"काय ग वीणा तुला काय वाटतं, का पडलं असेल विमान?' माझ्या मैत्रिणीचा प्रश्न. ‘अगं, जेवढी तुला इन्फॉर्मेशन मिळते तेवढीच मला. पेपरातल्या बातम्यांवरून आणि विश्लेषणांवरून आपण आपले अंदाज बांधत असतो. अजून पूर्ण रिपोर्ट प्रसिद्ध व्हायचाय, त्यामुळे ठामपणे कुणीच काही सांगू शकत नाहीये ही वस्तुस्थिती आहे. हे आमचं संभाषण गेल्या आठवड्यातलं. या कार्यक्रमानंतर घरी आले तरी तिचा प्रश्न मनातनं जाईना. विमान वर उडू शकलं नाही हे सर्वश्रुत आहेच, त्याचं कारण कालांतराने आपल्याला कळेलही. पण कार्यालयात प्रत्येक गोष्टीत ‘व्हॉट्स फॉर मी’ शोधायची एक सवय लागलीय. जगात, भारतात, अगदी आपल्या शहरात कुठेही काहीही घडो, त्याचा आपल्या व्यक्तिगत आयुष्यावर, व्यवसायावर कसा चांगला-वाईट परिणाम होणार आहे, त्याप्रमाणे आपण काय करायला पाहिजे हे आजमावणं सध्याच्या टोटली अनप्रेडिक्टेबल जगात अपरिहार्य झालंय. ‘विमान वर उडू शकलं नाही, म्हणजे त्याला वजन जास्त झालं असेल का?’ हा माझ्यासारख्या अनेक भाबड्या मनांना पडलेला, कुणीही खिल्ली उडवावी असा प्रश्न. पण आता तो आलाच नं मनात. सायन्स खूप पुढे गेलंय, आता यापेक्षा डबल क्षमतेची विमानं येताहेत हे ही माझ्या वास्तववादी मनाला माहितीय. पण तरीही कोणत्याही दिशेला उधळणारं मन स्वस्थ बसू देईना. विमान कंपन्या ‘सामान किती न्यावं प्रत्येक प्रवाशाने यावर मर्यादा घालतात आणि त्याचवेळी एक्सेस बॅगेज च्या आधारे जास्त पैसे घेऊन अधिक सामान न्यायला उद्युक्त करतात. त्यांना रेव्हेन्यू मिळतो आणि आपण खचाखच सामानाने भरलेल्या बॅगांची संख्या वाढवत राहतो. जगात सर्वत्र सर्व काही मिळतं हे सर्वांना माहीत असूनही आपली हाव आपल्याला स्वस्थ बसू देत नाही. युएसए किंवा युरोपला जाताना बॅगांवर उभं राहून बॅगा बंद कराव्या लागण्याची वेळ आपणा प्रत्येकावर आली असेल किंवा आपण ती अनुभवली असेल. मी ही केलंय ते पूर्वी अनेक वेळा. नील आणि राज जेव्हा शिकण्यासाठी परदेशात गेले, तेव्हा त्यांनी 'आम्ही आमच्या कपडे आणि गरजेच्या वस्तूंव्यतिरिक्त काहीही घेऊन जाणार नाही' ही धमकी दिल्यावर आमच्या भारतीय मनाला किती यातना झाल्या होल्या. नंतर नंतर तर त्यांचं येणंजाणं एका स्ट्रोलर केबिन बॅगवर आलं आणि ‘हे देऊ की ते देऊ’ करीत उंचबळणाऱ्या आमच्या भावना त्या स्ट्रोलर बॅगेभोवती घुटमळत राहिल्या. हळूहळू आम्हीही शिकलो आणि माझा नंतरचा प्रवास अगदी आठ पंधरा दिवसांचा असला तरी एका स्ट्रोलर बॅगेवर आला. असो, जपानी फिलॉसॉफी किंवा आपली संस्कृती आपल्याला सतत सांगत आलीय, की जेवताना पूर्ण पोट गच्च भरेल इतकं खाऊ नका. सत्तर ऐशी टक्के पोट भरेल एवढंच खा. तीस टक्के पोट रिकामं ठेवा, जेणेकरून खाल्लेलं अन्न पचायला जागा मिळेल. त्या अन्नाला मोकळा श्वास घेता येईल. कार्गो म्हणजे मला विमानाचं पोट वाटतं. विमान कंपन्या ते कदाचित 20-30 टक्के कमी भरीत असतीलही, पण एक प्रवासी म्हणून कुठेही बाहेर प्रवासाला निघताना मला माझी एक नैतिक जबाबदारी वाटायला लागलीय ती म्हणजे, ‘आपण आपलं ओझं कमी करायचं. विमान कंपनीने तेवीस किलोची मर्यादा दिली असेल, तर मी वीस किलोच न्यायचं. विमान कंपनीने तीस किलो सांगितलं असेल तर पंचवीसवरच आपण आवरतं घ्यायचं.’ प्रत्येक प्रवाशाने असं करणं म्हणजे अवास्तव अपेक्षा ठरेल, पण वीस-तीस टक्के प्रवाशांनी असं वागायचं म्हटलं तर विमानाचं वजन तुलनेने कमी होईल, विमान हलकं होईल, त्याला कदाचित इंधनही कमी लागेल आणि आपल्याला एक प्रकारचं मानसिक समाधान मिळेल पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्यासाठी फुल ना फुलाची पाकळी सदृश योगदान दिल्याचं. अर्थात एक्सेस बॅगेजमुळे मिळणारा रेव्हेन्यू विमान कंपन्या गमावतील, पण सर्वांच्या सुरक्षिततेचा आणि पर्यावरणाचा विचार केला तर रेव्हेन्यू, तोही अॅडिशनल ही गोष्ट नगण्य होऊन जाते.
‘अॅनी हाऊ इज युअर शोल्डर? काय म्हणाले डॉक्टर?’ आमची एच आर मॅनेजर अॅनी खांदा दुखतोय म्हणून डॉक्टरांकडे जाऊन आली, तिला मी विचारलं. ती म्हणाली, डॉक्टर बेरामजी म्हणाले, ‘काही औषधं वगैरे घ्यायची गरज नाही, आठ दिवस ट्रीटमेंट घेऊन तुझा खांदा ठीक करतो, पण नंतर मात्र काळजी घ्यायची. पहिली गोष्ट म्हणजे तुमची रोजची पर्स, त्याचं वजन कमी कर. अनावश्यक गोष्टी काढून टाक. पर्स एकदम हलकी कर.’ आणि अॅनीचा खांदा बरा झाला. माझीही अवस्था अॅनीसारखीच झाली होती काही वर्षांपूर्वी. डॉक्टरांना दाखवायला गेल्यावर ते म्हणाले, ‘तुझ्याकडे किती पर्सेस आहेत? त्या सगळ्या देऊन टाक आणि हॅवरसॅक वापरायला सुरूवात कर. तुमचा अनेकांचा प्रॉब्लेम तुमची पर्स आहे. गेट रिड ऑफ इट.’ माझा प्रॉब्लेम काय? डॉक्टर काय म्हणताहेत? कसलाही संदर्भ लागेना. मी म्हटलं, ‘डॉक्टर, आता या वयात मी हॅवरसॅक वापरणं किती फनी दिसेल? आणि आवडीने घेतलेल्या पर्सेस देऊन टाकायच्या म्हणजे जरा अति होतंय.’ डॉक्टर म्हणाले, ‘तब्येत महत्त्वाची की लोक काय म्हणतील ते, यू डिसाइड!’ आणि मी फक्त गरजेच्या वस्तूंनी भरलेली, वजनाने हलकी अशी हॅवरसॅक वापरायला लागले. आधी थोडं ऑड वाटायचं, पण आता वयाच्या साठीला जीन्स टी शर्टवर हॅवरसॅक चढवल्यावर एखाद्या कॉलेजमध्ये जाणाऱ्या तरुणीचा उत्साह अंगात संचारतो. डॉक्टरांच्या सल्ल्यासोबत 'एकावर एक फ्री' सारखा तब्बेतीसोबत उत्साह फ्री मिळाला. एकूणच शरीरावरचं पर्सचं ओझं कमी झालं आणि तब्बेतही ठणठणीत झाली.
‘अरे वीणा मॅम को बोलो इतने बडे बडे प्लांट्स मत लाओ, बिल्डिंगका बोझ बढ़ता है। स्लॅब नीचे गया तो? नीचे भी तुम्हाराही ऑफिस है।' एखाद्या झोपलेल्यावर पाण्याची बादली ओतल्यावर जशी खडबडून जाग येते तसं माझं झालं. कोविडमध्ये अॅक्चुअली वेळ घालविण्यासाठी मी ‘प्लांट मॉम’ बनले. पण हे एक भन्नाट भयानक वेड आहे हे मला नंतर कळलं. आमच्या ऑफिसला अटॅच्ड ओपन टू स्काय असं मस्त टेरेस आहे. किंबहुना ते टेरेस बघूनच आम्ही जागा पसंत केली होती. आज त्याचा फायदा होतोय. संध्याकाळच्या वेळी अनेक टीम्स त्या मोकळ्या हवेत मोकळा श्वास घेताना बघून बरं वाटतं. पण जागा थोडी ड्राय वाटत होती. इथे थोडी हिरवळ आणूया करीत, एकदा पुण्याहून येताना मोठ्या नर्सरीत घुसले आणि आंबा चिकू पेरू चेरी ड्रॅगन फ्रूट पाल्म जाम अशी अनेक ट्रकभर झाडं घेऊन आले. आता झाडांनी भरलेलं टेरेस चांगलं वाटायला लागलं होतं. आम्ही फळांची गोडीही चाखत होतो, पण आमच्या बिल्डर्स टीममधल्या जयेश ------ भाईंच्या सल्याने मी जागी झाले. साध्या महत्त्वाच्या गोष्टी असतात, पण माझ्या 'वृक्षवल्ली आम्हा सोयरी' ने झपाटलेल्या मनाला किंवा हव्यासाला ही गोष्ट लक्षातच आली नाही. त्याचवेळी दादर शिवाजी पार्कचं ऑफिस झालं आणि आम्ही बरीचशी झाडं तिथे हलवली. टेरेसवरचं लोड कमी झालं आणि माझ्या मनावरचंही.
फ्रेंच फिलॉसॉफर डेनिस डिडरो(ट) च्या बाबतीतला एक किस्मा मला आवडतो. तोही आपल्या चंगळवादी मनाला, अमेरिकेकडून आपल्याला बहाल होत असलेल्या 'प्रॉब्लेम ऑफ प्लेंटी' ची शिकार बनत चाललेल्या मनाला 'आवरतं घ्या' ची जाणीव करून देतो. डेनिस डिडरोला एकदा भेट म्हणून अतिशय सुंदर लाल रंगाचा गाऊन मिळाला. तो इतका अप्रतिम होता की त्या गाऊनपुढे त्याला स्वतःचं घर खूपच निरस जुनं फिकट असं वाटायला लागलं. मग त्याने घरातले पडदे बदलले, पडदे बदलल्यावर त्याला डायनिंग टेबल आणि खुर्च्या फिक्या वाटायला लागल्या, मग त्याने तो संपूर्ण सेट बदलून टाकला. गाऊन, पडदे आणि डायनिंग टेबलसेट अतिशय सुंदर झाल्यावर मग घरातलं इतर फर्निचर सोफा सेट्स कपाटं सगळंच जुनाट वाटायला लागलं. मग त्याने तेही सर्व बदलून टाकलं. एका लाल गाऊनमुळे त्यानं संपूर्ण घर नवीन केलं आणि ते करताना त्याचा बँक बॅलन्स पन्नास टक्क्यांवर आला हे त्याला लक्षातच आलं नाही. आपल्याकडे ‘नालेसाठी घोडा’ म्हणतात ते हेच. हा अनुभव डेनिस डिडरोने एका निबंधाद्वारे जगासमोर आणला आणि जगाच्या व्यवस्थापनात तो 'डिडरो इफेक्ट' म्हणून प्रसिद्ध झाला. एक नवीन वस्तू आली की तिच्याशी जुळवून घेण्यासाठी आपण अजून वस्तू विकत घेतो. मग कधी ते कपडे असतात, कधी डेकोर किंवा कधी गॅजेट्स. वस्तू वाढतच जातात आणि घरावरचं वजनही. मी तर आयुष्यभर याची शिकार झालेय. जेव्हा जाणीव झाली तेव्हा या पापावरचा उतारा म्हणून घरातले दोन मोठे वॉर्डरोबच काढून टाकले. ‘ना रहेगा बाज, ना बजेगी बासुरी’ सारखं. वस्तू ठेवायला जागाच नसली की घरात उगाचच येणा-या वस्तूंना आळा बसेल या विचाराने. वॉर्डरोब काढण्याचा विचार अतिरेकी असला तरी आता घरात खूप मोकळं वाटतंय. घर श्वास घेतंय असं वाटून मलाही बरं वाटतंय.
सभोवताली लक्ष दिलं तर आपल्याला अशा अनेक गोष्टी वा माणसं दिसतील. त्यांनी अशी अनेक अनावश्यक ओझी कमी करून स्वतःचंच नव्हे, अनेकांचं, अगदी देशाचं, जगाचं भलं केलं. स्टीव्ह जॉब्जविषयी म्हणतात नं की त्याने त्याची जी प्रॉटक्टस् होती, त्याच्यात कटौती करून फक्त काही उत्कृष्ट प्रॉडक्टस् च ठेवली आणि त्यांच्यावर लक्ष केंद्रित करून ती अद्वितीय बनवली. रॉजर फेडररला एकदा विचारलं होतं की तू खेळताना एवढा सहज, एफर्टलेस कसा असतोस? तर तो म्हणाला की अभ्यास करून खेळताना शरीराच्या अनावश्यक हालचाली मी कमी करून टाकल्या आणि महत्वाच्या स्ट्रोक्सवर लक्ष दिलं. त्यात आणखी नैपुण्य आणि प्रावीण्य मिळवलं. महात्मा गांधीच्या बाबतीतही तेच म्हणता येईल. कपडे गरजा वस्तू कमी करून त्यांनी चळवळ – सत्याग्रहावर लक्ष केंद्रित केलं आणि ते जगासाठी आदर्श बनले. बराक ओबामांच्या बाबतीतही तेच म्हटलं जातं. अशांती, अविचार, गोंधळ या अनावश्यक गोष्टींना त्यांनी आपल्या आयुष्यातून तडीपार केलं आणि संकटाच्या काळातही शांत विचारी नेता म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. पक्षी स्थलांतर करण्याआधी त्यांची चरबी आणि पिसं काढून टाकतात आणि हलके होतात. तयार होतात फेदरलाईट बनून स्थलांतर करण्यासाठी, निसर्गाचा चमत्कारच म्हणायचा हा. शिवाजी महाराजांच्या जगप्रसिद्ध गनिमी काव्यात 'कमी सामान सोबत असणं, त्यामुळे सैन्याला हलकं वाटणं आणि पर्यायाने वेग वाढणं या गोष्टी महत्वाच्या होत्या. एकूणच हलकं होणं, हलकं राहणं, ओझं कमी करणं याला आपण आयुष्यात खूप महत्वाचं स्थान दिलं पाहिजे. आज आपण ज्या युगात आहोत त्यात ‘अधिक मिळवणं’ हे यशाचं लक्षण आहे, पण ओझं जितकं कमी तितका आनंद जास्त यावरचा माझा विश्वास वाढत चाललाय. आपल्या मनात सुध्दा राग, आठवणी, अपराधीपणा, अपेक्षा किंवा तुलना याच्याशी निगडीत किती ओझं आपण भरून ठेवतो. चला, जागरूकपणे या सर्वांचं ओझं कमी करूया. घरात, प्रवासात, व्यवसायात, शरीरात, मनात, सगळीकडे असलेलं अनावश्यक ओझं कमी करायची सवय लावली तर आपल्या जगण्यासाठी, आनंदासाठी, आणि इतरांना देण्यासाठी खूप वेळ ऊर्जा आणि उत्साह मिळेल.
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.