Published in the Saturday Lokasatta on 09 August 2025
...काही वर्षांपूर्वी मेक्सिकोतल्या युकातान पेनिन्सुला मधल्या मायन साम्राज्याची महती सांगणाऱ्या चिचेन इत्झा ला गेलो होतो. भरपूर पायऱ्या चढून वर जायचं होतं. धापा टाकीत घाम गाळत...
गेल्या रविवारी भरपूर पाऊस पडत होता. `स्लो डाऊन’, ‘टेक इट इझी’ सांगत होता. सकाळी आकाशवाणी, एफ एम रेडिओवरही ‘शक्यतो घरातच रहा’ हा सल्ला मच्छिमार बांधवांना देण्यात आला होता. तो आम्हीही पाळला आणि घरातच राहिलो. ‘तळलेलं काही खायचं नाही’ ह्या नियमाला बगल देत कांदा भजीचा यथेच्छ आस्वाद घेतला आणि घरी असतानाच्या ‘साफ सफाई’ या कार्यक्रमाला वाहून घेतलं. आजचं मिशन ठरवलं, कागदपत्र डायऱ्या पुस्तकं ह्यातलं हवं नको बघायचं. हव्या असलेल्या गोष्टी नीट रचून ठेवायच्या आणि नको असलेल्यांची काय वासलात लावायची ती लावायची. गेल्या दहा वर्षातल्या बऱ्याच डायऱ्या, वह्या मिळाल्या, त्या चाळता चाळता अनेक आठवणींना उजाळा मिळाला. प्रत्येक डायरीत अनेक प्लॅन्स होते. त्यातले काही बिझनेस संबंधित होते तर काही पर्सनल. प्रत्येक डायरीचा पंचवीस टक्के भाग ह्या प्लॅनिंगने व्यापला होता. आता कालांतराने त्या प्लॅॅॅनिंगकडे बघायला मजा येत होती. काही प्लॅॅन्स प्रत्यक्षात उतरले होते तर काही त्या कागदावरून पुढे गेलेच नव्हते. ज्या प्लॅन्सचा बऱ्यापैकी बोजवारा उडाला होता ते होते पर्सनल. नेमकं किती वाजता उठायचं? उठल्यावर वाचन करायचं की मनन-चिंतन की योग? मॉर्निंग वॉकला कधी जायचं, किती वाजता आणि किती वेळ चालायचं? स्विमिंग आठवड्यातनं दोनदा की तीनदा आणि कोणकोणत्या वेळी? मसल स्ट्रेंग्थ वाढवणं हे तर मस्ट, त्यामुळे जीम दोन दिवस हवंच, पण त्यासाठी वेळ सकाळची की संध्याकाळची? आठवड्यातनं एक दिवस मसाज स्पा ची गरज असतेच तो दिवस कोणता? सकाळी ज्युस प्यावा की काढा की गरम पाणी लिंबू? कार्बोहायड्रेट्स प्रोटिन्स आणि फॅट्स मध्ये रेंगाळलेली अनेक पानं त्या डायऱ्यांमध्ये होती. ह्या डायऱ्या किंवा वह्या गेल्या दहा अकरा वर्षातल्या, त्या सांगत होत्या काय बरोबर आणि काय चूक. आज सगळं जग सस्टेनेबिलीटीचा उहापोह करतेय किंवा अनेक ठिकाणी त्याचा ‘शो ऑफ’ दिसतोय. त्या सस्टेनेबिलिटीसाठी लागणारी कन्सिस्टन्सी आणि कंटिन्युइटी माझ्या ह्या प्लॅनिंगमध्ये दिसली तरी वास्तवात त्या प्लॅनिंगबरहुकुम गोष्टी घडल्या नाहीत. मला सातत्य नाही राखता आलं हे मान्य करायला पाहिजे. आपलं अपयश स्विकारायला पाहिजे नाही का, त्याशिवाय यश काय किंवा यशासाठी कोणता मार्ग चोखंदळायचा ते कसं कळणार. म्हणजे आज ह्या डायऱ्यांची पानं उलटताना जरी हा सगळा मामला समोर आला असला तरी गोष्टी आपण ठरवतो तशा होत नाहीत हे बऱ्यापैकी आधी लक्षात आलं होतं. त्यात कोविडने जगाला ग्रासलं आणि आयुष्याच्या क्षणभंगूरतेची जाणीव झाली. ‘खूप दूरचं खूप मोठं प्लॅनिंग करू नका’ असा सल्लाच जणू तो कोविड आपल्याला देऊन गेला. तंत्रज्ञानात होणारे बदल तर अनेक गोष्टींच्या अस्तित्वालाच शह देताहेत. ॲमेझॉनच्या जेफ बेसोज्ला एका मुलाखतीत विचारलं, ‘पुढच्या दहा वर्षाचं काय प्लॅनिंग आहे तुमचं?’ तर म्हणाला, ‘टेक्नॉलॉजी एवढी बदलतेय की मी एवढं लाँगटर्म प्लॅनिंग नाही करू शकत. जस्ट पुढच्या तीन वर्षांचा विचार करतोय तोही सावधपणे.’ ह्या अवाढव्य कंपन्यासुद्धा जर पुढचं प्लॅनिंग करायला डळमळत असतील तर मग आपल्या बाबतीत अनेक गोष्टी प्लॅनिंगप्रमाणे घडल्या नसतील तर ‘इट्स ओके’ म्हणत मी स्वतःची समजूत काढली, जरी मनापासून मला ते ओके वाटत नसलं तरी. कारण माझ्या धरसोड वृत्तीमुळे माझी अनेक प्लॅनिंग्ज फेल गेली होती.
मागे कधीतरी एकदा स्वामी नारायण संप्रदायाच्या प्रमुखस्वामींच्या शिष्यगणातील ग्यानवत्सल स्वामींचं पॉडकास्ट ऐकताना त्यांनी सांगितलेला एक विचार भावला, तो म्हणजे, ‘जादा काही करायची गरज नाही फक्त आज रात्री उद्या काय करायचं ते ठरवा. अगदी एका चतकोर कागदावर लिहा, पण फक्त तेवढ्या एका दिवसाचं-उद्याचं प्लॅनिंग करा. आणि त्यानुसार प्रथम किमान एकवीस दिवस आणि कमाल नव्वद दिवस, तीन महिने सातत्याने ती गोष्ट करा. आयुष्य बदलून जाईल’. एक जानेवारीवालं केलेलं वर्षाचं प्लॅनिंग एक महिनाही टिकलं नाही कधी. त्यापेक्षा हे बरं आहे. फक्त उद्या काय करायचं ते मला ठरवायचंय आणि ते मात्र मनोभावे पूर्णत्वाला न्यायचं आहे. हे सोप्पं आणि करण्यासारखंही. एक दूरचं ध्येय किंवा लाँगटर्म गोल आपण ठरवलेलाच असतो. त्याच्या दिशेने मार्गक्रमणा चालू असते, पण अधेमध्ये आपला खूप वेळ वाया जातो त्या ध्येयाकडे नेणाऱ्या प्रत्येक दिवसाचं योग्य नियोजन न केल्यामुळे. त्याला आळा घालता आला पाहिजे.
काही वर्षांपूर्वी मेक्सिकोतल्या युकातान पेनिन्सुला मधल्या मायन साम्राज्याची महती सांगणाऱ्या चिचेन इत्झा ला गेलो होतो. भरपूर पायऱ्या चढून वर जायचं होतं. धापा टाकीत घाम गाळत मी पायऱ्या चढत होते आणि मधूनच ‘अरे बापरे अजून एवढं चढायचंय, केवढा दूर दिसतोय तो माथा?’ ही बडबड चालूच होती. मग सुधीरने म्हटलं, ‘वीणा एक गोष्ट कर, तुला माहितीय कुठं पोचायचंय ते. रस्ताही तुझ्यासमोर आहे. आता वर बघू नकोस, प्रत्येक पायरीकडे बघ, एक एक पायरी चढत रहा. दमायला होणार नाही. वन स्टेप ॲट अ टाइम’. आणि खरंच मी वर बघणं सोडून दिलं, पायऱ्या चढत राहिले आणि पोहोचले की चिचेन इत्झाच्या माथ्यावर. सुधीरच्या सल्ल्याने माझा थकवा कमी झाला होता. नवरेबुवांनाही बरंच काही कळतं!
आयुष्यात आपण अशा छोट्या प्रसंगांतून शिकतो, कधी ऐकायला मिळणाऱ्या विचारांतून, इतरांच्या अनुभवातून. आता बघानं ग्यानवत्सल स्वामींचा सल्ला काय किंवा हा चिचेन इत्झाचा अनुभव काय, एकच गोष्ट सांगतो, ‘खूप पुढचा विचार करून त्याने दमून जाऊ नका, नामोहरम होऊ नका.’
ज्या व्यक्तीने भारतात बिग बझार, पॅन्टालून्स सारख्या रीव्हॉल्युशनरी गोष्टी सर्वप्रथम यशस्वी करून दाखविल्या त्या किशोर बियानी नावाच्या एका ग्रेट मार्केटिंग पर्सनॅॅलिटीच्या बऱ्याच मुलाखती पॉडकास्टवर उपलब्ध आहेत. वेळ मिळेल तेव्हा असे अनेक पॉडकास्ट ऐकायचा माझा प्रयत्न असतो, मग ते घरात साफसफाई करताना असो वा प्रवासात. त्यातून मिळणाऱ्या अनेक विचारातल्या एका विचाराचा जरी आपल्याला उपयोग झाला तरी इट्स वर्थ इट. बियानींच्या एका मुलाखतीत पॉडकास्टर राज शमानीने त्यांना प्रश्न केला,‘आप क्या सलाह देना चाहोगे यंग जनरेशन को?’ ह्यांचं उत्तर, ‘बहुत बड़ा सोचने की जरूरत नहीं।’ पॉडकास्टर विचारतो, ‘आप ये बोल रहे हो?’ ते म्हणाले, ‘खुदके अनुभव से बोल रहा हूँ’, अंगावर शहारा आला त्यांचं ते प्रामाणिक अनुभवाने आलेलं विधान ऐकून. यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या एका रीव्हॉल्युशनरी आणि मोठ्या अपयशातही न खचता पुन्हा आयुष्याची गणितं सोडविणाऱ्या ह्या सेल्फ-मेड व्यक्तीची अनेक संभाषणं यू ट्यूबवर उपलब्ध आहेत. जरूर ऐकावी. फ्रॉम झिरो टू हिरो टू झिरो टू हिरो... अनुभवांतून शिकण्याचा तो खजिनाच जणू.
हल्लीच्या अतिवेगवान, तणावग्रस्त आणि अनिश्चिततेने भरलेल्या जगात अनेक गोष्टी आपल्या कंट्रोलच्या बाहेर आहेत. आणि म्हणूनच जी गोष्ट आपल्या हातात आहे त्यावर लक्ष केंद्रित करणं ह्यात शहाणपणा आहे. गेल्या महिन्यातल्या लीडरशीप मीटमध्ये आम्ही सर्वांनी मिळून एक मंत्र घेतला. सकाळी उठल्यावर स्वत:ला विचारायचं की, ‘आजचा दिवस मी कसा घालवणार आहे’. ॲक्चुअली घालवणार पेक्षा इथे कसा उपयोगात आणणार आहे ही गोष्ट महत्वाची आहे. कारण आजच्या दिवसातला प्रत्येक क्षण ही इनव्हेस्टमेंट आहे माझ्या उज्जवल भविष्यासाठीची. आणि संध्याकाळी ऑफिसमधून निघताना किंवा रात्री झोपताना मी स्वत:ला प्रश्न विचारणार आहे की, ‘आजचा दिवस चांगला गेला का?’ किंवा माझ्या मनात एक समाधान असणार आहे, ‘आजका दिन अच्छा गया!’ हे समाधान असंच मिळत नाही. त्यासाठी सकाळपासून रात्रीपर्यंत त्या दिवसातल्या प्रत्येक क्षणावर, मिनिटावर, तासावर आपल्याला सकारात्मकरित्या जागरूक राहून सावधपणे काम करावं लागतं. आणि ते केल्यावर रात्री जे काही समाधान मिळतं त्याचा आनंद केवल शब्दातीत.
स्टिव्ह जॉब्जच्या स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटीच्या सुप्रसिद्ध भाषणातलं ‘स्टे हंग्री, स्टे फुलिश’ आपल्या लक्षात राहतं पण त्या संपूर्ण भाषणाची पारायणं केल्यावर लक्षात येतं की, त्याच्या प्रत्येक निर्णयामागे ‘आज काय करायचं’ हेच स्पष्ट होतं. तो म्हणतो आयुष्य जगताना पुढचं चित्र कधीच स्पष्ट दिसत नाही. पण मागे वळून पाहिलं, की प्रत्येक क्षण, प्रत्येक निर्णय एकमेकांशी जोडलेला वाटतो, त्यावेळी जणू ते ठरलेलंच होतं. म्हणूनच आजची कृती, तो डॉट महत्वाचा ठरतो. उद्या मागे वळून पाहिल्यास समाधान देतो. द्रोणाचार्यांनी शिष्यांची परीक्षा घेतली आणि तुम्हाला समोर काय दिसतंय हे विचारलं तेव्हा त्यांनी जंगल, झाडं, फांदी, पक्षी, आकाश अशी उत्तरं दिली. अर्जुन म्हणाला, ‘माझ्या नजरेसमोर फक्त पक्ष्याचा डोळा आहे’. गतानुगतिके मार्गदर्शन करीत राहणारं हे उदाहरणंही हेच सांगतंय, ‘आता काय करायचंय त्यावरच लक्ष केंद्रित करा’. एखादा दिवस, एखादा विचार, एखादा वाक्य, एखादा निर्णय आपल्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरू शकतो. गांधीजी स्वत:ला प्रश्न विचारत, ‘आज कोणत्या सत्यासाठी उभं रहायचं आहे?’ दांडी यात्रा हे त्याचं उदाहरण आपल्याला सांगतंच आहे की, दररोजचं ते एक पाऊल वाटत असलं तरी त्याचं सामर्थ्य जग हलविणारं होतं, जेफ बेसोझने ॲमेझॉन सुरू करताना संपूर्ण रोडमॅप ठरवला नव्हता पण वॉल स्ट्रीटवर एक स्टेबल जॉब करताना स्वत:ला प्रश्न केला. ऐंशी वर्षाचा झाल्यावर मला कोणती गोष्ट जास्त त्रास देईल, मला जे करावसं वाटतंय त्यात आलेलं अपयश की ते न केल्याची खंत? आणि त्याने एका क्षणात निर्णय घेऊन नोकरी सोडली आणि एक एक पायरी चढत जगातली सर्वात मोठी कंपनी उभी केली. प्रत्येक गोष्ट प्लॅन नाही करता येत पण तो निर्णयाचा क्षण महत्वाचा, आणि त्यानंतर दर दिवशी सातत्याने सकारात्मकतेने आणि आत्मविश्वासाने केलेली कृती आवश्यक. चंद्रयानसारखी मिशन्स एकाच दिवसात घडत नाहीत. वर्षानुवर्षाचे प्रयत्न, चुकांमधून शिकणं, दररोज स्वत:ला विचारणं ‘आज काय सुधारता येईल?’ ह्या वृत्तीमुळेच तर असामान्य यश मिळू शकतं हे इस्त्रोने दाखवून दिलं. हजारो वर्षांपासून ऋषी, तपस्वी कोणताही लाँग टर्म प्लॅन न करता फक्त ‘एक दिवस, एक मंत्र, एक ध्यान’, ही दिनचर्या पाळत ‘आयुष्य म्हणजे तो एक दिवस फक्त, त्यावर लक्ष केंद्रित करा’ हा संदेश देताहेत.
दोन वर्षांपुर्वी अबु धाबीला गेले होते. तेथील त्या अतिविशाल गॅलरीया मॉलमध्ये आम्ही टाइमपास करीत होतो. मासिमो दुतीच्या विंडो डिस्प्लेमध्ये एका मॅनेकनला पांढरा टी-शर्ट घातला होता. सुधीरला म्हटलं, ‘काहीही झालं तरी हा टी शर्ट मला घ्यायचाच आहे. थोडासा महाग असेल पण माझे लाड मीच का करू नये’. ‘एवढं काय आहे त्यात?’ नवरेबुवांचा स्वाभाविक प्रश्न. ‘अरे त्यावर काय लिहलंय बघ. माझी सध्याची जीवनशैली आहे ती. आय ॲम फॉलोइंग इट सक्सेसफुली’. ‘अगं मुंबईला जाऊन एक साधा टी-शर्ट घे आणि त्यावर पेंट करून टाक हा मेसेज. वन टेंथमध्ये काम होऊन जाईल’. ‘नो नो, हे मी पहिल्यांदा इथे पाहिलंय आणि मला ते ओरिजिनल स्वरूपातच पाहिजे. सम थिंग्ज आर प्राइसलेस’. ‘जर एवढे तुझे विचार पक्के असतील तर विचारतेसच कशाला? पैसे तुझे, इच्छा तुझी, विचार तुझे, कर जे काही करायचं ते’. एकंदरीतच नवरेबुवांच्या कोणत्याही संभाषणाला आपल्याला हव्या त्या दिशेला वळविण्याची आम्हा महिलांची अभिजात हातोटी असल्यामुळे मी त्या शोरूममध्ये घुसले आणि तो टी-शर्ट घेऊनच बाहेर पडले. आता तो टी-शर्ट म्हणजे एखाद्या दागिन्यासारखा माझ्या कपाटात विराजमान झालाय. तो घरी धुवायचा नाही ही सक्त ताकिद आमच्या वर्षा-श्रुतीला. काही दिवसांनी मी त्याला फ्रेम करून समोर लावणार आहे. आणि का करू नये. माझं आयुष्य सुसह्य केलंय त्याने. ‘इतना तो ग्रटिट्युड बनता ही है।’ साधा वाटणाराच मेसेज आहे पण प्रचंड शक्ती आहे त्यात. प्रत्येक क्षणाला सुवर्णमय करण्याची ताकद देणाऱ्या, त्या टी-शर्टवरचा विचार आहे, ‘वन डे ॲट अ टाइम!’
वीणा पाटील, सुनिला पाटील, आणि नील पाटील ह्यांचे दर आठवड्याला वृत्तपत्रात प्रकाशित होणारे लेख वीणा वर्ल्ड वेबसाईट www.veenaworld.com वर वाचनाकरिता उपलब्ध आहेत.
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.