Language Marathi

लँड ऑफ द थंडर ड्रॅगन

हिमालयाच्या कुशीतला हॅप्पी हॅप्पी देश… आकाराने चिमुकला पण अ‍ॅल्टिट्यूडमध्ये उत्तुंग… इतिहासकाळापासून भारताचा मित्र…. बौध्द धर्माच्या शांत तत्वज्ञानाने समाधानी जीवनशैली जगणारा आपला शेजारी म्हणजे भूतान… प्राचीन मॉनेस्ट्रीज, हिमालयाचे अलौकिक सौंदर्य, ऐतिहासिक झोंग आणि फ्रेंडली स्थानिक यामुळे भूतानची भेट तुमच्या सुट्टीला समाधानाचं आणि आनंदाचं तोरण बांधणारी ठरते

काही महिन्यांपूर्वीची गोष्ट आम्ही सगळे फॅमिली मेंबर्स एकत्र जेवायला गेलो होतो, अशावेळी जनरली काय खायचं हा प्रश्‍न मी नीलवर-माझ्या मोठ्या लेकावर सोपवून मोकळी होते. एकतर त्याला चांगलचुंगलं आणि न्यूट्रिशस खायला आवडतं शिवाय अधूनमधून तो स्वतः काही रेसिपी बनवत असल्याने त्याला पदार्थांची चांगली इनसाइट आहे. पण त्यादिवशी तो ऑर्डर देत असताना, एका डिशच्या नावावर मी त्याला अडवलं आणि म्हटलं, ‘‘अरे, हे काय आहे नक्की? आपल्या गणितातलं आहे ना?’’ त्यावर त्याने माझ्याकडे एक ठेवणीतला कटाक्ष टाकला आणि आधी ऑर्डर पूर्ण केली. नंतर तो मला म्हणाला, ‘‘मॉम हाउ कॅन यू जज समथिंग जस्ट बाय इट्स नेम? ते नाव जरा वेगळं आहे पण बिलिव्ह मी ती डिश ऑसम लागते.’’ नंतर ती डिश आल्यावर मला नीलच्या म्हणण्याची चवदार खात्री पटली. पण हा मानवी स्वभावच आहे नाही का? जरा काही वेगळं, परिचयाचं नसलेलं दिसलं किंवा ऐकलं तर आधी मनात प्रश्‍न येतो की, ‘हे काय? आपल्याला आवडेल का?’ पण त्या गोष्टीचा आनंद, आस्वाद घेतल्यानंतर मग मात्र ती गोष्ट आपल्या पसंतीच्या यादीत विराजमान होते. आमच्या पर्यटन उद्योगात हे अनेकदा पाहायला मिळतं, जेव्हा एखादं वेगळं, अनोख्या पध्दतीचं नाव धारण करणारं ठिकाण समोर येतं तेव्हा सुरुवातीला पर्यटक जरा साशंक असतात, पण लवकरच ते ठिकाण पर्यटकांचं हॉट फेव्हरेट होऊन जातं. याचं उत्तम उदाहरण म्हणजे ‘भूतान’. हिमालयाच्या अंगाखांद्यावर वसलेल्या आणि हिमशिखरांची छाया लाभलेल्या ह्या देशाच्या सहली आम्ही तीन वर्षांपूर्वी सुरू केल्या तेव्हा आधी पर्यटक जरा साशंकतेनच ह्या सहलींची चौकशी करायचे. हा देश नेमका कुठे आहे? तिथले हवामान कसे आहे ? तिथे काय साइटसिइंग आहे? तिथे जेवण कसं मिळेल? अशा प्रश्‍नांना उत्तर देता देता आमची सेल्स टीम अक्षरशः दमून जायची. पण आता मात्र परिस्थिती बदललेली आहे, पर्यटक भूतानलाच जायचं आहे असं ठरवूनच येतात आणि बुकिंग करतात. अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या ह्या देशाच्या सहलीत असतं तरी काय काय ह्याचा एक आढावा घेऊया.

भूतान हा देश पूर्व हिमालयाच्या दक्षिण उतारावर वसलेला आहे. आकाराने जेमतेम भारतातल्या केरळ ह्या राज्याइतका असलेला हा देश हिमालयाच्या उत्तुंग रांगांनी व्यापलेला आहे. या देशाच्या उत्तरेमध्ये तेवीस हजार फूटांपेक्षा अधिक उंचीची हिमशिखरे आहेत. त्यातच गंगखार पुनसम हे या देशातलं सर्वोच्च – २४,८४० फूट उंचीचं शिखर आहे आणि हे जगातलं हायेस्ट अनक्लाइंब्ड शिखर आहे. या देशाच्या एकूण भूभागापैकी ७०% हून अधिक भाग अरण्याने व्यापलेला आहे आणि त्यातील ६०% भाग संरक्षित आहे. ह्या वर्षीच्या उन्हाळ्यात उकाड्याच्या त्रासापासून हमखास मुक्ती देणारी वीणा वर्ल्डची भूतान हायलाइट्स ही सहा दिवस पाच रात्रींची सहल म्हणजे हिमालयाच्या कुशीतला आल्हाददायक अनुभव. आपण भूतान हायलाइट्स या सहलीत मुंबईहून विमानाने भूतानच्या पारो ह्या शहरात येतो. इथून आपण प्रस्थान करतो भूतानची राजधानी असलेल्या थिम्पू या शहराकडे. १९६१ सालापासून थिम्पू हे शहर राजधानीपदाचा मान उपभोगत आहे. राजधानीकडे येताना आपण मेमोरियल चोर्तेन ह्या स्तुपाला भेट देतो. हा स्तुप भूतानचा सम्राट जिग्नी दोर्जे वांग्चूक यांच्या स्मरणार्थ उभारलेला आहे. तिबेटी शैलीत बांधलेला हा स्तुप त्याच्या सुवर्ण शिखरामुळे पाहाणार्‍याला प्रभावीत करतो. इसवी सनाच्या सातव्या शतकात बौध्द धर्म नेपाळमधून भूतानमध्ये आला, आज या देशातील ७५% लोक बौध्द धर्माचे मनोभावे पालन करतात. या देशाचा ग्रॉस नॅशनल हॅप्पीनेस इंडेक्स एशियात सर्वात जास्त आहे, त्याचे कारण इथल्या जनमानसात बौध्दधर्माची तत्वे पूर्णपणे रुजली आहेत. थिम्पूमध्ये आपण दोन रात्री निवास करतो. या शहरातील एक आधुनिक भव्य मॉन्युमेंट म्हणजे १६९ फूट उंचीचा बुध्दाचा स्टॅच्यु. शाक्यमुनी रुपातील हा ब्रॉन्झचा स्टॅच्यु सोन्यानं मढवण्यात आला आहे. या विशाल बुध्द मुर्तीच्या बैठकीखालच्या सभागृहात एक लाखापेक्षा अधिक छोट्या बुध्द प्रतिमा आहेत. या शहरातील एक प्राचीन धार्मिक स्थान म्हणजे चांगँगखा ल्हाखांग. एखाद्या गढीसारखं दिसणारं हे मंदिर थिम्पूमधलं सर्वात प्राचीन मंदिर आहे. १२ व्या शतकात तिबेटमधून आलेल्या लामा शिंगपो ह्यांनी हे मंदिर बांधून घेतलं. या विहारात अवलोकितेश्‍वराची अकरा मस्तकं असलेली, सहस्रबाहू मूर्ती आहे. या शहरातील ताशीझो झाँग ह्या वास्तुमध्ये धर्म आणि राजसत्ता ह्यांचा मिलाप झालेला पाहायला मिळतो. वांग छु नदीच्या काठावरच्या ह्या वास्तुमध्ये १७ व्या शतकात द्रुक्पा कांग्यु पंथाचे  मुख्य भिक्षू आणि त्यांचे शिष्य राहात असत. १९६८ सालापासून ही वास्तु भूतानच्या शासनाचे मुख्यालय म्हणून वापरली जाते. आज ह्या इमारतीत राज्याच्या सिंहासनाचे दालन आणि इतर कार्यालये आहेत. थिम्पूला आल्यावर आवर्जून भेट द्यायलाच हवी अशी जागा म्हणजे मोतिथांग टकिन प्रिझर्व्ह. ह्या ठिकाणी भूतानचा राष्ट्रीय प्राणी असलेल्या टकिनचे संवर्धन केले जाते. इथल्या स्थानिक लोककथेनुसार १५ व्या शतकात द्रुक्पा कुनले ह्या तिबेटी धर्मगुरूने हा बकरी आणि गाय ह्यांचे कॉम्बिनेशन असलेला प्राणी निर्माण केला असं मानलं जातं. मोतिथांग झूमध्ये हे टकिन नैसर्गिक परिसरात विहार करताना पाहायला मिळतात.

ह्या सहलीच्या तिसर्‍या दिवशी आपण थिम्पूहून पुनाखाकडे प्रस्थान करतो. १९५५ पूर्वी पुनाखा हे भूतानच्या राजधानीचं शहर होतं. पुनाखाकडे येताना आपण दोछुला पास ही १०,१७१ फूटांवरची खिंड ओलांडतो. या खिंडीच्या पूर्वेला बर्फाने आच्छादलेल्या हिमालयाची शिखरे आहेत, त्यातच भूतानमधील गंगखार पुनसम हे सर्वोच्च शिखरही आहे. धुक्याने भरलेल्या आणि थंडगार हवेनं अंगावर शहारा आणणार्‍या ह्या खिंडीतून प्रवास करताना आपण ऐन उन्हाळ्यात आहोत हेच विसरायला होतं. पुनाखामधील पुनाखा झाँग हा १७ व्या शतकातील पॅलेस, भूतानमधील दुसर्‍या क्रमांकाचा सर्वात प्राचीन पॅलेस आहे. फो छू आणि मो छू ह्या दोन नद्यांच्या संगमावर हा राजवाडा उभा आहे. रम्य पर्वताराजी पार्श्‍वभूमीला घेऊन हा सहा मजली भव्य राजवाडा उभा आहे. हा राजवाडा म्हणजे बौध्द धर्मातील तत्वांचे मूर्तरुप आहे असे मानले जाते.

या सहलीमधला आपला शेवटचा पडाव असतो पारो. पारो छू नदीच्या काठावर वसलेल्या ह्या शहरात दिडशेपेक्षा अधीक प्राचीन मंदिरे आणि मॉनेस्ट्रीज आहेत. पारोमधील रिनपुंग झाँग हा किल्ला मुळात दहाव्या शतकात मॉनेस्ट्री म्हणून उभारण्यात आला होता. नंतर १७ व्या शतकात या पाच मजली वास्तूने तिबेटी आक्रमकांपासून पारोचं रक्षण करण्याची जबाबदारी चोखपणे पार पाडली. किआनु रिव्हज्च्या ‘लिटल बुध्दा’ ह्या हॉलिवूडपटाचं चित्रिकरण ह्या झाँगमध्ये करण्यात आलं आहे. पारोमध्ये भूतानमधील सर्वात प्राचीन मंदिरांपैकी एक असलेलं, मुळात ७ व्या शतकात बांधलेलं किछु लाखांग हे मंदिर आहे. ह्या सहलीच्या अंतीम टप्प्यावर आपण भेट देतो भूतानमधल्या तक्तसांग मॉनेस्ट्रीला, हा बौध्द विहार ‘टायगर्स नेस्ट’ म्हणूनही ओळखला जातो. हे ठिकाण गुरु पद्मसंभवांना एका वाघानं दाखवलं होतं असं मानलं जातं, म्हणून इथल्या मंदिरात एक वाघाची मूर्ती पाहायला मिळते. इथल्या गुहेत गुरु पद्मसंभव ह्यांनी ८व्या शतकात तीन वर्षे, तीन महिने, तीन आठवडे, तीन दिवस, तीन तास साधना केली होती. म्हणून हे मंदिर इथे उभारण्यात आले. पारो छु नदीच्या उजव्या काठावर एका कपारीमध्ये १०,२४० फूटांवर ही मॉनेस्ट्री आहे. इथल्या नैसर्गिक गुहा, कपारी आणि खडकांचा वापर करून हा सगळा समूह उभारण्यात आला आहे. सहाव्या दिवशी जेव्हा आपण भूतानचा निरोप घेतो तेव्हा एका अनोख्या, निसर्गसुंदर आणि सुखी समाधानी देशाला भेट दिल्याचा आनंद आपल्या मनात काठोकाठ भरलेला असतो.

हिमालयाचं निसर्गसौंदर्य, प्राचीन परंपरा, कलात्मक जीवनशैली यांनी समृध्द असलेल्या भूतानचा आनंद घेता यावा म्हणून वीणा वर्ल्डकडे आणखी एक पर्याय आहे, तो म्हणजे भूतान ज्वेल्स ही आठ दिवस सात रात्रींची सहल. ह्या सहलीत आपण भारतातील बागडोगरापर्यंत विमानप्रवास करतो, तिथून रस्त्यावरून भूतानमध्ये प्रवेश करून फूनत्शोलिंग हे शहर गाठतो. या सहलीत जाताना आणि येताना एक दिवस फूनत्शोलिंग मध्ये निवास करतो, तर थिम्पू दोन रात्री, पुनाखा १ रात्र आणि पारो २ रात्री निवास करून भूतानचा आनंद घेतो. ह्या सहलीसाठी पुणे ते पुणे हा पर्यायही उपलब्ध आहे. आपल्या भारताला अगदी चिकटून असलेला, पण आजवर पाहायचा राहून गेलेला हा चिमुकला आणि सुंदर देश पाहायची, एप्रिल आणि मे महिन्याच्या उकाड्यापासून सुटका करून घ्यायची आणि हिमालयाच्या थंडगार हवेत सुट्टी घालवायची ही संधी दवडू नका. मग वाट कसली पाहाताय, चलो, बॅग भरो, निकल पडो!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*