Published in the Sunday Sakal on 06 July 2025
बारा वर्षांपूर्वी जेव्हा वीणा वर्ल्ड सुरू झालं तेव्हा आम्ही प्रथम भारताचा दौरा केला. आमची भारत जोडो यात्रा होती ती जणू. त्यानंतर जगाच्या सफरीवर आम्ही कूच केलं. वीणा वर्ल्डच्या नव्या कोऱ्या दृष्टीकोनातून जग बघायचं होतं. माझी पहिली सफर होती युएसए ची पंधरा दिवसांची इस्ट टू वेस्ट टूर. शिल्पा मोरे जी आता वीणा वर्ल्डची जनरल मॅनेजर आहे ती पण होती सोबत आणि आमचा टूर मॅनेजर होता दिनेश बांदिवडेकर. टूर मॅनेजर म्हणून टूर करण्याचे आमचे दिवस संपले होते आणि गरजही नव्हती कारण आमच्यापेक्षा जास्त चांगल्या टूर्स करणाऱ्या टूर मॅनेजर्सची मोठी फौज जी निर्माण होत होती. गेल्या बारा वर्षांत आम्ही स्वत: भरपूर प्रवास केला वेगवेगळ्या नवनव्या टूर्स सेट करण्यासाठी, तसंच वीणा वर्ल्डच्या टूर्सबरोबरही प्रवास केला. कारण टूर्स कितीही चांगल्या तऱ्हेने आखल्या तरी त्याची अंमलबजावणी व्यवस्थित आपल्याला आणि पर्यटकांना हवी तशी होतेय की नाही हे पर्यटक म्हणून त्यांच्या दृष्टीकोनातून बघणं महत्वाचं आहे. यावर्षीही आम्ही वीणा वर्ल्डच्या काही टूर्सबरोबर जातोय. आता तर आम्ही सिनियर सिटीझन्स झाल्यामुळे आमचा टूर्सकडे बघण्याचा दृष्टीकोन बदललाय, त्यामुळे वीणा वर्ल्ड जास्त ‘अंडर ऑव्झर्वेशन’ आहे. असो, तर आम्ही त्या युएसए टूरची न्यूयॉर्कपासून सुरुवात केली. पहिलं साइटसीईंग होतं ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’. तिथे गेलं की कुणाच्याही ‘डोळ्यांचं पारणं फिटलं’ अशी गत होते. आम्ही सर्व सहप्रवासी एकमेकांचे फोटो काढण्यात मग्न होतो. मी एका ताईंना असंच जस्ट विचारलं, ‘काय कसं वाटतंय?’ तर त्यांना एकदम रडूच आलं. मला कळेचना काय झालं. ताईंजवळ बसले आणि विचारलं तर म्हणाल्या, ‘आयुष्यातली सर्वात मोठी इच्छा आज पूर्ण झाली. पैसे साठवले होते ह्यासाठी. आज विश्वास बसत नाहीये की मी खरंच स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या समोर उभी आहे. याजसाठी केला होता अट्टाहास’. आनंदाचे अश्रू होते आणि पूर्णतेचा अट्टाहास. माझ्या पर्यटन आयुष्यात 15 वर्षं मी टूर मॅनेजरशिप केली. टूरिस्ट म्हणून विदेशातल्या टूरिस्ट कंपन्यांबरोबर टूर्सही केल्या आणि ह्या सततच्या जगभ्रमंतीत, ‘याजसाठी केला होता अट्टाहास’ हे वाक्य मी अनेकदा कानांनी ऐकलंय आणि डोळ्यांनी बघितलंय. बऱ्याचदा मी अशावेळी ‘ऑब्झर्वेशन मोड’ मध्ये जाते. पर्यटक त्यांच्या त्या स्वप्नपूर्तीतल्या एखाद्या वर्ल्ड वंडरकडे बघत असतात आणि मी त्यांच्या नकळत त्यांच्या त्या आनंदाकडे बघत असते. नायगरा फॉल्स, आयफेल टॉवर, ताजमहाल बघताना लोकांच्या डोळ्यांतून असे आनंदाश्रू आपसूक ओघळताना मी पाहिलेत. जेव्हा अशा अनेक ठिकाणी मी पहिल्यांदा गेले किंवा अजूनही जाते तेव्हा माझीही अवस्था तशीच होऊन जायची, अगदी अजूनही होते. जगाच्या एखाद्या टोकावर गेल्यावर जो सुकून मिळतो तो केवळ अतुलनीय. आपलं केप कॅमोरिन, आफ्रिकेतलं केप ऑप गुड होप, ऑस्ट्रेलियातलं केप लिउविन, साऊथ अमेरिकेतलं चिली मधलं केप हॉर्न, पार्तुगालचं केप साग्रेस, नॉर्थ पोल कडे बघणारं नॉर्थ केप... अशी शहरं किंवा अनेक राहिलेले पॉईंट्स बघण्याची इच्छा मनात प्रबळ होते. माझा यापुढचा अट्टाहास हा कदाचित त्यासाठी असेल.
‘अट्टाहास’ चांगला की वाईट? अट्टाहास करावा की करू नये? संत तुकाराम महाराजांनी रचलेला आणि पंडित भीमसेन जोशींच्या आवाजातील ‘याजसाठी केला होता अट्टाहास। शेवटचा दिस गोड व्हावा॥’ हा अभंग तर स्वर्गसुखाचा आनंद देतो. पण तरीही घरात कार्यालयात मित्रमैत्रिणींमध्ये ‘आपण एखाद्या बाबतीत तुझा इतका अट्टाहास का?’ असं म्हणतो. बऱ्याचदा हटवादीपणाकडे घेऊन जाणारा हा शब्द वाटतो किंवा त्याचा वापर आपण ॲडॅमन्सी, स्टबर्ननेस दाखविण्यासाठी करतो. आता बघा नं, घरात आईवडिलांनी मुलामुलींना त्यांना काय करायचंय ते विचारात न घेता स्वत:च्या इच्छा त्यांच्या माथी मारल्या आणि त्याप्रमाणे मुलांना वागायला लावलं तर तो हटवाद झाला किंवा अट्टाहास, मला किंवा आम्हाला जसं हवंय तसं दुसऱ्यांनी करायला किंवा वागायला पाहिजे असा. म्हणजे जर मुलांना जे करायचंय, ज्यात त्यांना गती आहे, जे ते उत्कृष्टरित्या करू शकतात ते जाणून घेऊन त्यांच्या उत्कर्षासाठी घरातलं वातावरण पोषक केलं आणि मुलांनी जर अंतिमत: ती गोष्ट अचिव्ह केली, स्वप्न सत्यात उतरवलं, तर त्या स्वप्नपूर्तीच्या दिवशी आपण सर्वजण मिळून म्हणू, ‘याजसाठी केला होता अट्टाहास.’ शब्द तोच पण भावनेमध्ये जमीन अस्मानाचा फरक. अर्थात मुलांना जर दिशा कळत नसेल किंवा मिळत नसेल तर मग तिथे योग्य मार्ग दाखविण्यासाठी आईवडिलांनी अट्टाहास केला तर तो हवाहवासा अट्टाहास. व्यवसायात कार्यालयात हीच गोष्ट वेगळ्या अर्थाने पण दिसते. जो लीडर असतो, म्हणजे चांगला दूरदर्शी लीडर, त्याला कधीकधी व्हेटो वापरावा लागतो. कारण अंतिम रिझल्ट त्याला दिसत असतो वा माहीत असतो. मला स्टीव्ह जॉब्ज्ची आठवण झाली. प्रत्येक गोष्ट कशी असायला हवी किंवा ती तशीच असायला हवी यासाठी तो आग्रही असायचा किंवा त्याचा अट्टाहास इतक्या पराकोटीचा असायचा की त्याच्या स्टोरीज् आजही चघळल्या जातात. पण त्याचा तोच अट्टाहास अशी काही निर्मिती करून गेला की आजही कुणाला त्या क्रिएशनला शह देता येत नाहीये. डिटेलिंग, प्रिसिशन, डिझाइन, डिसेन्सी, एलिगन्स ह्याचं मोजमाप जणू ॲपलने घालून दिलंय. स्टीव्ह जॉब्जच्या अतिरेकी अट्टाहासाला मी कन्स्ट्रक्टिव्ह अट्टाहास म्हणेन, जो जरूरीचा असतो अनेक ठिकाणी. माणसं आणि ऑर्गनायझेझनप्रमाणे समाजही ॲडॅमंट किंवा अट्टाहासी असतो. पूर्वी नाही का लग्न झाल्यावर मुलींचं नाव बदलायची प्रथा होती. ती का होती हे मला अजूनही कळलं नाही. मला तर आडनाव पण बदलायचं नव्हतं, पण त्यावेळी सामजिक चौकट तेवढी मोकळीढाकळी झाली नव्हती. मग मी मनात प्रार्थना करायचे की मला पाटील आडनावाचाच पतीदेव मिळू दे. देव मनोमन केलेली प्रार्थना ऐकतो त्याप्रमाणे माझी इच्छा पूर्ण झाली आणि सुधीर पाटील मुळे मी सासर माहेरची पाटीलच राहिले. आता बरं झालंय, मुली मुलींचं नाव पुढे नेतात. लग्नानंतरही ते बदलत नाहीत. म्हणजे तो मुलींचा पूर्णपणे स्वत:चा प्रश्न आहे नाव बदलायचं की नाही ते. पूर्णपणे त्यांच्या मतावर, त्यावर कुणाची सक्ती नको. आतातर मुलांची नावं सुद्धा आई-वडील दोघांच्या आडनावाची झालीयत. आमच्या नातीच्या नावाचा प्रस्ताव आला तेव्हा मला तीस पस्तीस वर्षांपूर्वीची मी आठवले. मला सुद्धा हेच हवं होतं की. आता त्याला इक्वॅलिटी वा समानता ही कोंदणं मिळाली आहेत. पण प्रत्येक मुलीच्या मनातली इच्छा ‘माझं नाव आडनाव पुढे जावं’ ही असतेच, भले अजूनही ती खुलेआम ते बोलू शकत नसेल किंवा तिच्या मनात ती सुप्त इच्छा तशीच राहून जात असेल. बाबाचं नाव नाही आईचं नाव नाही आणि दोघांचीही आडनावं घेऊन आमची नात, ‘राया जांगला पाटील’ झाली. सेम सेम पॉवर डिस्ट्रिब्युशन. कायदेशीररित्या हे अलाऊड आहे की नाही ह्यासाठी मात्र मी आमचे सर्वेसर्वा ॲडव्होकेट संजय खेर ह्यांना फोन करून विचारलं होतं की कायद्याने ह्यात काही आडकाठी नाही नं? त्यांनी ग्रीन सिग्नल दिल्यावर नील आणि हेताच्या मनासारखं झालं, आम्हीही खूश झालो, आपल्या मुलांनी सामाजिक वहिवाटीला ‘असं का?’ हा प्रश्न केला आणि स्वत:साठी तो प्रश्न सोडवला. आणि जर का हा अट्टाहास असेल नील हेताचा तर तो मला सकारात्मक वाटला. मुलगा मुलगी, सासर माहेर मधला भेदभाव मिटवून टाकणारा दिसला आणि अशा गोष्टींमध्ये आपण पुढच्या पिढीला मनापासून पाठिंबा दिला पाहिजे. स्पेनमध्ये ती पद्धत ऑलरेडी आहे.
माणसं, संस्था, समाजानंतर येतो तो देश. देशसुद्धा कधीकधी अट्टाहासाची परिसीमा ओलांडतात आणि मग देशादेशांमधले ताणतणाव वाढायला लागतात. आत्ताही जगात छोटीमोठी युद्धं सुरूच आहेत. कुणाच्या तरी डिस्ट्रक्टीव्ह अट्टाहासाचाच तो परिणाम. लिहिता लिहिता मला देशांच्या अट्टाहासाचा एक मजेशीर किस्सा आठवला. अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इग्लंड सर्वत्र टॉयलेटमध्ये जेट स्प्रे का नसतो? हायजिनच्या-क्लीनलिनेसच्या गप्पा मारणारी ही लोकं ह्या बाबतीत एवढी मागसलेली का? एकीकडे ग्लोबल वॉर्मिंग वा निसर्गाचं संवर्धन ह्यावर मोठमोठी भाष्य करायची पण टॉयलेट पेपरपाठी खर्च होणारी निसर्गसंपदा दुलर्क्षित करायची. माझ्या सर्वसामान्य मनाला हा विरोधाभास नाही स्वीकारता येत. बरं तुम्ही जगात सर्वात पुढारलेले म्हणवून घेता मग जपानसारखे ऑटोमॅटिक बिडे वापरा. मिडल ईस्ट मध्ये आणि भारतात जेट स्प्रे सर्रास वापरला जातो. आणि तो सर्वात चांगला सोपा स्वच्छ प्रकार आहे. जेट स्प्रे जन्माला यायच्या आधी लोकांनी अनेक मजेशीर उपाय शोधले होते, पण आता ह्या जेट स्प्रे ने सर्वच प्रश्न सोडवले. गेली 30-35 वर्षं हे जेट स्प्रे प्रकरण आपल्या देशात प्रचलित आहे, पण पाश्चिमात्य देशांना त्याचं अनुकरण करावसं वाटलं नाही. इथे मला ॲडॅमन्सी किंवा त्यांचा टोकाचा अट्टाहास वाटतो. वाटतं की स्वत:ला सर्वज्ञ मानणारे हे देश पूर्वेकडच्या देशाकडून चांगल्या गोष्टी घ्यायला कमीपणा मानत असावेत. आजही तिथे निर्माण होणाऱ्या नवीन घरामध्ये जेट स्प्रे प्रोव्हिजन नाहीये. त्यांचा टॉयलेट पेपर आणि त्याचा अट्टाहास त्यांनाच लखलाभ.
आजचं लिखाण हे मुक्तचिंतनाच्या अंगाने गेलं. घरातल्या किंवा मित्रमंडळींमधल्या गप्पांसारखी माझ्या लिखाणाची दिशा बदलत गेली खरी, पण मी लेखिका नसल्याने लेखनाचे नियम पाळण्याचं बंधन मला थोडीच आहे? एक मात्र खरं की सकारात्मक किंवा नकारात्मक, कन्स्ट्रक्टिव्ह किंवा डिस्ट्रक्टिव्ह ह्यापैकी आपण कोणत्या अट्टाहासाकडे झुकतो हे आपण सतत चेक करत राहिलं पाहिजे.
नागालँड
द लँड ऑफ फेस्टिव्हल्स
नॉर्थ इस्टमधील उंच टेकड्या आणि पर्वतांमध्ये वसलेले नागालँड राज्य हे भारतातील सर्वात लहान राज्यांपैकी एक आहे. जवळपास संपूर्ण नागालँड डोंगराळ असून ते भारताचे अनधिकृत रॉक कॅपिटल आहे. इथे आपल्याला संस्कृती आणि परंपरांचे वैविध्यपूर्ण मिश्रण पहायला मिळते. पारंपारिक नागा धर्म हा सर्वशक्तिमान मानला जातो. राज्यात 20 पेक्षा जास्त प्रमुख नागा जमाती आहेत. त्यांच्या प्रत्येकाच्या स्वतःच्या विशिष्ट परंपरा, चालीरीती आणि भाषा आहेत. नागालँडमध्ये भाषिक वैविध्य आहे. नागा ही इथली मुख्य भाषा आहे. याशिवाय विविध नागा जमातींमध्ये प्रामुख्याने नागामी, ही आसामी आणि नागा बोलींभाषांचे मिश्रण असलेली भाषा बोलली जाते. नागालँडमध्ये महिलांना मानाचे स्थान दिले गेले आहे.
डिसेंबरमध्ये आयोजित होणारा हॉर्नबिल फेस्टिव्हल नागालँडची सांस्कृतिक विविधता प्रदर्शित करतो तर मोआत्सु फेस्टिव्हल मे महिन्यामध्ये तीन दिवस साजरा केला जातो. नागालँडमध्ये संगीत महोत्सव आणि हॉर्नबिल रॉक स्पर्धा देखील आयोजित केली जाते. नागालँडमधील गंमतीशीर गोष्ट म्हणजे इथल्या लोंगवा गावच्या ग्रामप्रमुखाच्या घराचा अर्धा भाग भारतात आणि अर्धा भाग म्यानमारमध्ये आहे. त्यामुळे पर्यटक या घरात दोन देशांत दोन पाय ठेवून उभे राहू शकतात, आणि एकाच वेळी ड्युअल सिटीझनशिपचा आनंद घेऊ शकतात.
नागालँड राज्य जगातील सर्वात हॉटेस्ट चिली पेपरचे, भूत जोलोकियाचे जन्मस्थान आहे. इथल्या महिला आणि पुरुषांच्या पारंपारिक पोषाखात शाल महत्त्वपूर्ण आहे. या विणलेल्या शाली नागा विणकरांच्या कौशल्य आणि कलात्मकतेचे प्रदर्शन घडवतात. हे राज्य पर्यटकांमध्ये लोकप्रिय असलेल्या बांबू उत्पादने आणि पारंपारिक कापडांसह हस्तकलेच्या वस्तूंचेही प्रमुख उत्पादक आहे. नागा नृत्य हा नृत्यप्रकार आणि ताती हा संगीतप्रकार हे पारंपारिक कलाप्रकारही राज्यात लोकप्रिय आहेत. हे राज्य मांसाहारी खाद्यपदार्थांसाठी ओळखले जाते, ज्यामध्ये बैल आणि डुकराचे मांस स्थानिक आणि पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहे. नागालँडमध्ये स्मोक्ड मीट, नागा चिली चिकन, फरमेंटेड बांबू शूट्स, बांबू फ्राय या नागा पाककृती प्रसिद्ध आहेत. शिवाय हे राज्य स्थानिक मसाल्यांच्या वापरासाठी ओळखले जाते. राईस बियर ज्याला झुथो, झुत्से किंवा रुही म्हटलं जातं ते इथलं पारंपारिक पेय आहे.
दुसऱ्या महायुद्धाच्या वेळच्या कोहिमाच्या लढाईत नागालँड हे एक महत्त्वाचे ठिकाण होते. या नाट्यमय प्रकरणाचे वर्णन करणारी कोहिमा युद्ध स्मशानभूमी, द्वितीय विश्वयुद्धात मरण पावलेल्या सैनिकांचे स्मारक यासह अनेक युद्धस्मारके आणि संग्रहालये या राज्यात आहेत. असं हे प्रसिद्ध नागालँड तुमच्या बकेट लिस्ट मध्ये आहे की नाही?
अरेच्चा! हे मला माहीतच नव्हतं...
व्हेनेशियन मकाओ हे आशियातील सर्वात मोठे तर गेमिंग फ्लोअर एरियाच्या बाबतीत जगातील दुसऱ्या क्रमांकाचे कॅसिनो रिसॉर्ट आहे. हे पंचतारांकित रिसॉर्ट इटालियन-थीम बेस्ड आहे. व्हेनिसमधल्या गंडोला राईड्स, सेंट मार्क्स स्क्वेअर आणि रियाल्टो ब्रिज अशा ठिकाणांच्या वास्तुशिल्पीय प्रतिकृती आपल्याला इथे पहायला मिळतात. मुख्य रस्त्यावरून ही व्हेनेशियन इमारत अतिशय देखणी दिसते. व्हेनेशियन मकाऊ हे इटलीतील व्हेनिस वॉटरसिटीसारखे दिसते. या हॉटेलभोवती मॅनमेड लेक आहे. आशियतल्या या एकमेव ठिकाणी सर्वोत्तम लक्झरी सुट्स, जागतिक दर्जाचे शॉपिंग, सनसनाटी मनोरंजन आणि आकर्षक जेवण एकाच छताखाली मिळत असल्यामुळे कोणत्याही कारणासाठी गेस्ट्सना बाहेर पडण्याची गरजच पडत नाही. हे व्हेनेशियन हॉटेल, गॅम्बलिंग व्यतिरिक्त इथल्या कॉन्सर्टस्, थिएटर्ससाठीही प्रसिद्ध आहे. या विशाल कॉम्प्लेक्समध्ये पर्यटकांना प्रवास करण्यास मदत करण्यासाठी इनडोअर स्कायट्रेन सिस्टम म्हणजेच ऑटोमॅटिक पीपल मूव्हर सिस्टम आहे. इथल्या व्हीआयपी गेमिंगच्या विशेष हाय रोलर रूम्स संपूर्ण आशियातील उच्चभ्रू गॅम्बलर्सना आकर्षित करतात. व्हेनेशियन मकाऊ आंतरराष्ट्रीय फॅशन शो, कॉन्सर्ट आणि चॅरिटी इव्हेंट्स आयोजित करते. इथे तुम्ही गंडोला राईड्स, पूलसाईड कॅबानासह आउटडोअर पूल्स, फिटनेस सेंटर, स्पा, बुटीक, मिनी गोल्फ आणि किड्स झोनचा आनंद घेऊ शकता. इथल्या रेस्टॉरंट्समध्ये इटालियन इंडियन कॅन्टोनीज एशियन आणि पोर्तुगीज पाककृतींचा आस्वाद घेऊ शकता. इथल्या फूड कोर्टमध्ये स्ट्रीट-फूड स्टाईल शॉपफ्रंट्स आहेत. अनेक लाउंज, कॉकटेल बार्सदेखील आहेत. रिलॅक्सेशन एरियामध्ये स्विमिंग पूल्स, जकूझी, आलिशान स्पा आणि फिटनेस सेंटर ही आहे. इथे इटालियन व्हेनेशियन सौंदर्यशास्त्र, आशियाई आदरातिथ्य आणि स्थानिक संस्कृतीच्या प्रभावाचे अनोखे मिश्रण पहायला मिळते. अनेक चित्रपट आणि आंतरराष्ट्रीय जाहिरातींमध्ये हे चित्रीकरण स्थळ म्हणून वापरले आहे. मकाऊच्या अर्थव्यवस्थेत आणि रोजगारात हे कॅसिनो रिसॉर्ट महत्त्वाची भूमिका बजावते. अशा गॅम्बलर्सना आकर्षित करणाऱ्या, पर्यटकांना सर्वांगसुंदर अनुभव देणाऱ्या कॅसिनो रिसॉर्टला तुम्ही कधी जाताय?
अनुभवसंपन्न करणारा प्रवास !
मी रवींद्र बापट आणि माझी पत्नी माधुरी बापट. आम्ही 2014 पासून वीणा वर्ल्ड सोबत टूर्स करत आहोत. आम्ही पुण्यात राहतो. सिंहगड रोडवरच्या सवारी टूर्स’ या वीणा वर्ल्डच्या सेल्स पार्टनरमार्फत आम्ही आमच्या टूर्स बूक करतो. योग्य त्या सीजनमध्ये योग्य ते ठिकाण आणि आर्थिक नियोजनात ते बसणं हे दोन क्रायटेरियाज् बघून आम्ही आमच्या टूर्स प्लॅन करतो. आम्हाला दोघांनाही प्रवास करायला आवडतो. आम्ही दोघांनी वीणा वर्ल्ड सोबत आजवर भारतात आणि परदेशात साधारण 20 टूर्स केल्या आहेत. मी आणि माझी पत्नी आम्ही काही कारणामुळे बऱ्याचदा वेगवेगळे टूरवर जातो. आमची दोघांची पहिली टूर होती 2014 साली केलेली सिंगापूर मलेशिया टूर. त्यानंतर आम्ही 2015 मध्ये युरोपियन वंडर ही टूर केली. आम्ही आजवर परदेशातल्या युरोप, स्पेन, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रेलिया, पोर्तुगाल, ऑस्ट्रिया स्विस, केनिया, तुर्कस्तान, बाली, दुबई आणि अगदी अलीकडे म्हणजे मे महिन्यात व्हिएतनाम अशा टूर्स केल्या आहेत, तर भारतातल्या आसाम मेघालय अरुणाचल, बंगलोर म्हैसूर, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, लेह लडाख या टूर्स केल्या आहेत. वीणा वर्ल्ड सोबत प्रवास करण्याचं मुख्य कारण म्हणजे व्हिसा प्रोसेस वगैरे अगदी व्यवस्थित पार पडते. शिवाय आता इतक्या वर्षात आमचं त्यांचं ट्यूनिंग छान जमलं आहे. माझ्या पत्नीला स्वित्झर्लंड खूप आवडलं होतं. त्यामुळे यंदा ती पुन्हा एकदा स्वित्झर्लंडला गेली. मला टर्की फार आवडलं. शिवाय केनियात केलेली जंगल सफारी लक्षात राहण्यासारखी होती. ऑस्ट्रेलियामध्ये केलेली बलून सफारी देखील वेगळा अनुभव म्हणून लक्षात राहिली. प्रत्येक टूरमध्ये संस्मरणीय असे अनेक क्षण असतात. वीणा वर्ल्डचे सगळे टूर मॅनेजर्स ए वन आहेत. इतक्या टूर्सवर जाऊन आलेल्या त्यांचे अनुभवकथन ऐकायला मजा येते. इतके दिवस कुटुंबापासून लांब राहणं त्यांच्यासाठीही कठीण असेल. पण सगळे मॅनेज करतात आणि ते ही हसतमुखाने. हॅट्स ऑफ टू देम. प्रत्येक टूर कायम लक्षात राहतील असे असंख्य क्षण देऊन आम्हालाही अनुभवसंपन्न करून जाते.
प्रायव्हेट हॉलिडे आयडियाज्
व्हिएतनाम विथ फु क्वॉक -
वीणा वर्ल्ड कस्टमाईज्ड हॉलिडेज् सोबत
सध्या जगभरात ट्रेंडिंग हॉलिडे डेस्टिनेशन्सच्या यादीत व्हिएतनाम आपलं स्थान पक्कं करतंय. कधी काळी युद्धासाठी ओळखला जाणारा हा देश, आज आपल्या विविधतेने, सौंदर्याने आणि आतिथ्याने साऱ्या जगभरातून पर्यटकांना खुणावतोय. या व्हिएतनाममध्ये तुम्हाला स्वतःचा खास, निवांत आणि हटके हॉलिडे प्लॅन करायचा असेल, तर वीणा वर्ल्ड कस्टमाईज्ड हॉलिडेज् घेऊन आलंय खास आठ दिवसांचं प्रायव्हेट पॅकेज फक्त तुमच्यासाठी!
ह्या हॉलिडेची सुरुवात होते हॅनोई शहरापासून. इथलं ऐतिहासिक ओल्ड क्वार्टर, होआन कीएम लेक अतिशय सुंदर आहे. तिथल्या पवित्र्ा मंदिरांमधून चालताना तुम्ही शहराच्या आत्म्याशी एकरूप होता. पुढे होई आनचे कंदिलांनी उजळलेले रस्ते आणि शांत निळसर वातावरण पाहून एकदम जादूई वाटतं. यानंतर तुमचं स्वागत करतो हॅलॉन्ग बे, निसर्गाचा अद्भुत चमत्कार. इथे खास ओव्हरनाईट क्रूझ आणि त्यावरून दिसणारा सूर्योदय म्हणजे खरंच आयुष्यभर लक्षात राहावा असा अनुभव असतो. हॉलिडेमध्ये पुढे आहे बा ना हिल्स. इथला प्रसिद्ध गोल्डन हॅन्ड्स ब्रिज आणि डोंगरात फिरणारी सुंदर केबल कार. इथून दिसणारी दृश्यं पाहून तुमच्या डोळ्याचं पारणं फिटतं. वीणा वर्ल्डच्या ह्या हॉलिडेचं सर्वात मोठं हायलाइट म्हणजे यात समाविष्ट असलेलं फु क्वॉक आयलंड. ह्या ट्रॉपिकल आयलंडवर तुम्ही आशियात असून चक्क युरोपचा फील घेऊ शकता. तुम्हाला माहितीय, फु क्वॉक आयलंड वर जगातली सर्वात लांब सी केबल कार राईड आहे आणि व्हिएतनाम मधील सर्वात मोठा सफारी पार्क देखील इथेच आहे! ह्या सोबतच तुम्ही इथे थ्रिल्लिंग आयलंड हॉपिंग आणि स्नॉर्केलिंग ॲडव्हेंचरचा आनंद घेऊ शकता. सोबत फुल्ल ऑन धम्माल करण्यासाठी विन वंडर्स थीम पार्क आहेच. इथे तुम्ही सुंदर बीचेसवर राहून खऱ्या अर्थाने एक रिलॅक्स्ड हॉलिडे घेऊ शकता.
85 हेक्टरवर पसरलेला ग्रँड वर्ल्ड फु क्वॉक म्हणजे लाईव्ह शोज, कॅनाल्स, शॉपिंग आणि इंस्टावर्थी क्षणांनी भरलेलं युरोपसारखं स्वप्न. हे सगळं सोप्या व्हिसा प्रोसेससह फक्त ₹1,00,000 मध्ये वीणा वर्ल्ड कस्टमाईज्ड हॉलिडेज्कडे उपलब्ध आहे! कपल्स असाल, ग्रुप असाल किंवा फॅमिली, आजच बुक करा. कारण ही बेस्ट प्राइस फार काळ टिकणार नाही!
रनिंग ऑफ द बुल्स
रनिंग ऑफ द बुल्स' म्हटलं की आपल्याला आठवतो तो ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ चित्रपटातील लास्ट सीन. हा फेस्टिव्हल साहसी प्रवासाच्या शोधात असणाऱ्या जगभरातील हजारो पर्यटकांना आकर्षित करतो. ज्या फेस्टिव्हलच्या अंतर्गत हा इव्हेंट होतो तो सॅन फर्मिन फेस्टिव्हल हा एक आगळावेगळा स्पॅनिश उत्सव आहे. याचं मूळ सापडतं ते 14 व्या शतकात. सेंट फर्मिन यांच्या सन्मानार्थ त्या काळी हा फेस्टिव्हल साजरा केला जात असे. आता 'रनिंग ऑफ द बुल्स' इव्हेंट 6 ते 14 जुलै दरम्यान स्पेनमधील नॅव्हरे इथल्या पॅम्पलोना इथे आयोजित केला जातो. या इव्हेंटमध्ये सहभागी झालेले लोक लाल स्कार्फसह पांढरे कपडे घालून शहरातील रस्त्यांवरून बैलांच्या पुढे धावतात. अर्थातच हा साहसी इव्हेंट धोकादायकही आहे. पण तरीही याबद्दल अनेकांना आकर्षण वाटतं. इथे येणाऱ्या देशी-विदेशी पर्यटकांमुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळते. या कार्यक्रमाच्या अंतर्गत विविध धार्मिक परंपरांचं दर्शन घडतं. या दरम्यान परेड, संगीत, नृत्य आणि बुल फायटिंग सारख्या स्थानिक सांस्कृतिक गोष्टी आपण पाहू शकतो. तुम्हालाही जर हा इव्हेंट पहायचा असेल तर स्पेनला या काळात नक्की भेट द्या.
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.