Published in the Sunday Sakal on 10 August 2025
गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात सेल्स पार्टनर्स मीट होती. आता बऱ्याचश्या मीटिंग्ज झूम आणि टीम्स या प्लॅटफॉर्मस् वरूनच होतात. थँक्यू यांच्या निर्मात्यांना. अडीच वर्षांपूर्वी युएसए मध्ये ‘झूम’ हेडक्वार्टर्सच्या बिल्डिंगबाहेर गाडी थांबवून उतरले आणि त्या वास्तूला मनापासून नमस्कार केला. कोविडच्या दोन वर्षांत आपल्याला एकमेकांशी संपर्कात ठेवण्यात ‘झूम’ देवासारखं धावून आलं होतं. तसं म्हटंल तर आम्ही हा असा वेडेपणा करतो. म्हणजे मी आणि सुनिला गाडी हायर करून ॲपल गुगल कॅम्पसना भेट देतो किंवा प्रदक्षिणा घालून परत येतो. कॅलिफोर्नियाच्या क्युपरटिनोमध्ये असलेल्या ॲपलच्या हेडक्वार्टर्सच्या शो रूममध्ये जाऊन त्या युएसए टूरची आठवण म्हणून नवीन काहीतरी, अर्थातच गरजेचं विकत घेतो. भले या कंपन्या पूर्णपणे कमर्शियल असतील, ‘दे मीन बिझनेस!’ अशा असतील, पण त्यांनी आपलं आयुष्य इतकं सोप्पं करून टाकलंय की मला ही आधुनिक तीर्थक्षेत्रं वाटतात आणि मग त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आम्ही त्यांचं दर्शन घेतो. असो.
आमच्या या सेल्स पार्टनर्स मीटमध्ये ज्यांना कुणाला यायचंय ती मंडळी येतात आणि व्हर्च्युअल मीटिंग्जचा डिटॉक्स घेतल्याप्रमाणे आम्ही तीन चार तास एकमेकांशी प्रत्यक्ष संवाद साधतो. अशा या प्रत्यक्ष संवादांच्या संधी कमी मिळत असल्याने त्यात एक अप्रूप असतं. त्यांचे प्रश्न आणि आमची उत्तरं असा सर्वसाधारण अजेंडा असतो. एका अर्थाने या ‘नो अजेंडा’ मीटिंग्जच असतात. ‘प्रत्यक्ष एकमेकांना भेटूया, बोलूया आणि मग काही प्रश्न असतीलच तर ते सोडवूया’ एवढीच अपेक्षा असते. हा संवाद सुरू असताना एका पार्टनरने म्हटलं की, ‘आपण ट्रेनने टूर्स का करीत नाही?’ आम्ही काही म्हणायच्या आत दुसऱ्याचं म्हणणं, ‘नाही नाही हल्ली कुणीही ट्रेनने जायला बघत नाही. एवढा वेळ कुणाकडे आहे?’ बऱ्याच जणांनी ‘हो खरंय ते’ म्हणत मान डोलवली. तेवढ्यात एक आवाज आला, ‘अरे पण तुम्ही ’वंदे भारत’ ट्रेनने गेलाय का कधी? काय मस्त ट्रेन्स आहेत. नीट, क्लीन, हायस्पीड, ऑटोमेटेड डोअर्स, फायर सेन्सर्स, सीसीटीव्ही कॅमेरा, वायफाय फॅसिलिटी, बॅटरी बॅक अप, जीपीएस असा मस्त सरंजाम असलेल्या या ट्रेन्स खरंच खूप छान आहेत.’ आणि मग सुरू झाला वंदे भारत ट्रेन्सवर संवाद. प्रत्येक जण या ट्रेन्सबद्दल आपलं मत नोंदवत होतं.
सगळ्यात महत्वाची गोष्ट मला जाणवली ती म्हणजे या वंदे भारत ट्रेन्सच्या प्रति सर्वांच्या मनात असलेला अभिमान. म्हणजे इथे कालचक्र उलटं फिरताना दिसलं. एक जमाना होता जेव्हा आम्ही आणि पर्यटक फक्त ट्रेनने प्रवास करायचो. नंतर ट्रेन किंवा विमान असा पर्याय उपलब्ध झाला. पण व्हायचं काय की ट्रेनने येणारा पर्यटक आणि विमानाने येणारा यांच्यात भेदभाव दिसायचा पर्यटकांमध्येच. म्हणजे ट्रेनने येणाऱ्या पर्यटकांमध्येही ते असायचं, जो सेकंड क्लासमध्ये असायचा तो खालचा आणि जो एसीत असायचा तो वरचा. तेच मग विमानाच्या बाबतीत झालं. जो ट्रेनमध्ये एसीत असायचा तो खालचा झाला आणि जो विमानाने यायचा तो वरचा. पूर्वी जेव्हा ट्रेन आणि विमानाने आलेले पर्यटक एकाच टूरमध्ये असायचे तेव्हा विमानाने आलेल्यांपैकी काही पर्यटक एअरलाइनचा टॅग पर्सला वा बॅगेला तसाच ठेवायचे कारण इतरांना कळावं की ते विमानाने आलेत. हळूहळू वेळ महत्वाचा झाला आणि विमानप्रवास आयुष्याची एक महत्वाची गरज बनला. ट्रेनचा प्रवास आम्हीही विसरलो आणि पर्यटकही. ट्रेनने जाणं वेळखाऊ होतंच, पण स्वच्छता, भोजन या बाबतीतही मध्यम वर्गाने एअरपोर्ट्स आणि तिथल्या फॅसिलिटीज्ना आपलंसं केलं. अर्थात राजधानी एक्सप्रेस, शताब्दी एक्सप्रेस, तेजस एक्सप्रेस, गतिमान, दुरांतो अशा छान छान ट्रेन्सनी लोकांच्या मनातला रेल्वेप्रतीचा आदर जिवंत ठेवला होता आणि आता वंदे भारतने तर कमालच करून दाखवली. लोकांचा रेल्वेवरचा विश्वास वाढला, नव्हे, रेल्वेने जाणं त्यांना अभिमानाचं वाटायला लागलं. घराघरात, मित्रमैत्रिणींमध्ये वंदे भारतवर चर्चा होऊ लागली. ‘वंदे भारतचा प्रवास’ एक ॲस्पिरेशन बनला आणि लोक रेल्वेकडे वळले. रेल्वेने फिरताना वाटणारा कमीपणा कमी झाला. परदेशी कसं, ट्रेन विमान यात भेदभाव नसतो. एका जागेहून दुसऱ्या जागी जाताना ‘सुटेबल मोड ऑफ ट्रान्सपोर्ट‘ इतकंच त्याकडे पाहिलं जातं. हे कमीपणाचं, ते मोठेपणाचं हा विचार नसतो आणि तसंच असलं पाहिजे. ते या वंदे भारत एक्सप्रेसच्या बाबतीत होताना दिसतंय. ‘मी ट्रेनने चाललोय, मी वंदे भारत ने चाललोय, मी तेजस एक्सप्रेस बुक केलीय फॅमिलीसाठी’ हे घडतंय. रेल्वेचा प्रवास हा पुन्हा एकदा स्टेटस सिम्बॉल बनायला लागलाय. थँक्यू टू श्री सुंधाशू मणी आणि त्यांची टीम ज्यांनी ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत ही ट्रेन प्रत्यक्षात आणली. आपल्या माननीय पंतप्रधानांनी सतत ‘आत्मनिर्भर भारत’ द्वारे या प्रकल्पाला प्रोत्साहन दिलं आणि आज 144 वंदे भारत एक्सप्रेस भारतात आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाताहेत आणि अशा पाचशे ट्रेन्स बनविण्याचा त्यांचा मानस आहे. यामध्ये आता स्लीपर ट्रेन्सही येणार आहेत. महत्वाचा मुद्दा हा आहे की वंदे भारतने प्रवाशांना पुन्हा रेल्वेकडे खेचलं. भारतीयांना रेल्वेची ओढ लावली. रेल्वेविषयी त्यांच्या मनात अभिमान जागृत केला.
एखाद्या गोष्टीची ओढ वाटणं, ओढ लागणं ही परिस्थिती निर्माण करता येऊ शकते. सिच्युएशन्स कॅन बी टर्न्ड अराऊंड, हे आपल्याला वंदे भारत ट्रेनने दाखवून दिलं. ’अरे यार ह्या वेळी मला बोअरिंग रेल्वेने जावं लागणार आहे’ या ऐवजी, ‘अरे तुला माहितीय मी वंदे भारतने जाणार आहे. काय मस्त ट्रेन आहे. टू गूड एक्स्पीरियन्स, मला हल्ली विमानापेक्षा रेल्वेच बरी वाटते’ हा बदल घडविण्याची क्षमता आपल्याच देशाने, आपल्याच माणसांनी दाखवून दिली. ‘आय हॅव टू’ वरून ’आय वॉन्ट टू’ कडे आपल्याला वळवलं.
सेल्स पार्टनर्सच्या मीटिंगने मला विचारात पाडलं. या एका ट्रेनने परिस्थिती बदलली, मनःस्थिती बदलली. ओढ निर्माण केली. आपल्या घरच्या बाबतीत मी विचार करायला लागले. मला घराची ओढ वाटते का? वर्षातले सहा महिने मी महाराष्ट्राबाहेर किंवा देशाबाहेर असते. मला परदेशातच रहायला आवडतं की आपल्या घरी यायची ओढ असते? आणि जर मला जाणवलं की मला बाहेर फिरायलाच बरं वाटंत, घरी यायची ओढ वाटत नाही तर मला जागं व्हावं लागेल, शोधून काढावं लागेल काय कारण आहे की मला माझ्या घराची ओढ वाटत नाही? घर अस्वच्छ आहे म्हणून? घर भांडणाचं आगार आहे म्हणून? घरातली माणसं माझं ऐकत नाहीत म्हणून? फक्त स्वत:लाच नाही तर माझ्या घरच्या माणसांना घरी यायची ओढ वाटते की नाही हे पण चेक करायला हवं. आणि मग सगळ्यांनी मिळून प्रयत्न करून रेल्वेसारखी सिच्युएशन बदलली पाहिजे. घराची ओढ असलीच पाहिजे असं मला वाटतं. आमच्या घरी असलेल्या, आम्हाला सांभाळणाऱ्या वर्षा आणि श्रुतीला त्यांच्या इंडक्शनमध्ये सांगितलंय की, “तुम्हाला एकच लक्षात ठेवायचंय की हे एकच घर आहे आपलं आणि ते ‘घर एक मंदिर’ सारखं आपण जपलं पाहिजे, ठेवलं पाहिजे.”
जे घराचं तेच शाळेचं. इथेही आपल्याला चेक करायचंय की शाळेत जायची ओढ आपल्या मुलांना आहे की नाही? त्यांना शाळा आवडते का? रोज शाळेत जायला मुलांना तितकाच उत्साह वाटतो का? आणि इथे शाळांनी जास्त करून ती ओढ लागण्यासाठी काम केलं पाहिजे. मुलं शाळेत जायला कंटाळा करीत असतील तर शाळेने आत्मपरिक्षण केलं पाहिजे. असं काहीतरी करायला हवं जेणेकरून मुलांना शाळेची ओढ वाटायला हवी. मुलांनी आनंदाने शाळेत गेलं पाहिजे आणि शाळा संपल्यावर त्यांना घरीही यावंसं वाटलं पाहिजे.
रोज सकाळी ऑफिसला जायची ओढ असणं आणि संध्याकाळी घरी यायची ओढ असणं हे असेल तर आपण आपलं करियर, आपलं घर, आणि आपलं आयुष्य चांगल्या तऱ्हेने मार्गी लावलंय असं म्हणता येईल. आणि या गोष्टी अशा आपोआप होत नाहीत. त्यासाठी विचारपूर्वक काम करावं लागतं. म्हणतात नं, आयुष्य अडथळ्यांची शर्यत आहे, मग ते अडथळे मस्तपैकी सोडविण्याची आपली तयारी असली पाहिजे.
आमच्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये आम्ही फॉलो करीत असलेल्या दहा कमांडमेंट्स लिहिल्या आहेत, त्यात एक आहे ‘ॲम आय पॉप्युलर ॲन्ड डाऊन टू अर्थ?’ आपण स्वत:च आपल्याला चेक केलं पाहिजे सतत. ऑर्गनायझेशनमध्ये अनेक लीडर्स असतात आणि ऑर्गनायझेशन चालविताना आपलं लक्ष पाहिजे या सर्व लीडर्सकडे. लीडर्ससोबत रहायची, लीडरशी बोलायची ओढ त्यांच्या टीम मेंबर्सना वाटते का? हे बघितलं पाहिजे. लीडरच्या सक्सेस मंत्रातील अनेक गोष्टींपैकी ही एक गोष्ट, जी त्या लीडरनेही सतत चेक केली पाहिजे. थोडक्यात स्वत:ला आत्मपरिक्षणाची सवय लावली पाहिजे.
आपल्याला घराची ओढ, मुलांना शाळेची ओढ, तरूणांना करियरची ओढ, प्रत्येकालाच कामाची ओढ... या सगळ्यांमध्ये टॉपला आहे ते आपल्याला आपल्या देशाची ओढ असणं, देशाप्रति प्रेम असणं. छान देश निर्माण करण्याची जबाबदारी मोठ्या प्रमाणावर राजकारण्यांची आहे पण आपल्या सगळ्यांनी मिळून हा देश बनला आहे, तेव्हा आपण प्रत्येकाने एक चांगला/ली नागरिक बनण्याची जबाबदारी पार पाडायचीय. बराच ‘ब्रेन ड्रेन’ ऑलरेडी झाला आहे. आता तरी जागं होऊया. आपल्या स्वत:पासून, घरापासून सुरुवात करूया. आपलं कर्तव्य चांगल्या तऱ्हेने पार पाडूया आणि खऱ्या अर्थाने आपल्या सुजलाम सुफलाम भारताची ओढ आपल्या पुढच्या पिढीला असेल यासाठी योगदान देऊया. फक्त भारतीयांनाच नव्हे, तर फॉरिनर्सना देखील आपल्या भारतात यायची ओढ वाटायला हवी असं काम आपल्याकडून झालं पाहिजे आणि ते आपलं लक्ष्य असलं पाहिजे.
देखो अपना देश!
अराकू
निसर्गाचा हिरवा कॅनव्हास
आजच्या धावपळीच्या जगात कधीकधी असं वाटतं नं की जरा थांबावं, खोल श्वास घ्यावा आणि अशा ठिकाणी जावं जिथे निसर्ग प्रत्येक श्वासात सामावलेला आहे. अशा वेळी एखादी जागा हवी असते जी फक्त डोळ्यांनी नाही, तर मनाच्या तळातून अनुभवता यावी. जिथं काळ गोठून रहावा, मन शांत व्हावं आणि आपल्या आतल्या आवाजाला एक निवांत जागा मिळावी. अशी जागा शोधायला परदेशातच जायची गरज नाही, बरं का ? आपल्या भारतातही अशी अनेक ठिकाणं आहेत आणि त्यातलीच एक जागा म्हणजे आंध्र प्रदेशातील अराकू व्हॅली. विशाखापट्टणमपासून अवघ्या 120 किलोमीटरवर असलेली ही जागा म्हणजे हिरव्यागार डोंगरांच्या आणि धुक्याच्या कुशीतली गावं.
ही अराकू व्हॅली आपल्याला बोरा लेण्यांचा नैसर्गिक चमत्कार दाखवते, कटिकी वॉटरफॉलचा नाद ऐकवते, आदिवासी संग्रहालयातल्या कहाण्या सांगते, आणि सेंद्रिय कॉफीच्या वासात मिसळलेल्या लोकजीवनाच्या समृद्धतेचा अनुभव देते. इथल्या गोंड आणि कोया जमातींचं हस्तकौशल्य, त्यांनी हातमागावर विणलेली वस्त्रं आणि त्यांच्या संस्कृतीचं होणारं दर्शन आपल्याला जणू एका वेगळ्याच जगात घेऊन जातं. हे सगळं पाहताना आपण नकळत त्या संस्कृतीचा एक भाग होतो. ‘अराकू कॉफी’ ही आज आंतरराष्ट्रीय ब्रँड झाली आहे. तिला मिळालेले आंतरराष्ट्रीय सन्मान, आणि त्यातून स्थानिकांचा वाढलेला आत्मसन्मान हे इथलं खरं वैभव..
या प्रवासाचा दुसरा रंग आहे वायझॅग म्हणजेच विशाखापट्टणम. अराकू व्हॅलीच्या कुशीत वसलेलं आधुनिक, सुसज्ज शहर. समुद्राच्या सान्निध्यातलं, लाटांशी बोलणारं हे शहर म्हणजे पूर्व भारताचं एक वेगळंच दर्शन. रामकृष्ण बीच, ऋषिकोंडा बीच, INS कुरसुरा सबमरीन म्युझियम, आणि ईस्टर्न नेव्हल कमांड यामुळे हे शहर केवळ पर्यटनस्थळ न राहता भारताच्या सामरिक व सांस्कृतिक वैभवाचं प्रतीक बनतं. इथलं सिंहाचलम मंदिर, कनक महालक्ष्मी मंदिर, वायझॅगचं सी फूड, आंध्र पद्धतीचं पारंपरिक जेवण, आणि उत्सवांचं रंगीत रूप यामुळे वायझॅग आपल्या मनात घर करतं.
2024 मध्ये 51,000 आंतरराष्ट्रीय पर्यटकांनी या भागाला भेट दिली, यावरूनच कळतं की भारताच्या नकाशावर अराकू आणि वायझॅग किती खास आहेत. तुमचं पुढचं प्रवासाचं स्वप्न काय असेल माहीत नाही, पण या हिरव्या कॅनव्हासवर एकदा तरी स्वतःचे रंग भरायलाच हवेत. कारण अशा जागा आपण फक्त डोळ्यांनीच पाहत नाही, तर मनाच्या खोल पातळीवर अनुभवतो.
अरेच्चा! हे मला माहीतच नव्हतं...
ड्रॅक्युला हे नाव ऐकलं तरी नॉस्टॅल्जिक व्हायला होतं. लहानपणी वाचलेल्या गोष्टी आठवतात. धुक्याने वेढलेला डोंगर, त्यावर उभा गूढ किल्ला, कुठून तरी उमटणारा कुजबुजण्याचा आवाज आणि रक्तपिपासू ड्रॅक्युला... झर्रकन अंगावर शहारा यायचा! पण तुम्हाला हे माहीत आहे का? हा किल्ला ही केवळ गोष्ट नसून तो आजही अस्तित्वात आहे. याचं नाव आहे ‘ब्रान कॅसल’. रोमानियातल्या ट्रान्सिल्व्हानिया आणि वलाकिया यांच्या सीमेवर उभा असलेला हा किल्ला. या गोथिक शैलीतल्या प्रचंड दगडी कॅसलचं बांधकाम 1377 मध्ये सुरू झालं. डोंगराच्या टोकावर उभा असलेला हा कॅसल म्हणजे एक जिवंत इतिहास. जाड भिंती, अरुंद वळणदार जिने, गुप्त दरवाजे हे सगळं पाहताना वाटतं की आपण एखाद्या रहस्यमय चित्रपटाचा भाग आहोत. या कॅसलमध्ये 60 पेक्षा जास्त खोल्या आहेत. त्यात राजघराण्याची खास दालनं, जेवणाचे हॉल्स, संगीत सभागृह, आणि सेवकांची विश्रांतीगृहं आहेत. यातलं खास आकर्षण म्हणजे, ड्रॅक्युला थीमवर आधारित रोमांचक प्रदर्शनं, जी पाहताना कधी भीती वाटते, तर कधी मजा!
किल्ल्याच्या आसपासचं कार्पेथियन पर्वतरांगांचं अप्रतिम सौंदर्य, लोकल मार्केट्स, हँडमेड सोव्हिनिअर्स आणि येथील खास कॅफे संस्कृती पर्यटकांना आकर्षित करते. ब्रान कॅसल बांधण्यात आला तो सीमेच्या रक्षणासाठी. ऑटोमन साम्राज्याच्या आक्रमणांपासून ट्रान्सिल्व्हानियाचं संरक्षण करणं हे त्याचं मुख्य काम होतं. पुढे 1920 मध्ये, ट्रान्सिल्व्हानिया रोमानियाचा भाग बनल्यानंतर, हा कॅसल रोमानियाच्या क्वीन मॅरी यांना भेट म्हणून दिला गेला. आज ब्रान कॅसलमध्ये वर्षभर ड्रॅक्युला थीमवर आधारित गाईडेड टूर्स, नाईट टूर्स, आणि हॅलोविन इव्हेंट्स भरवले जातात. 2023 मध्ये तब्बल 10 लाखांहून अधिक पर्यटकांनी या कॅसलला भेट दिली. जर तुम्हालाही इतिहासात रमायला आवडत असेल, रहस्य आणि थ्रिलची ओढ असेल, तुमच्या मनात अजूनही गोष्टी ऐकायची उत्सुकता असेल तर ‘ब्रान कॅसल’ हा तुमच्यासाठीच आहे. चला तर मग, कथांमधून थेट वास्तवात या आणि वीणा वर्ल्डसोबत रोमानिया बल्गेरिया सर्बिया नॉर्थ मॅसिडोनिया या टूरवर जाऊन अनुभवा ‘ब्रान कॅसल’ मधील ड्रॅक्युलाचं अद्भुत वास्तव!
वीणा वर्ल्ड सिनियर्स स्पेशल
माझं नाव रोशन कारेकर. मी गोव्याला राहते. वयाच्या 72व्या वर्षीही माझं प्रवासी मन अगदी ताजं टवटवीत आहे. 2019 साली मी पहिल्यांदा वीणा वर्ल्डसोबत वुमन्स स्पेशल शिमला कुलू मनाली टूर केली आणि त्यानंतर ‘प्रवास’ हा माझ्या जीवनाचा स्थायीभाव झाला. लॉकडाऊनचा दोन वर्षांचा अपवाद वगळता, मी या पाच वर्षांत 16 टूर्स केल्या आहेत, त्यात 9 भारतातल्या होत्या तर 7 परदेशातल्या! गेल्या वर्षी मला US व्हिसा मिळाला आणि आज, आत्ता मी स्वतःचं स्वप्न पूर्ण करत ‘वीणा वर्ल्ड’सोबत अमेरिकेच्या 15 दिवसांच्या टूरवर आहे. ही माझी 17 वी टूर आहे. भारतात मी आजवर लडाख, सिक्कीम दार्जिलिंग गंगटोक, सारनाथ वाराणसी, आसाम मेघालय, भुवनेश्वर पुरी कोणार्क चिलिका, पॉन्डिचेरी महाबलीपुरम्ा, राजस्थान मारवाड आणि काश्मीर या ठिकाणांना भेट दिली आहे. तर परदेशात मी ऑस्ट्रेलिया, जपान, टर्की, क्रोएशिया स्लोव्हेनिया स्लोव्हाकिया हंगेरी, व्हिएतनाम, इंग्लंड स्कॉटलंड आयर्लंड आणि स्कॅन्डिनेव्हिया या सुंदर देशांना भेट दिली आहे.
मला ऑस्ट्रेलिया देश सगळ्यात जास्त आवडला. कारण हा देश फक्त सुंदरच नाही, तर प्रचंड स्वच्छ, नीटनेटका आणि अतिशय शिस्तबद्ध आहे. दुसरा अविस्मरणीय अनुभव होता काश्मीरचा, तोही खास ट्युलिप सीझनमध्ये घेतलेला! सुरुवातीला मी फक्त वुमन्स स्पेशल टूर्स करत होते. पण अनुभव वाढत गेला, तसं त्या टूर्समध्ये झालेल्या मैत्रिणींसोबत मी ग्रुप टूर्सही करायला लागले. पेपर्समध्ये जाहिरात दिसली, एखादं ठिकाण क्लिक झालं की मी लगेच बुकिंग करते. माझी तिन्ही मुलं सेटल्ा आहेत. त्यामुळे आता माझा पूर्ण वेळ मी माझ्या मनाप्रमाणे जगते! वीणा वर्ल्डच का? तर त्यांचं हॉटेल्सचं सिल्ोक्शन, शांत, मदतीला तत्पर असलेले टूर मॅनेजर्स आणि सुटसुटीत नियोजन. सध्या माझ्या बकेट लिस्टमध्ये आहेत स्पेन, पोर्तुगाल आणि इजिप्त. वर्षभरात माझ्या तीन-चार टूर्स तरी होतातच. एक टूर संपली की लगेच पुढचं स्वप्न डोकावू लागतं. कारण, प्रवास हीच माझी नशा आहे. ही नशा एकदा चढली की ती कधीच उतरत नाही. आणि वीणा वर्ल्ड आहे नं माझं हे ट्रॅव्हल पॅशन जगवायला!
माय प्रायव्हेट हॉलिडे!
माय चॉइस, माय पेस, माय बजेट, माय फॅमिली टाईम!
‘वीणा वर्ल्ड कस्टमाईज्ड हॉलिडेज्‘ सोबत न्यूझीलंड.
कधी वाटतं का, की एकदा तरी असा प्रवास व्हावा जिथं प्रत्येक दिवस नवीन दृश्य, नवीन गंध, नवीन थरार घेऊन यावा? जिथं ग्लेशियर्सपासून गीझर्सपर्यंत, बीचेसपासून वाईन यार्ड्सपर्यंत, आणि हॉट वॉटर स्प्रिंग्सपासून बर्फाच्छादित पर्वतांपर्यंत सारं काही एका प्रवासात अनुभवता यावं? 'द ग्रेट न्यूझीलंड ट्रेन जर्नीज्' हा अशाच अनुभवांचा महोत्सव आहे. वीणा वर्ल्डने डिझाईन केलेला हा 15 दिवसांचा कस्टमाईज्ड हॉलिडे तुमच्या मनात कायमचा घर करून राहतो. या हॉलिडेमध्ये आपण आठ शहरं फिरतो. याची सुरुवात होते ऑकलंडपासून. पुढे जाताना ही टूर तुम्हाला रोटोरुआच्या हॉट वॉटर गीझर्सचा आणि माओरी संस्कृतीचा अनुभव देते. फिल्मी दुनियेतील हॉबिटन मूव्ही सेटमधलं जादूचं जग पाहून तुम्हाला स्वप्नात असल्यासारखं वाटतं. पुढे या प्रवासात वेलिंग्टनमधली कलात्मकता, ब्लेनहिममधल्या वाईनरीज्, क्राइस्टचर्चचं सौंदर्य याचा तुम्ही आस्वाद घेता. फ्रांझ जोसेफ ग्लेशियरचा व्ह्यू तुम्ही ट्रेनमधून पाहता आणि शेवटी ॲडव्हेंचर कॅपिटल ऑफ वर्ल्ड असलेल्या क्वीन्सटाऊन मध्ये बंजी जंपिंग, स्काय डायव्हिंग, जेट बोटिंग अशा साहसी गोष्टींमधला थरार अनुभवता. कैकोरामध्ये तुम्हाला व्हेल वॉचिंग करण्याची संधी मिळू शकते. मिल्फर्ड साऊंडची शांत क्रूझ तुमच्या मनात कायमचं घर करते आणि लेक तेकापोच्या निळ्या पाण्याचा स्पर्श विसरणं तर केवळ अशक्य! या हॉलिडेचा प्राण म्हणजे तीन आयकॉनिक ट्रेन जर्नीज््ा. नॉर्दर्न एक्सप्लोरर या ट्रेनने तुम्ही वॉल्कॅनोज् आणि नॅशनल पार्क दरम्यानचा अद्भुत प्रवास करता. कोस्टल पॅसिफिक ही कैकोराच्या किनाऱ्यावरून जाणारी ट्रेन म्हणजे निळ्या सागराचा शांत नाद अनुभवण्याची संधी. तर ट्रान्स अल्पाईन ट्रेनमधून आपण सदर्न आल्प्स ते वेस्ट कोस्ट पर्यंतचा प्रवास करतो. हा ट्रेन जर्नी म्हणजे प्रवास नव्हे, तर एक चालता बोलता सिनेमा आहे, ज्या सिनेमाचा दिग्दर्शक निसर्ग आहे, आणि तुम्ही त्यातले प्रमुख नायक नायिका! 15 दिवसांचा हा खास हॉलिडे म्हणजेच ‘द ग्रेट न्यूझीलंड ट्रेन जर्नीज्’ वीणा वर्ल्डने तुमच्यासाठी आणला आहे अगदी अफोर्डेबल किंमतीमध्ये. तेव्हा वाट कसली बघताय? आजच वीणा वर्ल्ड कस्टमाईज्ड हॉलिडेज् टीमशी कॉन्टॅक्ट करून स्वप्नातला हा प्रवास प्रत्यक्षात करा! आणि हो, उशीर करू नका नाहीतर ट्रेन मिस होईल.
अराऊंड द वर्ल्ड
स्टाईल! स्पीड! सायन्स!
कल्पना करा- जोरात गर्जणारा इंजिनाचा आवाज, ताशी 370 किलोमीटरच्या वेगाने वळणं घेणारी रेसिंग कार, अन् एका सेकंदात घेतला जाणारा असा निर्णय जो विजय किंवा पराभव ठरवणार आहे! अगदी हेच आहे फॉर्म्युला वन, जगातील सर्वात वेगवान आणि अत्याधुनिक मोटरस्पोर्ट. वेग, तंत्रज्ञान आणि थरार यांचं अद्वितीय मिश्रण! दरवर्षी जगभरात 24 हाय-ऑक्टेन रेसेस घेतल्या जातात, ज्या युरोपपासून अमेरिकेपर्यंत, सौदी अरेबियापासून जपानपर्यंत विविध ट्रॅक्सवर होतात. मर्सिडीज, रेड बुल, मॅकलॅरेन, फेरारी अशा टीम्स आपापल्या अत्याधुनिक कार्स, सर्वोत्तम ड्रायव्हर्स आणि इंजिनियर्ससह मैदानात उतरतात. ड्रायव्हरचं हेल्मेट, कारचं एरोडायनॅमिक डिझाईन, आणि दोन सेकंदात होणारा टायर चेंज आपल्याला दाखवतो विज्ञानाचा अद्भुत चमत्कार! एफ वन आता सस्टेनेबिलिटीकडेही वाटचाल करत आहे. 2030 पर्यंत ‘नेट कार्बन झिरो’चा संकल्प, सस्टेनेबल फ्युएल, आणि स्मार्ट इनोव्हेशन्समुळे एफ वन भविष्यकाळाची दिशाही दाखवत आहे. भारतात तरुण वर्गात एफ वन ची लोकप्रियता वाढतेय. तुम्हीही अनुभवू शकता जगातली ही सगळ्यात वेगवान रेस-फॉर्म्युला वन !
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.