Language Marathi

पहिलीत प्रवेश

येत्या एक एप्रिलला वीणा वर्ल्ड पाच वर्षांची होतेय. म्हणजेच आता आम्ही पर्यटनाच्या विश्‍वव्यापी विद्यालयात पहिलीच्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी योग्य वयाचे झालो असं म्हणायला हरकत नाही. अर्थात ह्या विद्यालयाचे प्राचार्य किंवा मुख्याध्यापक आहेत पर्यटक, त्यांनी ठरवायचंय की आम्हाला प्रवेश द्यायचा की नाही?

माणसाच्या शरीरातील मेंदूचा विकास हा वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत नव्वद टक्के झालेला असतो असं म्हणतात. हीच गोष्ट संस्थेच्याही बाबतीत लागू होते असं मला वाटतं. संस्थेचा मेंदू म्हणजे संस्कृती, संस्कार, विचारांतून आचाराकडे आणि आचारातून जीवनशैलीकडे घेऊन जाणारा समन्वय. पाच वर्षांपूर्वी आम्ही काय करतोय? का करतोय? कसं करणार आहोत? ह्याचा कोणताही विचार नव्हता, पण आज पाच वर्षांनी आमच्या संस्थेचा मेंदू बर्‍यापैकी विकसित झालाय. आता आम्ही काय करतोय? का करतोय? कोणत्या दिशेने चाललो आहोत? आपलं ध्येय काय? आपल्याला आयुष्यात काय साध्य करायचं आहे? ह्याचं चित्र समोर यायला लागलंय, किंवा ते अजून थोडं धुसर आहे म्हणूनच पर्यटनाच्या विश्‍वव्यापी विद्यालयात हे चित्र अधिक सुस्पष्ट होण्यासाठी प्रवेश घेतोय. पहिलीत प्रवेश घ्यायचाय म्हणजे शिकण्यासाठी आमच्या संस्थेला उभं आयुष्य पडलंय ही भावनाच फार उत्साहवर्धक आणि चैतन्यमयी आहे. जोपर्यंत शिक्षण सुरू आहे तोपर्यंत प्रगती आहे आणि म्हणूनच एकमेंकाकडून शिकणं, अनुभवांतून शिकणं, एखाद्या पर्यटनस्थळाकडून किंवा देशाकडून शिकणं, क्षणाक्षणाला शिकत राहणं आणि स्वतःला विकसित करीत राहणं ही वीणा वर्ल्डची मानसिकता बनलीय. ‘मला सर्वकाही कळतं’ किंवा ‘मलाच सर्वकाही कळतं’ ह्या विचाराला आम्ही फोफावू दिलं नाही. ‘तुला हे चांगलं कळतं, मला हे जास्त चांगलं माहितीय, त्याला ह्यात जास्त गती आहे, असं एकमेकांमधलं कौशल्य ओळखूया, त्याची सांगड घालूया आणि पुढे जाऊया’ ही विचारधारा मजबूत झाली, हीच वीणा वर्ल्डची खरी कमाई. संस्था एकमेकांच्या साथीने वाढणार आहे, हे प्रत्येकाला ज्ञात आहे त्यामुळे ‘मी श्रेष्ठ, तू कनिष्ठ’ थोडक्यात ‘ज्यूनियर-सिनियर, नवा-जूना’ हा भेदाभेदही बळावला नाही. संस्था वाढतेय, सोबत एक टीम मेंबर म्हणून आमच्यातला प्रत्येकजण सुद्धा प्रगती करतोय, त्यामुळे संस्थेच्या वाढीला अधिकाधिक चांगल्या हातांची गरज आहे, ‘मीही कधीतरी नवशिका होतो, मलाही कुणीतरी वेळ काढून, वेळ देऊन शिकवलंय, आता माझं काम आहे नव्यांना शिकवणं’ ह्या भावनेतून संस्थेतल्या माणसांची वृध्दी होतेय. खरंतर प्रत्येक पुढे गेलेल्या माणसाची नैतिक जबाबदारी आहे पाठच्याला पुढे आणणं आणि ती प्रत्येक जण पार पाडतोय. ‘ह्याला किंवा हिला शिकवलं तर तो माझ्याही पुढे जाईल, माझ्याच पायावर मी धोंडा मारून घेतोय की काय?’ किंवा ‘आज तू मला शिकवतोयस पण उद्या मी तुझ्याही पुढे निघून जाईन’ अशी कृतघ्नतेची भावना उगवलीच नाही आणि कृतज्ञतेची रुजवात झाली ही महत्वाची गोष्ट घडली ह्या पाच वर्षांत.

सध्य परिस्थितीत, जागतिक स्पर्धेच्या युगात तीन गोष्टी महत्वाच्या ठरणार आहेत कोणत्याही संस्थेसाठी आणि त्या म्हणजे कल्चर, इनोव्हेशन आणि स्पीड. कल्चर म्हणजे संस्कृती किंवा विचारधारा, ती एका रात्रीत बनत नाही त्यासाठी अनेक वर्ष लागू शकतात, पाच वर्षांचा कालावधी हा त्यादृष्टीने खूपच कमी आहे पण योग्य मार्गावर वाटचाल करण्याला सुरुवात होणं हेही महत्वाचं आहे. आता ह्या पाच वर्षांत ह्या कल्चर डेव्हलपमेंटमध्ये काय काय गोष्टी घडत गेल्या ते बघायचं म्हटलं तर प्रामुख्याने काही गोष्टींचा उल्लेख करायला आवडेल, कारण प्रत्येक दिवशी कुणीतरी आणि कितीतरी तरूणाईच्या मनात स्वतः काही सुरू करण्याची इच्छा उत्पन्न होत असते. त्याला किंवा तिला हे संस्कृती संवर्धनाचे मुद्दे निश्‍चित उपयोगी पडतील कारण ते अगदी ताजेतवाने आहेत, आत्ताच्या जागतिक स्पर्धेच्या वावटळीतले आहेत, टोटली प्रॅक्टिकल.

वीणा वर्ल्डच्या सुरुवातीच्या काळात आमच्याकडे पैशाचं भांडवल शून्य होतं, तसंच ते अनेकांचं असणार आहे, अ‍ॅक्च्युअली व्यवसाय सुरू करण्याचं ते एक मजबूत कारण वाटतं मला. त्यामुळे तुमच्याकडे पैसे नाहीत आणि तरीही तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचाय अशी परिस्थिती किंवा जिद्द असेल तर बिनधास्त आगे बढो, कारण जिंकण्याच्या मार्गातला पहिला पडाव तुम्ही पूर्ण केलाय. दुसरी गोष्ट होती ती म्हणजे प्रामाणिकपणे आणि मेहनतीच्या बळावर स्वतःवर आणि माणसांवर विश्‍वास ठेवून आम्ही श्रीगणेशा केला. कोणतीही चुकीची गोष्ट करायची नाही, नितीमत्तेशी तडजोड करायची नाही, व्यवसायाच्या दृष्टीने जे काही सरकार दरबारातले नियम आणि अटी आहेत त्यांचं काटेकोर पालन करायचं हे ठोसपणे ठरवलं, बिंबवलं. पैसे नव्हते त्यामुळे कर्ज काढणं क्रमप्राप्त होतं. पण कर्ज काढताना ते वेळेआधी फेडायचं बंधन आम्ही स्वतःला घालून घेतलं. अनेक हितचिंतकांनी वेळ, पैसा आणि आशिर्वादाच्या रूपाने सहाय्य केलं, त्यांचे उपकार आम्ही कधीच फेडू शकणार नाही. पण पैशाच्या मदतीची परतफेड करणं ही शक्य गोष्ट आम्ही पूर्ण केली. पाच वर्ष पूर्ण होताना मला सांगायला आनंद वाटतोय की आज कुणाचंही कर्ज नाही. आता नवीन कर्ज काढून व्यवसायाची आणखी वृध्दी आम्ही करू शकतो आणि पुन्हा वेळेआधी कर्जफेड करू शकतो हा विश्‍वासही त्यामुळे आलाय. जेव्हा कर्ज होतं तेव्हा कधीही कर्जाचा हप्ता आम्ही एक दिवसानेही चुकवला नाही. आमच्या टीमचा पगार, कधीही एका दिवसानेही त्याला विलंब झाला नाही. तिसरी गोष्ट होती ती आमच्या जगभरच्या असोसिएट्स आणि सप्लायर्सच्या पेमेंटची, तिथेही आम्ही कधी टाईमलाईन चुकवली नाही. सुरुवातीलाच ह्या गोष्टी ठरवल्याने ती सवय लागली आणि सवय संस्थेची संस्कृती झाली. पैसे नसतानाही आम्ही ह्या चांगल्या सवयींचा पाठपुरावा केला, अगदी पुढच्या महिन्याचा पगार द्यायला पैसे नाहीत अशी वेळही आली पण अचानक पर्यटकांचं बुकिंग वाढायचं आणि पैसे यायचे. देवावर, पर्यटकांवर, आपल्या माणसांवर, कामावर आणि आपल्या ध्येयावर अपरंपार विश्‍वासाचा हा परिणाम होता. अडचणी येत होत्या आणि त्या सुटतही होत्या. त्यामुळे खचायचं नाही, दमायचं नाही ही सवयही लागत गेली. आणखी एक महत्वाची गोष्ट आम्ही स्वतःला बजावत राहिलो ती म्हणजे आपण सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये आहोत, त्यामुळे जपानी लोकांप्रमाणे आपल्याला वाकूनच सर्व्हिस द्यायची आहे ही आपली मानसिकता मनापासून असली पाहिजे किंवा अशी मानसिकता असलेले सदस्यच ह्या वीणा वर्ल्डमध्ये सामील होत गेले. इथे ‘मोडेन पण वाकणार नाही’ हा बाणा चालणार नाही ह्याची पूर्ण कल्पना सर्वांना आहे. त्याचबरोबर नम्रपणा आणि लाचारी ह्यातला सूक्ष्म फरकही आम्ही जाणला. ‘मी नम्र आहे पण लाचार नाही’ नम्रपणे मेहनतीच्या जोरावर मार्गक्रमणा करण्यावर आम्ही भर दिला. नम्रपणा, शांतपणा, संयम ह्या गोष्टींमुळे अ‍ॅक्च्युअली वीणा वर्ल्ड पर्यटनक्षेत्रात उभं राहण्यास मदत झाली. ‘मी स्वतः, माझं कुटूंब, माझी संस्था आणि माझे पर्यटक’ ह्या गोष्टींवर फोकस झालो आम्ही, त्यामुळे अजून आमचं लक्ष्य कोसो दूर असलं तरी पर्यटनक्षेत्रात आपलं पाऊल रोवू शकलो. संस्था चालविताना माणसं घडवणं आणि कल्चर डेव्हलपमेंटला भर दिल्याने इनोव्हेशन आणि स्पीड येण्यासाठी जी काही परिस्थिती किंवा खंबीर मनोवृत्ती लागते ती आपोआप तयार होत गेली आणि त्यामुळेच कमी पैशात जगाचं पर्यटन घडविताना मोठ्या व्हॉल्यूमच्या बळावर संस्थेचीही वृध्दी होत राहिलीच. आता खरी सुरुवात झालीय वीणा वर्ल्डची ह्या पाच वर्षांनंतरच्या पहिलीच्या प्रवेशाच्या वेळी. आम्ही मनाने मजबूत बनवलंय स्वतःला त्यामुळे आता तयार आहोत जगाची आव्हानं पेलायला, पाय जमिनीवर घट्ट रोवून, डोकं धडावर ठेवून आणि डोक्यात कोणतीही हवा जाऊ न देता. मनात आणलं आणि प्रामाणिकपणे त्याचा पाठपुरावा केला तर काहीही शक्य आहे हे उदाहरण चांगल्या तर्‍हेने नव्याने प्रवेश करणार्‍यांसाठी प्रेरणादायी आहे. आता आमचा प्रवास जागतिक स्पर्धेत आणखी चॅलेंजिंग होणार आहे आणि त्यालाही आम्ही तयार आहोत. थँक्यू पर्यटकहो! तुमच्यामुळेच वीणा वर्ल्ड आहे ह्याची आम्हाला सतत जाणीव आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*