Published in the Sunday Lokmat on 03 August 2025
मोठ्या, मोकळ्या जागा, नजर जाईल तिथपर्यंत परसलेले निळेशार आकाश, अतिशय काळजीपूर्वक राखलेले दर्जेदाररस्ते, या सगळ्यामुळे प्रत्येक प्रवास म्हणजे एक वेगळाच अनुभव ठरतो...
तुम्ही कधी कोणत्याही देशाच्या संसदेत जेवणाचा आस्वाद घेतला आहे का? हो, तसे करणे शक्य आहे. ही युनिक संधी साधायची असेल तर आपल्याला ‘लँड डाऊन अंडर’ला म्हणजेच ऑस्ट्रेलियाला भेट द्यावी लागेल. ऑस्ट्रेलियाची राजधानी असलेल्या कॅनबेराला जाण्याची संधी मला अनेकदा मिळाली आहे. अशाच एका भेटीत ऑस्ट्रेलियन संसदेच्या गच्चीत असलेल्या क्वीन्स टेरेस कॅफेमध्ये मी जेवणाचा आनंद घेतला आहे. ज्या वास्तूमध्ये देशाबद्दलचे सगळ्यात महत्त्वाचे निर्णय घेतले जातात, अशा वास्तूच्या गच्चीत बसून हा सगळा परिसर न्याहाळणं हा अतिशय संस्मरणीय अनुभव होता. ऑस्ट्रेलिया भेटीत कॅनबेरामधील संसदेला भेट देणे आपण टाळूच शकत नाही. ती केवळ एक सरकारी वास्तू नाहीये. तिची ठेवण तर वैशिष्ट्यपूर्ण आहेच, शिवाय तिच्या रचनेत ऑस्ट्रेलियनपणा ठासून भरलेला आहे. म्हणून ऑस्ट्रेलियन संसदेला भेट हा एक आगळावेगळा अनुभव असतो.
ऑस्ट्रेलियातील लोकशाही व्यवस्थेत पर्यटकांनाही सरकारी कामाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी आमंत्रित केले जाते. ही गोष्ट सगळ्याच देशांमध्ये शक्य होत नाही. म्हणजे थोडक्यात, ऑस्ट्रेलियन संसदेचे अधिवेशन सुरू असताना आपण संसदेत प्रवेश करून तेथील कामकाज थेट पाहू शकतो. या व्यवस्थेतून ऑस्ट्रेलियामध्ये पारदर्शकतेबद्दल असणारी आत्मीयता आणि नागरिकांचे लोकप्रतिनिधींशी असणारे नाते याचे वेगळेपण अधोरेखित होते. मोकळीढाकळी आणि शांत-निवांत संस्कृती हे ऑस्ट्रेलियाचे ठळक वैशिष्ट्य! संसदेच्या वास्तूच्या गच्चीवरील उद्यानात पर्यटकांना प्रवेश देण्याच्या त्यांच्या कृतीतून त्यांच्या याच संस्कृतीचे दर्शन होते. म्हणूनच त्याला ‘लोकांचे सभागृह’ म्हणतात! त्यामुळेच, या आणि अशा वैशिष्ट्यपूर्ण अनुभवांचा, संधींचा वीणा वर्ल्डच्या टूर्समध्ये समावेश करण्याचा निर्णय आम्ही घेतला. प्रसिद्ध वास्तूंचे बाहेरून फोटो काढण्यापुरती ही टूर मर्यादित नसते. तो एक सर्वस्वी वेगळा अनुभव असतो. त्यातून आमच्यासोबत आलेल्या पर्यटकांना त्या वास्तूची ऐतिहासिक ओळख, तिचे अंतरंग, सौंदर्य आतमध्ये फिरून नजरेत साठवता येते. त्या वास्तूच्या सौंदर्याशी, भव्यतेशी एकरूप होऊन जाता येते. त्याच वेळी त्यांना त्या त्या देशाच्या समृद्ध संस्कृतीचाही अनुभव घेता येतो.
माझ्या शाळकरी दिवसांपासून मला ऑस्ट्रेलियाबद्दल अप्रूप होते. जगाच्या नकाशाचा अभ्यास करताना माझी नजर कायम ऑस्ट्रेलियावर जात असे. त्याचा आगळावेगळा आकार माझ्या मनावर ठसला होता. जगाच्या एका कोपऱ्यात शांतपणे पहुडलेला हा देश मला तेव्हापासूनच साद घालत होता. या कुतुहलापोटीच एक ना एक दिवस ऑस्ट्रेलियात जाण्याची इच्छा माझ्या मनात रुंजी घालत होती. सुदैवाने, मला ती इच्छा पूर्णही करता आली.
आपण ऑस्ट्रेलियाला का जावं असा प्रश्न तुम्हालाही पडलाय का? चला तर मग, या अवाढव्य देशाबदद्ल पटकन जाणून घेऊया.
ऑस्ट्रेलिया म्हणजे जगातला आकारमानानुसार सहाव्या क्रमांकाचा देश. 7.7 लक्ष चौ.कि.मी एवढा त्याचा अवाढव्य पसारा आहे. ही भूमी म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या भूप्रदेशांची आणि एकापेक्षा एक आश्चर्यांची खाणच आहे. त्याच्या आकारमानाची तुलना केवळ सर्वात मोठ्या ग्रेट बॅरिअर रीफ या कोरल रीफशीच होऊ शकते. पृथ्वीवरील हे सर्वात मोठे प्रवाळ बेट अवकाशातूनही स्पष्ट दिसते. त्यासोबत, प्राचीन दगडी नैसर्गिक शिल्पकृतींपासून ते क्वीन्सन्सलँडच्या घनदाट वर्षावनांपर्यंत सगळेच थक्क करणारे आहे. नैसर्गिक सौंदर्याचे नक्षीकाम ऑस्ट्रेलिया आपल्यासमोर मोठ्या दिमाखात सादर करतो. त्याशिवाय, मला आणखी एक वेगळेपण वाटते ते या भागातील वन्य प्राण्यांचे. त्यात अर्थातच कांगारू, कोआला, प्लॅटिपस हे आहेतच. बेभान करणारं निसर्गसौंदर्य, स्थानिक प्रजाती, भौगोलिक वेगळेपणा या सर्वच बाबतीत ऑस्ट्रेलिया म्हणजे आपल्याला आ वासून पाहायला लावणारे जागतिक भांडार आहे.
ऑस्ट्रेलिया हा शब्द उच्चारला की आपल्या डोळ्यासमोर सर्वप्रथम काय येत असेल तर वैशिष्ट्यपूर्ण सिडनी ऑपेरा हाऊस. माझ्याही बाबतीत तसंच आहे. मी प्रथम ही शंखाच्या आकाराची वास्तू निरभ्र आकाशाच्या पार्श्वभूमीवर जेव्हा पाहिली तो क्षण आजही जसाच्या तसा माझ्या डोळ्यांसमोर आहे. शक्य तेवढ्या सगळ्या कोनातून मी त्या वास्तूचे सौंदर्य नजरेत साठवत होते. बंदरातल्या रात्रीच्या प्रवासात त्या वास्तूचे सौंदर्य आणखी खुलून समोर आले. त्याच्यावर पडलेल्या चंद्राच्या शीतल प्रकाशामुळे वास्तूला आलेली झळाळी अवर्णनीय होती. गाईडसह या ऑपेरा हाऊसच्या आत भटकंती करणे हा तर खासच अनुभव असतो. देशविदेशातील स्पर्धेतून या वास्तूच्या रचनेसाठी 200 प्रवेशिका आल्या होत्या. त्यातून डॅनिश आर्किटेक्ट यॉर्न उत्झॉन यांची रचना निवडली गेली. युनेस्कोने मान्यता दिलेली, जागतिक वारसास्थळाचा मान मिळालेली ही हेरिटेज वास्तू आहे. त्याच्या छतावर सुमारे एक लाख सिरॅमिक टाइल्स रचलेल्या आहेत. त्यातून सूर्याची चकाकती किरणे विलोभनीय दिसतात. दरवर्षी या वास्तूत अंदाजे 1500च्या आसपास कार्यक्रम होतात. त्यात, ऑपेरा, बॅले, कॉन्सर्ट, नाटके यांचे असंख्य प्रयोग होतात. जगभरातील लाखो पर्यटक इथे भेट देतात. ऑपेरा हाऊसचे बांधकाम 1973मध्ये पूर्ण झाले. ते पाहण्यास यॉर्न हजर नव्हते. वास्तू व्यवस्थापनाबरोबर मतभेद झाल्याने त्यांनी या प्रकल्पाला 1966 मध्येच रामराम केला. अर्थात, ही वास्तू त्यांच्या अजोड रचनेचे कौतुक मिरवीत दिमाखात उभी आहे. ती वास्तू नजरेत सामावून घेत यॉर्न यांचे मी मनापासून आभार मानले. अलौकिक प्रतिभेतून साकारलेल्या या देखण्या रचनेतून आजही अनेकांना नवनवीन कल्पना साकारण्यास प्रोत्साहन मिळत आहे.
त्या पुढचा प्रवास होता तो सिडनी बंदरात. बोटीतून हळहळू मी देखण्या आणि आलिशान सिडनी हार्बर ब्रिजपाशी आले. त्याची ती अतिशय मोहवून टाकणारी छबी मी पाहतच राहिले. उत्तर आणि दक्षिण सिडनीला जोडणारा एक वाहतुकीचा दुवा एवढीच त्याची ओळख नाही. तो जगभरातील पर्यटकांच्या आकर्षणाचे महत्त्वाचे केंद्र आहे. तिथून सिडनीचे विंहगम दर्शन घडते. शिवाय, सिडनी ऑपेरा हाऊसचा आणखी एक वेगळाच अँगल येथून पाहता येतो. ब्रिजच्या वैशिष्ट्यपूर्ण आकारामुळे स्थानिक लोक प्रेमाने त्याला ‘कोटहँगर’ म्हणतात. त्या ब्रिजवर चढून वर शिखरापर्यंत जाण्याची सोय आहे. त्याच्या शिखरावर उभे राहून सिडनीचा अद्भुतपणा डोळ्यात साठवणं हा एक अत्यंत थरारक अनुभव आहे.
ऑस्ट्रेलियातील मोठ्या शहरांप्रमाणेच या देशातील छोटेखानी शहरेही अतिशय पाहण्यासारखी, आकर्षक आहेत. त्या शहरातून फेरफटका मारताना आपल्याला वसाहतींच्या काळातील इतिहासाची आठवण झाल्याशिवाय रहात नाही. ऑस्ट्रेलिया हा देश पाहण्यासारखा आहेच, पण मला तिथे सर्वाधिक आवडणारी गोष्ट म्हणजे एका ठिकाणाहून दुसरीकडे जाण्यासाठी, खासकरून गाडीने केलेला प्रवासही मन:पूर्वक भावतो. म्हणतात ना, जिथे पोहोचायचे त्या ठिकाणाइतकाच तिथवरचा प्रवासही हवाहवासा वाटतो! रस्त्यांवरील सफरींसाठी ऑस्ट्रेलिया हा स्वर्गच आहे. निर्सग सौंदर्याने नटलेले इकडचे रस्ते जगातल्या काही अफलातून रस्त्यांइतके देखणे आहेत. मोठ्या, मोकळ्या जागा, नजर जाईल तिथपर्यंत परसलेले निळेशार आकाश, अतिशय काळजीपूर्वक राखलेले दर्जेदार रस्ते, या सगळ्यामुळे प्रत्येक प्रवास म्हणजे एक वेगळाच अनुभव ठरतो. भारताप्रमाणेच ऑस्ट्रेलियातही डाव्या बाजूने वाहने चालवली जात असल्याने ऑस्ट्रेलियातील या नयन मनोहारी रस्त्यांवरून वाहन चालवणे हा आपल्या सवयीचाच भाग बनतो. व्यवसाय आणि सुटी अशा दोन्ही निमित्ताने मला या रस्त्यांवरून वाहन चालवण्याची संधी मिळाली आहे. त्यात सोबतीला कधी सहकारी होते, तर कधी मित्रमंडळी. एकदा वेग मर्यादेपेक्षा जराशी जास्त वेगाने गाडी चालवल्याबद्दल ऑस्ट्रेलियन पोलिसांचा इंगाही मी अनुभवला आहे. मैलोनमैल लांब रस्त्यावर समोर कोणतेच वाहन नव्हते, त्यामुळे माझा वेग थोडा वाढला, असे सांगण्याचा मी तोकडा प्रयत्न केला. पण, त्या पोलिसाला अर्थातच तो काही पटला नाही. माझी त्या प्रसंगातून फक्त तंबीवर सुटका झाली. रस्त्यावर चिटपाखरूही नसताना मनसोक्त गाडी चालवणे हाच मुळात माझ्यासाठी पूर्णपणे नवीन आणि सुखद अनुभव होता.
अशाच प्रवासापैकी माझ्या कायम लक्षात राहणारा एक प्रवास व्हिक्टोरिया प्रातांतील ग्रेट ओशन रोडवरील होता. प्रत्येक वळणावरील निसर्गाची किमया मला श्वास रोखून धरायला भाग पाडत होती. या रस्त्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, पहिल्या जागतिक युद्धातून परतून आलेल्या सैनिकांच्या त्याग आणि शौर्याचे स्मरण करणारे हे जगातले सगळ्यात मोठे स्मृतिस्थळ आहे. एका बाजूला अथांग पसरलेला समुद्र आणि दुसरीकडे सतत सोबत करणारी पर्वतरांग यांच्या मधोमध ग्रेट ओशन रोडवरील प्रवास एकदम लक्षणीय ठरतो. वीणा वर्ल्डच्या टूरमधली, मोठमोठ्या खडकांनी घडलेल्या ट्वेल्व्ह अपॉझल्सचे विहंगम दर्शन घडवणारी, हेलिकॉप्टर सफर पर्यटकांना खूपच आवडते. ग्रेट ओशन रोडवर एखादी रात्र राहण्याची इच्छा असेल तर पोर्ट कॅम्पबेल आणि अँगलसी या समुद्रकिनारी असलेल्या गावात मुक्काम करता येतो. तेथे ऑस्ट्रेलियातील सागरी जीवनाचा आनंद घेता येतो. शिवाय, स्थानिक खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत सभोवतालचा सुंदर परिसर आणखी मनात साठवून घेता येतो.
मेलर्बनपासून हाकेच्या अंतरावर फिलीप आयलंड वसलेले आहे. पेंग्विन परेड ही या आयलंडची खास ओळख. हे बेट अतिशय सुंदर आहे. एकदा मी चालतच त्याच्या किनाऱ्यावर पोहोचले. सूर्य मावळतीकडे आला होता. अचानक हळूहळू छोटे छोटे पेंग्विन पाण्यातून वर येऊन त्यांच्या घरट्यांच्या दिशेने दुडूदुडू जाऊ लागले. सूर्यास्ताच्या पार्श्वभूमीवर, शांतपणे बसून या छोट्या मंडळींची किनाऱ्यावरील लगबग पाहणे हा ऑस्ट्रेलियातील वैविध्यपूर्ण वन्यजीवनाचा आणि निसर्गाचा अनोखा अनुभव मला घेता आला.
वेगवेगळ्या हवामानाचा हा देश असल्याने वर्षभरात कधीही येथे सुटीचा आनंद लुटता येतो. प्रत्येक पर्यटकाची प्रवासाकडून काही तरी अपेक्षा असते. ऑस्ट्रेलिया त्या सर्व अपेक्षा पूर्ण करतो. या खंडाच्या प्रत्येक कोपऱ्यात आपल्याला भुरळ घालण्याची जादू आहे. कोणी गोल्ड कोस्टवर बीचवर बसून सूर्यकिरणांचा आनंद घेतो, तर कोणी मेलबर्नच्या कमालीच्या व्हायब्रंट संस्कृतीचा भाग होतं. ऑस्ट्रेलियातल्या सगळ्या रंगात तुम्हाला रंगून जाता येईल, अशा तऱ्हेने वीणा वर्ल्डने आपल्या टूर्सची आखणी केलेली आहे. आयुष्यभराचा ठेवा घेऊन तुम्ही ऑस्ट्रेलियातून परताल याची पूर्ण खात्री बाळगा. मग काय तर, माझ्यासोबत चला, वीणा वर्ल्डच्या सोबतीने ऑस्ट्रेलियाच्या अनोख्या, अलौकिक सौंदर्याचा शोध घेऊया!
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.