Published in the Saturday Lokasatta Chaturang on 26 July 2025
माराक्केश या मोरोक्कोमधल्या देखण्या शहरात आम्ही कधी पायी तर कधी घोडागाडीतून तर कधी बसमधून भ्रमंती करीत होतो. गाईड सोबत होता, त्यामुळे त्या भटकंतीला अर्थ मिळत होता. फ्रान्सने जवळजवळ चाळीस वर्षं मोरोक्कोवर सत्ता गाजवली. अर्थात त्यांनी अनेक सुधारणाही केल्या ह्या देशात आणि त्यामुळे फ्रेंच भाषेचा अंमल या संपूर्ण देशावर अगदी आजतागायत आहे. पण इथल्या गव्हर्नमेंटने एक ऐतिहासिक निर्णय घेतला. ह्या वर्षी म्हणजे 2025-26 या एज्युकेशनल इयरपासून संपूर्ण देश एज्युकेशन, ॲडमिनिस्ट्रेशन इत्यादींमधून फ्रेंचची उचलबांगडी करून इंग्लिश भाषेला महत्व देणार. जागतिकीकरणाच्या युगात ग्लोबल सिटिझन्स बनू पाहणाऱ्या तरुणाईला फ्रेंच भाषेच्या मर्यादेमुळे अडचणी येऊ शकतात हे त्यांना जाणवलं आणि इंग्लिश भाषेची व्याप्ती बघता भावी पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी इंग्लिशला आपलंसं करणं त्यांना शहाणपणाचं वाटलं. त्याची सुरुवात आत्ताआत्ताच तेथील शाळांपासून झाली. शंभर वर्षांपासून तळागाळापर्यंत पोहोचलेल्या फ्रेंच भाषेला डावलून इंग्लिश वरचढ करणं हे काम असं पटकन होणार नाही, पण एखादी गोष्ट करायची असेल तर कुठून तरी सुरुवात तर करायला पाहिजे आणि ती सुरुवात त्यांनी या वर्षी केली. हे भाषांतरण व्हायला वर्षं लागतील याची त्यांनाही कल्पना आहे आणि तेवढा पेशन्स ठेवण्याची त्यांची तयारीसुद्धा आहे. जगात पर्यटन करताना पावलापावलागणिक शिकायला मिळतं ते असं. खरंतर चालत होतं तसं चालू ठेवणं, डोक्याला ताप न करून घेणं हे शक्य होतं आणि फ्रेंच ही सुद्धा तशी जागतिक भाषा आहेच की, पण त्याहीपेक्षा वरचं-पुढचं असं जे काही मनुष्यप्राण्याला सतत हवं असतं ते मोरोक्को देशालाही हवं होतं आणि ते करायला त्यांनी सुरुवात केली. मुस्लिम देश, अरेबिक कल्चर पण तरुणाईच्या भविष्याचा विचार करून त्यांनी इंग्लिशला आपलंसं केलं. त्यांचं लॉजिक सिंपल, घरात आम्ही आमची मातृभाषाच बोलणार. आम्ही आमच्या भाषेचा मनापासून सन्मान करतो. मात्र व्यवहारासाठी आम्ही इंग्लिशला जवळ केलंय. कारण आमच्या जनरेशन्स जगाच्या तुलनेत मागे पडायला नकोत.
‘भाषा’ या विषयावर काहीही करताना खूप विचार करावा लागेल हे गेल्या महिन्यात उफाळून आलेल्या भाषा संघर्षाने आपल्या प्रत्येकाला जाणवलं. भाषेचं नातं माणसांच्या भावनांशी जोडलेलं आहे. ते केवळ अभ्यासक्रम किंवा प्रशासकीय असं मर्यादित नाही. तिथे मुद्दा आहे अस्मितेचा, प्रेमाचा आणि संस्कृतीचाही. अर्थात हा काही नवीन अनुभव नाही. आपल्या बहुभाषिक भारतात भाषेवरून राजकारण रंगताना आपण अनेकदा पाह्यलंय. पन्नास-साठ वर्षांपूर्वी तामिळनाडूमध्ये हिंदीविरोधात विद्यार्थ्यांनी प्राण दिले होते आणि तेव्हापासून भाषा सक्ती किंवा हिंदी सक्ती ही थोडीशी नकारात्मक गोष्ट झाली. खरंतर काही मैलांवर भाषा बदलणाऱ्या आपल्या देशात संविधानाने मंजूर केलेल्या बावीस अधिकृत भाषा आहेत. सातशे स्थानिक भाषा आहेत आणि एकूण बोलीभाषा किंवा मातृभाषा अठरा एकोणीस हजार आहेत. अशा बहुभाषिक देशात व्यवहारासाठी एक भाषा असणं सोयीचं. इंग्लिश आहे, पण ती सर्वांची भाषा आज तरी नाहीये. त्यामुळे तो मान हिंदीला आपसूकच मिळतो. म्हणजे आम्हाला पूर्वी मराठी ही मातृभाषा, हिंदी ही आपली राष्ट्रभाषा आणि इंग्लिश ही व्यवहाराची भाषा असंच शिकवलं गेलं. नंतर कळलं की हिंदी ही राष्ट्रभाषा नाहीये. म्हणजे तिला तसा दर्जा दिलेला नाही संविधानाने. ते काहीही असलं तरी हिंदी ही बहुतांश भारतीयांची सेंकड लँग्वेज बनलीय, स्वयंघोषित किंवा अघोषित. आणि ती तशीच व्यवस्थित राज्य करीत होती की जनमानसावर. पण तिला जेव्हा जेव्हा राज्यभाषेचा किंवा राष्ट्रभाषेचा दर्जा देण्याची सक्ती केली गेली, तेव्हा तेव्हा ही अदरवाईज स्वीकारलेली भाषा आपली ब्रँड व्हॅल्यू गमावून बसली.
खरं सांगायचं तर आमची पिढी नशीबवान. आम्ही घरात मराठी बोललो, शाळेत मराठीसोबत हिंदी शिकलो, त्यानंतर गरजेपुरती इंग्लिशशी दोस्ती केली. मराठी, हिंदी, इंग्लिश, बंगाली, मल्ल््याळम्, तमिळ अशा सर्व भाषांमधले सिनेमेही पाहिले. आमच्यासाठी भाषा हा कधी अडथळा नव्हताच. मुंबईत आल्यावर तर इथे सर्व भाषा गळ्यात गळे घालून आनंदाने नांदताना दिसल्या. भारतात हिंदी सिनेमेच चालतात हे सत्य नाकारता येत नाही. पण जेव्हा ‘सक्ती’ नावाचा प्रकार येतो तेव्हा ह्या शांतपणे नांदणाऱ्या भाषांमध्ये कटुता, तुच्छता, तिरस्कार ह्या गोष्टींचा शिरकाव होतो, जो नकोसा वाटतो. भाषा हे माणसामाणसांमधल्या संवादाचं माध्यम आहे. सुसंवादासाठी हीच भाषा चांगली किंवा तीच भाषा चांगली असं काहीही नाहीये माझ्यामते तरी. दर शनिवार रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या माझ्या लेखात आपल्या बोलीभाषेत विरघळून गेलेले इंग्लिश वा हिंदी शब्द आपसूक येतात. इलाज नसतो कारण जसं बोलते तसं लिहिते. अमुक एका इंग्लिश शब्दासाठी मराठी शब्दाचा शोध घ्यायला लागले तर लेखन प्रवासात आणि विचारात अडथळा येईल त्यामुळे तो प्रयोग करायचं मी टाळते. यावरुन मला बरीच पत्रं येतात, एकांनी तर लाखोलीच वाहिली आणि दम दिला, ‘जर तुम्ही इंग्लिश शब्द वापरायचे थांबवले नाहीत तर आम्ही लेख वाचणार नाही’. याच्या विरुद्ध एक पत्र असं होतं की, ‘तुम्ही लिहिलेलं वाचायला सोप्पं जातं, कारण त्यात कठीण मराठी शब्द नसतात’. असो, संवाद होणं महत्वाचं. पण सुसंवाद साधणारी भाषा जेव्हा ‘सक्ती’ खाली येते तेव्हा लागलीच विसंवादाचं रूप धारण करते आणि दुःख त्याचं होतं.
एक जुना सुविचार आठवला,‘if you love someone, set them free. If they come back, they are yours; if they don't, they never were yours’ प्रेमाबद्दलच्या या उक्तीचा अर्थ अगदी सोप्पा आहे. प्रेम खरं असेल तर ते स्वखुशीने परत येईल. आणि नाहीच आलं तर ते खरं प्रेम नव्हतंच मुळी. प्रेम जबरदस्तीने धरून ठेवता येत नाही. आता हा सुविचार भाषेलाही तेवढाच लागू होतो असं मला वाटतं.
भाषा म्हणजे जणू आपल्या मनातली अतिशय लाडकी छोटीशी मुलगी. जिला आपण जोपासतो, गोंजारतो, प्रेमाने वाढवतो, तिचा अभिमान बाळगतो. पण जर मी म्हटलं की ही माझी लाडकी इतरांनाही आवडलीच पाहिजे तर प्रॉब्लेम आहे. म्हणजे भाषा ही गोष्टच अशी आहे की ती इतरांवर लादताच कामा नये. एखादी भाषा आवडावी, त्याचा स्वीकार व्हावा असं जर वाटत असेल तर तो अगदी स्वाभाविकपणे आणि मनापासूनच झाला पाहिजे. आणि त्यासाठी वातावरण निर्मितीची गरज आहे. काय काय करता येईल आपल्या भारतातील ह्या अनंत भाषा वाचविण्यासाठी ह्याचा विचार करताना जाणवलं की याची सुरुवात शाळेपासून झाली पाहिजे. ‘वाचविण्यासाठी’ असं मी म्हणतेय कारण आपला भारत देश एकमेव असा देश असावा जिथे आपण मायबोलीत बोललं तर आपल्याला कमी लेखलं जातं. ‘फाडफाड इंग्लिश बोलणारा श्रेष्ठ आणि ज्याला इंग्लिश येत नाही तो कनिष्ठ.’ हा अलिखित नियम झालाय जणू. मराठी माध्यमात शिकलेल्या माझ्यासारख्या अनेकांना ह्या मानहानीला कधी ना कधी सामोरं जावं लागलंच असेल. असं इतरत्र कुठेही नाही, हे संपलं पाहिजे. सर्वांनी छातीठोकपणे मायबोली बोललीच पाहिजे. आम्ही घरात, ऑफिसमध्ये मराठीच बोलतो, अभिमानाने आणि सन्मानाने. तरीही भाषा मरताहेत हे कटू सत्य आहे. अनेक घरातल्या पुढच्या पिढ्या परदेशात स्थायिक होतात तेव्हा त्यांची मायबोली आईबाबांसोबतच संपते की. असो. आमच्या घरात आमच्या नातीला, रायाला, मी आणि सुधीरने मराठी शिकवायचं, नमिता आणि हितेन जांगला म्हणजे तिच्या नाना नानीने गुजराती शिकवायचं आणि त्याच भाषांमध्ये तिच्याशी बोलायचं हा दंडक आम्ही घालून घेतलाय. अशा तऱ्हेने आपल्या दोन भाषा तिसऱ्या पिढीकडे हस्तांतरित करण्याचं ठरवून आम्ही आमच्यापुरता हा प्रश्न सोडवलाय.
प्रत्येक घराने आपली मातृभाषा वाचविण्यासाठी किंवा माझ्या बाबतीत बोलायचं झालं तर माझी मायमराठी वाचविण्यासाठी मनापासून प्रयत्न करायचे. आणि फार काही नाही करावं लागत हो. आपण मराठीत मानाने आणि सन्मानाने बोलत राहिलो, लिहीत राहिलो तर भाषा वृद्धिंगत होत राहील, आपोआप. आत्ताच्या जगात मुलं फक्त शाळांमध्येच नाही तर चहुबाजूंनी शिकताहेत. अशावेळी राज्यस्तरीय किंवा देशाच्या पातळीवर प्रतिष्ठित स्पर्धा घेता येतील का? की जिथे ज्या मुलांना भारतातील जास्तीत जास्त भाषा येतील त्यांचा बहुमान केला जाईल. ही भाषा मोहीम भारतभर राबविली जाईल. दुसरा विचार असा की, लहान मुलांना एकमेकांच्या भाषा शिकण्यासाठी उद्युक्त करायचं. शाळांमध्ये किंवा सोसायटीज्मध्ये असे ग्रुप्स करायचे आणि वर्षाच्या शेवटी ॲन्युअल डे मध्ये त्यावर काही मजेशीर स्पर्धा वा नाट्य निर्माण करून त्यात जिंकणाऱ्यांना गौरवपूर्ण ट्रॉफी द्यायची.
ह्यामुळे आपल्या भाषेवर जसं आपलं प्रेम असतं, अभिमान असतो तो इतर भाषांबद्दलही उत्पन्न होईल. आपण अनेक जण नवीन भाषा शिकायला तयार नसतोच. आमचीच भाषा श्रेष्ठ म्हणत इतर भाषांकडे दुर्लक्ष करतो. मुलांकडे बघितलं तर कोरियन वा स्पॅनिश भाषेतली गाणी ते आनंदाने शिकतात, पण एखादी प्रादेशिक भाषा किंवा संस्कृत शिकायला सांगितलं तर नाकं मुरडतात. याचं कारण म्हणजे आवड. जिथे आवड आहे, त्या भाषेतले शब्द पटकन आत्मसात होतात. आपणही नाही का शाळेत संस्कृत शिकलो, पण ते पाठांतर असायचं. फक्त आणि फक्त पूर्ण मार्क्स मिळविण्यासाठीच ते आपल्याकडून केलं जायचं. आपण प्रेमाने ते कधी केलंच नाही त्यामुळे आता काही आठवतही नाही. भाषा शिकण्यासाठी मनात ओढ निर्माण होणं महत्वाचं.
माझ्या मते आपण भाषेबाबत स्पर्धा, भीती आणि अहंकार या भावना बाजूला ठेवायला हव्यात. मातृभाषेचा अभिमान अवश्य बाळगावा. तिचं रक्षण आणि संवर्धन हे आपलं कर्तव्य आहे आणि आपण ते पार पाडतोय. पण आपण भारतीय आहोत हे ही महत्त्वाचं, त्यामुळे इतर भारतीय भाषांबद्दलही आपल्या मनात आदर असावा. शक्य असल्यास किमान दोन-तीन भाषा तरी शिकण्याचा प्रयत्न करावा. आपलं व्यक्तिमत्त्व त्यामुळे निश्चितच उजळून निघेल. शेवटी भाषा ही ज्ञान संस्कृती आणि माणसं जोडण्याची गोष्ट आहे. ती दडपण्याची, सक्ती करण्याची वा भिंती उभ्या करण्याची बाब नाही. ज्याची इच्छा आहे किंवा गरज, तो ती भाषा शिकणारच आणि ज्याची इच्छा नाही त्याला अजिबात जबरदस्ती करू नये. तो बंड करून उठेल आणि त्यात ती भाषाही बदनाम होईल. हिंदीविषयी असंच झालं गेल्या महिन्यात. एकांनी मला मेल केला, दोन - तीन आठवड्यांपूर्वीच्या लेखात मी ‘हादसा’ असा हिंदी शब्द वापरला म्हणून. हे आधी असं कधी कुणाच्या मनातही आलं नसेल. त्यामुळे आपण सर्वांनीच हे लक्षात घेतलं पाहिजे की कोणत्याही भाषेला बंधनात न बांधता, सक्ती न करता मोकळं सोडूया. सेट इट फ्री! मग बघा, ती हळूवारपणे प्रत्येकाच्या ओठावर फुलेल आणि मनावर राज्य करेल.
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.