Travel Planner 2025
Travel Planner 2025
IndiaIndia
WorldWorld
Our Toll Free Numbers:

1800 313 5555

You can also call us on:

+91 22 2101 7979

+91 22 2101 6969

Foreign Nationals/NRIs travelling

Within India+91 915 200 4511

Outside India+91 887 997 2221

Business hours: 10AM - 7PM

Our Toll Free Numbers:

1800 313 5555

You can also call us on:

+91 22 2101 7979

+91 22 2101 6969

Foreign Nationals/NRIs travelling

Within India+91 915 200 4511

Outside India+91 887 997 2221

Business hours: 10AM - 7PM

Explore Topics, Tips & Stories

Balloon
Arrow
Arrow

सिप बाय सिप

8 mins. read

...तुम्ही संपवलेला कप उलटा करून ठेवतात. तो थंड होऊ देतात आणि मग तुमच्या सोबत असलेला मित्र किंवा कॅफेचा मालक त्या कपाच्या तळाशी दिसणाऱ्या पॅटर्न्सवरून भविष्य सांगतात. ...

लंडनमधल्या एका उबदार कॅफेमध्ये बसून माचा लातेचे सिप घेत घेत मी हा लेख लिहितोय. बाहेर हवामान ढगाळ आहे, जरासा पाऊसही पडतोय, अगदी क्लासिक लंडन वेदर आहे हे. लंडनची हीच तर गंमत आहे, इथे तुम्ही एकाच दिवसात चारही ऋतू अनुभवू शकता. त्यामुळेच अशा हवेत हे गरम, हिरव्या रंगाचं आणि ज्याला मातीचा स्वाद आहे असंच पेय हवं, नाही का? आता लंडनमध्ये माचा पिणं योग्य आहे का? तर कदाचित नसेलही, पण आज मला मात्र ते एकदम परफेक्ट वाटतंय.

हे पीत असतानाच माझ्या मनात विचार आला की एखाद्या साध्या पेयामुळे तुमचा प्रवास संस्मरणीय  झालाय असं किती वेळा घडतं? कधी कधी विमानातून उतरल्यानंतर सर्वात पहिल्यांदा तुम्ही तेच शोधता. कधी ते अचानक समोर येतं आणि मग तुमच्या ट्रिपचा हायलाईटच बनून जातं.

चला तर मग, या आठवड्यात हाच विषय घेऊयात. फक्त काही मोजकी पेयं, जी तुम्हाला एखाद्या ठिकाणाची खरी ओळख करुन देतात त्याबद्दल बोलूया. यातली काही मी चाखली आहेत आणि काहींचा मला स्वाद घ्यायचा आहे.

जपानमधील माचा

मी जपानमध्ये असताना सतत माझी सोबत कोणी केली असेल तर ती माचाने. हा निव्वळ चहा नाही, तर यात तो नेमका क्षण संपूर्ण सामवलेला असतो. मला क्योटोमधल्या तातामीरुममधला तो क्षण अजूनही आठवतो. त्या शांत जागी मी मांडी घालून बसलो होतो. माझ्यासमोर टी मास्टरने ती गडद हिरव्या रंगाची पावडर हळूहळू ढवळायला सुरूवात केली आणि एक दाटसर क्रिमी पेय तयार होऊ लागलं. त्यात ना साखर होती ना दूध. जरा कडसर चवीचं, मातीचा स्वाद असलेलं हे पेय. पण त्या पेयात तुम्हाला गुंतवून ठेवण्याची ताकद होती.

जपानमध्ये माचा फक्त प्यायलं जात नाही, तर त्याचं आदरपूर्वक सेवन केलं जातं. त्यासाठी होणारा टी सेरेमनी कसा अगदी आरामात, काळजीपूर्वक आणि नेमका असतो. पारंपारिक पध्दतीशिवाय माचा वेगवेगळ्या प्रकारे समोर येतो. तसा तो सगळीकडेच असतो, लातेमध्ये, स्वीट डिशमध्ये, नूडल्समध्ये. कशात नसतो असं नाही, पण याला स्वतःची अशी एक ग्रेस आहे. तो तुम्हाला जणू शांतपणे लक्ष केंद्रित करण्यासाठी आवाहन करतो.

माचाला शतकानुशतकांची परंपरा लाभलेली आहे आणि लोकंही या परंपरेचा आदर करतात. त्यामुळेच माझ्यासारख्या सतत प्रवास करणाऱ्या व्यक्तीसाठी माचा म्हणजे जणू थबकण्याचा एक स्टॉप ठरतो. एक कप माचा घेतला की आपोआप तुम्ही पुढे काय हा प्रश्न विसरून, आहे त्या क्षणाचा आनंद घेऊ लागता. टोकियो, ओसाका, क्योटो जिथे कुठे मी माचा घेतला तिथे तिथे, माझ्या भोवतालचा गजबजाट, कोलाहल क्षणात विरुन गेला. न थांबता गती मंद कशी करायची हे जपानच्या माचाने मला शिकवलं आहे.

इस्तंबूलमधील टर्किश कॉफी

जर जपानमधील माचा तुम्हाला शांतपणे स्वतःमध्ये रमायला शिकवत असेल, तर टर्किश कॉफी म्हणजे त्याच्या एकदम विरुध्द टोक, जी तुम्हाला बोलायला भाग पाडते. चवीला जरा कडक, बहुपदरी आणि रसरशीत आयुष्यासारखी असते ती. टर्किश कॉफी हे असं पेय आहे जे तुम्हाला जरा सरसावून बसायला भाग पाडतं. ती नेहमीच छोट्याशा पण देखण्या कपात दिली जाते. मात्र या कपाच्या आकाराने फसू नका, कमी दिसली तरी ती कायम निःसंकोचपणे दाट आणि कडकच असते.

मी आयुष्यातली पहिली टर्किश कॉफी प्यायलो ते इस्तंबूलमध्ये रस्त्यालगतच्या एका लहानशा कॅफेत. मी जिथे बसलो होतो तिथून मला एका बाजूला बोस्फोरस खाडीचा नजारा दिसत होता आणि दूरवरचे हाया सोफियाचे घुमटही दिसत होते. माझ्यासमोर कॉफी आली, सोबत पाण्याचा ग्लास आणि लोकम (टर्किश डिलाइट) ची लहानशी वडीही होती. खरंतर मी काही टर्किश कॉफीचा फॅन वगैरे नाही, कारण ती फिल्टर्ड नसल्याने कपात नेहमी शेवटी जो कॉफी पावडरचा थर उरतो तो मला अजिबात आवडत नाही. पण जरी पेय आवडत नसलं तरी तो क्षण, तो अनुभव, काही औरच होता. कारण हातातल कप संपला तरी तो अनुभव संपला नव्हता. टर्कीमध्ये कॉफीच्या कपाच्या तळाशी उरलेल्या कॉफीवरून भविष्य सांगण्याची पध्दत रूढ आहे. तुम्ही संपवलेला कप उलटा करुन ठेवतात. तो थंड होऊ देतात आणि मग तुमच्यासोबत असलेला मित्र किंवा कॅफेचा मालक त्या कपाच्या तळाशी दिसणाऱ्या पॅटर्न्सवरून भविष्य सांगतात. जर तुमची ती पहिलीच वेळ असेल तर एकदम अनपेक्षित असा तो अनुभव असतो. मात्र ती गंमत असते आणि खेळीमेळीनेच घ्यायची असते. पण त्यामुळेच कॉफीसारखी साधी गोष्ट एकदम भारी वाटायला लागते, जणू ती निमित्त बनते मित्रांबरोबर हसण्याचं, गप्पा मारण्याचं.

त्यामुळे माझ्यासाठी टर्किश कॉफी म्हणजे मित्र जोडण्याचं पेय आहे. भले मी माझ्या घरी कधीच कॉफी ब्रू करणार नाही, पण मला इस्तंबूलमधला तो कडक कॉफीचा कप, त्यासोबतच्या गप्पाटप्पा आणि ते समोर दिसणारं दृश्य कायम आठवत राहील.

अर्जेंटिना मधील येर्बा माते

जेव्हा मी अंटार्क्टिकाला जाताना अर्जेंटिनामध्ये होतो, तेव्हा मला ज्याविषयी मी अनेक वर्षं नुसतं ऐकलं होतं ती गोष्ट अर्थात ‌‘येर्बा माते‌’ प्यायची संधी मिळाली. तुम्ही लिओनेल मेस्सीला मुलाखत देताना, मॅचच्या आधी किंवा टीमबरोबर बसमधून जाताना माते पिताना नेहमी पाहिलं असेल, मग मेस्सी जे करतो ते सगळा देश करणारच ना!

तिकडे येर्बा माते हे फक्त एक पेय नाही, तर ती परंपरा आहे. तिथल्या संस्कृतीची ओळखच म्हणा ना. अर्जेंटिनात मी जिथे जिथे गेलो, मग पार्क असो, रस्त्यावर असो, अगदी एअरपोर्टवरसुध्दा मी पाहिलं की स्थानिक लोकं घोळक्याने येर्बा मातेचं भांडं, त्यातील मेटल स्ट्रॉसह एकमेकांना देऊन पेयपान करीत होते.

माते बनवण्यासाठी येर्बाची सुकवलेली पाने गरम पाण्यात भिजत घालतात आणि हे मिश्रण सुकलेल्या भोपळ्यापासून केलेल्या भांड्यात देतात. माते पिण्यासाठी नेहमी बोम्बिला म्हणजे मेटल स्ट्रॉ वापरला जातो. ते कडक, किंचित कडसर आणि जरा मातकट स्वादाचं असतं, पण एकदा का तुम्ही प्यायला सुरूवात केलीत की त्याचा स्वाद तुम्हाला अतिशय सूदिंग वाटू लागतो.

समोर आलेल्या मातेला नकार द्यायचा नाही हा अलिखित नियम मात्र न चुकता पाळायचा. तुम्ही तो भोपळा हातात धरायचा, त्यातून मातेचा एक सिप घ्यायचा आणि पुढच्या माणसाकडे तो पास करायचा. माते म्हणजे एक आमंत्रणच, ते तुम्ही स्वीकारलंत की लगेच तुम्ही थोड्या वेळासाठी तरी तिथे जमलेल्या लोकांचा हिस्सा बनून जाता.

थोडक्यात सांगायचं तर, माते हे काही एकट्याने किंवा घटाघटा प्यायचं पेय नाही. ते शेअर करायचं, शांतपणे आणि चवीचवीने प्यायचं पेय आहे. त्यामुळेच मला ते आवडलं कारण माझ्यासाठी प्रवासातील क्षण असेच तर असतात.

भूतान मधील बटर टी

मी अजून जरी बटर टी प्यायलो नसलो तरी तो कुठे जाऊन प्यायचा हे मला नक्की माहीत आहे. ती जागा म्हणजे भूतान. हिमालयातल्या अतिशय उंच ठिकाणी, जिथे हवा अगदी विरळ असते, सगळा भूभागच अनोखा असतो, तिथे हा चहा मिळतो. दूध आणि साखरेऐवजी हा चहा याकचं बटर आणि मीठ घालून तयार करतात. त्याला सुजा म्हणतात आणि त्या विषयी मी जे वाचलंय, ऐकलंय त्यावरुन एक नक्की सांगू शकतो की हा आपल्या नेहमीच्या चहासारखा अजिबात नाही. दाटपणा आणि नमकीन चव यामुळे तो एखाद्या सूपासारखा लागतो.

बहुतेकांचा अनुभव आहे की पहिला घोट जरा गोंधळातच टाकतो, पण दुसरा-तिसरा घोट पोटात गेला की भोवतालच्या बर्फाच्छादित शिखरांवरुन येणाऱ्या थंडगार वाऱ्यात ती चव आवडायला लागते. आपल्या नेहमीच्या चहासारखा बटर टी रिफ्रेशिंग नाही, पण तो एनर्जी देतो, थंडीत उब निर्माण करतो. लडाखमध्ये तो तुमचा तारणहार असतो. इथल्या मोनॅस्ट्रीज्‌‍मध्ये, होम स्टे मध्ये, पर्वतरांगेतल्या छोट्या छोट्या गावांमध्ये अतिशय अगत्याने तुमचं स्वागत याच चहाने करतात असं मी ऐकलं आहे. त्या कपात चहापेक्षा बरंच काही सामावलेलं असतं. म्हणूनच मला तो लवकरात लवकर प्यायचा आहे. जेव्हा मी त्याचा किंचित खारट असा पहिला घोट घेईन, तेव्हा तो क्षण त्यानंतर अनेक दिवस मला सोबत करेल याची मला खात्री आहे.

थायलंडमधील नारळपाणी

आता तुम्हाला जरा विचित्र वाटेल, पण मला खरंच असं वाटतं की थायलंडमधल्या नारळ पाण्याची चवच वेगळी आहे. ते अधिक फ्रेश असतं, अधिक गोड असतं, अधिक थंड असतं आणि म्हणून अधिक जिवंत असतं. आता हा तिथल्या उष्ण हवेचा परिणाम असू शकेल. कारण काही असेल, पण थायलंडच्या नारळ पाण्याची गोष्टच न्यारी हे खरं. ते काही चमकदार नाही, त्यात चवीला काही घातलेलं नसतं, पण ते अगदी अस्सल असतं. आणि काहीवेळा तुमच्या लक्षात राहणारा प्रवास असाच असतो, नाही का?

ज्यांच्याविषयी लिहायला हवं त्या पेयांची यादी बरीच मोठी आहे. इटलीमधील एस्प्रेसो, मोरोक्कोचा मिंट टी, भारतातील उसाचा रस, जर्मनीत ख्रिसमसमध्ये मिळणारी गरम वाईन किंवा एखाद्या दुपारी घेतलेला साधा फ्रेश लाइम सोडासुध्दा. प्रत्येक पेयाची कथा वेगळी आहे, जागा ठरलेली आहे. पण त्यांच्याविषयी परत कधीतरी. कारण ही यादी म्हणजे फक्त सुरूवातच आहे घोटाघोटातलं जग कसं आहे हे सांगण्याची. खरंच एखाद्या लहानशा पेल्यातून त्या त्या प्रदेशाची होणारी ओळख किती मजेशीर असते नाही? एखादं पेय काळजीपूर्वक पेल्यात ओतलं जातं, दुसरं एखादं घोळक्यात शेअर केलं जातं, आणखी एखादं गोष्टीसारखं असतं, तर एखादं शहाळ्यात थंडगार करुन दिलं जातं. मात्र प्रत्येकात त्याच्या चवीबरोबरच आणखी काही तरी असतं. त्यात परंपरा असते, रितीरिवाज असतात, आठवणी असतात. आत्तासाठी एवढंच पुरे. पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात!

August 22, 2025

Author

Neil Patil
Neil Patil

Founder & Director, Veena World

More Blogs by Neil Patil

Please let me know your thoughts on this story by leaving a comment.

Post your Comment

Please let us know your thoughts on this story by leaving a comment.

Similar Romantic Blogs

Read all
insert similar tours here

Explore Topics, Tips & Stories

Balloon
Arrow
Arrow

Get in touch with us

Share your details for a call back and subscribe to our newsletter for travel inspiration.

+91

Listen to our Travel Stories

Most Commented

Veena World tour reviews

What are you waiting for? Chalo Bag Bharo Nikal Pado!

Scroll to Top