Language Marathi

छोट्या ब्रेकचा मोठा आनंद

Reading Time: 4 minutes

विमानतळावरून गाडी निघाली आणि केवळ १०-१५ मिनिटांत आम्ही जंगलामधून प्रवास करू लागलो. रस्त्याच्या दोन्ही बाजूला उंच उंच झाडे व त्यावर उड्या मारणारी वानरसेना बघत आमचा प्रवास सुरू झाला. मुंबईपासून केवळ तीनएक तासात आम्ही थेट स्वर्गात येऊन पोहोचलो होतो. खरंच, आपण भारतात असे शॉर्ट ब्रेक वारंवार का घेत नाही? असा पुन्हा एकदा मला प्रश्‍न पडला.

‘विमान आता लँड होणार आहे तर आपले सीट बेल्ट्स बांधून घ्या’ अशी पायलटने घोषणा करताच आम्ही सीट बेल्ट बांधून तयार झालो. विमानाच्या खिडक्यांचे शेड्स उघडताच नकळत मी श्‍वास धरला. बघावे तिकडे हिरवेगार डोंगर व झाडं दिसत होती. जणू निसर्गाने अगदी उदार मनाने हिरवाईची उधळण करत संपूर्ण परिसर हिरव्या रंगाच्या छटांनी सजवला होता. मुंबईच्या विमानतळावरून टेक-ऑफ करताना गगनाला भिडण्यार्‍या इमारतींनी बनलेल्या काँक्रीटच्या जंगलाचं व त्याचबरोबर पावसाच्या पाण्यापासून आपल्या घरांना वाचविण्यासाठी त्यावर टाकलेल्या निळ्या प्लॅस्टिकचे दर्शन घडले होते. विमानात डोळा लागला व त्या दृश्यानंतर डोळे उघडताच, हे खर्‍या-खुर्‍या जंगलाचे सुखद दृश्य पाहून डोळे दिपले. लाछिवाला रेंज, राजाजी नॅशनल पार्क व डून व्हॅलीच्या इतर जंगलांनी घेरलेले देहरादूनचे विमानतळ सुबक व सुंदर होते. उतरताच ढगांमध्ये लपलेल्या पर्वतरांगानी आमचे स्वागत केले. पावसाळ्यात हॉलिडे घेण्याचे फायदे माझ्या समोर उलगडू लागले. उन्हाळ्याच्या सुट्टीची गर्दी ओसरली होती आणि हलक्या पावसामुळे हवामान देखील फारच प्रसन्न झाले होते. विमानतळावरून गाडी निघाली आणि केवळ १०-१५ मिनिटांत आम्ही जंगलामधून प्रवास करू लागलो. रस्त्याच्या दोन्ही बाजूला उंच उंच झाडे व त्यावर उड्या मारणारी वानरसेना बघत आमचा प्रवास सुरू झाला, तो केवळ एका तासाभरात उत्तराखंड राज्याच्या तेहरी गढ़वाल भागात ‘आनंदा इन द हिमालयास्’ या अनोख्या रीसॉर्टमध्ये येऊन संपला. मुंबईपासून केवळ तीनएक तासात आम्ही थेट स्वर्गात येऊन पोहोचलो होतो. खरंच, आपण भारतात असे शॉर्ट ब्रेक वारंवार का घेत नाही? असा पुन्हा एकदा मला प्रश्‍न पडला.

अमेरिकेत राहणारी माझी बालपणीची अगदी जिवाभावाची मैत्रीण भारतात काही दिवस कामानिमित्त आली होती व पुन्हा एकदा लहानपणीच्या आठवणी ताज्या करण्यासाठी आम्ही तीन-चार दिवसात एक छोटासा हॉलिडे घ्यायचा ठरवला. वेळ कमी असल्याने मुंबईवरून थेट विमानप्रवासाने दोन-तीन तासांच्या आत आपण पोहोचलो पाहिजे ही माझी पहिली अट होती. त्यानंतर आम्ही दोघीच प्रवास करत असल्याने ते ठिकाण व तिथल्या सोयी ह्या आम्हा ‘दोन मैत्रिणींना’ एकत्र आनंद घेता येईल अशा देखील असल्याच पाहिजेत ही दुसरी अट आणि शेवटची अट तसेच इच्छा अशी होती की गप्पा मारायला व आराम करण्यासाठी भरपूर वेळ मिळावा, त्यामुळे फार घाई-गडबडीचे स्थलदर्शन आम्हाला नको होते.  थोडेफार प्लॅनिंग व डिस्कशन केल्यानंतर आम्ही ‘आनंदा इन द हिमालयास्’ची निवड केली व हॉटेलच्या आवारात गाडी शिरताच आपली निवड योग्य होती ह्याची खात्री मला पटली. तेहरी गढ़वाल येथील महाराजांच्या नरेन्द्र नगरच्या महालाबरोबर हिमालयातल्या शंभर एकरच्या माउंटन इस्टेटमध्ये ‘आनंदा इन द हिमालयास्’हे रीसॉर्ट स्थित आहे. सभोवती साल ची उंच झाडे आहेत तर अतिशय सुंदर प्रकारे देखरेख केलेला पॅलेस व त्याबरोबर निवासासाठी बांधलेले हॉटेल रूम्स. खरंतर ‘आनंदा इन द हिमालयास्’ला हॉटेल म्हणणं थोडंसं वावगं वाटतं.  इथे आल्यापासून आरती ओवाळून रुद्राक्षाची माळ गळ्यात घालून केलेल्या वेलकमपासून ते तिथल्या प्रत्येक व्यक्तीकडून होणारं आदरातिथ्य व आत्मियता पाहून आपण खरंच महाराजांच्या घरी पाहुणे म्हणून आलोय असंच वाटू लागते.  आमच्या ‘व्हॅली व्ह्यू’ रूममध्ये चेकइन करून आम्ही समोर दिसणार्‍या पर्वतरांगांच्या सौंदर्याकडे टक लावून बसलो तेवढ्यात समोरचे आकाश मोकळे झाले व लखलखत्या सूर्यप्रकाशात गंगा नदी व त्याभोवती वसलेल्या ऋषिकेशचे दर्शन घडले. गंगा मातेच्या अचानक घडलेल्या या दर्शनाने आम्ही मंत्रमुग्ध झालो.

आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर हॉलिडेवर निघालो की कोणतेही रीसॉर्ट किंवा कोणतेही डेस्टिनेशन तसे छानच वाटते पण आतापर्यंत देवभूमी आणि यात्रेसाठी प्रसिद्ध असलेल्या उत्तराखंडची नवीन ओळख मला आवडली. ऋषिकेशला जगातली ‘योगसाधनेची राजधानी’ म्हणून ओळखले जाते व त्याच धर्तीवर बांधलेले ‘आनंदा इन द हिमालयास्’ हे लक्झरी वेलनेस रीसॉर्ट आज जगातल्या सर्वात प्रसिद्द ‘डेस्टिनेशन स्पास्’ किंवा ‘हिलिंग हॉटेल्स ऑफ द वर्ल्ड’मध्ये का धरले जाते, ते इथे आल्यावर समजले. योग, आयुर्वेद आणि वेदान्त या तिन्ही गोष्टींचा त्रिवेणी संगम हे ‘आनंदा इन द हिमालयास्’चे कल्चर आहे व केवळ शरीरासाठी मसाज नव्हे तर मानवाचं माइंड, बॉडी आणि सोल ह्या महत्त्वाच्या घटकांना रीफ्रेश करण्यासाठी सर्व प्रकारच्या वेलनेस प्रोग्रॅमची इथे प्रॅक्टिस केली जाते.

मला गंमत वाटली, ती इथे येण्याआधी हॉटेलकडून आलेल्या प्रोग्रॅम आणि पॅकिंग गाईड लाईन्समध्ये केवळ हायकिंग शूज् आणि पोहायचे असल्यास स्विम सूट आणावे हेच नमूद केले होते. कारण इथे चक्क रोज आपल्याला कुर्ता-पजामा दिला जातो. अतिशय मऊ कापसाने बनवलेले हे कॉटनचे पांढरेशुभ्र कुर्ता-पजामा दररोज धुवून इस्त्री करुन आपल्यासाठी ठेवलेले असतात. हे कपडे घालण्याची तशी सक्ती नाही पण बहुधा तिथले भारतीयच नव्हे तर चक्क फॉरेनर्ससुद्धा ह्या कुर्ता-पजामात वावरताना दिसतात. ह्या पोशाखानेसुद्धा पूर्णपणे रीलॅक्स होण्याची मनाची तयारी होत असावी. काहीही असो, एखाद्या रीसॉर्टमध्ये आपण कपड्याच्या बॅगेचं ओझं न घेता जाऊ शकतो याचेच मला नवल वाटत होते. इथे पोहोचताच सर्वप्रथम इथल्या आयुर्वेदिक डॉक्टरबरोबर भेट घेतल्यास आयुर्वेदाच्या नियमांप्रमाणे कफ, पित्त आणि वात यांपैकी आपल्या शरीराची प्रवृत्ती नेमकी कोणती आहे याचा शोध लागतो व त्यानंतर आपण इथे नक्की काय खावे, कुठल्या स्पा ट्रीटमेंट घ्याव्या असे सगळ्या प्रकारचे मार्गदर्शन मिळते. पंचवीस हजार स्क्वेअर फूटच्या इथल्या स्पा सेंटरमध्येे आयुर्वेदिक व आंतरराष्ट्रीय असे सर्व प्रकारचे मसाज व ट्रीटमेंट घेता येतात. स्पा ट्रीटमेंट न आवडणार्‍या मंडळींसांठी स्विमिंग पूल, गोल्फ कोर्स, जॉॅगिंग ट्रॅक असे अनेक पर्याय आहेत. आज सकाळी तर आम्ही कुंजापूरी मंदिराला भेट द्यायला चांगला दोन तासांचा ट्रेक करत डोंगर चढलो. फार कठीण नाही पण अगदी सोपासुद्धा नसलेल्या ह्या ट्रेकमध्ये आपण ५०० मीटरची उंची चढून १६४५ मीटर म्हणजेच साधारण ५४०० फूटाच्या उंचीपर्यंत चढून जातो. ‘सती’मातेचे हे शक्तीपीठ भगवान महेश आणि सतीसाठी प्रसिद्ध आहेच, पण त्याचबरोबर वरून दिसणारे गंगा नदीचे व ऋषिकेश आणि सभोवताली असलेल्या डोंगरांच्या पॅनोरमिक व्ह्युज्साठी सुद्धा चढून जाणे योग्य ठरेल. सोबत दोन गाईड असल्याने या मंदिराच्या कथेची माहितीसुद्धा मिळते. आमच्या दहा जणांच्या बॅचमध्ये चार भारतीय नागरिक होते आणि इतर सहा मंडळी फ्रान्सहून आले होते. गंमत म्हणजे त्या सगळ्यांनी ट्रेकची मजा तर घेतलीच पण त्याच बरोबर देवीला नैवेद्य दाखवून अगदी मनापासून नमस्कारसुद्धा केला. पर्यटनाने संस्कृतीची देवाणघेवाण होते हे पाहून बरं वाटलं. डोंगर चढताना छोटी छोटी गावं लागली व इथली स्वच्छता प्रकर्षाने जाणविली. ह्यात दिनेश, आमच्या गाईडने सांगितले की मी माननीय पंतप्रधान श्री मोदीजींचे आभार मानतो की, आज ‘स्वच्छ भारत’ आंदोलनाचा गावागावात प्रचार होऊन लहान मुलांमध्येसुद्धा याची जाणीव निर्माण झाल्याने आता लोकं कचरा टाकत नाहीत आणि टाकलेला कचरा उचलू लागले आहेत. अशाने भारतातल्या पर्यटनाचे खरंच ‘अच्छे दिन’ यायला वेळ लागणार नाही, याची खात्री पटलीय.

आपण एवढे चढलो तरी दिवसभर फार थकवा जाणवला नाही, याचं रहस्य आपला फिटनेस लेवल अचानक एका दिवसात उच्चांकाला पोहोचलाय अशा सुखद भ्रमात दडलेला नसून, इथल्या उत्कृष्ट जेवणाची व स्पा ट्रीटमेन्ट्सची ती जादू आहे हे आम्ही स्वतःशी लागलीच  कबूल केले. त्याबरोबर मेडिटेशन क्लासेस, जवळपासच्या शाळेतल्या लहान मुलांचे उत्साहपूर्ण मनोरंजनाचे कार्यक्रम, बागेत फिरणारे मोर, टेम्परेचर कन्ट्रोल्ड स्विमिंग पूल या सर्वांनी आम्ही खरंच ‘आनंदमयी’ झालो. आता उद्या गंगेकाठी गंगा आरतीला भेट द्यायची उत्सुकता लागली आहे.

‘आनंदा इन द हिमालयास्’सारखे अनेक शॉर्ट ब्रेक घेणं अगदी सोप्पं आहे. मग ते वेलनेससाठी असो किंवा शॉपिंग, लक्झरी, फूड ब्रेक, स्थलदर्शन असे कारण काहीही असो भारतात छोट्या ब्रेकवर मोठा आनंद घेणे अगदी सहज शक्य आहे. गोवा, दिल्ली, आग्रा, जयपूर, उदयपूर, केरळमधले मुन्नार, अल्लेप्पी, कूर्ग, अमृतसर, पाँडिचेरी, हैदराबाद आणि भारतातल्या इतर अनेक ठिकाणी आपल्या दिमतीसाठी एकसेएक रीसॉर्टस आणि हॉटेल्स् सुसज्ज आहेत. त्यात आता येणार्‍या महिन्यांमध्ये ईद, पार्सी न्यू इयर आणि इतर वीकेन्डस्मध्ये आपण पटकन एक शॉर्ट ब्रेक घेऊ शकता. कोण म्हणतं की, ‘हॉलिडे वर्षातनं एकदाच असला पाहिजे?’

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*