळ वेळ दाखवणारं घड्याळ नाही किंवा आकाशातील घडामोडींची नोंद ठेवणारं यंत्र नाही. त्यात त्यावेळच्या समाजाचं प्रतिबिंब उमटलेलं आहे. घड्याळाकडे पाहणाऱ्यास काळाच्या धारणा आणि संकल्पना यांचं दर्शनही घडतं. त्या घड्याळाकडे बारकाईने पाहिल्यावर त्याच्या मध्यभागी पृथ्वी विराजमान झाल्याचं लक्षात येतं आणि तिच्याभोवती भ्रमण करणारा सूर्य दिसतो. पृथ्वी केंद्रस्थानी असून विश्व तिच्याभोवती फिरते अशी पक्की खात्री असलेला तो काळ होता. त्या काळात शास्त्रीय समज, मिथक आणि गूढता यांच्यासोबत एकत्रपणे नांदत होता. त्या काळाचं प्रतिबिंब इथे उमटलेलं आहे. हे घड्याळ सूर्योदय आणि सूर्यास्त यांच्या वेळांसोबतच चंद्राच्या कलांचेही वेळापत्रक दाखवते. त्याचबरोबर, जगण्याच्या तत्वज्ञानातील धडेही शिकवते. त्या घड्याळाची अद्भुत किमया पाहण्यासाठीच माझ्यासह अनेक पर्यटक प्रागच्या नगर चौकात जमलेले होते. आम्हाला फार काळ वाट पहावी लागली नाही. अल्पावधीतच घड्याळाने तासाचे टोल दिले आणि आम्ही सगळे एका अद्भुत अनुभवाचे साक्षीदार बनलो. घड्याळालगतचे चार छोटेखानी मानवी पुतळे म्हणजे त्या काळच्या समाजाला ज्यांच्याविषयी तिरस्कार होता अशा चार गोष्टींची प्रतीकं. पहिली आकृती होती निरर्थकता दाखवणारी. एक माणूस स्वत:चा चेहरा आरशात बघतोय. दुसरा माणूस म्हणजे सोन्याने भरलेली पिशवी हाती असलेली कंजूष व्यक्ती. ते लोभाचं प्रतीक. शेजारी एक सांगाडा आहे. तो घड्याळाने दर तासाला टोले दिले की कालमापक दाखवून मृत्यूचे स्मरण करून देतो. शेवटी असलेली एक मानवाकृती ही वासना आणि भौतिकसुख यांचं प्रतीक होती. दरेक तासाला तो सांगाडा तासाचे टोल देत होता आणि उरलेल्या तिन्ही मानवाकृती नकारार्थी मान हलवत होत्या. त्याचा अर्थ त्यांची तिथून निघून जाण्याची तयारी नव्हती. मृत्यूची शाश्वतता त्यांना मान्य नव्हती. मानवी जीवनातही हे काहीसं असंच सुरू असतं ना? या घड्याळाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक तासाला खगोलीय घड्याळ्याच्या डाव्या आणि उजव्या बाजूच्या असलेल्या दोन खिडक्यांची दारं किलकिली होतात आणि त्यातून बारा प्रेषितांचे पुतळे दर्शन देतात. त्यांच्यावर आहे आरवणारा कोंबडा. कोंबड्याची बांग ऐकू आली याचा अर्थ आपण जिवंत आहोत, असं समजायचं अशा अर्थाची एक आख्यायिकाही इथे सांगितली जाते. त्यामुळे, या सगळ्याला मनमोहक इतिहासाला, कथेचा एक विचित्र पैलूही जोडला जात होता.
त्या जुन्या चौकातल्या अनेकानेक कॅफेंपैकी एका कॅफेत बसून मी विचार करत होते... मला आनंद तर झालाच होता. दर तासाला कोंबड्याचे आरवणे ऐकू येत होते. याचाच अर्थ मी जिवंत होते, मी त्या आनंदात होते! बसल्याबसल्या मी त्या संपूर्ण चौकावरून नजर फिरवली. तिथल्या प्रत्येक इमारतीची भिंत अन भिंत एकेक कहाणी स्वत:पाशी कवटाळून उभी आहे. तिच्याकडे सांगण्यासारखे काहीतरी आहे. हा चौक म्हणजे केवळ इमारतींचा समूह नाही तर, नांदत्या, खेळत्या संस्कृती आणि सामाजिक जीवनाचं ते एक महत्त्वाचं स्थान आहे. एका जुन्या ऐतिहासिक घोडागाडीतून काही पर्यटक नगरात फेरफटका मारत होते. त्या फेरफटक्यामुळे त्या जुन्या माहोलाला एकदम देखणी पार्श्वभूमी लाभली होती.
एखाद्या प्राचीन शहराची कहाणी जाणून घ्यायची असेल तर इतिहासाच्या शेकडो पानांमध्ये तासन्तास घालवावे लागतात. पण इथे प्रागमध्ये या जुन्या चौकात घालवलेल्या तासाभराने शहराच्या संपन्न इतिहासाचा आणि वास्तूरचनेच्या पद्धतीचा जिवंत दाखलाच मला दिला. वैभव आणि संपन्नतेची गाथा माझ्यासमोर मांडली. गॉथिक, रोमन, रोकोको आणि बारोक अशा वेगवेगळ्या वास्तूशैलींचे प्रतिनिधित्व करणाऱ्या इमारतींमधून प्रागच्या जडणघडणीतील सगळे टप्पे इथे आपल्याला जाणवतात. गेल्या वर्षी ख्रिसमसच्या आधीच मी प्रागला जाऊन आले होते. जुन्या धाटणीच्या शहरापासून ते वेनल्सासच्या चौकापर्यंत संपूर्ण प्रागने हिवाळ्याची जादुई दुलई पांघरलेली होती. सगळीकडे ख्रिसमस मार्केट, सजावटीची रोषणाई यांची चहलपहल होती. वातावरणात वाईनचा गंध दाटून राहिलेला होता. त्यावेळी जुन्या दगडी वाटांवरून प्रागच्या गल्लीबोळात फिरताना ‘शंभर मनोऱ्यांचे शहर’ हे या शहराचे वर्णन सार्थ वाटले. या गल्लीबोळातून फिरत असताना वाटेतील दुकानांमध्ये प्रागच्या प्रख्यात बोहेमियन स्फटिकांच्या आणि पोर्सिलेनच्या (चिनी मातीचा प्रकार) भांड्यांचं देखणं रुप मनाला मोहवून टाकत होतं.
प्रागमधील माझी पुढची भेट होती ती चार्ल्स ब्रिजला. या ब्रिजवरून प्रागचं सौंदर्य आणखी खुलून दिसतं. मी त्या सौंदर्यात आकंठ बुडाले. 14व्या शतकात बांधलेला हा पूल जुने शहर आणि हार्डकॅनी कॅसल असलेल्या कॅसल ड्रिस्ट्रिक्टला जोडतो. दगडी पायवाटांवरून चालताना आजूबाजूला संत महात्म्यांचे 30 पुतळे दिसतात. त्याशिवाय, गॉथिक शैलीचा उत्तम नमुना असलेल्या या पुलावर बारोक शैलीत रंगवलेल्या, इतिहासातील घडामोडी पाहता येतात. प्रागचा राजमहाल आणि वल्तावा नदीच्या कडेने उभे राहिलेल्या शहराचे अतिशय मनोहारी दर्शन इथे घडते. तो सगळा देखणा नजारा पाहत मी अनंत काळापर्यंत तिथे तशीच उभी राहू शकले असते. कॅसल डिस्ट्रिक्टमधून फिरणं मला भावलं. वेळ घालवण्यासाठी मी पायवाटेलगत असलेल्या दुकानात चेक प्रजासत्ताकात बनलेल्या लाकडी बाहुल्या आणि वस्तू पाहत पुढे निघाले. त्यावेळी मला काही पारंपरिक पदार्थ, त्यांच्या पारंपरिक चवीत चाखण्याची संधीही मिळाली. आता ते पदार्थ नवीन रुपडे लेवून आधुनिक स्वरुपात भेटतात. रस्त्यावर मिळणारी चिमणी कोन-केक ही मिठाई आणि कोलाचे हा पेस्ट्रीचा पारंपरिक प्रकार इथे लोकप्रिय आहे. या दोन्ही गोष्टी आता आधुनिक प्रकार आणि चवींमध्ये मिळतात.
यात फारसं आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. कारण नवनवीन शोध लावण्याची वृत्ती चेक लोकांच्या रक्तातच शतकानुशतके भिनलेली आहे. त्यातूनच, अल्बर्ट आईनस्टाईन यांच्यासारख्या प्रकांड पंडिताला इथे विद्यादान करावंसं वाटलं. प्रख्यात संगीतकार वोल्फगांग आमाडेउस मोझार्ट यांनी त्यांचा ऑपेरा प्रागला आणला. त्यांच्या ‘डॉन जिओव्हानी’ आणि ‘सिम्फनी क्रमांक 38’ (प्राग सिम्फनी) या कलाकृतींचे पहिले प्रयोग प्रागमध्ये झाले. शहरात फिरत असताना श्रेष्ठ चेक संगीतकार अंतोनिन लियोपोल्द द्वोराक यांचा पुतळाही मला दिसला. त्यांच्या ‘न्यू वर्ल्ड सिंफनी’चा वापर लोकप्रिय ‘स्टार वॉर’ आणि ‘जॉज’ या सिनेमांमध्ये करण्यात आला आहे. बोहेमेनियन काळातील प्रागमधील प्रसिद्ध कांदबरीकार फ्रांझ काफ्का यांचा वावर असलेल्या वाटेवरूनही मी प्रवास केला. विसाव्या शतकातील साहित्य क्षेत्रातील काफ्का यांचं स्थान आघाडीचं आहे.
चेक लोकांनी लावलेले शोध मला पावलापावलावर गाठत होते. रोबोट शब्दाची रचना चेक लोकांनी केली. रक्ताचे चार गट त्यांनी शोधले. स्नॅप बटण, जहाजाचे प्रोपेलर, बीअरचे ग्लास, साखरेचे क्यूब ही सगळी त्यांचीच देण. प्रत्येकाच्या आयुष्यात गोडवा आणण्याचं काम या साखरेच्या क्यूबने केलं आहे. जेकब ख्रिस्तोफर राड या चेक उद्योगपतीने 1841 मध्ये साखरेचा क्यूब तयार केला. त्याचं कारण ठरली त्याची पत्नी. साखरेचा ढीग फोडताना तिला इजा झाली होती म्हणे! त्यावर उपाय म्हणून आला साखरेचा क्यूब! प्रागमध्ये अशा कितीतरी मनोहारी गोष्टी आपल्याला समजतात आणि आपण थक्क होतो.
कॉर्पोरेटसाठी वीणा वर्ल्डकडून आम्ही खास प्राग टूर प्लान करत होतो. त्यावेळी ऐतिहासिक महत्त्वाच्या ठिकाणांसोबतच बिअर फॅक्टरीला भेट देण्याचा कार्यक्रमही ठरवला. त्याला पर्यायच नव्हता. जगातील सर्वाधिक बिअर रिचवणारा देश अशी चेक प्रजासत्ताकाची ओळख आहे. बिअर तयार करण्याची चेक घरांमध्ये मोठी परंपरा आहे. त्यात वर्षानुवर्षे पारंगत झालेली मंडळी तिथे आहेत. घरी बिअर तयार करण्यात आपल्या कुटुंबाची कशी मातब्बरी आहे, हे तिथली काही कुटुंबे अभिमानाने मिरवतात. कुटुंबात वर्षानुवर्षे जपलेली खास चव एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे, ज्येष्ठांकडून तरुणांकडे जपून हळूवारपणे हस्तांतरित केली जाते. प्लिस्नर आणि मूळ बडवायजरचे हे जन्म ठिकाण. त्यामुळे बिअर प्रेमींसाठी चेक प्रजासत्ताक हा मोठा खजिनाच आहे.
प्रागसोबतच देशातील दुसऱ्या क्रमांकाचं असलेलं ब्रनो हेही देखणं शहर आहे. त्याचबरोबर ‘स्पा टाऊन’ असं वर्णन केले जाणारे कार्लोव्ही व्हॅरी आणि निसर्गसौंदर्याचे देणे लाभलेले चेस्की क्रूमलोव्ह या शहरांनाही आवर्जून भेट द्या. यासोबत, वीणा वर्ल्डच्या सेंट्रल युरोपच्या टूरमध्ये व्हिएन्ना, ब्रातिस्लावा, बुडापेस्ट या प्राग शेजारीच असलेल्या सुंदर शहरांचाही समावेश आहे. याही शहरांना एकदा तरी भेट द्यायलाच हवी!
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.