Language Marathi

Eyjafjallajökull

आजचा रविवारचा टाइमपास म्हणून हा प्रश्‍न. कसा उच्चारायचा हा वरचा शब्द? टिव्ही चॅनल्सवर फनी प्रोग्रॅम्स आलेयत ह्या शब्दाच्या उच्चारावर. तो कसा बोलायचा हे माहीत नसल्याने अनेक न्यूजरीडर्सनी त्याचा उच्चारच टाळला होता. २०१० मध्ये ह्या शब्दाने जगाची झोप उडवली होती. युरोपच्या इकॉनॉमीवर घाला घातला होता. एअरलाइन इंडस्ट्री घायकुतीला आली होती. दुसर्‍या महायुद्धानंतर जगरहाटीमध्ये एवढा मोठा अडथळा पहिल्यांदाच आला होता. एक कोटी लोक ‘जैसे थे!’ झाले हाते. काय, येतोय का उच्चारता हा शब्द?

मनालीची पहिली महिलांची सहल होती, मी चार दिवस मनालीत होते. रोहतांग स्नो पॉईंटला धम्माल केल्यावर मी आमच्या टॅक्सी ाईव्हरला म्हटलं, “मला आणखी पुढे घेऊन चल जिथपर्यंत रस्ता आहे तिथपर्यंत आणि मग आपण परत येऊ.” पहाडांची भव्यता, बर्फाचा अप्रतिम नजारा आणि एकूणच लँडस्केप डोळयात साठवायचं होतं. निसर्गसौंदर्याचा मनसोक्त आस्वाद घेऊन मी चार वाजता खाली उतरायला सुरूवात केली. ह्या पहाडांवर मोबाईल रेंज मिळत नसल्याने इतका वेळ निसर्ग आणि माझ्यामध्ये कोणताही अडसर नव्हता. मनालीच्या जसे जवळ आलो आणि आठवण झाली मोबाईलची. जसा मोबाईल ऑन झाला, मेसेजेसचा खच, ‘कॉल अर्जंटली’ म्हणून. एवढे मेसेजेस बघून पोटात गोळा आला. घाबरतच फोन लावला, समोर आमचा एअर रिझर्वेशनचा प्रमोद, “मॅम युरोपमधले सगळे एअरपोर्टस् बंद झालेत, कुठूनही कुठेही फ्लाईट्स येत जात नाहीयेत आणि रोज आपल्या टूर्स आहेत”, “अरे पण नेमकं काय झालय, युध्द बिध्द सुरू झालं की काय?’‘अ‍ॅश क्लाऊड आलाय, संपूर्ण युरोपच्या आसमंतात तो पसरलाय, झिरो व्हिजिबिलीटी आणि त्यामध्ये पार्टिकल्सपण आहेत, त्यामुळे  जैसे थे स्थिती’ अ‍ॅश क्लाऊड? तोपर्यंत ऐश्‍वर्या रायला अ‍ॅश म्हणतात एवढाच संबंध होता अ‍ॅश या शब्दाशी. पण युरोपमध्ये अ‍ॅश क्लाऊड आलाय म्हणजे नेमकं काय, कशामुळे हे कळेना. प्रमोदला म्हटलं,“हे बघ सगळंच ठप्प आहे नं. सो पर्यटकांना कळवा वुई विल किप यु अपडेटेड म्हणून आणि परिस्थितीचा आढावा-अवाका-तीव्रता ह्याचा अंदाज घेऊन पुढील पावलं टाकूया. मला हॉटेलला जाऊना जरा बघु दे हे अ‍ॅश क्लाऊड म्हणजे नेमकं काय आहे? हॉटेलला आले तर सगळे टीव्ही चॅनल्स ह्या ‘अ‍ॅश क्लाऊडच्या’ न भू:तो न भविष्यति अशा विषयावर तुटून पडलेले. एअरलाइन्स आणि एअरपोर्टस्वर असे अचानक बंद पडल्यावर काय हाहाकार उडाला असेल ह्याची कल्पनाच केलेली बरी. त्याचं असं झालं होतं, आइसलँड ह्या इग्लंडच्या वर असलेल्या, जगाच्या नकाशावर अतिशय छोट्या दिसणार्‍या व्होल्कॅनिक इरप्शन्स संबंधात प्रसिध्द असलेल्या ह्या देशात ज्वालामुखीचा उद्रेक झाला होता आणि त्यातून बाहेर पडलेल्या ज्वाळांमधून निघणारा धूर, राख आणि माती ह्याचं मिश्रण एवढ्या वेगाने भूगर्भातून येत होतं आणि आकाशात पसरत होतं की शास्त्रज्ञही अवाक झाले होते. हे सगळं मिश्रण तीस ते पस्तीस हजार फूट उंचावर फेकलं जातं होतं आणि हजारो किलोमीटरर्सच्या परिघात पसरत होतं, नॅचरली विमानांचं उड्डाण बंद करण्यातच शहाणपणा होता. अ‍ॅश क्लाऊडचे फोटोज्, त्यावरची चर्चा, हे कुठपर्यंत चालणार? हे कशामुळे झालं? आता पुढे काय? एअरपोर्टवर माणसं कशी अडकून पडलीयत? एअरपोर्टचा खाण्याचा स्टॉक कसा संपलाय? ह्या बातम्यांनी प्रत्येक चॅनल भरला होता. पण त्यात सगळ्यात एक मजेशीर गोष्टही दिसत होती ती म्हणजे आइसलँडमध्ये ज्या पर्वतावर हा ज्वालामुखीचा उद्रेक झाला होता त्या पर्वताचं नाव कोणत्याही टीव्ही चॅनलवरच्या न्यूजरीडरला उच्चारता येत नव्हंत अगदी सीएनएन, बीबीसीलासुध्दा. नंतर त्यांनी क्लिप्स दाखवायला सुरुवात केली, वेगवेगळ्या ठिकाणी कॅमेरा लावून येणार्‍या जाणार्‍याला विचारायला लागले की ह्या शब्दाचा उच्चार कसा करायचा? प्रत्येक जण कागदावर तो शब्द वाचत होते आणि असफल प्रयत्न करत होते. ह्या फटफजितीमुळे मात्र हास्याचे फवारे निर्माण होत होते. अ‍ॅश क्लाऊडमुळे आठ दिवस युरोप बंद पडला. एक कोटीच्यावर प्रवासी जिथे तिथे खोळंबले. वित्तिय हानी किती झाली ह्याला गणतीच नाही. हळूहळू फ्लाईट्स सुरू झाली आणि टूर्स सुरळीत झाल्या पण सगळा बॅकलॉग आणि नुकसान भरून काढण्यात एअरलाइन्सना खूप वेळ लागला. मानवाने कितीही प्रगती केली तरी निसर्ग नेहमीच एक पाऊल आपल्या पुढे राहील हे दर्शवणारं हे उत्तम उदाहरण.

 

२०१० मध्ये १४ एप्रिल ते २३ मे ह्या कालावधीत हा ज्वालामुखीचा उद्रेक झाला होता. त्याची तीव्रता सर्वात जास्त होती ती १५ एप्रिल ते २३ एप्रिलच्या दरम्यान. विमानसेवा बंद पडल्या त्या ह्याच काळात. जगाला बंद करण्याची ताकद असलेला हा ज्वालामुखी प्रकट झाला तो आइसलँडमधल्या Eyjafjallajökull ह्या साडेपाच हजार उंच आणि शंभर किलोमीटर्स क्षेत्रफळाच्या माऊंटनवर. पण त्याचा आवाका बघा किती प्रचंड होता. पॅरीस वा लंडनपासून आइसलँडला विमानाने पोहोचायला तीन तास लागतात. म्हणजे मुंबईहून बँकॉक एवढं अंतर आणि त्याखाली सगळा मेनलँड युरोप. एवढ्या दूरवर ही अ‍ॅश पसरली होती. आइसलँडची अ‍ॅश जर एवढी महत्वाची असेल तर हा देश कसा असेल हे बघायाची उत्सुकता तेव्हापासून लागली होती. २००८ च्या मंदीच्या फटक्यात हा देश दिवाळखोरीत निघाला होता तो IMF च्या पाठिंब्याने वाचला. ‘डाय अनदर डे’ ह्या जेम्स बॉण्डच्या चित्रपटात आणि आत्ताच्या दिलवाले सिनेमात आइसलँडचं शुटींग होतं, त्यामुळे अधूनमधून आइसलँड हा विषय डोकं वर काढायचा. मग सुधीरने ठरवलं आइसलँडला जायचं आणि मला न विचारता बुकिंगही केलं. पतींची आज्ञा कशी मोडणार? तसं मलाही कधीपासून जायचंच होतं पण पत्नीसुलभ उत्साह न दाखवता, “मी आता तू केलंच आहेस बुकिंग तर येते” म्हणत मॉरिशसहून डायरेक्ट आइसलँडला त्यांना जॉईन झाले. पाच दिवसांचं पॅकेज होतं आणि ‘पैसा वसूल’ सहल झाली.

‘लँड ऑफ फायर अँड आइस’ असं ज्याला म्हटलं जातं तो नॉर्थ पोलजवळचा आर्क्टिक रिजनमधला आइसलँड फक्त साडेतीन लाख लोकवस्तीचा देश आहे. पाच हजार किलोमीटर्सचा समुद्रकिनारा लाभलेल्या ह्या देशाची रेकयाविक ही राजधानी. इथून न्यूयॉर्क विमानाने साडेपाच तासांवर, युरोप तीन तासांवर, स्कॅन्डिनेव्हिया अडीच तासांवर आणि नॉर्थ पोल पाच हजार किलोमीटर्सवर आहे. समुद्री चाच्यांनी ह्या देशाचा शोध लावला. डॅनिश लोकांनी इथे बर्‍यापैकी सत्ता गाजवली. १९१८ ला स्वातंत्र्य चळवळ सुरु झाली आणि १७ जून १९४४ ला डॅनिश लोकांकडून-डेन्मार्ककडून स्वातंत्र्य मिळवलं आणि आइसलँड एक स्वतंत्र देश म्हणून अस्तित्वात आला. ख्रिस्ती धर्माचा स्विकार केल्यामुळे इथले जास्तीत जास्त लोक हे ख्रिश्‍चन आहेत. आइसलँडिक ही थोडीशी कठीण भाषा (अजून वरच्या टायटलचा उच्चार जमला नाही नं!) मुख्यत्वेकरून बोलली जाते. त्यानंतर इंग्लिश, डॅनिश, नॉर्वेजीयन आणि जर्मनसुद्धा अस्तित्वात आहेत. इथला मुख्य व्यवसाय फिशिंग आहे, तसंच हायड्रोपॉवर व जिओथर्मल पॉवरच्या देणग्या आहेत. तेलाच्या खाणी शोधण्याचं काम आता सुरू आहे. अ‍ॅल्युमिनियम वितळवण्याची मोठी इंडस्ट्री आहे तसेच फेरोसिलिकॉन प्रॉडक्शन इथे होतं. सर्वात स्वस्त ग्रीन एनर्जीवाला देश असल्याने डेटा सेंटर्सचा बिझनेस वाढायला लागलाय. २००९ पासून टूरीझमने जोर धरला आणि आता फिशिंगनंतर टूरिझम इंडस्ट्री दुसर्‍या क्रमांकावर आलीय. १००% साक्षरता ह्या देशात आहे कारण स्कूलिंग फ्री आहे आणि शिक्षणाला सर्वात जास्त प्राधान्य आहे. आइसलँड हा NATO म्हणजे नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशनचा मेंबर असला तरी आइसलँडकडे स्वत:चं सैन्य नाही. आइसलँडिक नॅशनल पोलिस आणि कोस्टल गार्ड्स हीच सिक्युरिटी. आइसलँडमध्ये गुन्ह्यांचं प्रमाण जवळजवळ झिरो, तिथल्या तुरूंगात फक्त सात कैदी आहेत. स्त्रियांसाठी त्यांनी जो तुरूंग बांधला त्यात वर्षानुवर्षे कुणीही स्त्री कैदी न गेल्यामुळे शेवटी त्यांनी तो तुरूंग ‘बे्रड अ‍ॅन्ड ब्रेकफास्ट’ हॉटेलमध्ये बदलून टाकला. स्वच्छ हवा, स्वच्छ पाणी, मोफत शाळा, जास्त आयुर्मान, गुन्हेगारी जवळजवळ शून्य, ह्यामुळेच असेल कदाचित आइसलँडमधल्या लोकांना ‘सर्वात आनंदी लोकं’ असं संबोधलं जात. इथे साप वा डास अस्तित्वात नाहीत. आइसलँडिक तगडे घोडे-शेळी- मेंढी-आर्क्टिक फॉक्स-शीपडॉग-गायी हे प्राणी, पफीन्स सारखे सी बर्डस्, व्हेल-सील-इल-चार-सालमन-ट्राऊट इत्यादी मासे ही आइसलँडची संपत्ती आहे असं म्हणायला हरकत नाही. पोलर बेअर सारखे डेंजरस प्राणी कधीतरी ग्रीनलँड किंवा आर्क्टिकवरून आइसबर्गवर फ्लोट होत इथे येतात. आइसलँड ही व्होल्कॅनो लँड असल्याने वीस जागृत ज्वालामुखी पर्वत इथे आहेत. वत्नाकुत्ल हे सर्वात मोठं ग्लेशियर असून त्याने ह्या देशाचा आठ टक्के भाग व्यापलेला आहे, त्यावरचं हायेस्ट पीक सात हजार फूट उंचीचं आहे. आइसलँडिक लोक मटन, मासे, डार्क ब्राऊन ब्रेड, दुग्धजन्य पदार्थांचा वापर त्यांच्या जेवणात करतात. रेनडियरचं मांस ही डेलिकसी समजली जाते पण ती खूपच महाग असते. इथे थर्मल वॉटर इतकं मुबलक आहे की संपूर्ण शहराला हे गरम पाणी पाइपच्या साहाय्याने पुरवलं आहे.

अशा ह्या छोट्याशा सुंदर देशात आम्ही भरपूर भटकलो. सुंदर सुंदर वॉटरफॉल्स पाहिले. हॉट स्प्रिंग्ज, मड पूल्स, गल्फॉस जिओथर्मल वेंट्समधून दर तीन मिनिटांनी उंच उडणारे गरम पाण्याचे फवारे आणि व्हॉल्कॅनिक क्रेटर्स अशा बर्‍याच गोष्टी बघितल्या, ऐकल्या. लोकल रेस्टॉरंट्समध्ये जेवलो. त्याचवेळी युरो कप सुरू होता. फ्रान्स आणि आइसलँडची क्वार्टर फायनल होती. आइसलँड टीम पहिल्यांदाच एवढ्या पुढेपर्यंत पोहोचल्याने संपूर्ण देश आनंदात होता. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सारेच मॅचकडे डोळे लावून बसले होते. अर्थात फ्रान्सपुढे हा संघ नवखा होता त्यामुळे किमान दोन गोल करु शकला हाच आनंद. तुम्ही जर फुटबॉल मॅच पाहिली असेल तर एक मजेशीर गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल ती म्हणजे इथे आइसलँडिक नावांमध्ये आडनाव नसतं. सर्वांची नावं वडिलांचा मुलगा किंवा मुलगी अशी असतात. म्हणजे नाव कॅथरिन असेल आणि तिच्या वडिलांचं नाव जॉन असेल तर तिचं पूर्ण नाव कॅथरिन जॉनडॉटीर असं असतं आणि समजा तिच्या भावाचं नाव एडवीन असेल तर एडवीन जॉन्ससन असं होईल. त्यामुळे आइसलँंड टीमच्या प्लेअर्सची सर्वांची नावं शेवटी …SSON अशी आहेत.

आता तिथे समर सुरु आहे. आम्ही गेलो तेव्हा सुर्यास्त होता रात्री ११.५८ ला आणि सुर्योदय होता पहाटे २ वाजता. त्यामुळे रात्रीच्या अंधाराचा अंधारच होता. आम्ही रात्र पाहिलीच नाही. ज्यावेळी आपण आईसलँडला नॉर्दन लाइट्स बघायला जाऊ तेव्हा नेमकी ह्याच्या उलट परिस्थिती असणार. चारेक तास काय ते झुंजूमूंजू होणार तेवढंच. सर्वात जास्त आइसलँड आपल्याला आवडतं ते तिथल्या अ‍ॅक्टिविटीजमुळे. ग्लेशियर वॉक करतानाचा अनुभव आणि अतिशय सॉफिस्टिकेटेड अल्ट्रामॉडर्न ब्लू लॅगूनमध्ये थर्मल बाथ घेण्याची मजा आयुष्यात कधीही विसरु शकणार नाही. आम्ही जाऊन आलो आइसलँडला आणि आमच्या आत्तापर्यंत पाहीलेल्या देशांमध्ये एका देशाची भर पडली. आता तुम्हाला घेऊन जायचंय. लेट्स एक्सप्लोअर समथिंग डिफरंट!

आणि हो, आजच्या टायटलचा उच्चार आहे ‘एया फैतला योकुत्ल’ आणि त्याचा अर्थ आहे ‘आयलंड माऊंटन ग्लेशियर.’

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*