Language Marathi

अरेरे की अरे वाह?

दर आठवड्याचा प्रवास अपरिहार्य आहे. तो त्रासदायक, ‘अगदी नको तो प्रवास’ इतका कष्टप्रद होऊ शकतो, पण पर्यटकांना, असोसिएट्सना आणि आमच्या टूर मॅनेजर्सना भेटणं ह्या तीन गोष्टी माझ्या प्रवासाचा हेतू बनल्या, आणि ज्यावेळी हा हेतू स्पष्ट झाला तेव्हापासून आजपर्यंत ‘अरे यार, फिरसे बॅग भरो, निकल पडो’ ऐवजी ‘अरे वाह! चलो, बॅग भरो, निकल पडो!’ मध्ये त्याचं परिवर्तन झालं.

सध्या दर आठवड्याला देशविदेशात माझी भटकंती सुरू आहे. महिन्याला किमान चार वेळा मुंबई एअरपोर्टचं दर्शन घडणं हे रूटीन झालंय. सीनियर्स स्पेशल किंवा वुमन्स स्पेशलच्या मोठ्या सहलींना आलेल्या पर्यटकांना त्या सहलींवर एका गाला इव्हिनिंगला जाऊन भेटणं, त्यांच्याशी सुसंवाद साधणं, सर्वांनी मिळून त्या गाला इव्हिनिंगमध्ये धम्माल अनुभवणं हे प्रवासाचं मुख्य कारण, पण त्याचा फायदा असाही होतो की मला त्या ठिकाणच्या आमच्या असोसिएट पार्टनर्सना भेटता येतं, त्यांच्याकडून फीडबॅक घेता येतो. नवीन गोष्टी, सर्व्हिस अपग्रेडेशन्स किंवा त्या डेस्टिनेशचा-सेक्टरचा लेखाजोखा जाणता येतो. कुठे काही त्रुटी असतील तर त्याही सुधारता येतात. दुसरा फायदा असतो तो त्या सहलींवर पर्यटकांच्या दिमतीला असलेल्या आमच्या टूर मॅनेजर्सना भेटण्याचा. आता वीणा वर्ल्डकडे पाचशेहून अधिक टूर मॅनेजर्स आहेत, प्रत्येकाला ऑफिसमध्ये भेटणं प्रवासामुळे आणि वाढत्या कामांमुळे जवळजवळ अशक्य. त्यामुळे हा दर आठवड्याचा प्रवास वरदान वाटतो. टूर मॅनेजर्सचं ट्रेनिंग, रीज्युविनेशन, रिफ्रेशमेंट हा भाग आमचा डिरेक्टर नील पाटील, एचआर टीम, विवेक कोचरेकर, दिनेश बांदिवडेकर, कमलेश सावंत, मिहिर कळंबी आणि आमचे अनुभवी टूर मॅनेजर्स सांभाळतात. थिअरी-प्रॅक्टिकल्स ह्या सर्वांचा मारा असलेलं हे ट्रेनिंग घेतल्यावर किंवा रीफ्रेशर्स कोर्स केल्यावर खरी कसोटी असते ती सहलीवर नेमकं काय घडतंय ह्याची, आणि ते मला अगदी फर्स्ट हॅन्ड जाणायला मिळतं ह्या दर आठवड्याच्या प्रवासात. पर्यटकांना भेटताक्षणी कळतं की सहल आनंदाच्या कोणत्या पट्टीत सुरू आहे, पर्यटक खूश आहेत न? आपण जे जाहिरातीत लिहीतो, ते पर्यटकांना मिळतंय न? अनेकदा पर्यटकांना डायरेक्ट विचारते की, ‘‘जे तुम्हाला अपेक्षित होतं ते मिळालं न?’’ बर्‍याचदा ‘न बोलता कळले सारे’ असाच मामला असतो. आत्ता परवा मी अंदमान आणि श्रीलंकेला जाऊन आले. दोन्हीकडे सीनियर्स स्पेशल आणि वुमन्स स्पेशलच्या एकूण चार सहलींवर आलेल्या पर्यटकांना भेटले. एका कार्यक्रमात एका पर्यटकांनी प्रश्‍न केला की, ‘आमची ही चौथी सहल आहे आणि प्रत्येक सहलीत आजपर्यंत आम्हाला जे जे टूर मॅनेजर्स मिळाले ते एकसे एक होते. सीनियर मंडळींची भरपूर काळजी घेतली त्यांनी. तुम्ही कसं ट्रेनिंग देता हो?’ त्यांना म्हटलं, ‘‘तुम्हाला जी काही सेवा मिळालीय आणि ज्याने तुम्ही खूश आहात त्यात पन्नास टक्के ट्रेनिंगचा भाग आहे पन्नास टक्के ह्या मुलांच्या स्वत:च्या इंटरेस्टचा. आम्ही फक्त चार-साडेचार वर्षांची संस्था आहोत. ह्या साडेचार वर्षांत सर्वांनी मिळून वीणा वर्ल्ड उभं केलंय. अर्थात ह्यात तुमच्या आणि आमच्या जगभरातील असोसिएट्सच्या साथीचा मोलाचा वाटा आहेच. प्रत्येकाने मनापासून काम केलं म्हणून ‘जे तीस वर्षांत केलं ते तीन वर्षांत करण्याची’ जिद्द किंवा आव्हान आम्ही पूर्ण करू शकलो. पण आता खरी कसोटी आहे. थोडं नावारूपाला आलो की डोक्यात आणि अंगात एक प्रकारची गूर्मी वा सुस्ती यायला सुरुवात होते, ती येऊ न देता ‘पाय जमिनीवर आणि डोकं धडावर’ हा साधा मंत्र आम्ही प्रत्येकजण आळवीत असतो, स्वत:ला त्याची जाणीव करून देत असतो. आम्ही काम केलं तर आम्हाला आणि वीणा वर्ल्डला भविष्य आहे हे आम्हा प्रत्येकाला पक्कं माहीत आहे. त्यामुळे ‘काम, मेहनत, कष्ट हे करावे लागणारच आहेत, आणि जर ते अपरिहार्य असतील तर मग ते आनंदाने उत्साहाने का करू नयेत?’ ही भावना ह्यापाठी आहे.

आता मलाही दर आठवड्याचा प्रवास अपरिहार्य आहे. तो त्रासदायक, कंटाळवाणा, ‘अगदी नको तो प्रवास’ इतका कष्टप्रद होऊ शकतो पण पर्यटकांना भेटणं, असोसिएट्सना भेटणं आणि आमच्या टूर मॅनेजर्सना भेटणं ह्या तीन गोष्टी प्रामुख्याने माझ्या प्रवासाचा हेतू बनल्या किंवा प्रवासाचा मकसद म्हणूया, आणि ज्यावेळी माझा हा हेतू स्पष्ट झाला तेव्हापासून आजपर्यंत ‘अरे यार, फिरसे बॅग भरो, निकल पडो’ ऐवजी ‘अरे वाह! चलो, बॅग भरो, निकल पडो!’ मध्ये त्याचं परिवर्तन झालं. परिस्थिती तीच पण मनस्थिती बदलली, हेतू स्पष्ट झाला, मकसद मिळाला आणि कंटाळ्याचं रूपांतर उत्साहात झालं. हीच गोष्ट वीणा वर्ल्डच्या कल्चरचा भाग आहे. प्रत्येक टूर मॅनेजर किंवा प्रत्येक मॅनेजर आणि टीम ह्यांनी प्रत्येकाने हे सेल्फ-चेकअप किमान सहा महिन्यांतून एकदा केलं पाहिजे. मोजमाप करणं अगदी साधं आहे. सकाळी उठल्यावर तुमच्या मनात टूरवर जायचा किंवा ऑफिसला यायचा किती उत्साह आहे तो स्वत:च चेक करून पहायचा. ‘ओ नो, पुन्हा जायचं?’ असं वाटतंय की ‘चलो, लेट्स गो!’ असं वाटतंय? ‘ओ…नो…’ हे फीलिंग जर सारखं येत असेल तर समथिंग इज राँग समव्हेअर हंड्रेड पर्सेंट. एकतर तुम्हाला काम आवडत नसेल, जमत नसेल, चुकण्याची भिती वाटत असेल, एखादा अदृश्य दबाव तुमच्यावर असेल… अशी कोणतीही कारणं असू शकतात, ती आपल्याला शोधता आली पाहिजेत. जर लाईनंच चुकली असेल तर जेवढ्या लवकर त्यातून बाहेर पडता येईल ते पडायचं. ह्यात स्वत:चं आणि संस्थेचंही भलं. समजा ते सहज शक्य नसेल तर नेमकं कशामुळे माझ्यात ‘चलो, लेट्स गो!’ अशी उत्साही आनंदी भावना निर्माण होत नाही ह्याचं मुळ मग ते आर्थिक, शारिरीक, मानसिक, वैचारिक, कोणतंही असो ते शोधून काढून त्यावर इलाज केला पाहिजे, करता आला पाहिजे. आजच्या जागतिक स्पर्धेच्या युगात सर्वात महत्वाची गोष्ट आहे ही. एकदा का हे मानसिक आरोग्य संतुलन आपल्याला जमलं की आपण बाजी मारलीच समजा. वीणा वर्ल्डमध्ये ह्या संस्कृतीच्या रूजवातीचा प्रयत्न आम्ही करतोय आणि त्याला बर्‍यापैकी यश येतंय म्हणायला हरकत नाही. त्याचंच फळ असेल कदाचित पर्यटकांनी आमच्या टूर मॅनेजर्सना आणि त्यांच्या सेवेला वाखाणण्याचं.

संतुलित मनातून चांगले विचार, चांगल्या सकारात्मक विचारांतून विधायक आचार, उत्तम आचारांच्या पुनरावृत्तीतून लागलेली सवय आणि छान छान सवयींनी बनलेली सशक्त आनंदी समाधानी जीवनशैली एकदा का आत्मसात झाली की आपण कोणत्याही आर्थिक वा सामाजिक स्तरावर असलो तरी आपल्याला येऊ घातलेल्या आव्हानांना पेलण्यासाठी तयार करेल ह्यात शंका नाही. कुटुंबातला किंवा संस्थेतला प्रत्येक माणूस असा सकारात्मक , सशक्त आणि खंबीर असेल आणि अशा माणसा माणसांनी जोडून जर एखादं कार्य उभं राहात असेल तर काय बिशाद आहे सांगा बर संकटांची. येऊ दे किती संख्येने ती येताहेत त्यांना, आयुष्य थोडंच पायघड्या घालून येतंय? प्रत्येक परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी आपण स्वत:ला आणि सभोवतालाला तयार केलं पाहिजे हे महत्वाचं.

आणखी एक गोष्ट वीणा वर्ल्डमध्ये टूर मॅनेजर्सनी आणि कार्यालयातल्या प्रत्येक टीमने सर्वांनी मिळून राबवली किंवा राबवताहेत ती म्हणजे सर्वांनी एकत्रितपणे पुढे जायची मार्गक्रमणा करायची. ‘टुगेदर वुई ग्रो’ हाच ध्यास. ‘दुसर्‍याला पुढे जाताना बघून मला असूया वाटते’ की ‘मी आणखी प्रयत्न करीन आणि मलाही स्वत:ला आणखी पुढे नेईन’ ही माझी भावना आहे हे माझं मलाच तपासून पाहिलं पाहिजे. ‘तुझ्यातला वीकनेस माझ्या स्ट्रेंथने दूर होऊ शकतो आणि तुझी स्ट्रेंथ माझ्या वीकनेसवर मात करू शकते’ हे पेनिट्रेशन होतंय. ‘एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ’. ह्यामध्ये दुसर्‍याप्रती कृतार्थतेचा भाग आहे. मी एकटा फार पुढे जाऊ शकत नाही. मला पुढे यायला अनेकांनी हात दिलेयत आणि आता माझं काम आहे माझ्या मागच्यांना पुढे आणण्याचं ही जाणीव सर्वत्र दिसतेय आणि समाधान वाटतं. तसं बघायला गेलं तर बारीक नजर असते सर्वांवर ती एकाच दृष्टीकोनातून की आपल्या अखत्यारीतली माणसं जगाची आव्हानं पेलायला प्रथम चांगली माणसं बनली पाहिजेत, असली पाहिजेत. अ गूड ह्युमन बीइंग! अ‍ॅन्ड दॅट्स द रीझन वुई आर रेडी टू टेक ऑन द वर्ल्ड!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*