Travel Planner 2025
Travel Planner 2025
IndiaIndia
WorldWorld
Our Toll Free Numbers:

1800 313 5555

You can also call us on:

+91 22 2101 7979

+91 22 2101 6969

Foreign Nationals/NRIs travelling

Within India+91 915 200 4511

Outside India+91 887 997 2221

Business hours: 10AM - 7PM

Our Toll Free Numbers:

1800 313 5555

You can also call us on:

+91 22 2101 7979

+91 22 2101 6969

Foreign Nationals/NRIs travelling

Within India+91 915 200 4511

Outside India+91 887 997 2221

Business hours: 10AM - 7PM

Explore Topics, Tips & Stories

Balloon
Arrow
Arrow

ईस्ट ऑर वेस्ट

8 mins. read

Published in the Sunday Pudhari on 10 August 2025

...धुक्याने वेढलेली शिखरं, कड्यांवरून कोसळणारे धबधबे आणि घनदाट जंगल अशा वातावरणात भटकंती करायचा मोह कसा बरं टाळता येईल...   

ईस्ट कोस्ट विरुध्द वेस्ट कोस्ट असं म्हटलं की कोणालाही सर्वात आधी आठवते ती युनायटेड स्टेट्‌‍स ऑफ अमेरिका. जिथे या दोन किनाऱ्यांमधील विरोधाभास हा कायम चर्चेचा विषय ठरला आहे. लॉस एंजेलेसच्या ग्लॅमरपासून ते न्यूयॉर्कच्या ऐतिहासिक चार्मपर्यंत, या दोन किनाऱ्यांवरचे पर्यटनानुभव इतके वेगळे आहेत की त्याच्यात तुलना होणं स्वाभाविकच आहे.

पण तुमच्या हे लक्षात आलंय का? की आपल्या भारतातही असेच दोन किनारे आहेत, ज्यांच्यात कमालीचं वेगळेपण आहे. मग आपण भारताचा ईस्ट कोस्ट विरुध्द वेस्ट कोस्ट अशी तुलना करतो का? भारताच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे, तर पूर्वेला बंगालचा उपसागर आहे. या दोन्ही किनाऱ्यांचं सौंदर्य, इथल्या परंपरा आणि इथलं वातावरण यात जराही साम्य नाही. चला तर मग, आज भारताच्या पूर्व आणि पश्चिम किनाऱ्याची वैशिष्ट्यं, तिथली अनोखी पर्यटनस्थळं, तिथल्या आगळ्या परंपरा आणि तिथलं लोकजीवन जाणून घेऊयात.

भौगोलिक आणि सांस्कृतिक फरक:

भारताच्या पश्चिमेला जिथे अरबी समुद्र जमिनीला कवेत घेतो तिथे उंच-सखल टेकड्या, नारळाच्या बागा, क्लिफ्स यामुळे किनारपट्टीला रौद्रभीषण रुप प्राप्त झालं आहे. तर बंगालच्या उपसागराने तयार झालेली पूर्वेची किनारपट्टी अगदीच वेगळी आहे. या किनाऱ्यावर पुरातन मंदिरांची शहरं, त्यातील प्राचीन परंपरा आणि इथे जाणवणारा परकीय सत्तांचा प्रभाव यामुळे एक वेगळंच दृश्य पहायला मिळतं. पश्चिमेच्या तुलनेत पूर्वेची किनारपट्टी अधिक सपाट आहे, त्यामुळे लांबलचक, अखंड पसरलेले वाळूचे किनारे आणि सुंदरबनसारखा अगदी अनोखा मँग्रूव्हज्‌‍ मुळे तयार झालेला निसर्गरम्य प्रदेश आपल्याला इथे पहायला मिळतो.

भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर उष्ण कटिबंधातलं दमट, गरम हवामान आणि तिथल्या हिरव्या वनराजीला जोपासणारा मुसळधार पाऊस असतो. याउलट पूर्व किनाऱ्यावर तिथल्या बंगालच्या उपसागरामुळे विध्वंसक चक्रीवादळांचा तडाखा अनुभवावा लागतो. पश्चिमेला खळाळत्या सागर किनाऱ्यांवर उंच उंच हिलस्टेशन्स आहेत, तर पूर्वेला नजर जाईल तिकडे पसरलेली मैदाने, जी थेट समुद्रापाशी येऊन थांबतात.

किनाऱ्यावरची शहरं:

भारतातला बीच हॉलिडे म्हटल्यावर जे सागर किनारे आठ्वतात ते पश्चिम किनाऱ्यावरचे आहेत. गोव्यातले सोनेरी वाळूचे किनारे, गोकर्णच्या किनाऱ्यावरील माडांची बने, केरळच्या वर्कला बीचवरील संथ लाटांचे नृत्य... यामुळे हे किनारे म्हणजे निवांतपणे आरामात सुट्टी घालवायच्या जागा. या किनाऱ्यांवरच्या शॅक्स, सी फूडचे स्टॉल्स, इथल्या खाऱ्या हवेची झिंग वाढवणारं संगीत यामुळे या किनाऱ्यांवर सगळे रिलॅक्स होण्यासाठी जातात.

तुलनेनं पूर्व किनाऱ्यावरचं वातावरण अधिक अंतर्मुख करणारं आहे. या किनाऱ्यांना इतिहास आणि आधात्मिक वातावरण यांचं वलय लाभलेलं आहे. फ्रेंच राजवटीच्या खुणा जपणाऱ्या वास्तूंची किनार लाभलेला पुद्दुचेरीचा (पॉन्डेचरी) प्रोमेनेड बीच पाहिल्यावर पूर्व आणि पश्चिम मधला फरक चटकन स्पष्ट होईल. पुरीच्या किनाऱ्यावर शेकडो भक्त जगन्नाथ मंदिरात जाण्यापूर्वी भाविकतेनं स्नान करत असल्यामुळे इथला किनारा फक्त मौजमजेचं ठिकाण राहत नाही. तमिळनाडूमधल्या महाबलीपुरमच्या किनाऱ्यावर असलेल्या प्राचीन रॉक टेम्पल्समुळे तिथे इतिहास आणि निसर्गसौंदर्याचा संगम पहायला मिळतो.

इतिहास आणि वारसा:

भारताच्या पूर्व किनाऱ्यावरच्या इतिहासाचा ठेवा हा महाबलीपुरमची मंदिरं आणि कोणार्कचे सूर्य मंदिर यांच्या रुपाने पाहायला मिळतो. तर पश्चिम किनाऱ्यावर तिथे झालेल्या ऐतिहासिक लढाया, व्यापारी उलाढाली आणि त्यातून उभी राहिलेली साम्राज्ये याच्या खाणाखुणा आढळतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या युध्दशास्त्रातील नैपुण्याचे आणि त्यांच्या दुर्दम्य इच्छाशक्तीचे प्रतीक असलेले 350 बुलंद किल्ले महाराष्ट्रात आहेत. या किल्ल््यांवरून अरबी समुद्राचा जो नजारा पहायला मिळतो, त्यामुळे इथे इतिहासाला निसर्गाची किनार लाभलेली जाणवते.

पश्चिम किनाऱ्याचा इतिहास हा व्यापार आणि धाडसी मोहिमांनी विणलेला आहे. केरळच्या ज्या बंदरांमधून युरोप आणि मिडल इस्टमध्ये मसाल्याच्या पदार्थांची निर्यात होत असे, ती बंदरे आजही त्या काळातील व्यापारी आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीच्या कहाण्या सांगतात. गोव्यातील पोर्तुगीज राजवटीच्या आठवणी आजही तिथल्या किल्ले आणि चर्चमधून जिवंत राहिल्या आहेत.

प्राचीन काळात भारतीय उपखंडावर राज्य करणाऱ्या बलाढ्य साम्राज्याशी पूर्व किनाऱ्याचा इतिहास निगडित आहे. या साम्राज्यातील भव्य वास्तू आपल्याला आश्चर्यचकित करतात. चोला साम्राज्याच्या काळात घडवलेली, स्थापत्याचा चमत्कार ठरतील अशी तामिळनाडूमधील मंदिरे, ज्यात तंजावरच्या बृहदेश्वर मंदिराचा समावेश आहे ती बघताना त्या काळातील इंजिनियरिंग आणि कलात्मक रचना किती प्रगत होती याची जाणीव होते. ही मंदिरे तमिळ परंपरा आणि सर्जनशीलतेचं प्रतीक आहेत.

पूर्व किनाऱ्यावरच जरा उत्तरेकडे गेल्यावर कोलकाता शहरात तिथे कधी काळी असलेल्या ब्रिटिश राजच्या खुणा व्हिक्टोरिया मेमोरियल आणि फोर्ट विल्यम्स अशा भव्य वास्तूंमधून दिसतात. ओडिशा राज्यातही कोणार्कच्या सूर्य मंदिराशिवायही काही महत्वाची वारसास्थळं आहेत. उदयगिरी आणि खांडगिरीच्या गुंफांमधील जैन तपस्वींची निवासस्थाने आपल्याला भारताच्या आध्यात्मिक आणि कलात्मक प्रवासाची गोष्ट सांगतात.

खाद्यपदार्थ:

दोन्ही किनाऱ्यांवरची खाद्यपरंपरा सागराशीच निगडित आहे, मात्र त्यावरील प्रभाव आणि बनवण्याच्या पध्दतीत फरक आहे. नारळ, कोकम आणि झणझणीत मसाल्यांनी बनवले जाणारे बांगडा फ्राय आणि सुरमईचं कालवण असे मालवणी पदार्थ महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरच मिळतात.

गोव्याच्या पाककलेवर पोर्तुगीज आणि भारतीय अशा दोन्ही पध्दतींचा प्रभाव आहे, त्यामुळे इथे प्रॉन्स बालचाव, गोवन कोरिझो आणि गोव्याची ओळख असलेला बेबेन्का असे पदार्थ मिळतात जे गोव्यातील पोर्तुगीज राजवटीचा स्वाद ताजा करतात.

कर्नाटकच्या किनाऱ्यावरील खास पदार्थ म्हणजे मंगलोरी फिश करी आणि मुलायम, स्वादिष्ट नीर डोसा तर केरळच्या किनारपट्टीवरचे टेस्टी पदार्थ म्हणजे मीन मोईली (नारळाच्या वाटणातील फिश करी) आणि पारंपरिक केरळी साद्या म्हणजेच केळीच्या पानावर वाढलं जाणारं पारंपारिक भोजन.

ज्यांना सी फूड आवडतं अशांसाठीही पूर्व किनाऱ्यावर बरेच चवदार पर्याय आहेत. या पदार्थांवर तामिळनाडू, आंध्रप्रदेश, ओडिशा, बंगाल या राज्यांमधील पारंपरिक पाककलेचा प्रभाव जाणवतो. तामिळनाडूच्या सुप्रसिध्द चेट्‌‍टिनाड पदार्थांमधील चेट्‌‍टिनाड क्रॅब करी खाताना, या पदार्थांमधील मसाल्यांचा वापर आणि त्यातून आलेली चमचमीत चव ठळकपणे जाणवते.

हैद्राबादची खासियत म्हणजे मसालेदार रॉयाला इगुरु(प्रॉन्स करी) आणि सुप्रसिध्द हैद्राबादी बिर्याणी. बंगालच्या परंपरेतले ‌‘शोर्शे इलिश‌’ (मोहरीच्या कालवणातला हिल्सा) आणि चविष्ट माशेर झोल (फिश करी) हे पदार्थ खाताना त्यांचं मोहरीवरचं प्रेम घासागणिक जाणवतं. ओडिशा प्रसिध्द आहे ते तिथल्या मंदिरांमधील नैवेद्यासाठी. कांदा-लसूण न वापरता तयार केला जाणारा तिथल्या जगन्नाथ मंदिरातील महाप्रसाद अतिशय चविष्ट असतो.

साहस आणि निसर्ग:

साहसाची आवड असलेल्यांसाठी पश्चिम किनाऱ्यावरील डोंगर आणि समुद्र हे वरदानच ठरतात. गोव्याचे बीच म्हणजे चित्तथरारक वॉटर स्पोर्टस्‌‍ असं समीकरणच झालं आहे. अरबी समुद्राच्या चमचमत्या पाण्यावर केलेलं पॅरासेलिंग, बागा बीचवरचं जेट स्कीईंग, पलोलेमवरचं विंडसर्फिंग असे कितीतरी थरारक अनुभव तुमची तिथे वाटच बघत असतात.

ज्यांना साहसातील थरार अनुभवायचा आहे त्यांनी कर्नाटकातील नेत्रानी बेटावरचं स्कूबा डायव्हिंग अजिबात चुकवू नये. या लहानशा, हृदयाच्या आकाराच्या बेटाजवळ सर्वात उत्कृष्ट सागरी जैवविविधता आढळते, त्यामुळे तुम्ही समुद्राच्या खोल पाण्यात रीफ शार्क, मान्ता रे आणि रंगीबेरंगी कोरल फिश बरोबर डायव्हिंगचा आनंद लुटता.

पश्चिम किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्रीची डोंगररांग ट्रेकिंगची आवड असलेल्यांना कायम खुणावत असते. धुक्याने वेढलेली शिखरं, कड्यांवरून कोसळणारे धबधबे आणि घनदाट जंगल अशा वातावरणात भटकंती करायचा मोह कसा बरं टाळता येईल? केरळच्या टी प्लांटेशन्समधून जाणाऱ्या, धुक्याने वेढलेल्या पहाडातील ‌‘मेसापुलिमला ट्रेक‌’ केल्यावर सूर्योदयाचं दिसणारं दृश्य ट्रेकर्सचा श्रमपरिहार करणारं असतं.

वन्यजीव प्रेमींसाठी कर्नाटकातील काबिनी आणि बांदीपूर टायगर रिझर्व्ह मधील टायगर सफारी ही अनिवार्यच आहे. केरळमधल्या पेरियार अभयारण्यातल्या विशाल जलाशयात बोट सफारी करुन तुम्ही जंगलातले हत्ती आणि अनेक प्रकारचे  पक्षी पाहू शकता.

या उलट पूर्वेच्या किनाऱ्यावर हटके आणि एकदम रोमांचक अनुभव घेता येतात. बंगालच्या उपसागराच्या उसळत्या लाटांमुळे महाबलीपुरमचा किनारा हा भारतातील सर्फिंग कॅपिटल ठरला आहे. त्याचप्रमाणे आता आंध्र प्रदेशातील ऋषीकोंडा बीच नव्याने सर्फिंगसाठी लोकप्रिय होऊ लागला आहे. मात्र पूर्वेच्या किनाऱ्याचा खरा मोती आहे ‌‘सुंदरबन‌’. या जगातल्या सर्वात मोठ्या मँग्रूव्ह फॉरेस्टमध्ये रुबाबदार पट्टेरी वाघ बघायला मिळतो. भारतातल्या इतर जंगलांमधल्या जीप सफारींपेक्षा अगदी वेगळ्या मार्गाने म्हणजे लहान बोटीतून तुम्ही इथल्या खाड्या-खाजणांमधून जलसफर करत किनाऱ्यावर सुस्तावलेल्या मगरी बघता आणि रॉयल बेंगॉल टायगरचा माग काढता, तेव्हा ती सफारी साहजिकच अविस्मरणीय ठरते.

पश्चिम किनाऱ्यावरील सह्याद्रीच्या म्हणजे वेस्टर्न घाटाच्या तुलनेत पूर्व किनाऱ्यावरच्या इस्टर्न घाटातल्या डोंगरवाटा ‌‘अनएक्सप्लोअर्ड‌’ आहेत. वेस्टर्न घाटाचा परिसर हिरव्यागार अरण्यांनी भरलेला आहे, तर इस्टर्न घाटातले पहाड अधिक रांगडे आहेत. कॉफीचे मळे आणि डोंगरातले धबधबे यामुळे आंध्र प्रदेशातली ‌‘अराकू व्हॅली‌’ ही ट्रेकर्ससाठी नंदनवनच आहे. ओडिशामधील  सर्वोच्च ‌‘देवमाळी पर्वता‌’वरुन दिसणारे हिरव्यागर्द डोंगरदऱ्यांचे विहंगम दृश्य तुमच्या डोळ्यात मावत नाही.

‌‘चिल्का‌’ या आशियातील सर्वात मोठ्या खारट पाण्याच्या सरोवरामध्ये तुम्ही अगदी वेगळा अनुभव घेता. इथे पर्यटक बोटीने कालिजाई बेटावर जातात, जिथे एक पुरातन मंदिर आहे. या सरोवरात थेट सायबेरियातून स्थलांतर करुन आलेले हजारो पक्षी बघायला मिळतात. इथे आढळणारे दुर्मिळ इरावडी डॉल्फिन जर त्यांच्या खेळकर लीला करताना बघायला मिळाले तर निसर्गप्रेमींना फार आनंद होतो.

थोडक्यात काय, तर भारताचे दोन किनारे म्हणजे एकाच रंजक गोष्टीची दोन प्रकरणं आहेत. पश्चिम भाग तुम्हाला त्याच्या समृद्ध निसर्गाची, मोहक किनाऱ्यांची, आरामदायी वातावरणाची भुरळ घालतो, तर पूर्व किनारा त्याच्या संपन्न इतिहासानं, आध्यात्मिक गूढतेनं आणि उदात्त संस्कृतीनं भारून टाकतो. अशावेळी दोघांपैकी एकाची निवड न करता दर आठवड्याला दोन्हीकडचं एकेक डेस्टिनेशन निवडून दोन्हीचा अनुभव घ्यावा हेच योग्य, नाही का?

August 08, 2025

Author

Neil Patil
Neil Patil

Founder & Director, Veena World

More Blogs by Neil Patil

Please let me know your thoughts on this story by leaving a comment.

Post your Comment

Please let us know your thoughts on this story by leaving a comment.

Similar Romantic Blogs

Read all
insert similar tours here

Explore Topics, Tips & Stories

Balloon
Arrow
Arrow

Get in touch with us

Share your details for a call back and subscribe to our newsletter for travel inspiration.

+91

Listen to our Travel Stories

Most Commented

Veena World tour reviews

What are you waiting for? Chalo Bag Bharo Nikal Pado!

Scroll to Top