Published in the Sunday Pudhari on 17 August 2025
...प्रत्यक्षात हे सगळे गैरसमज ऐकीव आणि जुन्या माहितीवर आधारित आहेत, जे अजिबातच खरे नाहीत. एक अगदी कॉमन गैरसमज म्हणजे...
काही दिवसांपूर्वी मी अचानक क्रुझ पर्यटनाबद्दल विचार करु लागलो. एखादा सिनेमा संपूर्ण पिढीलाच माहिती नसलेली ट्रॅव्हल स्टाईल कशी शिकवतो याचं उदाहरण म्हणजे ‘दिल धडकने दो’. या सिनेमाने भारतातल्या लोकांना क्रुझ टूरिझमची ओळख करुन दिली असं म्हणता येईल.
क्रुझ पर्यटनाचं ग्लॅमर आणि कुतुहल असूनही भारतीय पर्यटकांना क्रुझ पर्यटनात काय काय समाविष्ट असतं याची पूर्ण कल्पना नसते. उलट तिथे ड्रेस कोडच असतो, ते महागच असतं, असे क्रुझबद्दलचे गैरसमजच फार बघायला मिळतात. प्रत्यक्षात तिथे अशी बंधनं नसतात आणि भरपूर विविधता अनुभवायला मिळते.
अलीकडेच मी जेव्हा क्रुझ पर्यटनाची अधिक माहिती मिळवू लागलो, तेव्हा माझ्या लक्षात आलं की पर्यटनाच्या या विलक्षण पर्यायाबद्दल आपल्याला फारच वरवरची माहिती आहे. वीणा वर्ल्डचा भर जरी जमिनीवरच्या सहलींवरच असला तरी दरवर्षी आम्हीही थेट जगाच्या दोन्ही टोकांना - आर्क्टिक आणि अंटार्क्टिका ला पर्यटकांना क्रुझनेच नेतो की.
2013 मध्ये मी स्वतः केलेली अंटार्क्टिका क्रुझ मी कधीच विसरू शकणार नाही. या प्रवासाने माझा क्रुझकडे बघण्याचा दृष्टीकोनच बदलून टाकला. म्हणूनच या आठवड्यात मी क्रुझवर लिहायचं ठरवलं. क्रुझ पर्यटन म्हणजे नेमकं काय? ते का केलं पाहिजे? आणि विशेषतः भारतीय पर्यटकांसाठी तो सर्वात उत्तम पर्याय का आहे? याबद्दल सांगण्यासाठीच हा लेख. क्रुझेस बद्दल जे मला समजलं आहे आणि तुम्हालाही माहीत असावं असं सारं काही यात आहे.
अनेक वर्षं करिबिअन,मेडिटेरेनियन सारख्या लोकप्रिय कुझेस या फक्त पाश्चिमात्य प्रवाशांसाठीच आहेत असा समज प्रचलित होता. त्यामुळे भारतीय पर्यटक त्यापासून जरा लांबच राहत होते. आज मात्र जग पाहण्यासाठी क्रुझिंग हा एक सोईचा, आरामदायी आणि व्यापक अनुभव देणारा मार्ग ठरला आहे. याच कारणांमुळे भारतीय पर्यटकांमध्ये क्रुझिंगचा कल वाढताना दिसतोय.
सुलभता हीच या प्रवासाची खासियत आहे. एकदा का तुम्ही तुमचं सामान अनपॅक करुन, तुमच्या केबिनमध्ये सेटल झालात की मग येणारा प्रत्येक नवा दिवस तुम्हाला नव्या शहरात, नव्या किनाऱ्यावर, नव्या देशात नेणारा ठरतो. या पर्यटनात रोजच्या रोज हॉटेल चेक इनची कटकट नाही की ट्रान्सपोर्टेशनचा प्रश्न नाही आणि रोज काय खायचं हे ठरवायचा त्रासही नाही. प्रवासातील सगळ्या गोष्टी म्हणजे चविष्ट भोजन, लाईव्ह एन्टरटेनमेंट, मुलांसाठी ॲक्टिव्हिटीज्, सुनियोजित शोअर एक्सकर्शनपर्यंत सगळ्या गोष्टींची नेटकेपणाने काळजी घेतली जाते.
क्रुझवर फार सुंदरपणे वेगवेगळ्या प्रकारच्या पर्यटकांची सोय पाहिली जाते. वॉटर पार्कपासून ते लाईव्ह शो पर्यंत मनोरंजनाचे विविध प्रकार असल्याने एकाच कुटुंबातील वेगवेगळ्या वयोगटाचे लोक खूश होतात. हनिमूनसाठी किंवा लग्नाचा वाढदिवस साजरा करायला आलेल्या जोडप्यांना इथे रोमँटिक वातावरण आणि एकांताचा आनंद लुटता येतो. क्रुझवरील निवांत वातावरण आणि विनासायास मिळणाऱ्या सुविधांमुळे निवृत्त मंडळी सुखावतात, तर कॉर्पोरेट आणि इन्सेंटिव्ह ग्रुप्सना समुद्रातुन प्रवास करता करता ज्या सहजतेने आणि इनोव्हेटिव्ह पध्दतीने त्यांचे इव्हेंट्स करता येतात, त्यामुळे ते सुद्धा क्रुझ एन्जॉय करतात.
सध्या आपल्या जवळून म्हणजे मुंबई, कोचीन, दुबई, सिंगापूर इथूनही क्रुझेस सुटू लागल्या आहेत. त्यामुळे आता क्रुझिंग ही पाश्चिमात्यांची मिरासदारी राहिलेली नाही, तर जागतिक पर्यटकांनी स्वीकारलेली पर्यटनाची पध्दत बनली आहे. त्यातही भारतीय पर्यटकांचं तर क्रुझ इंडस्ट्री जणू हात पसरून स्वागतच करत आहे.
क्रुझ पर्यटन म्हटल्यावर अनेक भारतीय पर्यटकांच्या भुवया उंचावतात. ‘क्रुझ पर्यटन हे फार महाग आहे, फारच न झेपणारं आहे, आपल्यासारख्या लोकांसाठी नाहीच ते’ असे अनेक गैरसमज प्रचलित आहेत. प्रत्यक्षात हे सगळे गैरसमज ऐकीव आणि जुन्या माहितीवर आधारित आहेत, जे अजिबातच खरे नाहीत. एक अगदी कॉमन गैरसमज म्हणजे तुम्ही शीपवर बोअर व्हाल. या इतकी सत्यापासून लांब असलेली गोष्ट दुसरी नसेल. प्रत्यक्षात रोलर कोस्टर, वॉटर स्लाइड्स, पिकलबॉल, झिप लाईन्स, स्पा’ज्, सिनेमा, स्काय डायव्हिंग पासून ते कुकिंग क्लासेस, शॉपिंग, फाईन डायनिंग पर्यंत आधुनिक क्रुझवर असलेल्या सुविधांची रेलचेल पाहिल्यावर क्रुझ म्हणजे मनोरंजनाची तरंगती नगरीच असल्याची खात्री पटते. काही क्रुझवर तर आइस रिंक आणि गो कार्ट ट्रॅक्स सुध्दा असतात.
असाच आणखी एक प्रचलित असलेला गैरसमज म्हणजे, क्रुझेस या फक्त ‘अल्ट्रा रीच’ लोकांसाठीच असतात. आता हे खरं आहे की अल्ट्रा लक्झरी क्रुझिंगचा एक वेगळा वर्ग निश्चितच आहे, पण म्हणून सगळ्या क्रुझेस त्याच कॅटेगरीत असतात असं नाही. रिट्झ कार्लटन यॉट ‘ल्युमिनारा’,ओरिएंट एक्सप्रेसची ‘कोरिंथिएन’(जी आपला प्रवास पुढच्या वर्षी सुरू करेल), द फोर सिझन यॉट 1,‘अमानदिरा’ हे फिनिसी म्हणजे इंडोनेशियातील पारंपरिक जहाज या सगळ्या क्रुझेसचा अनुभव अतिशय दुर्मिळ आणि क्रुजिंगमधला सर्वोच्च म्हणता येईल असा असतो.
जरी अशा लक्झरी क्रुझ लाइन्स असल्या तरी एकूणच क्रुझेसमध्ये भरपूर पर्याय उपलब्ध आहेत. त्यातले अनेक पर्याय तुमच्या बजेटमध्ये सहज बसणारे आहेत. एकदा क्रुझ बुक केली की तुमचा निवास, भोजन, करमणूक, दोन ठिकाणांमधील प्रवास या सगळ्याची एका फटक्यात काळजी घेतली जाते. अनेकदा या सेवा वेगवेगळ्या बुक केल्यावर होणाऱ्या खर्चापेक्षा क्रुझ नक्कीच स्वस्त पडते.
काहीजणांना मोशन सिकनेसची चिंता क्रुझवर सतावते, पण आता स्टॅबिलायझर्समुळे आणि जहाजांच्या आधुनिक डिझाइन्समुळे, तुम्ही एका जहाजावर खोल समुद्रात आहात हेच विसरायला होतं. विशेषतः मेडिटेरेनियन किंवा करिबियन सारख्या शांत समुद्रात मोठ्या जहाजातून प्रवास करताना तर हा त्रास अजिबात होत नाही.
शेवटचा मुद्दा म्हणजे अनेकांना वाटतं की क्रुझवर गेल्यावर तुम्हाला काही स्वातंत्र्य राहत नाही, कारण त्यांचं स्ट्रिक्ट वेळापत्रक पाळावं लागतं. तर आता अनेक क्रुझेसवर जेवणाच्या वेळा फ्लेक्सिबल असतात, ऑफबीट एक्सकर्शन्स असतात आणि तुम्हाला तुमच्या गतीने क्रुझचा आनंद घ्यायची मुभा असते. मग प्रत्येक बंदरात उतरून स्थलदर्शन करायचं का निवांतपणे पूलशेजारी पुस्तक वाचत पहुडायचं हा चॉइस तुमचा असतो.
क्रुझेसच्या जगात डोकावल्यावर मला हे जग किती वैविध्यपूर्ण आणि विशाल आहे याची जाणीव झाली. प्रत्येक क्रुझ लाइनचं वैशिष्ट्य वेगळं, अनुभव वेगळा, वातावरण वेगळं आणि डेस्टिनेशन्सही अर्थातच वेगळी. त्यामुळे तुम्ही कोणती क्रुझलाईन निवडता यावर तुमच्या हॉलिडेची रंगत अवलंबून असते.
आता डिस्ने क्रुझचंच बघा ना, कुटुंबासाठी, विशेषतः जिथे लहान मुलं आहेत त्यांच्यासाठी ही क्रुझ म्हणजे पाण्यावरची मायावी दुनियाच ठरते. समुद्रावर प्रवास करताना डिस्नेची सुप्रसिध्द कॅरेक्टर्स भेटतात, थीम्ड डायनिंग आहे, म्युझिकल शोज्चा आस्वाद घेता येतो आणि फटाक्यांच्या आतिषबाजीची मजा लुटता येते. तुम्ही रॉयल करिबियन इंटरनॅशनलच्या क्रुझचा विचार कराल तर तिथे भव्यता आणि मनोरंजन यांचा संगम अनुभवायला मिळतो.‘आयकॉन ऑफ द सीज’ ही त्यांची नवीन शीप जगातली सर्वात मोठी शीप मानली जाते, कारण या क्रुझवर एकावेळी 7600 प्रवासी प्रवास करू शकतात. या क्रुझेसवरील सर्फ स्टिम्युलेटर्स, वॉटर पार्क, ब्रॉडवे शोज्, फाईन डायनिंगमुळे ही जणू मिनी शहरंच असतात. शिवाय ती तुम्हाला एका आकर्षक ठिकाणाकडून दुसऱ्या ठिकाणी तरंगत तरंगत घेऊन जातात. कुटुंबातल्या वेगवेगळ्या पिढ्यांसाठी व्हरायटी ऑफ ॲक्टीव्हिटीज् उपलब्ध असल्याने या क्रुझेस फॅमिली हॉलिडेसाठी अगदी आदर्श असतात. ज्यांना फ्लेक्सिबिलिटी हवी असते त्यांच्यासाठी सर्वोत्तम पर्याय म्हणजे नॉर्वेजियन क्रुझ लाइन्स. या क्रुझेसवर ठराविक डिनर स्लॉट्स, ड्रेसकोड याचं बंधन नसतं. या क्रुझेस एकदम कूल, चकाचक आणि आधुनिक असतात. कपल्स आणि तरुणांना हवा असतो तसा रिलॅक्सेशन आणि ॲडव्हेंचरचा मिलाप इथे अनुभवता येतो.
आपल्या भारतीय कॉर्डेलिया क्रुझमुळे, ज्यांना खास ओळखीचं वातावरण हवं आहे त्यांची इच्छाही पूर्ण होऊ शकते. मुंबई आणि चेन्नई इथून या क्रुझेस सुटत असल्याने देशांतर्गत पर्यटन करणाऱ्यांची चांगली सोय झाली आहे. या क्रुझचं बुकिंग केलं की विकेंडच्या मनोरंजनाची, भोजनाची आणि ॲक्टिव्हिटीज् ची काळजीच राहत नाही. एम एस सी, कोस्टा, सेलिब्रेटी, सिल्व्हर सी अशा मोठ्या क्रुझ कंपन्यांची स्वतःची खास स्टाइल आहे. आर्क्टिक आणि गालापागोस सारख्या ठिकाणांसाठी सेवा देणाऱ्या या क्रुझेसवर युरोपियन धर्तीचे वातावरण, फॅमिली फ्रेंडली, आरामदायी सुखसोई आणि एक्सपिडिशनचा थरार हे सगळं अनुभवायला मिळतं.
सगळ्यांसाठी एकाच क्रुझवर सारं काही असू शकत नाही, पण यामुळेच क्रुझिंग रोमांचक ठरतं. जर तुम्ही कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्ती किंवा बच्चे कंपनीबरोबर प्रवास करत असाल, तर मेडिटेरेनियन किंवा करिबियन क्रुझचा विचार करा. या क्रुझेस रोम, बार्सिलोना, सॅन्तोरिनी किंवा करिबियन मधील बहामा, सेंट ल्युसिया अशा बंदरामध्ये थांबतात. इथे समुद्रावर असताना आराम आणि बंदरात उतरल्यावर स्थलदर्शन अशी विभागणी करुन तुम्ही दोन्हीचा आनंद लुटू शकता. जोडप्यांसाठी किंवा हनिमून साजरा करायला आलेल्यांसाठी सर्वात उत्तम पर्याय म्हणजे युरोपमधील डॅन्यूब किंवा ऱ्हाइन रिव्हर क्रुझ. या क्रुझवर पारंपरिक रुपात संगीत आणि कलेची परंपरा जपणारी व्हिएन्ना, बुडापेस्ट, स्ट्रासबर्ग सारखी शहरं बघायला मिळतात.
सगळ्याच पर्यटनप्रेमींच्या बकेट लिस्ट मधल्या क्रुझ म्हणजे अंटार्क्टिका आणि आर्क्टिकच्या क्रुझ. या क्रुझ तुम्हाला जगाच्या टोकाला घेऊन जातात, जिथे पेंग्विन्स बागडत असतात, अवतीभवती हिमनग तरंगत असतात आणि आसमंतातल्या शांततेचा ध्वनी तुम्हाला अंतर्मुख करतो. तुम्हाला मित्रमंडळींसह भरपूर मौजमजा करायची असेल तर साऊथ ईस्ट आशियातील क्रुझ म्हणजे सिंगापूर ते थायलंड आणि मलेशियाचा अवश्य विचार करावा.
तुम्ही अजून क्रुझ पर्यटनाचा अनुभव घेतला नसेल तर लगेच विचार करायला हरकत नाही. सुरुवात म्हणून तुम्ही 3 ते 5 दिवसांची क्रुझही निवडू शकता. तुमच्या इतर सहलींसारखीच ही सहल असेल, फक्त हा हॉलिडे तुम्ही समुद्रावर घालवणार आहात. त्यानंतर तुम्ही फॅमिलीबरोबर जाताय का रोमँटिक हॉलिडे हवाय यावर तुमची निवड अवलंबून असेल. शिवाय तुमच्या डेस्टिनेशवरही खूप काही अवलंबून असतं. मेडिटेरेनियन क्रुझवर रोम, बार्सिलोना, अथेन्समुळे तुम्ही कल्चरल टूर अनुभवता. करिबियनवर बीचची धम्माल असते. साउथ ईस्ट आशियातही लवकरच डिस्ने क्रूझ सुरू होणार असल्याने भारतीय कुटुंबांसाठी ती मौजमजेची पर्वणीच ठरेल.
प्रत्येक क्रुझ लाइनची व्यवस्था वेगवेगळी असते. पोर्ट फीज, केबिनचे प्रकार, टिपींग, एम्बार्केशनची वेळ सगळं सारखं नसतं. त्यामुळे माहीतगार व्यक्तीकडून तुमचा क्रुझ हॉलिडे प्लॅन करुन घेणं अधिक योग्य.
‘दिल धडकने दो’ या सिनेमामुळे आपल्याला क्रुझच्या रंगतदार सफरीची झलक पहायला मिळाली. क्रुझ पर्यटनाची वैशिष्ट्यं या सिनेमामुळे नजरेत भरली. एकमेकांशी जोडलं जाणं, प्रतिसाद देणं, एकमेकांचा शोध घेणं हे जे त्या सिनेमाचं सूत्र होतं, तेच तर क्रुझ पर्यटनात अनुभवायला मिळतं.
आज थांबताना मी हेच सांगेन की तुमच्या प्रतिक्रिया मला neil@veenaword.com या मेल आयडीवर जरूर पाठवा. पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात.
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.