Published in the Saturday Lokasatta on 02 August 2025
...आम्ही अनेकदा तू तू मैं मैं मध्ये अडकतो. कधी त्याचं बोलणं मला पटत नाही, तर कधी माझं त्याला, पण रात्री झोपायच्या आधी आम्ही शांतपणे त्यावर चर्चा करतो, विसंवाद सुसंवादात परिवर्तित करतो...
‘ऑर्गनायझेशनमधला स्ट्रेस कमी करण्याचे काही मार्ग किंवा रेमिडीज् माझ्याकडे आहेत. तुम्हाला नक्की फायदा होईल त्याचा.’ आमच्या हितचिंतकानी स्वच्छ मोकळ्या मनाने सल्ला दिला. मी सुध्दा यावर विचार करीतच होते. फक्त माझी दिशा होती, ऑर्गनायझेशनमध्ये स्ट्रेस किंवा तणाव ह्या सध्याच्या अतिप्रचलित शब्दाचा आणि त्याच्याशी जोडलेल्या गोष्टींचा शिरकावच कसा होणार नाही. त्यांनाही मी ते तितक्याच मोकळेपणाने सांगितलं आणि म्हटलं, ‘मी तसं थोडं मोठं काम अंगावर घेतलंय याची मला कल्पना आहे, पण तेवढाच विश्वासही आहे की आम्ही यामध्ये यशस्वी होऊ. पहिल्यांदा स्ट्रेस का येतो किंवा त्याचा शिरकाव एखाद्या टीम मेंबरमध्ये किंवा डिपार्टमेंटमध्ये कसा होतो किंवा होऊ शकतो त्यावर अभ्यास सुरू आहे. कधी काही अडलं तर निश्चितपणे आम्ही तुमची मदत घेऊ.’ आमचे हितचिंतक आम्हाला ‘बेस्ट ऑफ लक’ देऊन गेले आणि आम्ही डीप थिंकिंगला सुरूवात केली.
स्ट्रेस का येतो? कधी काम वेळेवर होत नाही म्हणून, कधी कुणाचा तरी ओरडा खायला मिळतो म्हणून, कधी कम्युनिकेशन क्लिअर नसतं म्हणून, कधी काय करायचंय ते सांगितलं जातं, पण का करायचं हे सांगितलं जात नाही म्हणून, कधी आर्थिक अडचण आली म्हणून तर कधी काहीतरी भयानक चूक झाली म्हणून. स्ट्रेस यायची कारणं शोधायला लागलो तेव्हा ती मारुतीच्या शेपटीसारखी यादी संपेचना. प्रत्येक गोष्ट दुसऱ्या कुणावर तरी अवलंबून. म्हणजे बघा नं, मी जर हे आर्टिकल वेळेवर दिलं नाही तर त्याची चेन रिॲक्शन इतकी असते की ग्राफिक डिझायनरपासून पब्लिकेशनपर्यंत सगळेच स्ट्रेसमध्ये जातात. आमच्या मार्र्केटिंग डिपार्टमेंटचं उदाहरण घेतलं. म्हटलं तुम्हाला उशीर का होतो ऑफिसमधून निघायला? आपल्याकडे इमर्जन्सी वा एखादा लाँच वगळता रात्री साडेआठनंतर शक्यतोवर कुणी ऑफिसमध्ये थांबायचं नाही असा दंडक आहे नं. तुम्हीच आपली ‘टाईम थिअरी’ अनेकदा अनेक पद्धतीने छापलीय, जी सांगते, ‘वेळेवर या... वेळेत काम करा... वेळच्या वेळी घरी जा...’ मग ज्यांनी ती बनवलीय, तीच मंडळी ती तोडताहेत हे चित्र म्हणजे संपूर्णपणे माझं फेल्युअर. लेट्स डू थिंग्ज डिफरंटली. गेल्या दोन महिन्यात आम्ही चार वेळा भेटलो. सर्वात महत्त्वाचा भाग होता ‘डिपेन्डन्सी’. हा ह्या डिपार्टमेंटवर अवलंबून, हे डिपार्टमेंट दुसऱ्या डिपार्टमेंटवर अवलंबून, कुणी ट्रान्सलेटरवर अवलंबून तर कुणी ग्राफिक डिझायनरवर. बरं सगळ्या गोष्टी एकदम टाईम बाऊंड, प्रत्येकाची डेडलाइन किंवा स्ट्रिक्ट अशी टाईमलाइन असलेल्या. पब्लिकेशनला एखादी गोष्ट ज्यावेळी जायला पाहिजे, तेव्हा ती गेलीच पाहिजे. त्याला कोणतंही कारण देऊन चालत नाही. प्रचंड मेहनतीनंतर, अनेक चेकलिस्ट आणि ब्रीफ पेपर्स बनवल्यावर, डिपेन्डन्सीज् काढून टाकल्यावर आणि काम करणाऱ्यालाच जबाबदारी दिल्यावर अदरवाईज बिल्ड होणारा स्ट्रेस कमी होईल असं आम्हाला सर्वांनाच दिसायला लागलं, कारण सर्वांनी मिळून हे बदल केले होते. नवी सिस्टिम आणण्याचा आणि रुजविण्याचा प्रयत्न केला होता. आता आम्ही यात पूर्णपणे यशस्वी होऊ याची कागदोपत्री तरी खात्री वाटतेय, पण प्रॅक्टिकली गोष्टी विनासायास होण्यासाठी थोडा वेळ द्यावा लागेल. महिन्याभरात काय होतंय हे आम्हाला कळेलच. कदाचित काही चेंजेंस आणखी नव्याने करावे लागतील, पण सगळ्यांना बऱ्यापैकी खात्री वाटायला लागलीय की आता आपल्या प्रॉब्लेमचं सोल्युशन आपण शोधलंय, गोष्टी नव्याने करायचं ठरवलंय आणि त्याबरहुकूम पुढे जायची तयारी ठेवलीय, तेव्हा थिंग्ज विल डेफिनेटली चेंज! एकदा का येत्या तीन महिन्यात हे डिपार्टमेंट यशस्वी झालं की आमचा हुरूप वाढेल आणि मग इतर डिपार्टमेंटमध्ये जर कुठे अशी गरज असेल तर तिथेही काम करू शकू.
सर्वांमध्ये एकवाक्यता, सर्वांना आपण काय करतोय आणि का करतोय याची जाणीव, सर्वांसाठी एक ध्येय ह्या सगळ्या गोष्टी आम्ही दर महिन्याला सातत्याने होणाऱ्या चार मीटिंग्जमध्ये सर्वांना एकत्रितपणे सांगतच असतो, पण प्रत्येक मॅनेजर, इनचार्ज ह्यांच्याशी ‘वन टू वन’ अशा मीटिंग्जही आम्ही घेतो. एकमेकांना समजून घेणं, त्यांच्या अडीअडचणींवर चर्चा करणं, नवीन आयडियाज्चा पाठपुरावा करणं अशा अनेक गोष्टी या वन-टू-वन कम्युनिकेशनमध्ये होतात. एका साईडला ऑर्गनायझेशन दुसरीकडे छोटी मोठी डिपार्टमेंट्स, तिसरीकडे प्रत्येक इंडिव्हिज्युअल सोबत संवाद असं सर्वांगाने काम सुरू आहे. काम कुणालाच चुकत नाही, मैलाचे दगड सर्वांनाच पार करायचे आहेत, पण हे सगळं ताणतणाव विरहित करायचंय आपल्याला, कारण प्रत्येकाच्या पर्सनल आणि प्रोफेशनल या जीवनाच्या दोन्ही बाजूंमध्ये समन्वय साधला गेला पाहिजे.
दर महिन्याला होणाऱ्या लीडरशीप मीटिंगमध्ये आम्ही बऱ्याच गोष्टींवर चर्चा करतो. आमचा एक टॉपिक होता, ‘आपण सध्या काय करतोय? आणि ॲक्च्युअली आपल्याला काय करायला पाहिजे?’ आमच्या टेक्नॉलॉजी डिपार्टमेंटचा सिनियर मॅनेजर ध्रुव प्रजापती म्हणाला, ‘आत्ताच मी एका छोट्याशा गोंडस मुलीचा, आर्याचा, बाप झालोय. नव्याने जबाबदारी आली, रात्रीची जागरणं वाढली. कामांचा उरक कसा करायचा ह्या विचाराने स्ट्रेस यायला लागला. नेमकं काय केलं तर मला बॅलन्स साधता येईल त्यासाठी अनेक पॉडकॉस्ट ऐकले. आणि माझ्या काम करण्याच्या पद्धतीत बदल केला, आमुलाग्र. कामं एका दिवसावर नव्हे तर आठवड्यावर, पंधरवड्यावर अगदी महिन्यावर टाईमलाइन देऊन पसरवली, त्यामुळे एकावेळी एका कामावर फोकस करता यायला लागलं. मनातला गोंधळ कमी झाला आणि स्ट्रेसही. आता माझी कामं पण होताहेत आणि मी आर्यालाही वेळ देऊ शकतोय. या नव्या पध्दतीमुळे माझी धावपळ होत नाही आणि चिडचिडही कमी झालीय. मी खऱ्या अर्थाने शांत झालोय.’ ध्रुवने अगदी खुल्यादिलाने हे शंभरपेक्षाही जास्त लीडर्ससोबत शेअर केल्यामुळे आमचा सर्वांचाच उत्साह वाढला. स्ट्रेस कमी करण्याचा किंवा त्याचा शिरकाव न होऊ देण्याचा नवीन फॉर्म्युला ध्रुवने दिला होता. शेअरिंग-केअरिंग- ट्रान्सफॉर्मिंगचं हे एक अतिशय चांगलं उदाहरण.
त्याच मीटिंगमध्ये प्रॉडक्ट डिपार्टमेंटमधली इनचार्ज आरती कबरेने तिचं उदाहरण सांगितलं. तिच्या सोबतची टीम वाढत होती, त्यामुळे त्यांच्याशी डील कसं करायचं यावर ती विचार करीत होती. नवीन टीम मेंबर्सच्या निरीक्षणातून तिच्या असं लक्षात आलं की ही न्यू जनरेशन फास्ट आहे, इंटेलिजन्ट आहे, शिवाय टेक्नोसॅव्ही आहे. जर त्यांना 5W+1H किंवा आमची 6W+2H थिअरी शिकवली तर ते सर्वसाधारणपणे लागणाऱ्या वेळेपेक्षा कमी वेळात काम पूर्ण करू शकतात. ही थिअरी म्हणजेच काय करायचं? कधी? कुणी? कसं? का? कुणासाठी? त्याचसोबत त्या कामात पूर्वी काय अडचणी आल्या होत्या आणि आता काय येऊ शकतील हे सांगितलं तर ते अगदी अचूकपणे काम पूर्ण करू शकतात. अरे वा! नवीन पिढीला दोष देण्याऐवजी आरतीने त्यांची पद्धत समजून घेऊन त्याप्रमाणे स्वतःला बदलवलं, ती आणखी ऑर्गनाइज्ड झाली. ही सर्वांसाठी एक स्तुत्य गोष्ट होती. इथे आणखी महत्वाची गोष्ट होती ती म्हणजे आरतीने इगो दाखवला नाही किंवा सुपिरियॉरिटी. ही गोष्ट लीडरशीपला साजेशी होती.
तिसरं उदाहरण त्याच मीटिंगमध्ये माझ्या नजरेसमोर आलं जे आजच्या विषयाला साजेसं आहे ते महिमा वेद या आमच्या कंपनी सेक्रेटरीने शेअर केलेलं. आत्तापर्यत महिमा एकटीच होती, पण जसं काम वाढलं तशी टीमही वाढली. पण काम डेलिगेट करताना तिला भीती वाटायची की टीमकडून काही चूक झाली तर. म्हणजे तिने काम द्यायला सुरुवातही केली, पण थोड्या वेळाने ती स्वतःच ते काम करून टाकायची. एकदा तिचा टीम मेंबर सिद्धांत नाईकने तिला म्हटलं, ‘महिमा तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवा नं, आम्हाला शिकवा. आम्ही चुका करणार नाही. तुम्ही आम्हाला काम देता आणि स्वतःच ते पूर्ण करता, मग आम्ही कसे तयार होणार?’ महिमाच्या लक्षात आलं की ती डेलिगेट करण्याचा प्रयत्न करीत होती, पण त्यासाठी लागणाऱ्या बाकीच्या गोष्टी तिने आत्मसात करायला हव्या होत्या. महिमानेही आपली स्टाईल बदलली. आता सिद्धांत आणि टीम खूष, तसंच महिमाही कारण तिला महत्त्वाची कामं करायला वेळ मिळाला. या तीनही उदाहरणात फक्त ध्रुव, आरती किंवा महिमा हेच शिकले नाहीत, तर त्यांनी आम्हा सर्वांनाही ‘चेंज इज द ओन्ली कॉन्स्टंट थिंग’ याची आठवण करून दिली, वेगाने बदलत्या जगात आपल्याला टिकून रहायचं असेल तर कुठेतरी आपल्याला बदलायला हवं हे दाखवून दिलं.
गेल्या आठवड्यात माझ्या मैत्रिणीचा साठावा बर्थ डे होता. त्याच्या सेलिब्रेशनसाठी आम्ही मुंबईबाहेर एका दिवसाच्या ट्रिपवर गेलो होतो. केक कटिंग झाल्यावर ‘तुमच्या हसऱ्या साठ वर्षांचं आणि यशस्वी लग्नाचं गुपित काय?’ असं तिला आणि तिच्या पतिदेवाला म्हणजे आमच्या मित्राला विचारल्यावर त्या दोघांनीही शेअर केलेली एक गोष्ट आवडून गेली ती म्हणजे, ‘आम्ही अनेकदा तू तू मैं मैं मध्ये अडकतो. कधी त्याचं बोलणं मला पटत नाही, तर कधी माझं त्याला, पण रात्री झोपायच्या आधी आम्ही शांतपणे त्यावर चर्चा करतो, विसंवाद सुसंवादात परिवर्तित करतो आणि हातात हात घालून खुशीत झोपून जातो. आमच्यात अलिखित नियम बनून गेलाय, की एक दुसऱ्यावर राग काढत कधीही झोपायचं नाही.’ ह्या आमच्या दोस्तांनी स्ट्रेस येऊ नये म्हणून स्वतःचा मार्ग शोधून काढला होता. आयुष्यात आपण पावलोपावली काहीतरी छान शिकत असतो ते असं.
स्ट्रेस किंवा तणाव या गोष्टीला ऑर्गनायझेशन मध्ये किंवा डिपार्टमेंटमध्ये किंवा टीम मेंबरमध्ये घुसू द्यायचं नाही यासाठी आम्ही अथक प्रयत्न करतोय, कारण स्ट्रेस फ्री टीमच आमच्या पर्यटकांना अपेक्षित आनंद देऊ शकते. आता यात आम्ही किती यशस्वी होतोय हे काळच ठरवेल, पण आम्ही सातत्याने मनापासून प्रयत्न करीत राहणार. महाभारतात कुरुक्षेत्रावर युध्द सुरू होण्याआधी अर्जुन पुरता कोलमडतो, त्यावेळी श्रीकृष्णाच्या लक्षात येतं की युध्दाच्या परिणामांच्या विचारांनी आलेला तणाव तो सहन करू शकत नाहीये. श्रीकृष्ण त्याला सांगतो, ‘कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन...’ ‘तुझा अधिकार फक्त कर्म करण्याचा आहे, ते तू करीत रहा, फळ काय मिळेल ह्याची अपेक्षा न करता आणि काय होईल ह्या अंतिम परिणामाला न घाबरता.’ आपण प्रत्येकाने हेच करणं अपेक्षित आहे, नाही का?
आधुनिक काळात स्ट्रेस टाळायचा असेल तर एक गोष्ट समजून घ्यायला हवी की स्ट्रेस ही पर्सनल गोष्ट नाही. ती सांघिक असते. स्ट्रेस हा केवळ थकवा नाही. तो विसंवाद असतो. तो एकटेपणा असतो. ती अपेक्षा असते आणि तो संवादाचा अभाव असतो. यावर उपाय म्हणजे एकदिलाने काम करणं, स्पष्टपणे बोलणं, स्ट्रॅटेजीज् संबंधित टीमला समजावून सांगणं, एकमेकांना विश्वास देणं आणि एकमेकांवर विश्वास ठेवणं. गरजेच्या ठिकाणी पॉज घेणं, कामावर चित्त एकवटणं, वेळेचं व्यवस्थित नियोजन करणं. ह्यातूनच तयार होऊ शकतं एक संवेदनशील पण सक्षम वातावरण, जिथे कामही होईल आणि मनही हलकं राहील.
वीणा पाटील, सुनिला पाटील, आणि नील पाटील ह्यांचे दर आठवड्याला वृत्तपत्रात प्रकाशित होणारे लेख वीणा वर्ल्ड वेबसाईट www.veenaworld.com वर वाचनाकरिता उपलब्ध आहेत.
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.