चला जगाच्या टोकावर

0 comments
Reading Time: 9 minutes

वीणा वर्ल्ड सुरू झाल्याची पहिली जाहिरात आम्ही दिली आणि शुभेच्छांचे असंख्य फोन आले. बर्‍याच जणांनी प्रश्‍न केला, ‘जाहिरात मस्त आहे, पण हा जो फोटो वापरलाय तो कोणत्या ठिकाणाचा आहे?’ पहिल्या जाहिरातीपासूनच बिझनेस सुरू झाला म्हणायचा. खाली डाव्या साईडला जो दिलाय तोच तो फोटो, ‘पेरितो मोरेनो ग्लेशियर’. हे अप्रतिम ठिकाण आपण साउथ अमेरिकेच्या सहलीत बघतो.

जगाच्या टोकाला पोहोचायची ओढ प्रत्येकाला असते, पण नेमकं जगाचं टोक कोणतं? पृथ्वी गोल आहे, म्हणूनच आम्ही उत्तर धु्रव आणि दक्षिण धु्रव ह्यांना प्रमाण मानून त्यांच्यापर्यंत एक पर्यटक म्हणून कसं पोहोचता येईल हा विचार काही वर्षांपूर्वी केला आणि आता पर्यटक दरवर्षी वीणा वर्ल्डसोबत नॉर्दन लाइट्स आणि अंटार्क्टिका क्रुझच्या निमित्ताने जेवढं शक्य होईल तेवढं ह्या दोन्ही धु्रवाजवळ जायचा प्रयत्न करतात. अजून तर बरीच भ्रमंती बाकी आहे. ज्यांनी आत्ता प्रवासाला सुरुवात केलीय, त्यांना आम्ही पर्यटनाच्या यादीत एक ‘लक्ष्य’ म्हणून देशांचं किंवा खंडाचं टोक समाविष्ट करायला सांगतो. आपलं केप कॅमोरिन-कन्याकुमारी, साउथ आफ्रिकेचं केप ऑफ गूड होप किंवा केप अ‍ॅगुल्हास, स्कॅन्डिनेव्हियाचं-नॉर्वेचं नॉर्थ केप-नॉर्डकॅप, चिलीचं केप फ्राव्हर्ड, ऑस्ट्रेलिया टास्मानियाचं साउथ ईस्ट केप, न्यूझीलंडचा स्लोप पॉईंट, युएसए हवाईचं का-लाइ, चायनाचं हायनान, ग्रीनलँडचं केप फेअरवेल, रशियाचं केप फ्लिगली, जपानचं केप इरिसाकी…ही यादी न संपणारी आहे. बर्‍याच ठिकाणी पर्यटनाला अनुकूल परिस्थिती आहे, त्यामुळे मलाही अनेक ठिकाणी ह्या पर्यटन व्यवसायामुळे जाता आलं. जगाच्या किंवा देशाच्या अशा टोकांवर उभं राहायचं, देवाचे आभार मानायचे, गायत्री मंत्राचं पठण करायचं हा परिपाठ मी आजतागायत सुरू ठेवलाय. अजून बरीच टोकं खुणावताहेत, कधीतरी तिथे पोहोचायचंय हा मानस आहे आणि इच्छा केली की पूर्ण होतेच, तेव्हा ‘व्हाय नॉट लूक फॉरवर्ड टू समथिंग बीयाँड?’

आज अशाच जगाची टोकं म्हणून संबोधल्या जाणार्‍या दोन खंडांचा मागोवा घ्यायचा थोडक्यात प्रयत्न केलाय. त्याला कारण आहे फेब्रुवारीत जाणार्‍या दोन सहलींचंही. ‘रीओ कार्निव्हल’ हा ब्राझिलच्या ‘रीओ दी जनिरो’ ह्या शहरात आयोजित केला जाणारा जगप्रसिद्ध सोहळा. त्याला धरून दरवर्षी आम्ही साउथ अमेरिकेची, ह्या खंडातल्या महत्त्वाच्या पाच देशांना भेट देणारी, जगातल्या अनेक विख्यात आश्‍चर्यांचा समावेश असलेली सहल आयोजित करतो, साउथ अमेरिकेला जायचं म्हणजे विमानप्रवासाचा खर्चच काही लाखात. मग एवढ्या लांब जातोय तर आणखी पुढे जाऊन अंटार्क्टिका एक्सपीडिशन करून, सातव्या खंडाची सफर करूया असा विचार आमचा आणि पर्यटकांचाही असतो, जेणेकरून एका वेळच्या विमानखर्चाची काही लाखांची बचत होऊ शकते.

आशिया, आफ्रिका आणि नॉर्थ अमेरिकेनंतरचा जगातला ‘नंबर चार’चा मोठा खंड म्हणजे दक्षिण गोलार्धातला ‘साउथ अमेरिका’. पश्‍चिमेला पॅसिफिक ओशन, उत्तरेला करिबीयन सी आणि नॉर्थ अटलांटिक सी, दक्षिणेला साउथ अटलांटिक सी अशा महासागरांच्या कोंदणात साउथ अमेरिका खंड चपखल बसला आहे. पोर्तुगीज, स्पॅनिश, इंग्लिश, डच आणि फ्रेंच लोकांनी म्हणजे दर्यावर्दी वा समुद्री चाच्यांनी साउथ अमेरिकेचा एक एक भाग शोधून आपल्या अमलाखाली आणला आणि तिथे युरोपियन कोलोनायझेशन व्हायला सुरुवात झाली. त्यावेळी पॉवरबाज असलेल्या पोर्तुगिजांनी साउथ अमेरिकेच्या पूर्व भागावर कब्जा केला तर स्पॅनिश लोकांनी पश्‍चिम भागावर आपला हक्क प्रस्थापित केला, त्यामुळेच ह्या दोन भाषांचं प्राबल्य आपल्याला इथे दिसतं. ह्या दोन भाषांमुळे अर्थातच विखुरलेली अनेक कल्चर्स एकत्र यायला मदत झाली, ह्या नवीन उदयाला ‘लॅटिन अमेरिका’ असंही म्हटलं गेलं. पोर्तुगिजांना बरीच किंमत मोजून अठराशे बावीसमध्ये ब्राझिल स्वतंत्र झाला आणि त्याच्या आसपास सर्वच देशांच्या स्वातंत्र्यचळवळींची लाट येऊन एक-एक देश स्वतंत्र होत गेले आणि साउथ अमेरिकेची जगरहाटी सुरू झाली. नैसर्गिक,सागरी आणि खनिज संपत्तीच्या जोरावर साउथ अमेरिका महत्त्वाचा खंड बनला.

साउथ अमेरिकेला अनेक वरदानं लाभलीयेत, जी आपण आपल्या सहलीत बघतो. जगातलं सर्वात मोठं अ‍ॅमेझॉनचं जंगल साउथ अमेरिकेत आहे आणि त्याचा जास्तीत जास्त भाग हा ब्राझिलमध्ये आहे. अ‍ॅमेझॉन जंगल ज्या नदीच्या काठावर वसलं आहे, ती जगातली सर्वात मोठी नदी आणि लांबीच्या बाबतीत जगातली दोन नंबरची अ‍ॅमेझॉन रीव्हर साउथ अमेरिकेतच आहे. इथल्याच ब्राझिल आणि अर्जेंटिना ह्या देशांना लाभलेल्या इग्वासु फॉल्सला भेट दिल्यावर फर्स्ट लेडी ऑफ अमेरिका-एलेनोर रूझवेल्ट म्हणाल्या होत्या, ‘पूअर नायगारा.’ त्यांच्या ह्या विधानाने इग्वासु फॉल्सचं आयुष्याचं भलं झालं आणि तो बघायला जगभरातल्या पर्यटकांमध्ये चढाओढ लागली. जिथल्या बर्‍याचशा भागात चारशे-पाचशे वर्षात पाऊसच पडला नाही असं पॅसिफिक महासागराच्या किनार्‍यालगतचं एक हजार किलोमीटर्स लांबीचं, जगातलं ड्रायेस्ट डेझर्ट ‘आटाकामा’ चिली आणि पेरू ह्या दोन देशांमध्ये विभागलं गेलंय. जगातली सर्वात लांब सात हजार किलोमीटर्सची माऊंटन रेंज म्हणजे ‘अँडीज’ ही अर्जेंटिना, चिली, बोलिव्हिया, पेरू, इक्वाडोर, कोलंबिया आणि व्हेनेझुएला ह्या साउथ अमेरिकन देशांमध्ये पसरली आहे. अटाकामा डेझर्टचा भागही ह्या अँडीजमध्ये येतो. जगातील सर्वात उंचावर वसलेली कॅपिटल सिटी म्हणजे बोलिव्हियाची राजधानी ‘ला पाझ’. जहाजांना दळणवळणासाठी खुला असलेला आणि जगातला सर्वात उंचावरचा ‘लेक टिटिकाका’ पेरू ह्या देशात म्हणजे साउथ अमेरिकेत आहे. अशा अनेक नॅचरल वंडर्ससोबत साउथ अमेरिका सजलंय ते ‘न्यू सेव्हन वंडर्स ऑफ द वर्ल्ड’ मधल्या दोन अद्भुत आश्‍चर्यांनी. त्यातलं एक आहे इन्का साम्राज्याचे अवशेष ‘माचूपिचू’ आणि दुसरं ‘ख्राइस्ट द रीडीमरचा’ भव्य पुतळा. सर्वात मोठी, सर्वात घनदाट, सर्वात उंच, सर्वात लांब… अशा वैशिष्ठ्यांनी नटलेल्या साउथ अमेरिकेमध्ये एकूण बारा देश आहेत, त्यातील पाच महत्त्वाच्या देशांना आपण भेट देतो

आत्ता थोडंसं जाणूया अंटार्क्टिकाविषयी. अगदी आत्ता-आत्तापर्यंत तो पर्यटकांच्या आवाक्याबाहेर होता. तसा तो अनेक बाबतीत इतर खंडांपेक्षा वेगळा आहे. यावर कोणत्याही देशाची मालकी वा अधिकार नाही. इतकेच काय, या खंडावर एकही शहर नाही आणि कायमस्वरूपी मानवी वस्तीही नाही. वर्षभर इथे पांढर्‍याशुभ्र बर्फाचं साम्राज्य असतं. हा खंड म्हणजेच दक्षिण गोलार्धात, पृथ्वीच्या अगदी तळाशी असलेला ‘अंटार्क्टिका खंड’. हा जगातला असा एकमेव खंड आहे की ज्याची अधिकृत भाषा नाही, जिथे अधिकृत चलन नाही आणि ज्याला अधिकृत राजधानीही नाही. दक्षिण गोलार्धातील अंटार्क्टिका सर्कलच्या दक्षिण टोकाला ही भूमी असून तिच्या भोवती सदर्न ओशनचा वेढा आहे. आकारमानाच्या बाबतीत जागतिक क्रमवारीत एशिया, आफ्रिका, नॉर्थ अमेरिका आणि साउथ अमेरिकेनंतर हा खंड पाचव्या स्थानावर येतो. तुलनाच करायची तर अंटार्क्टिकाचे आकारमान ऑस्ट्रेलियाच्या दुप्पट आहे. अंटार्क्टिका हा सर्वात कोरडा, सर्वात थंड आणि सर्वात जोरदार वार्‍यांचा प्रदेश म्हणून प्रसिद्ध आहे. या परिसरात पाऊस अगदी अल्प पडतो. जगातल्या एकूण बर्फापैकी सुमारे ९०% बर्फ अंटार्क्टिकावर साचलेला आहे. त्यामुळे जगातल्या गोड पाण्यापैकी ७०% पाणी या खंडावर बर्फाच्या रूपानं एकवटलेलं आहे.

बर्फाने झाकलेल्या अंटार्क्टिका खंडावर माणूस पहिल्यांदा पोहोचला तो सन १८२१ साली. नंतर या परिसरातील व्हेल्स आणि सील्स ह्या प्राण्यांच्या शिकारीचा सिलसिला सुरू झाला आणि त्यासाठी चक्क या मायनस डीग्रीच्या प्रदेशात बेस कॅम्प उभारण्यापर्यंत मजल गेली. सुदैवाने १९५७ साली, ‘इंटरनॅशनल जीओफीजिकल ईयर’ साजरे करताना अंटार्क्टिकाच्या संरक्षणासाठी काही नियम तयार करण्यात आले आणि तेव्हापासून या खंडावर फक्त शास्त्रीय संशोधनाला परवानगी देण्यात आली. आपल्या भारताचाही संशोधन तळ अंटार्क्टिकावर आहे. आपल्याकडच्या हिवाळ्यात तिथला उन्हाळा असतो, त्यामुळे आपण नोव्हेंबर ते एप्रिल या काळात अंटार्क्टिकाला भेट देऊ शकतो.

अंटार्क्टिका गाठण्यासाठी आपल्याला जावं लागतं साउथ अमेरिकेतील अर्जेंटिनाची राजधानी असलेल्या ब्युनोस आयरेस शहरातून अंटार्क्टिकाचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणार्‍या ‘उशुआया’या शहरात. उशुआयामधूनच आपली अंटार्क्टिकाची क्रुझ निघणार असते. उशुआया ज्या बिगल चॅनलच्या काठावर आहे, त्या चॅनलमधून आपण प्रवासाला सुरुवात करतो. यानंतर जी भूमी दिसेल, ती असेल जगाच्या तळाशी असलेल्या सातव्या खंडाची -अंटार्क्टिकाची. नुसत्या कल्पनेनंच आपण एक्साईट होतो. अंटार्क्टिकाकडे जाताना वाटेत ‘ड्रेक पॅसेज’ ओलांडावा लागतो. १६ व्या शतकातील धाडसी, दर्यावर्दी ‘फ्रान्सिस ड्रेक’ याचं नाव या पॅसेजला दिलं आहे. ह्या ठिकाणी अटलांटिक आणि पॅसिफिक महासागरांची गळाभेट होते आणि आपल्याला ‘रफ सी’ म्हणजे काय ते कळतं. ड्रेक पॅसेज पार केल्यावर भोवतालच्या समुद्रात तरंगणारे हिमखंड सांगायला लागतात, की आपण अंटार्क्टिकाच्या घेर्‍यात पोहोचलो आहोत. या सहलीत आपण भेट देतो अंटार्क्टिका पेनिन्सुलातील साउथ शेटलँड आयलंड्सना. आपण आपल्या क्रुझमधून, छोट्या बोटीत – ज्यांना ‘झोडियाक’ म्हणतात त्यात उतरतो आणि कुशल नावाडी वल्हवत वल्हवत आपल्याला वेगवेगळ्या बेटावर घेऊन जातात. या बर्फाच्या राज्याचे रहिवासी म्हणजे पेंग्विन्स, सील्स, व्हेल्स हे जलचर. त्यामुळे अंटार्क्टिकावर स्थलदर्शन म्हणजे इथलं अनोखं ‘वाइल्ड लाईफ’. आपल्याला इथे चिनस्ट्रॅप पेंग्विन्सची कॉलनी पाहायला मिळते. जेमतेम दीड दोन फूट उंचीचे हे पेंग्विन्स शेकडोंच्या संख्येनं पाहायला मिळतात तेव्हा आयुष्यात न पाहिलेलं काहीतरी पाहातोय ह्याची खात्री पटते. हे सारं अनुभवताना, ‘आपण खरोखर अंटार्क्टिकावर आहोत की स्वप्नात सफर करतोय?’ असा प्रश्‍न मनात आल्यावाचून राहात नाही. पण जेव्हा आपल्या क्रुझच्या समोरून महाकाय व्हेल्स कधी आपली भव्य शेपटी दाखवत तर कधी डोक्यातून उसळणारे पाण्याचे कारंजे उडवत जातात तेव्हा खात्री पटते, की आपण प्रत्यक्षात या जगावेगळ्या भूमीवर, जगाच्या टोकावर आलो आहोत. आम्ही जाऊन आल्याला दहा वर्ष झाली असतील पण आजही ते प्रिस्टीन-पवित्र निसर्गचित्र डोळ्यासमोर जसंच्या तसं उभं आहे.

फेब्रुवारी 2019 मध्ये रिओ कार्निव्हलचं औचित्य साधून ह्या सहली आयोजित केल्या आहेत. आपल्याला साउथ अमेरिका आणि अंटार्क्टिका ह्या दोन्ही सहली एकत्रित करता येतील किंवा फक्त साउथ अमेरिका, फक्त अंटार्क्टिका, फक्त ब्राझिल अशा छोट्या सहलींची पार्ट टूर घेता येईल.  सो चलो, बॅग भरो, निकल पडो! यावेळी जगाच्या टोकावर, एका हटके सहलीला.

Language, Marathi

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

*