Language Marathi

साध्या साध्या गोष्टी भाग 2

Reading Time: 4 minutes

‘ग्रुप टूर्स की इंडिपेंडंट हॉलिडे’ही गोष्ट प्रत्येक ट्रॅव्हलरने स्वत: जोखून पाहिली पाहिजे. माझा स्वभाव कसा आहे? मला माणसांमध्ये आवडतं की माझी प्रायव्हसी महत्वाची आहे हा विचार करून आपण आपली स्वत:ची वर्गवारी केली पाहिजे. ग्रुप टूरवाला पर्यटक इंडिपेंडंट हॉलिडे घेतो किंवा इंडिपेंडंट हॉलिडे ह्या जातकुळीवाला पर्यटक ग्रुप टूरला येतो तेव्हा त्याचाच नाही तर इतरांचाही मूड ऑफ होऊ शकतो.

पहिल्यांदा मी पर्यटनात आले तेव्हा सेकंड क्लासने प्रवास व्हायचा. मुंबई-डेहराडून, मुंबई-जम्मू असा प्रवास असायचा. कंपनीचं जसं प्रस्थान बसू लागलं तसं सेकंड क्लासवरून एसी चेअर कार – राजधानीने प्रवास सुरू झाला. त्यानंतर हळूहळू थ्री टीयर एसी मग टू टीयर एसी, त्यानंतर कामाचा वाढता आलेख सांभाळण्यासाठी वेळ महत्वाचा झाला आणि विमानप्रवास अपरिहार्य बनला. तीसेक वर्षापूर्वी विमानप्रवास ही तसं बघायला गेलं तर लक्झरी होती. एअरपोर्टवर जाणं विमानात बसणं ह्या सगळ्या गोष्टी अंगावर मुठभर मास चढवायच्या. पायही जमिनीवरून जरा हवेत जायचे. ‘मी म्हणजे कोण? अशी थोडीशी ‘ग’ ची लागण व्हायची आणि त्यामुळेच असेल कदाचित पेशन्स कमी असायचा. अशाच त्या ‘ग’ ची बाधा झालेल्या मी ने एकदा मुंबई-जोधपूर  विमानप्रवासाला सुरुवात केली, टूर मॅनेजर होते त्यामुळे पर्यटक जोधपूरला पोहोचायच्या आधी मला तिथे पोहोचायचं होतं. उतरण्यापूर्वी अचानक पायलटने अनाऊन्समेंट केली, ‘काही अपरिहार्य कारणात्सव आपण जोधपूरला उतरु शकत नाही आणि उदयपूरला उतरतोय’. विमानात एकच हल्लाबोल, त्यात मी पण अग्रस्थानी. शांत विमानाचा एकदम मासळी बाजार झाला. सीट बेल्ट बांधलेले होते म्हणून काय ती आम्ही माणसं एअरहोस्टेसच्या अंगावर गेलो नाही. विमान उतरलं आणि आम्ही सगळ्यांनी मिळून ग्राऊंड स्टाफला उभं आडवं घेतलं, त्यांनी सर्व प्रवाशांना टॅक्सीज करून दिल्या आणि आम्ही रात्रीच्या वेळी उदयपूर जोधपूर प्रवास करून पहाटे हॉटेलला पोहोचलो. माझ्या टॅक्सीत एक शांत जर्मन मुलगी होती. तिला म्हटलं, “तु एवढी शांत कशी राहू शकतेस अशा प्रसंगी?” ती म्हणाली, ‘मी बॅग काखोटीला मारून जमेल तेव्हा असा जगभर प्रवास करते आणि प्रवासात असं होतं खूपदा त्यावेळी कुणाचाच इलाज नसतो, आरडाओरड करून फारसं काही पदरी पडत नाही. आय गो विथ द टाइम्स…’ त्यानंतर बर्‍याच गप्पा मारल्या तिच्याशी. त्यादिवशी माझ्याच वयाची ती जगभ्रमंती करणारी मुलगी मला बरंच काही शिकवून गेली. मी मनातल्या मनात स्वतःलाच प्रश्‍न विचारला की आपण का बरं एवढे हायपर झालो? जसजसा देशविदेशातला प्रवास वाढत होता, पर्यटकांसोबतच भल्या भल्या व्यक्ती भेटत होत्या अनुभव वाढत होता तेव्हा थोड्याशा यशाने वर गेलेले माझे पाय जमिनीवर यायला सुरुवात झाली. विश्‍वातील अनेक ग्रह-तार्‍यांमधील दोन तृतिआंश पाणी आणि एक चतुर्थांश जमीन असलेल्या पृथ्वी ह्या ग्रहावरील, 193 हून अधिक देश सामावणार्‍या सात खंडापैकी एका आशिया खंडातल्या अनेक देशांपैकी एका भारत देशाच्या 28 राज्यांपैकी एका राज्यातल्या एका मुंबई नावाच्या शहरातील एका छोट्याशा भागातल्या छोट्याशा घरात वा कार्यलयात बस्तान बांधणार्‍या स्वतःची-स्वतःच्या यत्कििंचत पणाची जाणीव होऊ लागली आणि डोक्यातली हवा निघून गेली. हायपर होणं-अग्रेसिव्ह बनणं-रिअ‍ॅक्टीव वागणं कमी झालं.

जसा प्रवास वाढतोय, जास्तीत जास्त लोक पर्यटन करताहेत तसं ‘केल्याने देशाटन… मनूजा चातुर्य येतसे फार।’ ह्याप्रमाणे प्रवासी आणि पर्यटकही शांत व्हायला लागलेत हेही जाणवतं. गेल्या प्रवासात मला दोनदा ह्याचा प्रत्यय आला. सोळा तासांचा प्रवास करून न्यूयॉर्कला उतरले. बॅगेज बेल्टवर दहा पंधरा बॅगा आल्यावर कुणाचीही बॅग येईना. बेल्टसभोवती माणसांची गर्दी. थोड्याच वेळात एक ऑफिशियल तिथे आली आणि म्हणाली ‘काही अपरिहार्य कारणास्तव बिझनेस क्लास सोडून इतर कुणाचंही सामान लोड झालेलं नाही. आता इथे थांबू नका, तुमचं सामान तुमच्या घरी पाठवण्यात येईल’. तिथल्या चेहर्‍यांवर भीती काळजी राग आश्‍चर्य असे सर्व भाव बघायला मिळाले पण एकानेही आरडाओरडा अरेरावी केली नाही. निमूटपणे सगळे कम्प्लेंट नोंदविण्यासाठी रांगेत उभे राहिले. ह्याच टूरमधला दुसरा अनुभव होता परतीच्या प्रवासातला. सॅनफ्रान्सिस्को-मुंबई व्हाया फ्रॅकफर्ट. भला मोठा प्रवास कधी एकदाचा संपतो असं वाटत असताना अगदी पंधरा मिनिटं असताना पायलटने अनाऊंस केलं, ‘हेवी रेन्स आणि एअरपोर्ट रनवे बंद झाल्याने आपण मुंबईला उतरू शकत नाही. आपलं विमान बेंगलुरुला वळवतोय. पुढे काय करायचं ते ग्राऊंड स्टाफ सांगेल’ विमान शांत. अजिबात आरडाओरड नाही. बेंगलुरूला उतरलो तिथे बरीचशी फ्लाईट्स डायवर्ट झाल्याने ही गर्दी, ग्राऊंड स्टाफही थोडा गोंधळात कारण त्यांच्यावरही ही परिस्थिती अचानक आदळली होती. पण तरीही सर्व प्रवासी शांतपणे, त्या गर्दीला, तिथल्या असहायतेला सांभाळून घेत होते. तीन तासांनी त्यांनी आम्हाला हॉटेलला नेलं. मुंबई एअरपोर्ट कधी सुरू होणार? काय होणार पुढे आमचं? ही चिंता होतीच. दुसर्‍या दिवशी संध्याकाळी एका फ्लाइटमध्ये जागा मिळाली आणि आम्ही वाट चुकलेले प्रवासी आपापल्या घरी गेलो. जोधपूर फ्लाइट आणि सॅनफ्रान्सिस्को फ्लाइटमध्ये तीस वर्षांचा कालावधी गेला होता पण मनःस्थितीतला बदल स्वागतार्ह होता. प्रवासामुळे घडणार्‍या व्यक्तिमत्व विकासाची मी विद्यार्थी होते आणि आजन्म राहणार कारण प्रत्येक प्रवास काहीतरी नवीन शिकवतोय.

काही दिवसांपूर्वी मी ‘राइट ऑफ अ‍ॅडमिशन’ चा राइट वापरण्यावर लिहीलं होतं. कोणत्याही बिझनेसला ‘राइट ऑफ अ‍ॅडमिशन’ असावं की नसावं ह्यावर आमची चर्चा झाली. समोर बसलेला आमचा स्नेही मकरंद जोशी म्हणाला, ‘अहो, मॅकडॉनल्डज् जेव्हा भारतात आलं तेव्हा त्यांनी दारावर ‘राइट ऑफ अ‍ॅडमिशन रीझव्हर्ड’ म्हणून पाटी लावली आणि चक्क त्यावर गदारोळ झाला. पण त्यांचं म्हणणं जे लोक आमच्याकडे येणार त्यांची सेफ्टी, किंवा त्यांच्यासाठी आम्हाला हे करावं लागतंय, कुणाच्याही वागण्याचा इतरांना त्रास होऊ नये ही भावना. आम्हीसुध्दा अडीच लाखांहून जास्त पर्यटकांमध्ये फक्त चार वेगवेगळ्या पर्यटकांसाठी हा हक्क वापरला तोसुध्दा सहलीवर आनंदासाठी आलेल्या पर्यटकांना कुणाच्यातरी विचित्र वागण्याचा त्रास होऊ नये यासाठी. म्हणूनच ग्रुप टूर की इंडिपेन्डंट हॉलिडे हे प्रत्येकाने आधी ठरवायचंय. ग्रुप टूरवर आल्यावर आपल्याला सर्व सहप्रवाशांचा विचार करावा लागतो. आता बघानं एका टूरमध्ये एक व्यक्ती पहिल्या दिवसापासून टूर मॅनेजरशी अतिशय उद्धटपणे बोलणं, सहप्रवाशांना तुच्छ लेखणं, त्रास देणं, वेळेवर नं येणं, आपल्या बेजबाबदार वागण्याने इतर प्रवाशांना त्रास होतोय ह्याची जाणीव तर जाऊ दे त्याविषयी कोणताही खेद व्यक्त न करता बेफिकीरीची भाषा वापरणं, टूर मॅनेजरला न सांगता कुठेही जाणं आणि टूर मॅनेजरसह सर्व पर्यटकांना वेठीस धरणं, इ. गोष्टी करीत होती. ह्या गोष्टींनी आधीच हैराण झालेल्या पर्यटकांनी सहनशीलता संपण्याचा एक किस्सा सांगितला तो म्हणजे अतिरेक होता, आता मला सांगा अशा पर्यटकांसाठी हा ‘राइट ऑफ अ‍ॅडमिशन’ वापरायचा की नाही? आमच्या पर्यटन संस्थेची सर्व्हिस नाही आवडली तर पर्यटक दुसरी पर्यटनसंस्था निवडतात, आणि बरोबरच आहे ते. हा चॉईस पर्यटकांचा आहे. तसा चॉइस आम्हाला नाही, निश्‍चितपणे. ‘पर्यटक देवो भव:’ पण अशा अतिरेकी सिच्युएशनमध्ये ग्रुप टूरमधील सहप्रवाशांच्या हितासाठी आम्हाला अगदी रेअर केसेसमध्ये असा निर्णय घ्यायची मुभा असावी नाही का.
सो मंडळी, हा साध्या साध्या गोष्टींचा सिलसिला सुरू ठेवूया. भेटूया पुढच्या रविवारी…. तोपर्यंत हॅव अ ग्रेट वीक अहेड…

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*