IndiaIndia
WorldWorld
Toll free number

1800 22 7979

Chat on WhatsApp

+91 88799 00414

Business hours

10am - 6pm

पिझ्झेरिया आर्कोबलेनो

18 mins. read

Published in the Sunday Sakal on 11 February, 2024

इटली हा आमच्या बहुतांश युरोपियन टूर्समधला महत्वाचा देश आहे. काही टूर्स तर फक्त इटलीच्याच असतात. प्रत्येक पर्यटकाला कधीना कधी इटलीला भेट द्यायचीच असते. त्यामुळे आम्हीही इटलीला पोहचलो. कोविडनंतर बदललेल्या जगाला भेट देणं सुरू आहे. ऑगस्ट ते डिसेंबर ह्या गेल्या पाच महिन्यांत आम्ही ग्रीस, अबु धाबी, स्पेन, स्वित्झर्लंड, व्हिएतनाम, पॅरिस, पोर्तुगाल आणि इटली पिंजून काढलं. शंभर दिवसांची भ्रमंती. प्रत्येक देशानंतर पाच सहा दिवस घरी यायचं आणि मग पुन्हा ’चलो बॅग भरो निकल पडो’. ह्या आमच्या जगभ्रमंतीमध्ये बारा तेरा डिसेंबरला आम्ही इटलीत होतो. इटलीच्या पोटात दोन छोटे देश आहेत. एक आहे व्हॅटिकन जिथे आपल्या सर्व टूर्समधले पर्यटक भेट देतात आणि सेंट पीटर्स बॅसिलिका बघून धन्य होतात. दुसरा देश आहे सॅन मारिनो, छोटासा पण अतिशय सुंदर. ह्याही देशात आपण वीणा वर्ल्डच्या युरोप टूर्समध्ये जात असतो आणि आपल्या देशांच्या संख्येत अजून एका देशाची भर टाकतो. मी आणि सुधीर दोघंही सॅन मारिनोला गेलो नव्हतो त्यामुळेच अनेक टूर्समध्ये समाविष्ट असलेला हा देश आम्हालाही बघायचा होता. शक्य होईल त्या त्या शहरात आपण कोणती हॉटेल्स देतो तेही आम्हाला जाणायचं होतं. एवढ्या सगळ्या गोष्टी एकत्र आल्यामुळे आमच्या इटालियन पार्टनरसोबत आम्ही आठ दिवसांचा दौरा प्लॅन केला होता. सॅन मारिनोचं बेस स्टेशन म्हणता येईल अशा फेरारा ह्या इटालियन शहरात आम्ही मुक्कामाला होतो. दिवसाला कामाचे आठ दहा तासच मिळायचे, त्यात डिसेंबर म्हणजे छोटा दिवस आणि आम्हाला दर दिवशी भलीमोठी कामांची लिस्ट पूर्ण करायची असायची. रात्र थोडी, नव्हे ‘दिवस थोडा सोंग फार‘ सारखी अवस्था. लाइट लंचही चालेल पण ते करायलाही वेळ नसायचा. पण आमची पायपीट आणि कारपीट एवढी सुरू होती की कडाडून भूक लागली होती. ’अरे यार इतना काम मत करवाओ और अगर करके लेना ही है तो खानेको तो दो कुछ’ आम्ही इटालीयन अ‍ॅक्सेंटमध्ये आमच्या पार्टनरला चिडवत होतो. आता तिनेही मनावर घेतलं आणि फेराराच्या ओल्ड टाऊनमध्ये जेमतेम आमची गाडी माऊ शकेल अशा टिपिकल इटालियन छोट्या छोट्या गल्ली बोळातून वाट काढत एका पिझ्झेरियासमोर गाडी उभी केली.

इटली म्हटलं म्हणजे पिझ्झाला पर्याय नाही. पिझ्झा आज जरी इटलीची ओळख असला तरी ग्रीक लोकांनी तो प्रथम बनवला फ्लॅट ब्रेडच्या स्वरूपात. नेपल्स हा इटलीचा दक्षिण भाग, जो पूर्वी ग्रीक लोकांच्या अधिपत्याखाली होता. ग्रीक लोकांनी इटलीच्या ह्या दक्षिण भागावर बरेच वर्ष राज्य केल्याने तिथले इटालियन्स बर्‍यापैकी ग्रीक लोकांसारखे दिसतात व वागतात. तर अशा ह्या नेपल्समध्ये हा फ्लॅट ब्रेड आला साधारणपणे अठराशेच्या दरम्यान आणि फ्लॅट ब्रेड पिझ्झा अस्तित्वात आला. पिझ्झाला खर्‍या अर्थाने ओळख मिळाली ती १८८९ मध्ये जेव्हा पहिल्यांदा किंग उंबेर्टो पहिला आणि त्याची पत्नी क्वीन मार्गारिटासाठी त्यांच्या नेपल्स व्हिझिटमध्ये क्लासिक पिझ्झा बनवला गेला. राऊंड फ्लॅट ब्रेडवर मोझेरेल्ला चीझ, टॉमेटो आणि बेझिल्सच्या टॉपिंग्जने बनवलेला हा पिझ्झा राणीच्या आणि राजाच्याही पसंतीस उतरला आणि जन्म झाला ‘पिझ्झा मार्गारीटा’चा. नंतर पिझ्झा इतका लोकप्रिय झाला की इटली म्हणजे कोलोसियम, इटली म्हणजे लीनिंग टॉवर ऑफ पिसा, इटली म्हणजे गंडोला प्रमाणे इटली म्हणजे पिझ्झा असं समिकरण बनून गेलं. २०१२ मध्ये इटलीतल्या अनेक शेफ्सनी एकत्र येऊन रोममध्ये जगातला सर्वात मोठा पिझ्झा बनवला. १३५८० फूट व्यासाचा २०००० पौंड पीठ आणि १०००० पौंड मोझेरेल्ला चीझवाल्या ह्या पिझ्झाचं नाव ‘ओटाविया’ ठेवलं गेलं, रोमन एम्परर ऑक्टेव्हिअन अगस्टसच्या नावावरून. प्रत्येक गावाची, शहराची, राज्याची, देशाची एक ओळख असते. मला स्वत:ला माझ्याशीच हा खेळ खेळायला आवडतो. एखाद्या ठिकाणाचं नावं घ्यायचं आणि पटकन डोळ्यासमोर काय उभं राहतं ते बघायचं. बघातर हा टाइमपास करून. राजस्थान-हवामहल, आग्रा-ताज महाल, दिल्ली-लाल किल्ला, काश्मीर-शिकारा, केरळ-बॅकवॉटर्स इत्यादी ठिकाणांप्रमाणे माणसांचीही ओळख निर्माण झालेली असते नाही का. प्रेमळ, दयाळू, खडूस, शिस्तप्रिय, आक्रस्ताळी, शांत, प्रामाणिक, खोटारडा...बापरे! पिझ्झा खाताना दचकायला झालं, नेमकी आपली काय ओळख असेल. जाऊदे जाऊदे, सत्य ऐकायची हिम्मत तर आपल्यात पाहिजे.

सो, आम्ही पोहोचलो फेरारा मधल्या पिझ्झेरिया आर्कोबलेनो ला. छोटंसं पिझ्झा शॉप आणि अनेक प्रकारचे पिझ्झा काचेच्या त्या कपाटात विराजमान झालेले. बसायला फक्त चार बार स्टूल्स आणि भिंतीला छोटा उंच टेबलवजा प्लॅटफॉर्म. आत घुसलो आणि प्रसन्न वाटलं. मरणाची भूक लागली होती. लकीली आम्ही सर्वजण व्हेजेटेरियनवर भर देणारे निघालो त्यामुळे तेथील स्पिनॅच, मशरूम, कॉर्न, टोमॅटो, झुकिनी असे सर्व व्हेज प्रकारातले एक एक तुकडे मागवले आणि काय सांगावं ते एवढे टेस्टी होते की आम्ही भुकेले एका पाठी एक ऑर्डर देत सुटलो. आमची आवड आणि भूक बघून तिथल्या मुलीने म्हटलं, "थांबा, तुम्हाला मी ताजा ताजा पिझ्झा करून देते". आम्ही एकमेकांकडे बघितलं, ‘अरे वा! पर्सनलाइज्ड सर्व्हिस!’ तिथे थांबलेलो असताना लोकल माणसं, ऑफिसला जाणारे, विद्यार्थी असे सर्व येऊन हाय हॅलो करीत त्यांच्या आवडीचा पिझ्झा घेऊन खात खात बाहेर पडत होते. जणूकाही हे त्यांचंच दुकान, नव्हे तर किचन होतं आणि आई वा आजीकडे खायला मागायला जातो तसे लोक येऊन हक्काने आत्मियतेने आणि आनंदाने पिझ्झा घेत होते. आमच्याशी जेवढ्या प्रेमाने ती मुलगी बोलली तेवढ्याच प्रेमाने ती सर्वांशी बोलत होती. मस्त हसरी, उत्साही, आणि नम्र. येणार्‍या प्रत्येकाचा मूड ती प्रसन्न करीत असावी. आमचा पिझ्झा आतल्या भट्टीत बनत होता त्यामुळे वेळ मिळाल्यावर मी तिच्याशी गप्पा मारत होते. एकोणीसशे एक्काहत्तर मध्ये तिच्या आई-वडिलांनी रोलांदो आणि मारिया बुती ह्यांनी हे रेस्टॉरंट सुरू केलं होतं जे आता फेरारामधलं एक उत्कृष्ट पिझ्झेरिया म्हणून ओळखलं जातं. सगळ्यात जास्त आणि सगळ्यात चांगले रिव्ह्यूज त्यांच्या रेस्टॉरंटला आहेत. हो, रीव्ह्यूजपण क्वालिटी ठरवतात नाही का हल्ली. त्या पंधरा मिनिटांत ह्या रेस्टॉरंटशी माझंही नातं जमल्यासारखं झालं. मी तिला म्हटलं, "मला एक तुझा फोटो पाहिजे". तर म्हणाली, "थांब मी माझ्या बहिणीला बोलावते". म्हणजे ह्या दोघी बहिणी मिळून आई-वडिलांचा वारसा पुढे चालवीत होत्या. बहिणीला बोलाविण्याचा त्या छोट्याशा इन्सिडंटमध्ये तिचं व्यक्तीमत्व असं मस्त समोर आलं. आता मी एक टूरिस्ट, रेस्टॉरंट बिझी होतं, माझ्या फोटो काढण्याच्या रीक्वेस्टला ती नाही म्हणू शकत होती, पण तिने हो म्हटलं, स्वत:ला जरा ठाकठिक केलं, केस नीट केले तोपर्यंत बहीण आली, तीही हसरी आणि प्रेमळ वाटली आणि आम्ही फोटो काढले. ज्या आई-वडिलांनी हे रेस्टॉरंट सुरू केलं ते कुठे आहेत हे विचारायचं धाडस नाही झालं कारण १९७१ ला ते पंवविशीत वा तीशीत असतील म्हणजे त्यांचं वय आता ऐंशीच्या वर असणार. हयात आहेत की नाहीत कल्पना नाही. त्यांना बाय बाय करून आम्ही निघणार तेवढ्यात आमच्यासमोर एक ज्येष्ठ सिनियर सिटिझन सायकलवरून उतरले, कॅरियरला अंडी आणि कांदे अडकवलेले, ते काढले आणि हसत हसत फेडेरिका आणि किआरा ह्या दोन भगिनींच्या हाती दिले. हे वडील तर नव्हे हा विचार करतानाच फेडेरिकाने ओळख करून दिली हेच ते त्यांचे वडील ज्यांनी हे रेस्टॉरंट सुरू केलं. वा! पिझ्झेरियाच्या मुख्य हिरोची भेट झाली आणि आम्ही खुश झालो. वयाच्या त्र्याऐंशीव्या वर्षी रोलांदो एकदम फिट अँड फाइन होते. सायकल चालवित होते. सामान घेऊन आल्यावर एप्रन चढवून लागलीच काऊंटरच्या मागे जाऊन कामाला सुरुवातही केली. त्यांच्यासोबत फोटो काढून आम्ही पुढच्या प्रवासाला लागलो. आज दीड महिना झाला ह्या आमच्या अर्ध्या तासाच्या भेटीला पण ही माणसं कायमची लक्षात राहिली. त्यांच्याकडच्या त्या प्रेमाने बनविलेल्या पिझ्झाची चव आजही जीभेवर रेंगाळतेय.

संपूर्ण इटली अशा फॅमिली ओन्ड छोट्या छोट्या रेस्टॉरंट्सनी भरलंय. पिझ्झेरिया, त्रातोरिया, ओस्तेरिया, फियासचेत्तेरिया, एनोतेका, पानिनोतेका अशा अनेक नावांनी ती ओळखली जातात त्यांच्या वैशिष्ट्यांसह. जनरेशन टू जनरेशन ही चालत राहतात. मोठ्या रेस्टॉरंट्सना जेवढा मान आहे तेवढाच ह्या छोट्यांनाही. तेवढीच स्वच्छता आणि क्वालिटी ही छोटी आऊटलेट्सही जपतात. इटली मला आवडतं ते ह्याच कारणामुळे. प्रत्येकजण आपल्या विश्वात मग्न. छोटे मोठे सर्व एका पातळीवर. किमान आपण पर्यटकांना दिसते ती बाजू तरी अशी आहे. लोकं असेल त्यात समाधानी दिसतात आणि त्यातच आनंद मानतात.

प्रवासात दमायला होत नाही ते ह्याच कारणामुळे. डोळे कान उघडे ठेवले तर पावलापावलावर अशी प्रेरणादायी व्यक्तिमत्व भेटतात. द वर्ल्ड इज रीअली ब्युटिफुल!


अरेच्या! हे मला माहितच नव्हतं...

Know the Unknown

पॅसिफिक समुद्रात सहाशे बेटाबेटांनी बनलेला न्यूझीलंड हा देश जगातला सर्वात तरुण देश मानला जातो कारण या देशावर मनुष्य वस्तीला सुरुवात झाली तीच मुळी इसवी सन १३०० मध्ये. न्यूझीलंडमध्ये सुमारे ७५० वर्षांपूर्वी पोलिनेशियामधून काही लोक आले आणि या भूमीवर मानवाचे पहिले पाऊल उमटले. हेच लोक आता ‘माओरी जमातीचे’ लोक म्हणून ओळखले जातात. पुढे १८४० मध्ये ब्रिटिशांनी या बेटांवर ताबा मिळवला. ‘ट्रीटी ऑफ वायटांगी ’ नावाने ओळखल्या जाणार्‍या करारामुळे माओरी आणि ब्रिटिश यांच्यात ही भूमी एकोप्याने, मिळून मिसळून वापरण्याचा समझोता झाला. या देशाला युरोपियन लोकांनी ठेवलेलं नाव होतं ‘नोव्हा झीलँडिया’. या डच नावाचे इंग्रजी रुप म्हणजे ‘न्यूझीलंड’. माओरी लोकांनी या देशाला त्यांच्या माओरी भाषेत ‘आओटिरौ’ असे नाव दिले होते. या लोकांच्या भाषेत ‘माओरी’चा अर्थ ‘साधे’ किंवा ‘नॉर्मल’ लोक असा होतो. माओरी लोकांना लेखनाची कला अवगत नव्हती, त्यांची सगळी परंपरा मौखिक आहे.

माओरी लोकांमध्ये एकमेकांना भेटल्यावर अभिवादन करण्याची पध्दत अगदी अनोखी आहे. ते शेक हँड करत नाहीत किंवा नमस्कार ही करत नाहीत तर जवळ येऊन एकमेकांचे कपाळ आणि नाक एकमेकांना भिडवतात. अशा प्रकारे नाकाला नाक भिडवल्यामुळे ‘एकमेकांच्या आयुष्याचा श्वासच’ जणू वाटून घेतला जातो आणि अशा व्यक्तींचे जन्माचे मैत्रीबंध निर्माण होतात अशी त्यांची समजूत आहे. माओरी लोकांमध्ये चेहर्‍यावर वेगवेगळे टॅटू काढण्याला विशेष महत्व आहे. टॅटूने चेहरा रंगवण्याला ते ‘टा मोको’ म्हणतात. टॅटू करण्यामागे त्यांचा फक्त नटण्याचा उद्देश नसतो तर या टॅटूंवरुन त्या त्या व्यक्तीचे समाजातील, टोळीतील स्थान कळते. प्रत्येक माओरी व्यक्तीच्या चेहेर्‍यावरील टॅटू म्हणूनच वेगळा असतो. हा टॅटू काढण्यासाठी शार्क माशाचा दात वापरण्याची परंपरा आहे. माओरी लोकांच्या पारंपरिक पुराणकथांनुसार ‘रांगी’ म्हणजे ‘आकाश पिता’ आणि ‘पापा’ म्हणजे भूमी माता यांचे लग्न झाले आणि त्यातून या विश्वाची उत्पत्ती झाली. माओरी लोक कलानिपुण आहेत. ‘वैअटा’ (गाणी), ‘हाका’ ( नृत्य) आणि ‘मॉटिटी’ (कविता) यातून त्यांनी आपला इतिहास आणि पारंपारिक ज्ञान जतन केलं आहे. समूहाने राहाणारे माओरी लोक जेवण बनवतानाही एकत्र येतात. त्यांच्या पारंपरिक जेवण बनवण्याच्या पध्दतीला ‘हांगी ’ म्हणतात. हांगीमध्ये चिकन, मासे, बोकड, भाज्या असे सगळे एकत्र करुन जमिनीत पुरले जाते आणि वर  आग पेटवून त्या धगीवर पदार्थ शिजवला जातो. पदार्थ शिजायला वेळ लागत असल्याने साहजिकच जमलेल्यांच्या गप्पा-टप्पा, गाणी-गोष्टी करुन होतात. मार्च ते डिसेंबर या कालावधीत वीणा वर्ल्डच्या न्यूझीलंड टूरमध्ये सहभागी होऊन माओरींच्या अनोख्या संस्कृतीचे दर्शन घ्यायची संधी सोडू नका.


वीणा वर्ल्ड ट्रॅव्हल मिशन

Veena World Travel Mission

एका आयुष्यात आपला संपूर्ण भारत बघायचा आणि जगातल्या किमान शंभर देशांना भेट द्यायची हे पर्यटनातलं लक्ष्य आम्ही आमच्यासमोर, वीणा वर्ल्ड टीमसमोर, आमच्या टूर मॅनेजर्ससमोर आणि आमच्या पर्यटकांसमोर ठेवलंय. आयुष्यात आपली अनेक लक्ष्य असतात आणि कर्तव्यसुद्धा, त्यांना निश्चितच अग्रक्रम परंतु पर्यटन हा आयुष्यातला आनंद आहे, जगण्याला उर्जा देणारा एक घटक आहे आणि मुख्य म्हणजे जेव्हा हे मिशन100 किंवा मिशन10 प्रत्येकाला जमेल-झेपेल तसं आपल्यासमोर ठेवतो तेव्हा एक दिशा मिळल्यासारखी वाटते. समथिंग टू लूक फॉरवर्ड टू. मग प्रश्न येतो की हे एकामागे एक देश बघायचे कसे?

दर महिन्याला प्रसिद्ध होणारं वीणा वर्ल्डचं ट्रॅव्हल प्लॅनर जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने तुमच्या ट्रॅव्हल मिशनचं प्लॅनिंग करता येईल. तुम्हाला एकापाठी एक वेगवेगळ्या टूर्स सीझनप्रमाणे करता येतील अशीच भारतातल्या आणि जगभरातल्या टूर्सची आखणी केलेली आहे. म्हणजे कुणाला एकावेळी एक देश बघायला आवडतो तर कुणाला एकावेळी दहा-बारा देश. ह्या दोन्ही प्रकारच्या टूर्स वीणा वर्ल्डकडे आहेत. प्रत्येक देशात सर्वसाधारणपणे एक छोटी आणि एक मोठी अशा टूर्स असतात उदाहरणार्थ बेस्ट ऑफ ग्रीस आणि ऑल ऑफ ग्रीस. पर्यटक त्यांच्या आवडीनुसार, सवडीनुसार आणि बजेटप्रमाणे टूर्स सिलेक्ट करू शकतात. आमचा सल्ला असा असतो की दरवर्षी भारतातली एक टूर करा आणि एक परदेशातली. एका फटक्यात अनेक देश करायचे असतील तर वेस्टर्न युरोप किंवा इस्टर्न युरोपच्या टूर्समध्ये एका वेळी पाच ते पंधरा देश होऊ शकतात. आणि हो, हे फक्त टूर्सला जाणार्‍या पर्यटकांसाठीच नाही तर इंडिव्हिज्युअली कस्टमाईज्ड हॉलिडे घेऊन जाणार्‍या पर्यटकांनाही आम्ही अगदी महिन्याभराचा हॉलडे प्लॅन करून देऊ शकतो, ज्यामध्ये एका हॉलिडेत युरोपातले १५ ते २० देश बघून होऊ शकतात. इच्छा असली तर मार्ग दाखवायला आणि सर्वोतपरी सहाय्य देण्यासाठी वीणा वर्ल्ड आहेच. सो चलो, बॅग भरो, निकल पडो! मिशन100 के तरफ कदम कदम बढाए जा...

#VeenaWorldTravelMission


काय बाई खाऊ... कसं गं खाऊ!

कोणताही पदार्थ जन्माला येतो तो एखाद्या विशिष्ट हवामानातून, त्या भूभागाची वैशिष्ट्ये घेऊन आणि त्या प्रदेशातल्या उपलब्ध घटक पदार्थांमधून. मग एखादा भूभाग किंवा प्रदेश जेंव्हा दोन खंडांच्या सांध्यावर विराजमान झालेला असतो तेंव्हा त्या भागातली खाद्य संस्कृती किती चटकदार, चवदार असेल? याचं आदर्श उदाहरण म्हणजे ‘बकलावा’. या डेझर्टचं नाव तर तुम्ही नक्कीच ऐकलं असेल. कदाचित आता भारतातही अनेक शहरात हे ‘टर्किश डिलाइट’ उपलब्ध असल्याने त्याची चवही चाखली असेल. अतिशय तलम अशी फायलो पेस्ट्री, त्यावर पेरलेले अक्रोड, पिस्ते आणि खरपूस बेक केल्यानंतर त्यावर घातलेली मध, गुलाबपाणी, साखरेचा पाक, लिंबाचा रस याची आंघोळ यामुळे बकलावा म्हणजे अमृताहूनी गोड अशा चवीचा पदार्थ बनतो. ड्रायफ्रूटस, मध, साखर आणि खरपूस भाजल्यामुळे सुटलेले पापुद्रे यामुळे बकलावा एकदम रॉयल डिश होऊन जाते. बकलावाचा इतिहास सांगतो की इस्तंबूलच्या ‘टोपकापी पॅलेस’ या शाही राजवाड्याच्या मुदपाकखान्यात या पदार्थाचा जन्म झाला. ओटोमन सुलतानांच्या परिवाराचे रक्षण करण्यासाठी सदा सज्ज राहाणार्‍या ‘जानीसारीं’ना सुलतान स्वतः रमदानच्या काळात सन्मानपूर्वक बकलावा देत असे. या पदार्थाचे नाव हे कदाचित मंगोलियन भाषेतील ‘बयला’ या शब्दावरुन आले असावे असा अंदाज व्यक्त केला जातो. या शब्दाचा अर्थ ‘गुंडाळणे’, ‘एकावर एक थर रचणे’ असा होतो आणि बकलावा बनवीताना याच क्रिया केल्या जातात. बकलावा त्रिकोणी, चौरस, पंचकोनी अशा विविध आकारात बनवला जातो. 17 नोव्हेंबर हा दिवस टर्कीमध्ये ‘बकलावा डे ’ म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या बकलावाची ओरिजिनल टेस्ट चाखण्यासाठी वीणा वर्ल्डच्या टर्की सहलीत अवश्य सहभागी व्हा. देश-विदेशातील अशाच विविध खाद्यपरंपरा आणि ट्रॅव्हलचे भन्नाट अनुभव ऐकण्यासाठी वीणा वर्ल्डचा ‘ट्रॅव्हल एक्सप्लोअर सेलिब्रेट लाईफ’हा पॉडकास्ट नक्की ऐका

www.veenaworld.com/podcast


टूर आणि हॉलिडे

आपल्या डोक्यात अनेक गोष्टींचा गुंता असतो. त्यातला पर्यटनाशी संलग्न गुंता म्हणजे कशाला काय म्हणायचं किंवा त्यातला नेमका फरक काय? पिकनिक, हँगी, आऊटिंग, ट्रिप, टूर, हॉलिडे, एक्सकर्शन, व्हेके, सुट्टी, रजा, एक्स्पीडिशन, गेटअवे, जर्नी, ट्रॅव्हल, वॉयेज& आम्ही टाइमपास म्हणून ह्या सगळ्या शब्दांचे नेमके अर्थ आणि त्यातला फरक ह्यावर चर्चा करीत बसलो होतो. छोटी सारा, सुनिलाची मुलगी तिथे होती आणि ती म्हणाली, जे इना (वीणा) करते ती टूर आणि जे ममा (सुनिला) करते तो हॉलिडे. अरे वाह! एवढं सोप्पं होतं का ते. वीणा वर्ल्ड मध्ये आता सुनिला पाटील ग्रुप टूर्स, इंडिव्हिज्यूल हॉलिडेज्, माइस कॉर्पोरेट टूर्स, इनबाऊंड म्हणजे एनआरआई फॉरिनर्स साठीच्या इंडिया टूर्स ह्या सर्व गोष्टींवर काम करीत असली तरी पूर्वी किंवा अजूनही काही प्रमाणात ग्रुप टूर्सवर मी काम करायचे आणि बाकी सगळ्या गोष्टी सुनिलाच्या अखत्यारित होत्या. त्यामुळे साराचं म्हणणं अगदी बरोबर होतं. मी आणखी विचार करू लागले तर अ‍ॅक्च्युअली आमच्या दोघींच्या व्यक्तिमत्वामध्येही फरक आहे. आयुष्यभर माझं पर्यटन हे ग्रुप टूर्स सारखंच झालं. कमीत कमी वेळात जास्तीत जास्त बघायचं. सकाळी आठ ते रात्री आठ, डोळे दमेपर्यंत बघायचं आणि पाय थकेपर्यर्ंत भ्रमंती करायची. आणि तो माझा ग्रुप टूर्सचा माइंडसेट होता वा आहे. पुन्हा पुन्हा थोडंच यायचंय आणि आलोय एवढे कष्टाचे पैसे भरून तर जास्तीत जास्त बघूया हा विचार. सुनिला बहुतेक वेळा कुठेही गेली तरी जास्त दिवस एखाद्या ठिकाणी राहणार. आरामात एक एक करीत सगळ्या गोष्टी बघणार. सुशेगाद त्याचा आस्वाद घेणार. हल्ली आमचे सर्व फॅमिली हॉलिडेज् सुनिलाच प्लॅन करतेय. टूर्स आणि हॉलिडे हे पर्यटनातले दोन प्रकार जरी असले तरी ते दोन वेगवेगळे माइंडसेट आहेत माझ्यासारखे आणि सुनिलासारखे. प्रत्येक प्रवाशाने आपण कोणत्या प्रकारातले पर्यटक आहोत ह्याची चाचपणी केली पाहिजे. जर ग्रुप टूरवाला पर्यटक कस्टमाईज्ड हॉलिडेला गेला आणि कस्टमाईज्ड हॉलिडेज्चा पर्यटक ग्रुप टूरला आला तर टूर वा हॉलिडेची मजा सोडूनच द्या पण संताप आणि मनस्तापाला आमंत्रण. सो बी केअरफुल अ‍ॅन्ड बी अवेअर अबाऊट युवरसेल्फ. आम्हाला नेहमी विचारला जाणारा प्रश्न म्हणजे, ‘अहो आम्हाला फक्त आमच्याच फॅमिलीसोबत एकट्यांनाच जायचंय तर तुम्ही सगळी व्यवस्था करून द्याल का?‘ व्हाय नॉट? हे सगळं काम शंभर टक्के यशस्वी करणारी आमची इंडिव्हज्युअली जाणार्‍या पर्यटकांसाठीची डिव्हिजन आहे ती म्हणजे ‘वीणा वर्ल्ड कस्टमाईज्ड हॉलिडेज् डिव्हिजन‘. इथे एका व्यक्तीपासून फॅमिली फ्रेंडसचा तुमचा कितीही मोठा ग्रुप असेल त्यासाठी तुम्हाला हवी तशी सर्व व्यवस्था केली जाते. तुमच्या आवडीची एअरलाईन, तुम्हाला हवा तो विमानाचा क्लास, कोणत्याही प्रकारची त्या भागात उपलब्ध असलेली कार वा व्हॅन किंवा बस, तुमच्या पसंतीची हॉटेल्स, तुम्हाला हवे तेवढे दिवस वास्तव्य, अगदी चार्टर्ड फ्लाइट, प्रायव्हेट जेट हवं असलं तरी ती सर्व व्यवस्था तसंच कोणत्याही प्रकारचा अगदी लक्झुरी एक्सपिरियन्स तुम्ही घेऊ शकता. ‘यू नेम इट अँड वुई विल मेक इट पॉसिबल‘ असा मामला. त्यामुळे तुम्हाला जगात कुठेही कधीही कसंही जायला आवडत असेल तर वीणा वर्ल्ड कस्टमाईज्ड हॉलिडे डिव्हिजन आहे तुमच्या दिमतीला, एनिटाइम एनिव्हेअर अराउंड द वर्ल्ड!


हॉलिडे

जस्ट वे यू लाइक इट!

तुम्ही कधी लॉजमध्ये वास्तव्य केलंय? असा प्रश्न विचारला तरी आपल्यापैकी अनेकजणांची तळपायाची आग मस्तकात जाईल. आणि ते चुकीचं नाही. आपल्याकडे लॉज म्हणजे सर्वात कनिष्ट स्तरावरचं वास्तव्य समजलं जातं आणि बहुतेक लॉजेसची अवस्थाही तशीच असते. गतानुगतिक लॉजची अवस्था बघून त्याची इमेज अतिशय खराब झालीय. पण हे आपल्याकडे. ऑस्ट्रेलियात पंतप्रधानांच्या कॅनबेरातील ऑफिशियल निवासस्थानाला ‘लॉज‘ म्हणतात. आणि ऑस्ट्रेलियात हॉटेल्सपेक्षाही प्रसिद्ध आहेत ती लॉजेस. कारण बहुतेक वेळा ती निसर्गाच्या सान्निध्यात असतात. पर्सनलाइज्ड सर्व्हिस देतात आणि लक्झुरियस असतात.

आयर्स रॉक किंवा उलरू म्हणजे ऑस्ट्रेलियातील मूळ रहिवासी अ‍ॅबरेगिनल्सचं प्रवित्र स्थान. इथे येण्यासाठी खास करून तेथील काता जूता नॅशनल पार्कमधील ‘लाँगीट्यूड 131’ ह्या लक्झरी लॉजमध्ये राहण्यासाठी लोकं दोन दोन वर्ष आधी बुकिंग करतात. सोळा टेन्ट्स असलेल्या ह्या लॉजमधल्या एका कॉटेजचा एका रात्रीचा खर्च अडीच लाख ते पाच लाख रुपयांपर्यंत आहे. फ्लोअर टू सिलिंग ग्लास विंडोजमधून दिसणारं उलुरूचं अप्रतिम दृष्य आणि रात्र चांदण्यांनी भरलेल्या आकाशाखाली बसून जेवण घ्यायचा इथला अनुभव केवळ अफलातून. ऑस्ट्रेलियातील कांगारू आयलंडच्या बीचवर असंच एक मस्त लॉज आहे ‘सदर्न ओशन लॉज‘ जिथे आपण सी लायन कॉलनीमधून एखाद्या व्हिआयपी प्रमाणे ऐटित वॉक घेऊ शकतो. क्वीन्सलँड ऑस्ट्रेलियामधल्या हॅमिल्टन आयलंडवर आहे ‘क्वालिया लॉज‘ जे खास हनिमूनर्ससाठी प्रसिद्ध आहे. इथून आपण सी प्लेन घेऊन ग्रेट बॅरियर रीफच्या अवाढव्य पसरलेल्या सागरी संपत्तीमधल्या हृदयाचा आकार असलेल्या ‘हार्ट रीफ‘ला भेट देऊ शकतो. ऑस्ट्रेलियन विनयार्डज् जगभरच्या पर्यटकांना आकर्षित करीत असतात आणि त्याचसोबत तेथील एक से एक लॉजेस सुद्धा. बरोसा व्हॅलीमधलं ‘द लुईस‘ हे लॉज सुद्धा असंच. पर्यटकांच्या यादीत अव्वल दर्जावर असलेलं. इथे आपल्याला ‘ब्रेकफस्ट विथ कांगारू‘ चा अविस्मरणीय अनुभव घेता येतो.

संपूर्ण ऑस्ट्रेलियात अशी अनेक अफलातून लॉजेस  आपल्याला बघायला मिळतात. त्यातलीच काही म्हणजे, डेन्ट्री फॉरेस्टमधलं सिल्कि ओक्स लॉज, व्हेल शार्क हम्पबॅक व्हेल्ससाठी प्रसिद्ध असलेल्या निंगालू रीफचा साल सालीस हा लक्झरी सफारी टेन्ट्स लॉज, कोल्स बे टास्मानियाचं सफायर फ्रेशिनेट लॉज, क्वीन्सलँडचं लिझर्ड आयलंड लॉज इत्यादी

आम्ही नेहमी म्हणतो की आयुष्य म्हणजे आठवणींचा महासंग्रह. आठवणी आनंदी बनवणं हे आपलं काम आणि आनंदी बनविण्यासाठीचा एक पर्याय म्हणजे पर्यटन, त्या पर्यटनात आम्ही तुमचे सहकारी. आणि त्यात एकदम अनोखे जरा हटके अनुभव घ्यायचे असतील तर त्यासाठी आहे वीणा वर्ल्ड कस्टमाईज्ड हॉलिडेज् डिव्हीजन. वैयक्तिकरित्या तुम्ही गेलात तरी 24/7 तुमच्या दिमतीला व्हर्च्युअली आमची टीम असल्याने कुठेही काहीही अडचण आली तरी त्यावर तातडीने तोडगा काढण्यासाठी ते तत्पर असतात आणि हॉलिडेवर आपल्याला हॅन्डिकॅप व्हायला होत नाही. सो ऑस्ट्रेलियाला पुन्हा एकदा भेट द्यायला लॉजेसचा बहाणा पुरेसा आहे नाही का?

customizedholidays@veenaworld.com

February 10, 2024

Author

Veena Patil
Veena Patil

‘Exchange a coin and you make no difference but exchange a thought and you can change the world.’ Hi! I’m Veena Patil... Fortunate enough to have answered my calling some 40+ years ago and content enough to be in this business of delivering happiness almost all my life. Tourism indeed moulds you into a minimalist... Memories are probably our only possession. And memories are all about sharing experiences, ideas and thoughts. Life is simple, but it becomes easy when we share. Places and people are two things that interest me the most. While places have taken care of themselves, here are my articles through which I can share some interesting stories I live and love on a daily basis with all you wonderful people out there. I hope you enjoy the journey... Let’s go, celebrate life!

More Blogs by Veena Patil

Post your Comment

Please let us know your thoughts on this story by leaving a comment.

Looking for something?

Embark on an incredible journey with Veena World as we discover and share our extraordinary experiences.

Balloon
Arrow
Arrow

Request Call Back

Tell us a little about yourself and we will get back to you

+91

Our Offices

Coming Soon

Located across the country, ready to assist in planning & booking your perfect vacation.

Locate nearest Veena World

Listen to our Travel Stories

Veena World tour reviews

What are you waiting for? Chalo Bag Bharo Nikal Pado!

Scroll to Top