Marathi

सिलेक्शन मन्थ

Reading Time: 4 minutes

कुठे जावं, कसं जावं, काय खावं, कुणाबरोबर जावं… असे अनेक प्रश्‍न पडायला आता सुरुवात होईल कारण जानेवारी महिना सुरू झाला की वेध लागतात ते समर व्हेकेशनचे. अर्थात त्याला कारण असतं ते जानेवारी महिन्यात येणार्‍या पर्यटन संस्थांच्या जाहिराती आणि त्याद्वारे पर्यटकांच्या मागे लावलेली भुणभुण. आम्हीही सारखे म्हणतच असतो की,
चलो, बॅग भरो, निकल पडो!

परवा एका वृत्तपत्रात ग्रोसरी शॉपिंगच्या सात जाहिराती होत्या, प्रत्येक जाहिरात पूर्ण पान भरून. दिवाळीच्या वेळी ह्याच जाहिराती इलेक्ट्रॉनिक्स गोष्टींच्या असतात. जानेवारी महिन्यात ही जागा ट्रॅव्हल कंपन्यांच्या जाहिरातींची असते. जेवढ्या जाहिराती जास्त तेवढी पर्यटकांसाठी गोंधळाची स्थिती. ‘इफ यू कान्ट कन्व्हिन्स, कन्फ्युज देम’ अशी काहीशी स्ट्रॅटेजी तर नाही नं सर्व पर्यटन कंपन्यांची मिळून असंही वाटायला लागेल अशी अ‍ॅग्रेसिव्ह भाषा प्रत्येक जाहिरातीची. योग्य निर्णय महत्त्वाचा आणि म्हणूनच ह्या महिन्याला मी ‘सिलेक्शन मन्थ’ म्हणते.

हल्लीच्या सोशल मीडियाच्या सुपरफास्ट युगात अ‍ॅक्च्युअली आम्ही कितीही जाहिरात केली तरी आमचा पर्यटक राजा काय म्हणतो त्यावर सगळं काही अवलंबून असतं. त्यांच्या हातात आमचं भविष्य. पर्यटनसंस्था चालतात, पुढे जातात, मोठ्या होतात किंवा गाशा गुंडाळतात हे सगळंच त्या पर्यटक राजाच्या मर्जीवर. गेली पस्तीस वर्ष मी ह्या क्षेत्रात कार्यरत आहे. अनेक स्थित्यंतरं पाहिली. संस्था आल्या आणि गेल्या पण ह्या पर्यटक राजाचं स्थान मात्र अढळ राहिलं. आमच्या वीणा वर्ल्डच्या कॉर्पोरेट ऑफिसमधल्या एका भिंतीवर आम्ही सॅम वॉल्टनचं वाक्य लिहून ठेवलंय, ‘देअर इज ओन्ली वन बॉस. द कस्टमर. अ‍ॅन्ड ही कॅन फायर एव्हरीबडी इन द कंपनी फ्रॉम द चेअरमन ऑन डाऊन, सिंपली बाय स्पेंडिंग हिज मनी समव्हेअर एल्स’ किती खरं आहे हे आणि ह्या गोष्टीचा आपल्याला कधीही विसर पडू नये म्हणून आम्ही ते वाक्य सतत नजरेसमोर ठेवलंय. ‘सगळं छान छान चाललंय, कंपनी वाढतेय, आता आपल्याला कोण थांबवणार’ असा थोडासा जरी अ‍ॅटिट्युड येतोय असं दिसलं की आम्ही हा व्यावसायिक सुविचार आठवतो, आमच्या डोक्यात शिरू पाहणार्‍या हवेला टाचणी लावतो, वास्तवात येतो आणि कंबर कसून नेटाने कामाला लागतो. आमची सहल चांगली झाली तरच पर्यटक आपल्याकडे येणार पुन्हा पुन्हा, मग त्यांना जाहिरातीची गरज लागत नाही. पण जर सहल चांगली नाही झाली तर तेच नव्हे त्यांचे संबंधितही आपल्याकडे पाठ फिरवतात. अशावेळी पानभर जाहिरातीचाही काही उपयोग होत नाही. इतकं साधं सरळ आहे हे. मग प्रश्‍न येतो की, ‘आम्ही जाहिरात का करतो?’

आम्ही जाहिरात करतो ते दोन कारणांनी. एक म्हणजे जाहिरातीचं जे एक वैश्‍विक सत्य आहे, ‘आऊट ऑफ साईट-आऊट ऑफ माईंड’ त्यासाठी, आम्हीपण आहोत हे जगाला कळावं म्हणून. पब्लिक मेमरी इज व्हेरी शॉर्ट. आठवा बरं किती विमानकंपन्या, किती मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज, किती अ‍ॅक्टर्स, क्रिकेटर्स जे आपल्या जीवनाचा कधी काळी अविभाज्य भाग होते, किती सहजपणे आपल्या मन:पटलावरून-आपल्या आठवणीतून नाहीसे झाले. छोटी-मोठी-अवाढव्य कोणत्याही साईजची कंपनी असो, कितीही चांगली असो लोकांच्या सतत नजरेत रहावंच लागतंय. जागतिक स्पर्धेत तर हे अपरिहार्य झालंय. दुसरं कारण आहे आम्ही जाहिरात करण्याचं ते म्हणजे अनाऊंसमेंट. आमच्याकडे एखादी सहल आहे किंवा एखादी सहल आम्ही नवीन आणलीय हे पर्यटकांना कळावं म्हणून. आमच्याकडे वुमन्स स्पेशलची ऑस्ट्रेलियाची सहल आहे किंवा जपान चेरी ब्लॉसमची सीनियर्स स्पेशल सहल आहे किंवा हनिमूनर्ससाठी स्पेशल सहली असतात हे पर्यटकांना कळणार कसं? पर्यटकांसाठी आम्ही नव्याने फिलिपाईन्सची किंवा हवाई-मेक्सिकोची नवीन सहल आणलीय हे लक्षात आणून द्यायला जाहिरातीचा प्रपंच करावा लागतो.

आमच्याही जाहिराती आता आपल्या नजरेस पडतील. जानेवारी महिना म्हणजे समर ऑफरचा महिना. जास्तीत-जास्त पर्यटक ह्या महिन्यात समर व्हेकेशनमधल्या सहलींचं बुकिंग करतात. आधी बुकिंग केल्याने भरपूर पैसे तर वाचतातच पण परदेश सहल असेल तर व्हिसा प्रोसेस मार्गी लागते आणि कॉन्स्युलेटमधली व्हिसासाठीची गर्दी वाढण्याआधी व्हिसा होऊन जातो. बसमध्ये पुढच्या सीट्स मिळतात आणि एकदा का डेट्स निश्‍चित झाल्या की तुम्ही आणि आम्ही आपापलं पुढचं प्लॅनिंग करायला मोकळे होतो. बुकिंग करताना मात्र प्रत्येकाने कोणती सहल बूक करायची, किती दिवसांची करायची ह्याचा नीट विचार केला पाहिजे. आम्ही नेहमी पर्यटकांना सांगतो की जानेवारीत असणार्‍या समर ऑफरमध्ये पैसे वाचवा आणि टूर अपग्रेड करा, म्हणजे जर तुम्ही सात दिवसांची सिंगापूर मलेशियाची टूर घेणार असाल तर जंबो डिस्काउंटमध्ये पैसे वाचवा आणि दहा दिवसांची तीन देशांना भेट देणारी, स्थलदर्शनाने खचाखच भरलेली सिंगापूर थायलंड मलेशिया टूर घ्या. किंवा जर त्या सहलीत शक्य असेल तर सहल संपल्यानंतर पोस्ट टूर हॉलिडे घ्या किंवा एका सहलीवरून दुसर्‍या सहलीला जॉईन व्हा. अ‍ॅडव्हान्स प्लॅनिंगमुळे अनेक गोष्टी शक्य होऊ शकतात. तसंच बुकिंग करण्याआधीसुद्धा काही गोष्टी विचारात घेणे जरूरीचे आहे म्हणजे किमान तीन ते पाच वर्ष नजरेसमोर ठेऊन, सर्वसाधारणपणे आपण कसा काय प्रवास करू भविष्यात त्याचा विचार करून पावलं उचलली पाहिजेत.

परदेशात पर्यटन आपल्या आधी प्रगल्भ झालं. घर-गाडी-नोकरी-व्यवसाय-शिक्षण ह्यासोबत छोटं आऊटिंग आणि मोठा प्रवास वा पर्यटन हे त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले. आपल्याकडे गेल्या दहा-पंधरा वर्षात पर्यटनक्रांती झाली आणि आपणही मोठ्या संख्येने पर्यटनाभिमुख झालो. परदेशी पर्यटक त्यांच्या आयुष्यभराच्या पर्यटनाचं एक कॅलेंडरच बनवतात. आयुष्यात मी किती देश बघणार? कोणत्या वर्षी कोणत्या देशात जाणार? आधी काय, नंतर काय? किती बजेट पर्यटनासाठी ठेवायचं ह्याची आखणी केलेली असते त्यामुळे गोंधळ उडत नाही. ठरल्याप्रमाणे जग बघून होतं. आपल्याकडेही आता अशाप्रकारे प्लॅनिंगची सुरुवात झालीय ही चांगली गोष्ट आहे.

‘पर्यटनाला सुरुवात कशी करावी?’ हा प्रश्‍न बर्‍याचदा पर्यटक विचारतात. त्यासाठी तीन गोष्टी तपासून पाहणे गरजेचे आहे. एक म्हणजे, ‘काय प्रकारचा पर्यटक मी आहे? मला एकट्याने सडाफटिंग पर्यटन करायला आवडतं म्हणजे मी सोलो ट्रॅव्हलर आहे की मी अ‍ॅन्ड माय फॅमिली असं प्रायव्हेट फिरणं मला आवडतं की डोक्याला ताप नको असं ग्रुपसोबत मला फिरायला आवडतं?’ दुसरं म्हणजे, ‘मला पर्यटन करायचंय ते हौसेखातर जग बघण्यासाठी काही आहे की ज्ञानार्जनासाठी की नुसती धम्माल करण्यासाठी’ आणि तिसरं म्हणजे, ‘अर्थातच बजेट’. कमी खर्चात जास्तीत जास्त बघायचंय की आरामात एकावेळी एक देश निवांतपणे बघायचाय, नेमकी कोणती मानसिकता आपली आहे हे चेक केलं की पुढच्या गोष्टी सोप्या होतात. ग्रुप टूरची मानसिकता असलेला पर्यटक जेव्हा कस्टमाईज्ड हॉलिडे घेऊन एकटा सहलीला जातो किंवा जेव्हा एखादा ‘मी अ‍ॅन्ड माय प्रायव्हसी’ वाला पर्यटक ग्रुप टूरला येतो तेव्हा प्रॉब्लेम ठरलेला. ह्याला आम्ही ‘राँग नंबर लागला’ असं म्हणतो. शक्यतोवर आम्ही बुकिंगच्या वेळी पर्यटकांना जाणण्याचा प्रयत्न करतो पण जेव्हा पर्यटक ऑनलाईन बुकिंग करतात तेव्हा ते समजत नाही त्यामुळे आम्ही त्याबाबत अशी जागरुकता राखण्याचा प्रयत्न करतो. हल्ली पर्यटक वर्षातून किमान दोनदा पर्यटनाला बाहेर पडतात असं आमचं संख्याशास्त्र सांगतं, त्यामुळेच वीणा वर्ल्डच्या पाच वर्षांच्या आयुष्यात सात ते दहा वेळा पर्यटन केलेली अनेक मंडळी आहेत. भारतातील प्रवासात सर्वप्रथम पर्यटक सुरुवात करतात ती शिमला मनाली म्हणजे हिमालयाच्या पायथ्यापासून. मग एक नॉर्थ एक साउथ किंवा एक ईस्ट एक वेस्ट आणि मध्येच कधीतरी नेपाळ भूतान ह्या शेजारी राष्ट्रांचा नंबर लागतो. परदेशप्रवास करताना प्रथम सिंगापूर थायलंड मलेशिया, नंतर युरोप मग अमेरिका, मग ऑस्ट्रेलिया, मग पुन्हा युरोप मग आफ्रिका, मग पुन्हा युरोप मग कॅनडा, मग जपान चायना असा आत्तापर्यंतचा क्रम आहे पण जपान सध्या डिमांडमध्ये आहे. ते बर्‍याच वरच्या नंबरवर सरकलंय. जनरली मे महिन्याची सुट्टी परदेशप्रवासासाठी आणि दिवाळी-ख्रिसमसची सुट्टी भारतातल्या सहलीसाठी अशी पर्यटकांची वर्गवारी असते सुट्टीची. काहींच्या बाबतीत हा क्रम उलटाही असतो. स्वत:ला जाणून घेऊन त्याप्रमाणे प्लॅनिंग करणं, अ‍ॅडव्हान्स बुकिंग करणं आणि सर्वच दृष्टीने फायदा करून घेणं महत्त्वाचं. आम्ही नेहमीप्रमाणे म्हणतंच राहणार, जानेवारीच्या समर ऑफरमध्ये बुकिंग करा आणि निघा देशविदेशातील भ्रमंतीला. पैसे वाचवा, निर्धास्त व्हा.
चलो, बॅग भरो, निकल पडो!

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*