Language Marathi

साध्या साध्या गोष्टी भाग 3

शॉपिंग हा मूळ हेतू असलेला पर्यटक सहसा सापडणार नाही. अर्थात शॉपिंग हा बहाणा असू शकतो, खासकरून आमच्या वुमन्स स्पेशलला येणार्‍या सख्यांचा घरातून बाहेर पडण्यासाठी. टूर मॅनेजरने शॉपिंगसाठी वेळ दिला तर मारे मारे मॉलमध्ये भटकण्यापेक्षा कॅफेटेरियात शांतपणे कॉफी घेत त्या क्षणांचं सोनं करावं आणि शॉपिंग करायचं असेल तर ते लोकल शॉप्समध्ये लोकली मेड गोष्टींचं करावं.

सीनियर्स स्पेशल आणि वुमन्स स्पेशल ऑस्ट्रेलियाच्या पर्यटकांना, सिडनी शो बोट क्रुझवर गाला इव्हिनिंगला भेट देऊन मी सिडनी-मुंबई परतीचा प्रवास सुरू केला. सिडनी इंटरनॅशनल एअरपोर्टला पोहोचल्यावर चेक-इन इमिग्रेशन करून सिक्युरिटीला पोहोचले. त्यावरून आठवलं, सिडनीसारख्या अनेक मॉडर्न शहरांमध्ये आता ऑटो इमिग्रेशन होतं टोटली मॅनलेस. त्यामुळे आपला पासपोर्ट हा सिंगल बूक असावा. तो आधीच्या पासपोर्टस्ना जोडलेला नको किंवा तो पासपोर्ट कव्हरमध्ये पण नसावा. अ‍ॅक्च्युअली पासपोर्ट कव्हरचा बिझनेस आता संपलाच आहे कारण इमिग्रेशनच्यावेळी मशिनमध्ये पासपोर्ट स्कॅन करावाच लागतो तेव्हा तेवढी खबरदारी घ्यावी. इमिग्रेशन नंतर सिक्युरिटी करताना समोरच्या सिक्युरिटी ऑफिसरने मला त्या रांगेमधून खड्यासारखं बाजूला घेतलं आणि म्हटलं की,

‘‘रँडम चेकच्या खाली मी तुम्हाला चेक करतोय’’. अनेक माणसं बाजूने अशा चेकिंगशिवाय पास होत असताना बघून माझ्या मनात लागलीच अनेक विचार येऊन गेले. ‘मी इंडियन आहे म्हणून मला बाहेर काढलं का बरं? माझी गोरी चमडी नाही म्हणून मला बाहेर घेतलं असेल का? माझ्या चेहर्‍यावरचे भाव तर टेररिस्ट सारखे नव्हते?’ म्हणजे मी अगदी हसत हसत ‘ओ शुअर!’ करीत त्या रँडम चेकला सामोरी गेले. चेहर्‍यावर नाही पण मनात मात्र ह्या गोष्टी पटकन गर्दी करून गेल्या आणि थोड्या वेळासाठी का होईना खट्टू विचारांनी मला ग्रासलं. मी माझी बॅग पर्स व्यवस्थित बंद करीत असताना त्याने एका गोर्‍या इंग्लिश बाईला थांबवलं आणि माझ्या मनातले विचार किती वेस्ट ऑफ टाइमवाले होते हे जाणवलं आणि मीच माझ्या ह्या फालतू विचारांना चाप लावला. प्रवासात सिक्युरिटी सर्वात महत्वाची आणि त्याला आपण सर्वांनी अगदी हसत हसत सहकार्य केलं पाहिजे. आपल्याकडे मागे एकदा एका अतिश्रीमंत धनाढ्य अशा मुलाला सिक्युरिटीने हटकल्यावर ‘हाऊ कॅन यू आस्क मी?’ सवाल केला. ह्यावरून तेथे झालेला हंगामा आणि तू तू मै मै दुसर्‍या दिवशी पेपरात आली होती. अर्थात आता अशा प्रकारांना आळा बसू लागलाय कारण एअरलाईन्स आणि एव्हिएशन बॉडी अशा गैरवर्तन करणार्‍या व्यक्तींना अगदी विमानात त्यावेळी चढू न देण्यापासून ते काही काळासाठी किंवा सदासर्वकाळ एअर ट्रॅव्हल बॅन आणण्यापर्यंतची अ‍ॅक्शन घेऊ लागलेत. सिक्युरिटी म्हणजे आपली सर्वांची सेफ्टी, तिथे नो पंगा.

आजकाल अशा सिक्युरिटीच्या वेळी किंवा काही एअरलाईन्स विमानात आत जाण्यापूर्वी बोर्डिंग गेटवर प्रत्येकाची हॅन्डबॅग किंवा पर्स चेक करतात. त्यामुळे आपण प्रत्येकाने खबरदारी घेतली पाहिजे की आपली हॅन्डबॅग किंवा पर्स व्यवस्थित भरलेली असावी. मागे एकदा अबुधाबी वरून येताना हा असा चेक सुरू होता, मी ऑब्झर्व करीत होते. काही प्रवाशांच्या बॅगा खूपच गलिच्छ पद्धतीने भरलेल्या होत्या आणि ज्यावेळी त्या उघडल्या तेव्हा सिक्युरिटी ऑफिसरच्या चेहर्‍यावरचे ‘किस किससे पाला पडता है।’ सारखे भाव खूप काही सांगून गेले. म्हणजे ती आणि तो पॅसेंजर दिसायला बोलायला अगदी व्यवस्थित होते, आपल्या भाषेत झकपक पण बॅगेची ही अवस्था. बॅग उघडल्यावर अंडरवेअर्स आणि बाकीचे अंडरगार्मेंट्स सर्वांच्या समोर असे दिसले तर खूपच ऑकवर्ड पोझिशन होऊन जाते सर्वांचीच. सो, ही अशी हॅन्डबॅग व पर्सची चेकिंग बर्‍याच एअरलाइन्सनी अपरिहार्य केली आहे. आणि फक्त त्यासाठीच नाही तर एकूणच आपल्या बॅगेचं पॅकिंग हे व्यवस्थित करायची आपण सवय लावली पाहिजे. अमेरिकेला जाताना तर कार्गोमध्ये टाकलेल्या मोठ्या बॅगासुद्धा सिक्युरिटी उघडते, म्हणून त्या TSA लॉकने बंद करायच्या असतात, त्यांना उघडता याव्या म्हणून. त्यामुळे मोठ्या बॅगाही व्यवस्थित पॅक करणं आपलं काम असतं, त्या सिक्युरिटी ऑफिसरला बॅग बंद करताना त्रास होऊ नये म्हणून.

एटिकेट, मॅनर्स, डेकोरम, प्रोटोकॉल, शिस्त, सभ्यता, शिष्टाचार ह्या सगळ्या गोष्टी प्रवासातल्या निरीक्षणातूनच आणि सततच्या प्रवासातूनच जास्त चांगल्या तर्‍हेने अंगवळणी पडतात. माहेर सासरची पाटील असल्याने असेल कदाचित माझा मूळ स्वभाव रागीट किंवा अशांत पण प्रवासाने, पर्यटनाने आणि पर्यटकांनी माझा राग कुठच्या कुठे पळवला आणि ‘पेशन्स इज अ व्हर्च्यू’ह्या गोष्टीवर शिक्कामोर्तब करून टाकलं. आरडाओरड, अशांती ह्यापेक्षा शांतीच्या मार्गाने आयुष्य जास्त सुकर बनवता येतं, अगदी शांतीच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळवता येतं हे महात्मा गांधींनी सप्रमाण सिद्ध करूनही मला मात्र शांत व्हायला अर्ध आयुष्य गेलं असं म्हणायला हरकत नाही. शहाणपण नेहमीच उशीरा येतं ते असं. पण त्यामुळे देश-विदेशातल्या सततच्या प्रवासात फ्लाइट डीले झालं, एअरक्राफ्टमधलं एसी बंद पडलं, विमान मुंबईला यायच्या ऐवजी बंगळुरूला नेलं, एअरहोस्टेसने आपल्याला हवं असलेलं जेवण उपलब्ध नाही असं सांगितलं, विमानात विंडो सीट नाही मिळाली, बाजूच्या सीटवर जोरजोरात घोरणारी व्यक्ती बसली, विंडो सीटवर बसलेली व्यक्ती दहा वेळा आतबाहेर करायला लागली तरी ‘शांतम् पापम्’ असा प्रवास सुरू असतो.

‘काय करावं आणि काय करू नये’ हे एटिकेट शिकण्यासाठी विमानप्रवास त्यातही तो परदेशी जाण्यासाठी असेल तर खूप उपयोगाचा. एखादा क्रॅशकोर्स म्हणूया. विमानप्रवासात कपडे काय घालावे ह्याचंही शास्त्र आहे. विमान ही सार्वजनिक जागा आहे, इथे दाटीवाटीने बसावं लागतं, बाजूचा प्रवासी कोण येईल सांगता येत नाही अशावेळी सुटसुटीत पण अंगभर कपडे चांगले. वनपीस, स्लीव्हलेस, शॉर्टस शक्यतो घालू नयेत. आपली स्कीन अनेकांनी वापरलेल्या त्या सीट्सना एक्सपोज होणं टाळावं, बॅक्टेरियाजपासून बचाव. मी शक्यतोवर एखादा स्टोल गळ्याभोवती ठेवते. स्टाईल म्हणूनपण आणि स्वत:ला लपेटून घेतलं की बर्‍यापैकी सिक्यूअर वाटतं. विमानप्रवासासाठी आपल्या पर्समध्ये एक 50 ML ची परफ्यूम स्प्रे बॉटल ठेवावी. आपल्या अंगाला घामाचा वास येऊ नये आणि इतर प्रवासी मंडळींना त्याचा त्रास होऊ नये म्हणून. अर्थात अतिउग्र परफ्यूमही मारू नये. बाम किंवा तत्सम काही लोशन्स ज्याचा वास उग्र असतो ते विमानात अजिबात लावू नयेत, संपूर्ण विमानाचं सुगंधी डेकोरम त्यामुळे बिघडून जातं.

जरी विमान ही सार्वजनिक जागा असली तरीही त्या गर्दीत प्रत्येकजण स्वत:ची प्रायव्हसी जपत असतो. एक सर्व्हे असं सांगतो की, ‘‘विमानप्रवास करणार्‍या व्यक्तींमध्ये फक्त पंधरा टक्के लोकांनाच शेजारी बसलेल्या व्यक्तीशी बोलायला आवडतं, पंचवीस टक्के लोकं शांतपणे लॅपटॉपवर वा मोबाईलवर स्वत:चं काम करणं पसंत करतात, वीस टक्के लोकांना फिजिकल पुस्तक हातात घेऊन वाचायला आवडतं, तीस टक्के लोक टी. व्हीवर चित्रपट पाहणं पसंत करतात आणि दहा टक्के लोक विमानप्रवासाचा उपयोग राहीलेली झोप भरून काढण्यासाठी करतात, बसल्याबसल्या त्यांची ब्रम्हानंदी टाळी लागते’’. त्यामुळे आपल्या बाजूच्या माणसाची कोणती कॅटॅगरी आहे ते बघून बोलणं सुरु करावं जर आपल्याला दुसर्‍याशी बोलायची खूप आवड असेल तर. एअरलाईन्स लवकरच सायलेन्स झोनमध्ये बसायचं असेल तर एवढे पैसे भरा असं सांगायला कमी करणार नाहीत, शेवटी त्यांच्यासाठीही रेव्हेन्यू जनरेशन महत्वाचं आहेच. असो.

साध्या साध्या गोष्टी तशा छोट्या आहेत पण त्याची लांबण लागायला लागलीय. अजून खूप आहे लिहिण्यासारखं त्यासाठी पुन्हा भेटूयाच, पुढच्या रविवारी.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*