Published in the Sunday Tarun Bharat on 10 August 2025
...एखाद्या गावातल्या चौकात सुरू असलेल्या नृत्यांमध्ये आपसूक सहभागी होतो तो क्षण, अंगाईचे शब्द आपल्याला कळत नाहीत पण त्या भावना आपल्याही हृदयापर्यंत पोहोचतात तो क्षण...असे क्षण आपली ट्रिप संस्मरणीय करतात...
अमूर्त या शब्दाचं मला कायम आकर्षण वाटत आलं आहे. ‘वर्णन करण्यास कठीण, समजून घेण्यास अवघड आणि मोजमाप अशक्य पण तरीही जिचं अस्तित्व आहे अशी भावना म्हणजे अमूर्त’ असा या शब्दाचा शब्दकोशातील अर्थ. काहीसं अव्यक्त आणि तरीही काव्यात्मक असं काही. जिला स्पर्श करता येत नाही, जी साठवून ठेवता येत नाही अशी ही भावना. ती आपल्याला जाणवते, प्रतिसाद देते आणि स्मरणातही राहते. जेवणाच्या वेळी टेबलवर झालेला हास्यस्फोट, पारंपरिक वाद्याचा ताल, रणरणत्या उन्हात आईस्क्रीम खाल्ल्यावर मिळणारा आनंद, मातीच्या भांड्यातल्या औषधी वनस्पतीचा गंध, पहाटेच्या वेळी ऐकलेला मंत्रोच्चार... या सगळ्यात ती भावना आहे. ती बाटलीत बंद करू शकत नाही, फोटोत फ्रेमबद्ध करू शकत नाही की नकाशावर टाचून ठेवू शकत नाही. तरीही, प्रवास संपल्यावर पुढे बराच काळ ती भावना आपल्यामनात रेंगाळत राहते.
उझबेकिस्तानने आयोजित केलेल्या टुरिझमशी निगडित कार्यक्रमात मी सहभागी झाले होते. इतिहास, संस्कृती आणि पाहुणचार यासाठी उझबेकिस्तानची ख्याती आहे. त्यांनी त्यांच्या देशातील सर्व पर्यटनस्थळांची अभिमानाने मांडणी केलेली होती. त्यात माझं लक्ष एका माहितीकडे गेलं... ‘युनेस्को’च्या अमूर्त सांस्कृतिक वारशांच्या यादीतील 14 गोष्टी उझबेकिस्तानमध्ये होत्या. त्यात मला रस होताच, पण ‘युनेस्कोची अमूर्त सांस्कृतिक वारशांची यादी’ म्हणजे नेमकं काय याबद्दल माझ्या मनात कुतूहल निर्माण झालं.
‘युनेस्को’ची जागतिक वारसा ठिकाणं आपल्याला माहिती आहेत. भारतातील ताजमहाल, चीनची भिंत, पेरूमधील माचू पिचू, रोममधील कोलोसियम ही या यादीतील काही ठिकाणं आहेत, जिथे आपण सेल्फी काढतो, त्याबदद्ल जाणून घेतो, आपल्या पासपोर्टवर त्या देशांचे शिक्के उमटलेले आपल्याला आवडतात.
पण अमूर्त वारसा? हे अनुभवण्यासाठी आपण सर्वसाधारणपणे काही नियोजन करत नाही. तो प्रवासादरम्यान नकळतपणे घेतलेला अनुभव असतो. अमूर्त सांस्कृतिक वारसा म्हणजे त्या समुदायाच्या जगण्याची आपण घेतलेली प्रत्यक्ष अनुभूती, त्या संस्कृतीचं हृदय. वेगवेगळ्या प्रथा, परंपरा, ज्ञान, कौशल्य यांच्या एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे चालत आलेल्या वारशाबद्दलचा हा अनुभव. तो वारसा संग्रहालयात ठेवून त्याचं प्रदर्शन मांडता येत नाही. व्हिएतनाममध्ये आपल्या कानावर पडलेली अंगाई, गुजरातमधील गरब्यात पायाने धरलेला ठेका, उझबेकिस्तानमधील खेड्यात रंगलेल्या काव्यात्मक गप्पा... असे हे जिवंत अनुभव असतात. सन 2003 पासून युनेस्कोने या परंपराही अधिकृतपणे नोंदवण्यास सुरुवात केली. जगातील मानवप्राण्याच्या जडणघडणीचा या परंपरा अत्यावश्यक भाग आहेत, म्हणून ही नोंद घेणं सुरू झालं. थोडक्यात, हा वारसा आपल्याला त्या ठिकाणाची पुरेपूर अनुभूती देतो. संस्कृतीचा हा भाग छायाचित्रात बंदिस्त करता येत नसला तरी तो अनुभव आपण सोबत घेऊन येतो.
जगभरात अशा अनेक गोष्टी आहेत. सन 2024 पर्यंत युनेस्कोने अधिकृतपणे अशा प्रकारच्या सुमारे 600 अमूर्त सांस्कृतिक परंपरांची नोंद घेतलेली आहे. प्राचीन नृत्यशैली असेल तर त्याची पद्धत, मांडणी, सादरीकरण, पोशाख या सगळ्यांची नोंद त्यात असते. पण अमूर्त सांस्कृतिक वारसा जिवंत असतो. तो श्वास घेतो, नवता स्वीकारतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं मोकळ्या मनाने स्वागत करतो. या परंपरांचा आनंद घेत प्रवास करणं म्हणजे एखादा ताल, मंत्रोच्चार, विणलेला धागा यांच्या सहाय्याने त्या संस्कृतीच्या अंतरंगापर्यंतचा प्रवास.
आजच्या सोशल मीडियाकेंद्री जगात प्रवास करणं म्हणजे, आपण ज्या ठिकाणी गेलो तिथली छायाचित्रं टिपून ती पोस्ट करणं ही अविभाज्य गोष्ट आहे. त्याकरता आपण सूर्यास्त, जुना राजवाडा, प्राचीन मंदिर पहायला जातो. त्या ठिकाणची एखादी वस्तू आठवण म्हणून सोबत आणतो. अर्थात, हे सगळं करण्यात काहीही चूक नाही. मात्र या पोस्टकार्डकेंद्री क्षणांच्या शोधात आपण ज्या ठिकाणी गेलो आहोत त्या ठिकाणाचं अंतरंग पहायचं कधी राहून जाऊ शकतं. तो अनुभव घेण्यासाठी आपल्याला थोडासा वेळ काढावा लागतो.
भारतातही युनेस्कोने नोंदलेल्या अशा ठिकाणांची संपन्नता आहे. त्याचं कारण म्हणजे आपण संस्कृती साजरी करणारे लोक आहोत.
आता गरब्याचंच उदाहरण घ्या. गुजरातमधील हा अत्यंत नयनमनोहरी स्थानिक नृत्यप्रकार. 2023 मध्ये त्याला युनेस्कोची अमूर्त सांस्कृतिक वारसा म्हणून मान्यता मिळाली. हजारोंच्या संख्येने मंडळी गरबा करण्यासाठी एकत्र येतात. नवरात्रीच्या काळात मी एकदा अहमदाबादला माझ्या मैत्रिणीच्या घरी राहायला गेले होते. त्यावेळी मी गरब्याचा आनंद मनमुरादपणे लुटला. सुरुवातीला पाय अडखळतात, पण मग खेळता खेळता त्या प्रत्येक क्षणाची मजा घेत आपण गरब्याच्या तालात सहज सामावून जातो. अर्थातच, स्थानिक नवरात्रीतला सहभाग हा माझ्या त्या भेटीचा सर्वोच्च क्षण होता.
उत्सवाच्या त्याच काळात भारताच्या दुसऱ्या टोकाला कोलकातामध्ये दुर्गा पूजा साजरी होते. 2021 मध्ये दहा दिवसांच्या या उत्सवाचा समावेशही युनेस्कोच्या यादीत करण्यात आला. देवीच्या अप्रतिम घडवलेल्या मूर्ती, त्यांच्याभोवतीची रोषणाई, संगीत आणि मध्यरात्रीपर्यंत चालणारी मौजमजा...
भारतातल्या काही परंपरा आपल्याला प्राचीन रंगमंचासमोर घेऊन जातात. जगातला सर्वात जुना, संस्कृतमधील नाटकाचा प्रयोग कुटियाट्टम् हा त्यापैकीच एक. दिव्यांनी प्रकाशमान झालेल्या मंदिरांच्या प्रांगणात केरळमध्ये अनेक रात्री हे प्रयोग होतात. किंवा रामलीला ही लोककथेच्या माध्यमातून सांगितलेली रामाची गोष्ट उत्तर भारतात दसऱ्याच्या काळात हमखास पहायला मिळते.
त्याचबरोबर भारताच्या अमूर्त वारसास्थळांच्या यादीत आहे तो कुंभमेळा. जगातील सगळ्यात मोठा आध्यात्मिक उत्सव. आलटून पालटून वेगवेगळ्या शहरांमध्ये दर बारा वर्षांनी त्याचं आयोजन होतं. युनेस्कोने 2017 मध्ये त्याला मान्यता दिली. लाखो लोक या कुंभमेळ्यात सहभागी होतात. 2019 मध्ये मी प्रयागराज इथे झालेल्या अर्ध कुंभमध्ये सहभागी झाले होते. भक्तीमय वातावरणात नदीमध्ये मारलेली सामूहिक डुबकी, साधूंचा मंत्रोच्चार, वेगवेगळ्या यात्रा हे सारं अंतर्बाह्य हलवून टाकणारं असतं.
आणि हो, अर्थातच योग. भारताचा सगळ्यात मोठा जागतिक अमूर्त वारसा! जगभरात सगळीकडे योग स्टुडिओ आता सुरू होऊ लागले आहेत. परंतु, ऋषिकेश किंवा कर्नाटकसारख्या ठिकाणी आजही पारंपरिक जीवनशैलीत आपण आसनांच्या पलीकडे जाऊन मंत्रोच्चारात ध्यानधारणा, योगसाधना करू शकतो. आमच्या इनबाऊंड हॉलिडेज् डिव्हिजनने आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी योग रीट्रिटचंही आयोजन केलेलं आहे. त्यात स्पॅनिश दुभाष्यांच्या मदतीने दीडशे जणांसाठीची विविध योग सत्रं आम्ही आयोजित केली होती. आपण भारतीयांनीही आपल्या देशात अशा सुट्टीचा आनंद घ्यायला हवा.
काही परंपरांना भूगोलाच्या सीमा बांधू शकत नाहीत. पारसी लोकांचं नववर्ष म्हणजे नवरोज हा उत्सव त्यापैकीच एक. हा इराण, मध्य आशिया, अफगाणिस्तान, भारत आणि पाकिस्तान अशा सर्व ठिकाणी साजरा केला जातो. शेकोटीवरून उडी मारणे, सामुदायिक स्नेहभोजन, हाफ्त-सिन यातून आपल्याला जगण्याबद्दलची आशा आणि नवीन ऊर्जा मिळते. आपण तेहरानमध्ये असो किंवा ताश्कंदमध्ये, या उत्सवाचा आत्मा सारखाच असतो.
कितीतरी परंपरा या हातांच्या माध्यमातून पुढे गेलेल्या आहेत. स्लोव्हेनिया देशात इद्रिजामध्ये बॉबीन लेस मेकिंग ही एक कला आहे. ती आजीकडून नातीकडे परंपरेने येते. स्थानिक कार्यशाळांमध्ये किंवा लेस फेस्टिवलमध्ये ते नाजूक नक्षीकाम आकार घेत असताना आपण पाहू शकतो.
सोल्वाकियामधील बॅगपाईप संस्कृतीलाही युनेस्कोने मान्यता दिलेली आहे. ही सुद्धा अशीच एक अत्यंत व्हायब्रंट परंपरा. तज्ज्ञ कारागिरांनी घडवलेली वाद्य, त्याच्या सुरावटींवर सांगितली जाणारी लोककथा आणि त्यावरचे पारंपरिक नृत्य यातून ही परंपरा जिवंत राहिली आहे.
स्पेनमध्ये होली वीकच्या काळात कास्तिया-ला मांचा किंवा मुर्सिया इथे आपल्याला ड्रमच्या शोभायात्रा दिसतात. हजारो वादक एका तालात ते ड्रम वाजवतात.
आपली ट्रिप दरवेळी एखाद्या प्रेक्षणीय स्थळामुळेच अविस्मरणीय ठरेल असं नाही. एखाद्या गावातल्या चौकात सुरू असलेल्या नृत्यांमध्ये आपसूक सहभागी होतो तो क्षण, अंगाईचे शब्द आपल्याला कळत नाहीत पण त्या भावना आपल्याही हृदयापर्यंत पोहोचतात तो क्षण... असे क्षण आपली ट्रिप संस्मरणीय करतात. अवचित सापडलेल्या जेवणाच्या सुगंधाने किंवा एखाद्या चित्रकाराने रेखाटलेल्या चित्रांमुळे आपली प्रत्येक ट्रिप संस्मरणीय होते.
युनेस्कोची ही अमूर्त सांस्कृतिक वारशाची यादी म्हणजे केवळ एक जंत्री नाहीये. ते आमंत्रण आहे. हा लेख लिहिताना मी विचारांची जुळवाजवळ करत होते तेव्हा मला माझ्या आजवरच्या प्रवासाचंच प्रतिबिंब उमटत असल्याचं लक्षात आलं. गरब्यात नाचले, दुर्गा पूजेत सहभागी झाले, अर्ध कुंभात स्नान केलं आणि गेल्या वर्षीपासून अतिशय गांभीर्याने योग साधनाही सुरू केली. माझ्या प्रवासाच्या संस्मरणीय क्षणांमध्ये, तोडक्यामोडक्या स्पॅनिश भाषेत वाईनयार्डमधल्या शेतकऱ्याशी मी साधलेला संवाद आणि त्यानंतर त्याने मला दिलेली वाटीभर गोड द्राक्षं आहेत. व्हिएतनामच्या होई आन मध्ये स्थानिक मूर्तिकाराची केलेली प्रशंसा आहे आणि तैवानमधल्या बुद्ध विहारात शाकाहारी भोजनाचा घेतलेला आनंद आहे.
प्रामाणिकपणे सांगायचं तर वीणा वर्ल्डमध्ये आम्ही सगळे अशा प्रकारच्या संस्मरणीय प्रवासाचा आनंद देण्यासाठी मनापासून झटतो. पर्यटनस्थळांची मांडणी करताना आम्ही अनुभवलेल्या या क्षणांचा आपसूकच आधार मिळतो. अर्जेंटिनामधील टँगो डान्सिंग, इटलीमधील गलोटाचा आनंद, व्हिएतनाममध्ये रस्त्याच्या कडेला घेतलेली कॉफी... असे क्षण सोबत असतात. आमच्या लक्झरी टूर्समध्ये आता हिमालयाच्या पार्श्वभूमीवर योग साधना, फ्लोटिंग ब्रेकफास्ट, भिक्खूंसोबत केलेली ध्यानधारणा या सगळ्याचा समावेश आहे. सारं काही युनेस्कोला त्यांच्या यादीत घेता येणार नाही, पण आमच्या पर्यटकांना मिळणारा प्रत्येक अनुभव त्यांच्या प्रवासकथेचा एकेक धागा गुंफणार असतो.
मग काय? केवळ पाहण्यासाठी, चव घेण्यासाठी नव्हे, तर कायम सोबत ठेवण्यासाठी अशा कोणत्या परंपरेचा अनुभव तुम्हाला घ्यायला आवडेल ते मला लिहून नक्की कळवा.
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.