Published in the Sunday Lokmat on 17 August 2025
...माझ्याशी मैत्री झालेल्या नव्याकोऱ्या मित्रमंडळींना, आकाराने फारसे न जमलेले, पण चवीच्या बाबतीत मात्र फर्मास झालेले स्प्रिंग रोल खिलवण्यात एक वेगळाच आनंद मिळाला....
‘इथे रोजच दिवाळीसारखं वातावरण असतं!’ कंदिलाच्या प्रकाशात झगमगलेला आजूबाजूचा परिसर थक्क होऊन न्याहाळत असताना गाईडचे हे उद्गार माझ्या कानावर पडले. व्हिएतनाममधील क्वांग नाम या मध्यवर्ती प्रांतातील ‘होई आन’ या प्राचीन शहरात ‘थू बॉन’ नदीच्या काठाने मी चालत होते. नदीच्या मुखापाशी उत्तरेवरील काठावरून फिरस्ती सुरू होती. एकदम आकर्षक आणि प्राचीन ठेवणीतलं होई आन शहर पंधराव्या ते एकोणिसाव्या शतकापर्यंत महत्त्वाचं व्यापारी केंद्र होतं. तिथल्या वास्तुरचनेवर चिनी, जपानी आणि युरोपियन शैलींचा प्रभाव होता. या शैलींचा सहज संगम इथे झालेला आपल्याला पहायला मिळतो. विशेष म्हणजे हा वारसा त्यांनी निगुतीने जपून ठेवला आहे. चालता चालता मी नदीच्या किनाऱ्यावर आले. तिथे नदीच्या पाण्यावर अलगदपणे तरंगणाऱ्या बोटींचा सुरेख नजारा पहायला मिळाला. त्या सर्व बोटी, त्यावरील किमान एका तरी कंदिलाने प्रकाशमान झालेल्या होत्या. तो प्रवाह ओलांडून मी या कंदिलांनी झगमगणाऱ्या रस्त्यावर आले. ‘प्रत्येक चतुर्दशीला होई आनमध्ये कंदील महोत्सव आयोजित केला जात असे. या महोत्सवात हे शहर रंगीबेरंगी कंदिलांच्या प्रकाशात उजळून निघे. हा खास संस्मरणीय अनुभव असायचा.’ अशी माहिती माझ्या गाईडने दिली. तो अनुभव मी स्वत:ही घेतच होते. पूर्वी पौर्णिमा साजरी करण्यासाठी हा महोत्सव भरवला जायचा. त्यावेळी स्थानिक लोक आणि पर्यटकही थू बॉन नदीवर पारंपारिक कंदील सोडायचे. काळाच्या ओघात हा महोत्सव अतिशय लोकप्रिय झाला. त्यातूनच मग पूर्ण वर्षभर कंदील लावले जाऊ लागले. आता पौर्णिमा असो की वर्षातील इतर कोणताही दिवस, होई आन मधील सिल्कचे पारंपरिक आकाशकंदील या छोटेखानी शहराला देखणे बनवतात. आपणही त्या देखणेपणाच्या, मैत्रीपूर्ण वागणाऱ्या स्थानिकांच्या आणि एकूणच त्या शहराच्या प्रेमात पडतो. नदीवरील पूलावर मी मोक्याची जागा पटकावली आणि खास पोझमध्ये इन्स्टावाला फोटो काढून घेतला. अनेक पर्यटक नदीवर कंदील सोडण्याचा आनंद घेत होते. त्या कंदिलांमुळे सगळा परिसर अतिशय विलोभनीय दिसत होता. रात्री छान विश्रांती घेतल्यावर ताजंतवानं झालं की दिवसभर पायी भटकण्यासाठी ऊर्जा मिळते. अशा भटकंतीतून त्या शहराचं रुप आतून बाहेरून समजून घेता येतं. शहराची ओळख करून घेण्याचा हा उत्तम मार्ग असतो. मीही तशीच निघाले होते. चालण्याच्या दृष्टीने योग्य शूज आणि कॅमेरा यांच्या साथीने माझी भटकंती सुरू होती. या भटकंतीत हे शहर नजरेला भावलं. लाकडी बांधकाम असलेली पारंपरिक घरं आणि त्यावरचा पिवळा रंग यामुळे हा सगळा परिसर चित्रातल्यासारखा झाला होता. जपानी आणि चिनी संस्कृतीमध्ये पिवळा रंग संपन्नतेचं, ऐश्वर्याचं प्रतीक मानला जातो. त्यामुळे या घरांना दिलेल्या पिवळ्या रंगातून पूर्वीच्या, व्यापार भरात असतानाच्या काळातील, ऐश्वर्य, संपन्नता, सत्ता यांचं दर्शन घडत होतं. ही पिवळाई या लोकांनी प्रयत्नपूर्वक जपली आहे. पिवळा रंग शुभकारक आणि सकारात्मकतेचं प्रतीक असल्याची त्यांची धारणा आहे.
‘दा नांग’पासून ‘होई आन’ अवघ्या 30 किलोमीटर अंतरावर आहे. पण या दोघांतील फरकामुळे ही दोन्ही शहरं पूर्णपणे वेगवेगळ्या जगातील वाटतात. ‘दा नांग’ म्हणजे अतिशय धकाधकीचं, गडबड असलेलं आशियाई महानगर आणि त्याउलट जिथे काळ थांबला आहे असं वाटावं असं ‘होई आन’ शहर! मी व्हिएतनाममध्ये प्रथमच आले होते. इथे येण्यासाठी जी अनेक कारणं होती, त्यापैकी एक होतं दा नांगच्या ‘बा ना हिल्स रिसार्ट’मधील ‘गोल्डन हॅण्डस ब्रिज’. आता हा प्रचंड लोकप्रिय झाला आहे. व्हिएतनामचे ग्लोबल आयकॉन बनलेल्या या ब्रिजबद्दल जगभरातील पर्यटकांमध्ये उत्सुकता असते. त्यामुळे जेव्हा कधी व्हिएतनामला येण्याची संधी मिळेल तेव्हा न विसरता, दा नांगला येऊन या ब्रिजवर उभं राहण्याचा आनंद घ्यायचा, असं मी मनोमन ठरवलं होतं. या ब्रिजचं अधिकृत नाव ‘काऊ वांग ब्रिज’ असं आहे. त्याचं वर्णन शब्दातीत आहे. या ब्रिजवर उभं राहिल्यावर त्याच्या एकूण अवाढव्यतेने दिपून जायला होतं. दगडाच्या अतिविशाल अशा दोन हातांनी धातूचा हा पूल तोलून धरला आहे. त्यावर लोकं विहार करतात. हा सगळा देखावा म्हणजे एक कल्पनाविश्वच वाटतं. पौराणिक आणि सुंदर अशी या देखाव्याची रचना असून दैवी शक्तींनी हा पूल तोलून धरला असल्याची भावना पहिल्या दर्शनातच होते. देवाच्या हातांनी हा पूल तोललेला आहे अशीच याची मूळ कल्पना आहे. प्रत्यक्ष दर्शनात आपल्याला त्याची भव्यता, सुंदरता आणि कल्पकता भावते. स्वाभाविकच, या पूलावर पर्यटकांची दाटी असते. फोटो काढायचा म्हटलं तरी अनेक अनोळखी चेहरे फोटोच्या फ्रेममध्ये नकळत धडकतात. थोडी वाट बघितली आणि एकदाची एक चांगली जागा मला सापडली. मग मी मनसोक्त सेल्फीज् काढले. देवाच्या दोन हातांनी धरलेला तो पूल, ते सगळे वातावरण हा भाव फोटोमध्ये अधिकाधिक पकडण्याचा माझा प्रयत्न यशस्वी ठरला असं म्हणायला हरकत नाही.
‘बा ना हिल्स’पर्यंतचा प्रवास हे सुद्धा एक प्रकारचं साहसच आहे. केबल कारमधून आजूबाजूचं नयनरम्य सौंदर्य पाहत आम्ही वर येत होतो. त्याचवेळी आणखी चार केबल कार एकमेकींना ओलांडून जात असल्याचं मला दिसलं. त्या सर्व वेगवेगळ्या ठिकाणी जात होत्या. अखेरच्या स्थानकावर पोहोचल्यावर मी लगेचच प्रख्यात गोल्डन हॅण्ड्स ब्रिजच्या दिशेनं निघाले. त्याच्या भेटीचा मनसोक्त आनंद घेतल्यानंतर मग मी दुसऱ्या प्रेक्षणीय स्थळांकडे मोर्चा वळवला. थीम पार्क, फ्लॉवर गार्डन, बुद्धाचा अतिविशाल पुतळा, नयनरम्य बुद्धविहार आणि थेट चित्रातून उतरल्यासारखे फ्रेंच गाव... अशा एकाहून एक सरस ठिकाणांची बा ना हिल्सने मला अनोखी भेट दिली. तो एक वेगळाच अनुभव होता. आपण कोणत्याही वयाचे असलो तरी बा ना हिल्सची भेट आपल्याला निराश करत नाही. इथे सगळ्यांसाठी काही ना काही आहे. फॅण्टसी पार्कमधील राईड्समध्ये मुलं दंगून जातात, तर मोठी माणसं बॉटनिकल गार्डनमधील फुलांच्या देखण्या सजावटीने हरखून जातात. या वेगळेपणामुळेच बा ना हिल्स हे सगळ्यांचं लाडकं डेस्टिनेशन आहे. इथे आलेल्या प्रत्येकाला त्याच्या आनंदाचं काही ना काही कारण सापडतंच!
बा ना हिल्सप्रमाणेच मला व्हिएतनामच्या ईशान्य भागात असलेल्या ‘हॅलाँग बे’ या पर्वतीय प्रदेशाची खासकरून आठवण होते. राजधानी हनोईच्या उत्तरेला असलेला हा प्रदेश तिथल्या अद्वितीय निसर्गसौंदर्यामुळे युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. हनोई हून हॅलाँग बे ला येण्यासाठी मला सुमारे अडीच तास लागले. या प्रवासात पुढच्या निसर्गसौंदर्याची एकप्रकारे जणू काही पार्श्वभूमी तयार झाली. हॅलाँग बे वरच्या रात्रीच्या वेळी केलेल्या क्रूझ प्रवासानं तर माझ्या इथे येण्याबद्दलच्या अपेक्षा आणखी वाढवल्या. क्रूझपर्यंत जाण्यासाठी मी डॉकवर आले. तिथे चेकिंग झाल्यावर माझं सामान अतिशय सहजतेनं ट्रान्सफर झालं. त्यानंतर दूर बंदरात उभ्या असलेल्या क्रूझवर पोहोचण्यासाठी छोट्या बोटीतून केलेल्या रमणीय छोटेखानी प्रवासाने माझ्या पुढच्या प्रवासाबदद्लच्या अपेक्षा आणखी उंचावल्या. बोर्डिंगची सगळी उस्तवार पूर्ण केल्यावर दुपारचं अप्रतिम भोजन घेत जलप्रवास सुरू झाला. एखादा देश समजून घ्यायचा असेल तर स्थानिक पदार्थांचा आस्वाद घ्यायला हवा, अशी माझी धारणा आहे. त्यामुळे बुफेमध्ये मांडलेल्या सर्व पदार्थांचा मी यथेच्छ आस्वाद घेतला. रुचकर आणि वैविध्यपूर्ण चवींनी संपन्न असलेल्या व्हिएतनामी पदार्थांनी मजा आणली. कमी तेलकट आणि आरोग्यदायी अशा वेगवेगळ्या पदार्थांनी ही मजा वाढवली. त्यातही, ताजे स्प्रिंग रोल, प्रख्यात व्हिएतनामी नूडल्स सूप, फो/फू आणि व्हिएतनाममधील स्थानिक फळं या गोष्टी मला फार आवडल्या. ऑनबोर्ड कुकिंग क्लासमध्ये यापैकी काही पदार्थ करायलाही शिकले. त्यामुळे खाण्याचा आनंद दुणावला. एकदम परफेक्ट स्प्रिंग रोल करण्याची कलाकुसर शिकतानाच त्याची प्रोसेस प्रत्यक्ष पाहता आली. या क्लासमुळे व्हिएतनामी खाद्य पदार्थांच्या कुकिंगची गंमत अनुभवता आली. जगभरातून आलेल्या आणि माझ्याशी मैत्री झालेल्या नव्याकोऱ्या मित्रमंडळींना, आकाराने फारसे न जमलेले, पण चवीच्या बाबतीत मात्र फर्मास झालेले स्प्रिंग रोल खिलवण्यात एक वेगळाच आनंद मिळाला.
जसजशी आमची क्रूझ हॅलाँग बेच्या अंतरंगात शिरत होती, तसतसा चौफेर उधळलेल्या निसर्गसौंदर्याचा पॅनोरमा माझ्या डोळ्यासमोर अलगद उलगडत होता. लाईमस्टोनने घडलेले पर्वत आणि नाट्यपूर्णपणे अवचित समोर येणारी छोटी छोटी बेटके नजरेत सामावून घेण्यासाठी माझी शिकस्त सुरू होती. मावळतीला सूर्य पाण्यात उतरू लागल्यावर संपूर्ण परिसरावर सोनेरी आभा पसरली. त्यामुळे हॅलाँग बे चं मुळातच अर्वणनीय असलेलं सौंदर्य शतपटीने खुललं. संधीप्रकाशात बेटाचं रुप पूर्णपणे पालटू लागलं. मी निसर्गाच्या या किमयेचा आस्वाद घेत होते आणि आतून एक मन:शांतीही अनुभवत होते. क्रूझवरील माझ्या रूममुळे माझं राहणं आणखीनच आरामदायी झालं होतं. खोलीतूनच नव्हे तर बाथरूममधूनही बाहेरच्या निसर्गाचं आरस्पानी सौंदर्य न्याहाळता येत असल्याने मी त्या क्रूझच्या प्रेमातच पडले. हॅलाँग बे चं सर्वार्थाने रमणीय असं दर्शन या क्रूझने घडवलं. कयाकिंगमुळे बेटाचा जवळून अनुभव घेता आला. हिरव्यागार पाण्यातून प्रवास करणं हा खास अनुभव होता. यात केव्हज्मधला एक छोटेखानी प्रवासही होता. या केव्हज् व्हिएतनामी सैन्याने युद्धकाळात वापरल्या असल्याच्या गोष्टी ऐकून इथली भटकंती आणखीनच रोमांचक ठरली. क्रूझवर परतत असताना त्या पाण्यात पोहण्याचीही संधी आम्हाला मिळाली.
व्हिएतनामच्या दक्षिणेकडून उत्तरेकडे केलेल्या या प्रवासात निसर्गाची एकापेक्षा एक अनमोल रुपं माझ्यासमोर उलगडत गेली. उत्तरेतील हनोई ते हॅलाँग बे पयर्तंचा प्रवास निसर्गाची वेगवेगळी रुपे दाखवणारा होता. दक्षिणेत सायगॉनला मिळालेली अफाट ऊर्जा, नंतर देखण्या दा नांगची झालेली भेट... या प्रत्येक ठिकाणानं मला निसर्गाच्या अद्वितीय रुपाचं दर्शन घडवलं. त्याची माझ्या मनावर अमीट अशी प्रतिमा उमटवली. ‘मेकाँग डेल्टा’ इथला जलप्रवास, स्थानिक खाद्यपदार्थांची लयलूट, रात्रीच्या काळोखात सायगॉनच्या रोषणाईचं घडलेलं दर्शन... हे सगळे क्षण मौजेचे, आनंदाचे आणि संस्मरणीय ठरले. या सगळ्याला सुंदर साथ मिळाली ती व्हिएतनामी कॉफीच्या वेगवेगळ्या प्रकारांची. गोड चवीची स्ट्राँग कॉफी आणि त्यात दूध, अशा कॉफीने मला इतकं वेड लावलं की व्हिएतनामहून निघताना मी स्थानिक कॉफी बीन्सची एक मोठी बॅगच विकत घेतली. या सगळ्यावर कडी केली ती व्हिएतनामी लोकांच्या पाहुणचाराने. वेगवेगळ्या भागात शतकानुशतके लढल्या गेलेल्या युद्धांच्या पार्श्वभूमीवरही त्यांनी आपलेपणा, स्नेह जपून ठेवला आहे. याने माझं लक्ष तर वेधून घेतलंच, शिवाय माझं मनही जिंकलं. त्यामुळे, तुमच्या पर्यटनाच्या नकाशावर अजून व्हिएतनामचं नाव उमटलेलं नसेल, तर हीच ती व्हिएतनामच्या समृद्ध सफरीवर निघण्याची सुयोग्य वेळ!
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.