Language Marathi

आरसपानी अंदमानी हॉलिडे

भारत आणि साउथ ईस्ट एशियाच्या मध्ये पसरलेल्या अथांग अशा बंगालच्या उपसागरात दोन अतिशय देखणी बेटं इतिहासकाळापासून जगाचं आकर्षण राहिलेली आहेत जी चक्क आपल्या भारताच्या मालकीची आहेत. अंदमान आणि निकोबार आयलंड्स. त्यातील निकोबार अजून पर्यटकांसाठी खुलेआम झालेलं नाही पण अंदमान मात्र आता आपल्या भारतीय पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलं आहे.

पंचवीस वर्षांपूर्वी अंदमानच्या सहली मी स्वतः घेऊन जात होते, तेव्हा तिथे पर्यटन नुकतंच कुठे शेप घ्यायला लागलं होतं किंवा तिथे असलेल्या दोन चांगल्या रिसॉर्टस्मध्ये जाणार्‍या ‘एक्सक्लुसिव्ह’ अशा पर्यटकांचीच संख्या जास्त होती. ‘समथिंग न्यू’ ‘समथिंग ऑफबीट’ ‘समथिंग डिफरंट’ अशा पर्यटकांची भेट इथे घडत असे किंवा स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांच्या प्रेमाखातर त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी, सेल्युलर जेलमधल्या कारावासात त्यांचं वास्तव्य ज्या खोलीत होतं ती खोली किंवा सेल बघण्यासाठी अनेक पर्यटक खासकरून जात असत. आता मात्र अंदमानला जाणार्‍या प्रवाशांमध्ये भरपूर वाढ झालीय आणि अंदमान हे एक महत्वाचं पर्यटनस्थळ बनून गेलंय. फार्मिंग-फिशिंग ह्या व्यवसाय उद्योगांसोबत अंदमानमध्ये टूरिझम चांगल्या प्रमाणात फोफावतोय आणि ह्याद्वारे या आपल्याच भारतातल्या पर्यटनस्थळाचा विकास घडत असताना त्याला हातभार लावणे हे आपलं कर्तव्य आहे असं मला मनापासून वाटतं.

एकांतवास-काळ्या पाण्याची शिक्षा असं ज्याचं वर्णन स्वातंत्र्यापूर्वी केलं जायचं तो भाग तसा आपल्यापासून भौगोलिकदृष्ठ्या विरक्तच आहे, असं म्हणायला हरकत नाही. बघानं, कोलकत्ता-विशाखापट्टणम-चेन्नईपासून अंदमान म्हणजे त्याचा उत्तरेकडचा वरचा भाग हा साधारणपणे 1200 किलोमीटर्सवर (1255 कि.मी -1200-1190) म्हणजे भारताच्या महत्वाच्या दक्षिणी टोकांपासून जवळजवळ समान अंतरावर, आणि इंडोनेशियाचं सुमात्रा बेट 150 आणि ब्रम्हदेश 190 किलोमीटर्सवर साउथ साईडला. म्हणजे आपलाच हा भूभाग आपल्यापेक्षा परक्या देशांना जास्त जवळचा आहे म्हणायला हरकत नाही. जनरली असं विचारलं जातं कि, ‘तुमच्याकडे अंदमान निकोबारची सहल आहे का?’ तर इथे मला थोडी माहिती द्यावीशी वाटते ती म्हणजे अंदमान आणि निकोबार हा 572 बेटांचा समूह आहे-द्विपसमूह. त्यातल्या फक्त 34 किंवा 36 बेटांवर लोकवस्ती आहे. नकाशामध्ये बघितलंत तर तुम्हाला अंदमान सी पश्‍चिमेकडे-दक्षिणेकडे इंडियन ओशन आणि पूर्वेकडे बंगालचा उपसागर दिसेल आणि ह्या तीन समुद्रांमध्ये एक चिंचोळा पट्टा ज्याची लांबी साधारण 700 किलोमीटर्स किंवा त्यापेक्षा अधिक आहे अशात अंदमान निकोबार सामावलेलं आहे. वरचा म्हणजे उत्तरेकडचा चिंचोळा पट्टा आहे त्याला अंदमान म्हणतात. त्यानंतर मध्ये समुद्र आहे त्यात एक छोटसं बेट आहे त्याला ‘लिटिल अंदमान’ म्हणतात. त्याखाली जो आणखी एक चिंचोळा भाग आहे त्याला निकोबार म्हणतात. अंदमान आणि निकोबारमध्ये 150 किलोमीटर्सचं अंतर आहे म्हणजे मध्ये समुद्र आहे. अंदमानची राजधानी आहे पोर्ट ब्लेअर तर निकोबारची राजधानी आहे कार निकोबार. निकोबारच्या सर्वात दक्षिण टोकाला इंडोनेशियाकडे आहे ग्रेट निकोबार जे नाव आपल्या ऐकण्यात कधी कधी येतं. अंदमान आणि निकोबारमध्ये आपण सर्वसामान्य भारतीय पर्यटक फक्त अंदमानलाच भेट देऊ शकतो. तर फॉरिनर्सना अंदमानला येताना परमिटची गरज असते. निकोबारला आपण जाऊ शकत नाही, निकोबारला जाऊ शकतात ते फक्त संशोधक स्पेशल परमिट घेऊन किंवा काही स्पेशल टुरिस्ट स्पेशल परमिटच्या साह्याने जाऊ शकतात. त्यामुळे सहली ह्या अंदमानला जातात आणि आपण पर्यटक मंडळी भेट देतो तो अंदमानचा भूभाग. अंदमान निकोबारची लोकसंख्या आहे साधारण 4 लाख, त्यापैकी फक्त 10% लोकसंख्या ही निकोबार बेटावर आहे तर 90% लोकं अंदमानच्या वेगवेगळ्या भूभागात राहतात. उष्ण कटिबंधातल्या अंदमानची हवा उष्ण म्हणजे तापमान किमान 21 ते कमाल 31 सेंटिग्रेडच्या दरम्यान पण ह्युमिडिटी-दमटपणा मात्र जास्त, अगदी 70 ते 90% एवढी. अर्थात वारा भरपूर असल्याने तशी अंगाची लाहीलाही होत नाही. तसंच इथे नोव्हेंबर-डिसेंबरला पाऊसही पडत असल्याने कधी कधी उष्णता वाढली की पाऊस पडायला सुरुवात होते आणि आपल्याला त्रास होत नाही, आम्ही ह्याला ‘नॅचरली एअर कंडिशन्ड’ असं म्हणतो. अंदमानला 2 पावसाळे बहाल केलेयत निसर्गाने, मे ते सप्टेंबरमधला ‘साउथ वेस्ट मान्सून’, म्हणजे आपण म्हणतो नं आपला पावसाळा प्रथम येऊन पोहचतो तो अंदमानला तोच हा साउथ वेस्ट मान्सून आणि ह्यांचा दुसरा पावसाळा असतो तो म्हणजे ‘नॉर्थ इस्ट मान्सून’ नोव्हेंबर डिसेंबरमधला, जो आपल्याला केरळमध्येही बघायला मिळतो. आता दोन पावसाळ्यांचं वरदान मिळालेलं अंदमान हिरवंगार न झालं तरच नवल. रेनफॉरेस्टनी अंदमान भरलेलं आहे, अनेक प्रकारची वेगवेगळी जंगलं आपल्याला अंदमानमध्ये बघायला मिळतात. हिरवीगार वनराई-पांढरेशुभ्र समुद्रकिनारे-स्वच्छ निरभ्र आकाशाचं प्रतिबिंब पडलेलं समुद्रातल्या पांढर्‍या वाळूचा तळ दाखवणारं नितळ पाणी आणि आकाशाचं प्रतिबिंब पडून त्या पाण्याला मिळालेली निळी झळाळी… टुरिस्टना आणखी काय हवं. आयुष्यात एकदाही पाण्यात न गेलेल्या किंवा पोहणं म्हणजे काय हे माहित नसणार्‍या कोणत्याही व्यक्तीला भूल घालेल असा हा अंदमानचा द्विपसमूह ‘बंगालच्या उपसागरातलं पाचूचं बेट’ हे नामानिधान मिरवतो आहेच पण मला म्हणावसं वाटतं की हा पर्यटकांच्या आकर्षणाचा ‘नीलमणी’ झालाय.

स्वातंत्र्यपुर्व काळात जरी काळं पाणी अशी अंदमानची भीतिदायक ओळख असली तरी प्रत्यक्षात या द्विपसमूहाला अप्रतिम निसर्ग सौंदर्याचं दैवी वरदान लाभलं आहे. या आरसपानी सौंदर्याचा मनभरून आस्वाद घेता यावा म्हणून तर आपल्या सहलीत आपण अंदमानच्या हॅवलॉक आयलंडवर दोन रात्रींचा आणि नील आयलंडवर एक रात्रीचा निवास करतो. ही दोन्ही आयलंड्स आपल्याला सागराच्या नितळ नीळ्या पाण्याचं अक्षरश: वेड लावतात. स्नॉर्केलिंगचा आनंद इथे बरीच मंडळी घेऊ शकतात आणि पाण्याखालच्या कोरल्सची रंगीबिरंगी दुनिया डोळेभरून बघू शकतात. राधानगर बीच, एलिफंट बीच, भरतपूर बीच, सेल्युलर जेल, रॉस आयलंड, सॉ मिल अशा वेगवेगळ्या आकर्षणांनी ही सहल सजली आहे. आणि आता ऑक्टोबर ते मार्चपर्यंत फॅमिली ग्रुप टूर्स, वुमन्स स्पेशल, सीनियर्स स्पेशल, सिंगल स्पेशल, स्टुडंट्स स्पेशल, हनिमून स्पेशलच्या भरपूर सहली आहेत. पन्नास ते साठ हजार रुपयात तुम्हाला मुंबई ते मुंबई विमानप्रवासासह ही सहल सर्वसमाविष्ट अशी मिळतेय. तेव्हा चलो, बॅग भरो, निकल पडो!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*