Travel Planner 2025
Travel Planner 2025
IndiaIndia
WorldWorld
Our Toll Free Numbers:

1800 313 5555

You can also call us on:

+91 22 2101 7979

+91 22 2101 6969

Foreign Nationals/NRIs travelling

Within India+91 915 200 4511

Outside India+91 887 997 2221

Business hours: 10AM - 7PM

Our Toll Free Numbers:

1800 313 5555

You can also call us on:

+91 22 2101 7979

+91 22 2101 6969

Foreign Nationals/NRIs travelling

Within India+91 915 200 4511

Outside India+91 887 997 2221

Business hours: 10AM - 7PM

Explore Topics, Tips & Stories

Balloon
Arrow
Arrow

जिंदगी ना मिलेगी दोबारा

9 mins. read

Published in the Sunday Maharashtra Times on 27 July 2025

...जर तुम्ही आकाशातून हा परिसर बघितलात तर तो बुध्दिबळाच्या पटासारखा दिसतो आणि म्हणूनच मला तो कायम मोहित करत आलाय. मात्र या रचनेमागे फक्त सौंदर्यदृष्टीच नाहीये, तर ...

अलीकडेच मी स्पेनमध्ये भटकंतीचा आनंद लुटला, तोही माझी पत्नी हेता आणि मुलगी राया हिच्याबरोबर. या सहलीत एकाच देशातल्या तीन शहरांमध्ये जे अफलातून अनुभव आम्ही घेतले त्यामुळे आमची ही फॅमिली टूर एकदम संस्मरणीय झाली. त्यात माद्रिदमध्ये आमचे यु.के.मधले मित्र आम्हाला जॉइन झाले, तर बार्सेलोनामध्ये थेट यु.एस. मधला मित्र शॉर्ट ब्रेक म्हणून आमच्याबरोबर जोडला गेला आणि आमच्या सहलीच्या शेवटच्या टप्प्यात इबित्सा बेटावर आम्ही वाय.पी.ओ. (यंग प्रेसिडेंट्स ऑर्गनायझेशन) कम्युनिटीसोबत एडव्हेंचर, खादाडी आणि मौजमजा याचा संगम अनुभवला. आम्ही या टूरमध्ये पर्यटकांसारखे न वागता स्थानिकांप्रमाणे त्या त्या शहरांची मजा लुटली आणि म्हणूनच तो अनुभव मला तुमच्याबरोबर शेअर करावासा वाटला. चला तर मग, माद्रिदपासून सुरूवात करूया.

माद्रिद:

स्पेनची राजधानी असलेल्या ‌‘माद्रिद‌’ शहराचं नाव उच्चारलं की कोणालाही पहिल्यांदा आठवण होते ती ‌‘रेआल माद्रिद‌’ या जगप्रसिध्द फुटबॉल क्लबचीच. त्यामुळे माद्रिदला जाणारे सगळे पर्यटक हमखास ‌‘सान्तिआगो बर्नब्यु स्टेडियम‌’ पाहतातच. पण यावेळी मी इतर पर्यटकांप्रमाणे इथे न जाता स्थानिकांप्रमाणे माद्रिदमध्ये भटकायचं ठरवलं आणि त्यामुळे मला आजपर्यंत न घडलेलं माद्रिदचं दर्शन झालं.

माद्रिद हे एक चिरतरुण शहर आहे. त्याचं मोहक रुप तुम्हाला सहजच आकर्षित करतं. या शहरात आम्ही सर्वात प्रथम गेलो ते ‌‘पार्क्यु डेल ब्युएन रेटिरो‌’ अर्थात ‌‘ एल रेटिरो पार्क‌’ मध्ये. हा विस्तीर्ण हिरवागार बगीचा कधीकाळी स्पेनच्या राजघराण्याच्या मालकीचा होता. आम्ही एक पूर्ण दिवस या पार्कचा आनंद घेतला. हिरव्यागार झाडांच्या सावलीतून मनमुराद भटकलो, तलावात रोईंग केलं, जणू माद्रिद शहराची संथ पण उत्साहवर्धक लय स्वतःत भिनवून घेतली. मला सगळ्यात जास्त काय आवडलं तर माद्रिदमध्ये प्रत्येक ठिकाणी लहान मुलांसाठी काही ना काही होतं. शहरातल्या चौकांमधल्या आखीवरेखीव खेळाच्या जागांपासून ते मोकळ्या हिरव्या मैदानांपर्यंत, त्यामुळे रायाला बागडायला, धावायला, खेळायला मैदानच मोकळं मिळालं. माद्रिदने हेच सांगितलं की मोठी शहरं फक्त भव्य नसतात तर छोट्यांसाठी ती खेळकरही असतात.

इथल्या स्थानिकांचा आवडता प्रकार म्हणजे एका तापास बारमधून दुसऱ्यात जाऊन पोटभर खादाडी करायची, मग आम्ही पण तेच केलं. माद्रिदमधले तापास म्हणजे जणू स्पेनच्या टेस्टी खाद्यसंस्कृतीची दालनंच. या तापासमध्ये मिळणाऱ्या छोट्या प्लेट्समधले चटकदार पदार्थ - लसणीच्या स्वादाचा ‌‘गॅम्बास अल अजिल्लो‌’ (प्रॉन्सचा पदार्थ) असो किंवा ‌‘पटाटास ब्रावाज‌’ (पोटॅटो वेजेसचा स्पॅनिश अवतार) असो, प्रत्येक पदार्थातून होणारी स्पेनच्या खाद्यपरंपरेची ओळख अतिशय चविष्ट असते. माद्रिदमध्ये असताना आमचा संध्याकाळचा कार्यक्रम  जिथे कमानींच्या खाली संगीतकार मधुर सुरावटी छेडत असतात, जिथल्या वातावरणात एक उल्हास भरुन राहिलेला असतो, अशा ‌‘प्लाझा मेयर‌’ मधून फेरफटका मारत इतिहासाच्या पानातून वर्तमानात उभ्या ठाकलेल्या ‌‘रॉयल पॅलेस‌’पर्यंत जाऊन माद्रिदच्या व्हाईब्जचा आनंद घेणं हाच होता.

मी वीणा वर्ल्डसाठी जो ‌‘नो द अननोन‌’ असा पॉडकास्ट करतो, त्याचाच भाग म्हणून सांगायचं तर या टूरवर माद्रिदची काही अनोखी वैशिष्ट्ये मला सापडली, एक म्हणजे समुद्रसपाटीपासून 667 मीटर्स उंचीवर (2188 फुटांवर) वसलेलं माद्रिद हे युरोपमधील सर्वात उंचावरचं राजधानीचं शहर आहे. म्हणूनच या शहरातली हवा स्वच्छ, ताजी आणि रिफ्रेशिंग आहे. याहून विस्मयकारक म्हणजे या शहरात एकूण अडीच लाख झाडे आहेत, म्हणजे लोकसंख्येपेक्षा जास्त! या हिरवाईमुळेच तर युरोप खंडातील सर्वात हिरव्यागार राजधानींच्या यादीत माद्रिदचा समावेश होतो. सर्वात इंटरेस्टिंग म्हणजे माद्रिदच्या रस्त्यांखाली इजिप्तमधलं एक पुरातन मंदिर दडलेलं आहे. 1968 मध्ये इजिप्तकडून भेट म्हणून हे 2200 वर्षं पुरातन मंदिर स्पेनला पाठवण्यात आलं. अतिशय काळजीपूर्वक या प्राचीन मंदिराचा दगड आणि दगड हलवून इथे प्लाझा दे एस्पानियामध्ये हे मंदिर पुन्हा उभारण्यात आलं. शेवटी सांगायचं तर माझ्यासाठी माद्रिद म्हणजे फक्त तिथली भव्य स्मारके नसून हेता आणि रायाबरोबर केलेली निर्हेतुक भटकंती आहे. हेच तर खरं माद्रिद आहे, भव्य तरीही आपलंसं वाटणारं, ऐतिहासिक तरीही ताजंतवानं.

बार्सेलोना:

माद्रिदची मोहमयी जादू अनुभवल्यानंतर आम्ही जिथे पोहोचलो त्या बार्सेलोना शहरात जणू आधीचीच सुरावट पुढे सुरू झाली, मात्र आता तिची पट्टी जरा उंचावलेली होती. त्यामुळे आमचा उत्साहही वाढला, कारण बार्सेलोना शहर हे काही शांत बसलेलं सुंदर शहर नाही तर हे शहर सतत बदलत असतं, नाचत-खेळत असतं, इथे नवीन काही घडत असतं आणि ते तुम्हाला या सगळ्यात ओढून घेतं.

इथे आम्ही शहराच्या मध्यभागी असलेल्या अत्यंत गजबजलेल्या, उत्साहाने भरलेल्या ‌‘एय शॅम्पला‌’च्या जवळ राहिलो. हा सगळा परिसर प्रसिध्द आहे तो इथल्या विस्तीर्ण झाडांनी आच्छादलेल्या रस्त्यांसाठी, या आखीवरेखीव रस्त्यांवर असलेल्या इमारतींच्या बाल्कनीज्‌‍  इतक्या रेखीव आहेत की त्या एखाद्या कोरलेल्या शिल्पाप्रमाणे दिसतात. जर तुम्ही आकाशातून हा परिसर बघितलात तर तो बुध्दिबळाच्या पटासारखा दिसतो आणि म्हणूनच मला तो कायम मोहित करत आलाय. मात्र या रचनेमागे फक्त सौंदर्यदृष्टीच नाहीये, तर 19 व्या शतकात दूरदृष्टीने केलेल्या नागरी नियोजनातून ही रचना निर्माण झाली आहे. वाढत्या शहराला स्वच्छ हवा, भरपूर प्रकाश आणि हिरवाईची कमी पडू नये हा उद्देश त्यामागे आहे. त्यामुळेच आजही बार्सेलोनाच्या कलात्मक पसाऱ्यातही या भागाची सुरचना डोळ्यात ठसते.

बार्सेलोनाच्या कलात्मक परंपरेबद्दल बोलायचं तर या शहराची भेट ‌‘आन्तोनी गाऊदी‌’ची जादुई रचना पाहिल्याशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. आधुनिक वास्तुकलेवर आपला ठसा उमटवणारा हा स्पॅनिश आर्किटेक्ट त्याच्या काहीशा स्वप्नील निर्मितीसाठी ओळखला जातो. निसर्गाची काव्यात्मक अभिव्यक्ती, श्रध्दा आणि कल्पनाशक्ती याच्या संयोगातून झालेली त्याची निर्मिती यामुळे ती साधी दगड-मातीची इमारत न राहता आपोआप एक देखणी कलाकृती बनते. आम्ही एक संध्याकाळ ‌‘सॅग्रादा फॅमिलिआ‌’ या गाऊदीच्या अद्वितीय कलाकृतीचा आनंद घेण्यात घालवली. ही वास्तू खरोखरच अद्भुत आहे, कारण 1882 पासून निर्माणाधीन असलेली ही वास्तू अजूनही पूर्ण झालेली नाही. या वास्तूचे उंचावलेले मनोरे आणि रंगवलेल्या काचांच्या खिडक्या बघत तुम्ही जेव्हा उभे असता, तेव्हा जाणवतं की तुम्ही फक्त एक चर्च बघत नाही आहात तर एका हळूवारपणे पूर्ण होणाऱ्या स्वप्नाची जादू अनुभवत आहात. तिथल्या प्रत्येक कमानीमधून, मोझाइक टाइल्समधून आणि रंगाच्या उधळणीतून गाऊदी जणू सांगत असतो की निसर्ग हाच सर्वश्रेष्ठ रचनाकार आहे.

बार्सेलोनामधील आणखी एक अजब जागा म्हणजे टेकडीवरचा ‌‘पार्क ग्युएल‌’. या उद्यानात पुन्हा एकदा गाऊदीच्या जगावेगळ्या कल्पनाशक्तीचं आणि काहीशा विचित्र प्रतिभाशक्तीचं दर्शन घडतं. इथले नागमोडी बेंचेस, जिंजरब्रेड घरं आणि उंचावरुन दिसणारा शहराचा विहंगम नजारा यामुळे आपण जणू एखाद्या पऱ्यांच्या राज्यात आल्याचा भास होतो. त्यात आमच्याबरोबर आमचा खास आम्हाला भेटण्यासाठी यु.एस. हून आलेला मित्र होता. मग काय, गाऊदीच्या जादुई राज्यात ‌‘जब मिले दोस्त दिवाने‌’ असा अनुभव आला.

बार्सेलोनाचं पुराण इथल्या बीचवर गेल्याशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. आम्हाला बार्सेलोनामध्ये समुद्राचा अफलातून नजारा बघत झकास सी फूडचा आस्वाद घेता येइल असं एक मस्त रेस्टॉरंट मिळालं. आमची ही सागरभेट फक्त तिथल्या चवदार पदार्थांमुळे संस्मरणीय ठरली असं नाही तर तिथे आम्ही जो एक सर्वात हळुवार आणि मौल्यवान क्षण अनुभवला त्यामुळे ती आमच्या मनावर कायमची कोरली गेली. तो क्षण होता आमच्या चिमुकल्या रायाने पहिल्यांदाच सागर किनाऱ्याची मजा अनुभवण्याचा. त्या ओल्या वाळूवर तिची लहान लहान पावलं उमटत होती आणि पायाला कुरवाळणाऱ्या लाटांमुळे तिच्या चेहऱ्यावर हास्याची फुलं  उमलत होती, तो क्षण आम्ही कधीच विसरू शकणार नाही. त्या क्षणी जाणवलं की चविष्ट पदार्थ, अप्रतिम नजारे याबरोबरच आपल्या जिवलगांबरोबरच्या अशा हळुवार क्षणांमध्येच तर पर्यटनाचा खरा आनंद सामावलेला असतो, जो आम्ही बार्सेलोनात पुरेपुर अनुभवला.

इबित्सा:

इबित्सा हे नाव ऐकल्याबरोबर अनेकांना फक्त एकच गोष्ट आठवते आणि ती म्हणजे ‌‘पार्टी‌’! जगातले सर्वात बेस्ट डीजे, सनसेट बीच क्लब्स आणि रात्रीचा दिवस करणारा धम्माल माहौल... पण ही इबित्साची एक बाजू झाली. इबित्साची ही रंगीतसंगीत बाजू मी पाहिली आहे, इथल्या एका सुप्रसिध्द क्लबमध्ये लिजंडरी डीजे डेव्हिड गेटाची कमाल अदाकारी अनुभवली होती. पण या वेळच्या भेटीत मी जणू वेगळ्या इबित्साला बघितलं, या इबित्साचा ऱ्हिदम वेगळाच होता, एकदम ठाय लयीतला, अधिक खोलवर जाणारा आणि माझ्या कल्पनेपेक्षा अधिक समाधान देणारा.

आम्ही इबित्सावर आलो होतो ते वाय.पी.ओ. (यंग प्रेसिडेन्ट्स ऑर्गनायझेशन) रिट्रीटसाठी. या बेटानं त्याच्या नैसर्गिक गुणवैशिष्ट्यांनी आमचं इतकं गोड स्वागत केलं की विचारू नका. एका सकाळी आम्ही या बेटावर जो फेरफटका मारला तो एखाद्या ट्रेझर हंटसारखा रोमांचक होता, मात्र इथला खजिना होता नैसर्गिक वैशिष्ट्यांचा. एका दणकट लँड रोव्हर डिफेंडरमधून आम्ही जणू साहसी सफरच केली. किनाऱ्यालगतच्या नागमोडी रस्त्यांवरुन, पांढऱ्याशुभ्र घरांच्या छोट्या छोट्या गावांमधून स्वैर भटकंती करताना आम्ही पाईनच्या गंधाने भरलेल्या टेकड्यांवर गेलो, गूढ वाटणाऱ्या घळींपाशी थांबलो, प्राचीन मिठागरं बघितली आणि निळ्या-हिरव्या समुद्राकडे नजर लावून बसलेलं एक जगापासून दूर असलेलं एकाकी लाइटहाऊसही पाहिलं.

इथल्या वास्तव्यातली सर्वात थरारक गोष्ट म्हणजे ‌‘क्लिफ जंपिंग‌’. मी रायाबरोबर पूलमध्ये खेळण्यात इतका रमलो की मी काही हा अनुभव घेतला नाही, पण तरीही वातावरणात त्याचा थरार होताच ना?

मी सगळ्यात जास्त मजा लुटली ती एका समवयीन ग्रुपबरोबर केलेल्या यॉट सफारीत. आम्ही किनाऱ्यालगतच्या एका शांत, निवांत जागी जाऊन तिथे स्नोर्केलिंग केलं, समुद्रात बुड्या मारल्या, जेट स्कीज चालवलं आणि जलक्रीडेचा पूर्ण आनंद लुटला. आमच्यासाठी ती इबित्सामधली एक परफेक्ट दुपार होती, समुद्र-सूर्यप्रकाश आणि सोबत्यांसह जीवनाचा आनंद भरभरून देणारी.

इबित्साच्या रसदार पाककलेनं आम्हाला तृप्त केलं. तिथल्या ओल्ड टाउनच्या जुन्या, दगडी फरशांनी मढवलेल्या गल्लीत ‌‘मिशेलीन स्टार‌’ने मानांकित झालेल्या एका रेस्टॉरंटमध्ये आम्ही सुग्रास भोजनाचा आस्वाद घेतला. तिथलं वातावरण अतिशय जिव्हाळ्याचं होतं आणि आम्ही जे स्थानिक पदार्थ खाल्ले ते एकदम अनोखे, चवदार आणि स्वादिष्ट होते. तडकभडक पार्ट्यांपेक्षा हे इबित्साचं शांत रुप काही वेगळंच होतं.

माद्रिद, बार्सेलोना आणि इबित्सा या तीन शहरांना दिलेली भेट म्हणजे निव्वळ पर्यटन नव्हतं, तर आम्ही जणू ज्यांचं अंतरंग एकच आहे अशा तीन भिन्न प्रवृत्तीच्या व्यक्तींना  भेटलो. स्पेन हे फक्त एक डेस्टिनेशन नाही तर उल्हास, आवेग, उत्स्फूर्तता यांचं एक कोलाज आहे. जर तुम्ही याआधी स्पेनला भेट दिली असेल तर परत नक्की जा, कारण प्रत्येक भेटीत तुम्हाला नवीन काहीतरी गवसेल. जर याआधी गेलाच नसाल तर आणखीच उशीर करू नका. इथे गेल्यावर तुम्ही कधी स्पेनच्या प्रेमात बुडालात हे तुम्हाला कळणारही नाही. आणि मग कदाचित आमच्याप्रमाणेच तुम्हीही स्पेनहून परत येताना बरोबर भरपूर रंजक कहाण्या आणि कृतज्ञतेनं भरलेलं मन घेऊन परत याल.

July 25, 2025

Author

Neil Patil
Neil Patil

Founder & Director, Veena World

More Blogs by Neil Patil

Please let me know your thoughts on this story by leaving a comment.

Post your Comment

Please let us know your thoughts on this story by leaving a comment.

Similar Romantic Blogs

Read all
insert similar tours here

Explore Topics, Tips & Stories

Balloon
Arrow
Arrow

Get in touch with us

Share your details for a call back and subscribe to our newsletter for travel inspiration.

+91

Listen to our Travel Stories

Most Commented

Veena World tour reviews

What are you waiting for? Chalo Bag Bharo Nikal Pado!

Scroll to Top