Travel Planner 2025
Travel Planner 2025
IndiaIndia
WorldWorld
Our Toll Free Numbers:

1800 313 5555

You can also call us on:

+91 22 2101 7979

+91 22 2101 6969

Foreign Nationals/NRIs travelling

Within India+91 915 200 4511

Outside India+91 887 997 2221

Business hours: 10AM - 7PM

Our Toll Free Numbers:

1800 313 5555

You can also call us on:

+91 22 2101 7979

+91 22 2101 6969

Foreign Nationals/NRIs travelling

Within India+91 915 200 4511

Outside India+91 887 997 2221

Business hours: 10AM - 7PM

Explore Topics, Tips & Stories

Balloon
Arrow
Arrow

बोर्ड गेम्समधून उलगडणारं जग

9 mins. read

Published in the Sunday Maharashtra Times on 03 August 2025

...लाकडाची टेबलं, मंद प्रकाशयोजना, क्राफ्ट बिअर, फासे फेकल्याचा किंवा पत्ते पिसल्याचा हलका आवाज असं सगळं वातावरण असतं. यातली अनेक ठिकाणं ‌‘डिझाइन हब‌’ म्हणूनही ओळखली जातात...

काही आठवड्यांपूर्वीची गोष्ट. आमच्या घरी जवळच्या मित्रमंडळींसह बोर्ड गेम नाइटचा कार्यक्रम झाला. अगदी जवळचे मित्र, चटपटीत स्नॅक्स आणि रात्रभर रंगणारा ‌‘सेटलर्स ऑफ कटान‌’चा खेळ. बोर्ड गेम्सची एक खासियत तुमच्या लक्षात आलीय का? ते खेळताना आपण सगळे मिळून त्याची मजा लुटतो, हसतो- खिदळतो आणि यात आपल्याला जणू मोबाइल, नोटिफिकेशन्स या सगळ्याचा विसर पडतो.

या आठवड्याच्या लेखाचा विषय शोधत असताना, मला अचानक ती बोर्ड गेम नाइट आठवली. त्या दिवशी खेळताना झगडून जिंकताना आणि खेळाच्या नियमांबद्दल वाद घालताना मला अचानक प्रश्न पडला की मला हे बोर्ड गेम्स इतके का आवडतात? उत्तर अगदीच सोपं होतं, कारण हे खेळ आपण एकत्रितपणे खेळतो, आपण डावपेचही आखतो, पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे बोर्ड गेम्स खेळताना आपण नेमके कोण आहोत, आपण कसा विचार करतो याचं आपल्यालाच दर्शन घडतं.

हे बोर्ड गेम्स म्हणजे एका परीने संस्कृतीच्या कहाण्याच आहेत की. प्रत्येक देशात तिथले तिथले खास असे बोर्ड गेम्स आहेत. काही पारंपरिक, काही आधुनिक, काहींमध्ये विजयाला महत्व असतं, तर काही आपल्याला सहकार्याची महती शिकवतात. ज्याप्रमाणे एखाद्या देशाची खरी ओळख करुन घ्यायची असेल तर तिथले स्थानिक पदार्थ, पारंपरिक संगीत याचा आस्वाद घ्यायला हवा, त्याचप्रमाणे तिथले बोर्ड गेम्स सुध्दा तुम्हाला त्या देशाशी जोडण्यात मदत करतात. म्हणूनच आजच्या लेखात मी संस्कृतीचा हिस्सा असलेल्या या गोष्टीविषयी, अर्थात देशोदेशीच्या बोर्ड गेम्सविषयी बोलणार आहे. मग चला तर, फासे टाकूया आणि जग फिरूया!

थोडा बारकाईने विचार केला तर लक्षात येईल की बोर्ड गेम्समधून संस्कृतीचं प्रतिबिंब दिसतं. त्यातून त्या प्रदेशाची  विचारधारा, समस्या सोडवण्याची तिथली पारंपारिक पध्दत आणि परस्पर संबंध जोपासण्याची रीत कळते. काही गेम्स तुम्हाला डावपेच कसे आखायचे हे शिकवतात, काहींमुळे तुम्ही परंपरांचा आदर करायला शिकता. अशाच काही काळाच्या कसोटीवर उतरलेल्या आणि आजही लोकांच्या जगण्याचा भाग बनलेल्या खेळांची ही ओळख.

भारत: अनेक वर्षांपूर्वी जेव्हा मोनोपॉली आणि क्लूचा जन्मही झालेला नव्हता, तेव्हा भारताने जगाला ‌‘चतुरंग‌’ हा बैठा खेळ दिला. आजच्या बुध्दिबळाचा उगम ज्यातून झालाय असा चतुरंग 6 व्या शतकात निर्माण झालेला खेळ आहे. चौरस आणि गोलाच्या कापडी पटावर कवड्यांनी खेळला जाणारा ‌‘पचिसी‌’ हा देखील भारतातील पारंपारिक खेळ. ज्याला ब्रिटिशांनी पुढे ‌‘ल्युडो‌’च्या रुपात आपलंस केलं. हे खेळ फक्त वेळ घालवायचं साधन नव्हतं, तर यातून युध्दाचे डावपेच, शक्यतांची पडताळणी आणि सोबतच कर्मफलाचा सिध्दांतही शिकवला जाई. ‌‘शतरंज‌’चा महाभारतातील उल्लेख प्रसिध्द आहेच. भारतीय तत्वज्ञानात या खेळांचे रुपक नेहमी वापरलेले दिसते.

जपान: जपानमध्ये बोर्ड गेम्स म्हणजे एकाग्रता आणि दूरदृष्टी याचं प्रतीक मानलं जातं.  इथे आजही सर्वत्र ‌‘गो‌’ नावाचा खेळ खेळला जातो जो कैक वर्षे जुना आहे. हा खेळ खेळताना तुमच्या विचारांचा कस लागतो. या खेळात फक्त काळ्या-पांढऱ्या सोंगट्या वापरून खेळाडूंना आपल्या विभागात चौफेर हक्क प्रस्थापित करायचा असतो. हा खेळ म्हणजे जगण्यातील संतुलन आणि सूक्ष्मता याचे प्रतीक आहे. तसाच जपानी चेस अर्थात ‌‘शोगी‌’ या खेळात तुम्ही मारलेली प्यादी तुमच्या बाजूने वापरता येतात. कोणत्याही आपत्तीमधून चटकन सावरण्याची आणि नव्याने सुरवात करण्याची जपानी वृत्ती या खेळातून रुजली असावी.

चीन: शिंगकी म्हणजेच चायनीज चेस खेळताना आपण सैन्य, तोफा, हत्ती यांच्यासह युध्दाची रणनीती आखत आहोत असाच भास होतो. हा खेळ शांघायच्या पार्क्सपासून ते सिचुआनसारख्या लहान गावापर्यंत सगळीकडे खेळला जातो. चीनच्या परंपरागत तत्वज्ञानाचा भाग असलेल्या गोष्टी - संयम, दूरदृष्टी, पदांचे श्रेष्ठत्व यांचं बाळकडू जणू या खेळातून दिलं जातं. भारतातील बुध्दिबळ आणि जपानी शोगी पेक्षा चायनीज चेसचं वेगळेपण म्हणजे इथे बोर्डावर नद्या, राजवाडे असतात आणि त्यामुळे या खेळाचे डावपेच इतर खेळांपेक्षा कठीण असतात.

यु.एस.ए.: अमेरिकन बोर्ड गेम्समधून या देशाला भांडवलशाही, नवकल्पना, वाटाघाटी याबद्दल जी आत्मीयता वाटते, तीच प्रतीत होते. याचं आदर्श उदाहरण म्हणजे ‌‘मोनोपॉली‌’ हा खेळ. मुळात हा खेळ जमीन हडपण्याचे दुष्परिणाम दाखवण्यासाठी निर्माण झाला, पण आता तो मोठ्या उद्योगांची गौरवगाथा ठरला आहे. अमेरिकेतील रिस्क, स्क्रॅबल, क्लू हे सगळे खेळ जिंकणे, शब्द भांडार, अनुमान बांधणे याभोवती केंद्रित झालेले आहेत, कारण इथल्या समाजात वैयक्तिक प्रगती, भाषिक हुशारी आणि स्पर्धात्मक चढाओढ याला प्रतिष्ठा आहे.

जर्मनी: आधुनिक काळात गेमिंगसाठी जर्मनीने अफाट योगदान दिलं आहे. ज्या खेळाने जागतिक बोर्ड गेमच्या जगात उलथापालथ करुन ‌‘युरोगेम्स‌’ लोकप्रिय केले तो ‌‘सेटलर्स ऑफ कटान‌’ हा जर्मनीचीच देणगी आहे. नशिबाचा कमीत कमी वाटा, संतुलित पध्दत आणि आकर्षक रचना यामुळे हा खेळ लोकप्रिय झाला. जर्मन खेळांमधे खेळाडू बाद करण्यापेक्षा उपलब्ध साधनसामग्रीच्या व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित केलं जातं. यातून कार्यक्षमता, दीर्घकालीन नियोजन आणि सामुदायिक प्रयत्नांमधून कार्यसिध्दी करण्याचा या संस्कृतीचा कल लक्षात येतो.

आफ्रिका: या खंडात सगळीकडे ‌‘मन्काला‌’हा प्राचीन खेळ आजही खेळला जातो. जमिनीत खड्डे खोदून किंवा लाकडी कोरीव बोर्डांवर हा खेळ खेळला जातो. यात झाडाच्या बिया किंवा खडे अतिशय लयबध्दपणे हलवले जातात. ही लय जशी एकाग्र करणारी असते, तशीच ती खेळाचं गणित सांगणारीही असते. झाडाखाली, अंगणात किंवा शेकोटीजवळ डाव मांडला जातो, तेव्हा आपोआप एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हा खेळ हस्तांतरित होतो.

स्कँडेनेव्हिया: ‌‘हॅनेफताल‌’ हे नाव ऐकलं आहे का? हा वायकिंग लोकांच्या जमान्यातला पुरातन खेळ एकेकाळी युरोपमध्ये चेसपेक्षा जास्त लोकप्रिय होता. यात एका बाजूचे खेळाडू आपल्या राजाची सुटका करण्यासाठी प्रयत्नशील असतात, तर दुसरी बाजू त्याला अडकवण्याचा प्रयत्न करत असते. नॉर्स भाषेतील युध्द गाथांप्रमाणे, पलायन आणि पकडण्याची रस्सीखेच म्हणजे हा खेळ. कोडनेम्स आणि फोटोसिन्थेसिस हे नॉर्डिक देशांमधले अगदी अलीकडच्या काळातले खेळ त्यांच्या समाजातील सहकार्याच्या भावनेचे आणि त्यांच्या रचनेवरील प्रेमाचे प्रतीक म्हणता येतील.

मिडल ईस्ट: मेसोपोटेमियामध्ये जगातला सर्वात प्राचीन म्हणजे 4000 वर्षे जुना बोर्ड गेम ‌‘उर‌’ मिळाला. हा शाही खेळ इराकमध्ये उत्खननात सापडला. मूळ खेळ ब्रिटिश म्युझियममध्ये जतन करण्यात आला आहे, पण आजही त्याच्या आधुनिक आवृत्त्या पहायला मिळतात. मात्र ढोबळपणे मिडल ईस्टमध्ये ‌‘बॅकगॅमन‌’ सर्वात लोकप्रिय आहे. इराण, टर्की आणि लेबेनॉन मधल्या कॉफी हाउसेसमध्ये चहा आणि गप्पांच्या जोडीने हा खेळ रंगतो. नशीब आणि डावपेचांचा हा खेळ म्हणजे आयुष्यातील संधी आणि निवडीमधील संतुलन शिकवतो.

अनपेक्षित प्रवास: प्रवासात बोर्ड गेम्स आपल्याला कुठे भेटतील हे काही सांगता येत नाही.

बोर्ड गेम कॅफेज्‌‍:

सेउल आणि टोकियोसारख्या शहरांमध्ये बोर्ड गेम कॅफेज्‌‍ हे तिथल्या जीवनशैलीचाच भाग आहेत. सेऊलच्या होन्गादे आणि गंगनाम सारख्या गजबजलेल्या भागांमध्ये बहुमजली गेम कॅफे आहेत. जिथल्या शेल्फमधल्या शेकडो बोर्डगेम्सपैकी आवडत्या खेळाचा आनंद लुटण्यासाठी मित्रांची टोळकी हमखास जमा होतात.

टोकियोमध्ये खास जपानी नेटकेपणाने याचा आनंद घेता येतो. जेली जेली कॅफेसारख्या जागा म्हणजे खेळायची आवड असलेल्यांसाठी नंदनवनच आहेत, या ठिकाणी सोलो पर्यटकांनाही आपल्या टेबलावर आमंत्रित करुन सहभागी करुन घेतलं जातं. यातला सर्वात उत्तम भाग म्हणजे अनेक कॅफेज्‌‍ मध्ये इतरत्र कुठेही मिळणार नाहीत असे जपानमध्ये तयार झालेले स्थानिक गेम्स खेळायला मिळतात.

बर्लिन आणि ॲमस्टरडॅममधले बोर्ड गेम कॅफे हे अधिक आरामदायी असतात. लाकडाची टेबलं, मंद प्रकाशयोजना, क्राफ्ट बिअर, फासे फेकल्याचा किंवा पत्ते पिसल्याचा हलका आवाज असं सगळं वातावरण असतं. यातली अनेक ठिकाणं ‌‘डिझाइन हब‌’ म्हणूनही ओळखली जातात कारण तिथे गेम्स तयार करणाऱ्या कंपन्या प्ले टेस्टिंग नाइट्‌‍स आयोजित करतात आणि नवीन खेळांची ट्रायल घेतात.

रस्ते  बोर्ड गेम्स बनतात तेव्हा:

चायनामध्ये अनेकदा पार्क्स किंवा रस्त्यालगतच्या मोकळ्या जागांवर बोर्ड गेम रंगलेले पाहायला मिळतात. शांघाय किंवा चेंगदू सारख्या शहरामध्ये अनेकदा स्थानिक, सिनिअर सिटीझन्स शिंगकी किंवा गो खेळण्यात गढून गेलेले पाहायला मिळतात, मग त्यांच्याभोवती बघ्यांचं एक कोंडाळं जमा होतं आणि ते सुध्दा त्या खेळात रंगून जातात. बुध्दिमत्ता आणि अनुभव याचं जणू ते जाहीर प्रदर्शन असतं.

टर्कीमधलं चित्र काही वेगळं नाही, तिथे टी गार्डन्स आणि आउटडोअर कॅफेज्‌‍मध्ये बॅकगॅमनच्या सोंगट्यांचा किणकिणाट गुंजत असतो. खेळकरपणे बडबड करतानाच दोन मित्र एकमेकांशी जी झुंज देतात ती म्हणजे एकाग्रता, संयम याचा वस्तुपाठ असते.

बोर्ड गेम्सच्या मार्केटची दुनिया:

अनेक ठिकाणच्या स्थानिक बाजारांमध्ये तुम्हाला कलात्मकपणे तयार केलेले बोर्ड गेम्स विकायला ठेवलेले पाहायला मिळतात. पश्चिम आफ्रिकेतल्या हाताने कोरलेल्या मान्काला बोर्डपासून ते पूर्व युरोपमधल्या लाकडी चेस सेटपर्यंत, हे बोर्ड गेम्स मग केवळ सोव्हेनियर न राहता पारंपरिक कारागिरीचे जिवंत नमुने होऊन जातात.

पेरूमधील कुस्कोच्या मार्केटमध्ये ॲन्डीयन शैलीतील रंगीबेरंगी स्ट्रॅटेजी गेम्स मिळतात, तर मेक्सिकोमध्ये तिथल्या स्थानिक कलापरंपरेचा आणि लोकसंस्कृतीचा हिस्सा असलेले, हाताने घडवलेले लोतेरिआचे सेट्‌‍स विकत मिळतात.

म्युझियम आणि एक्झिबिशन्स:

तुम्ही जर स्वित्झर्लंडमध्ये असाल तर तिथलं ‌‘ला टूर दे पेइल्झ‌’ मधलं ‌‘स्विस म्युझियम ऑफ गेम्स‌’ बघायला विसरू नका. लेक जिनेव्हाच्या काठावरच्या या संग्रहालयात जगभरातले बोर्ड गेम्स, कार्ड गेम्स, आउटडोअर गेम्स एकत्रितपणे पाहायला मिळतात. त्यामुळे हे खेळ कसे निर्माण झाले याचा इतिहासही कळतो. जर्मनीतील न्यूरेम्बर्गमध्ये भरणारी वार्षिक टॉय फेअर म्हणजे गेम इंडस्ट्रीची पंढरीच असते. इथे जगभरातले नवीन आणि क्लासिक गेम्स एकत्र पहायला मिळतात. अनेक शहरांमध्ये खेळांचा इतिहास सांगणारी फिरती प्रदर्शने होत असतात. त्यातून तुम्ही जणू स्थळ-काळाच्या भिंती भेदून, टाईम मशीनमधून प्रवास करुन, या खेळांचा प्रवास पाहू शकता.

स्थानिक खेळांची महती:

तुम्ही ज्या देशात, प्रांतात गेला आहात, तिथली स्थानिक भाषा येत नसली तरीही बोर्ड गेम्समध्ये तुम्ही सहज सामावले जाऊ शकता. त्यामुळे स्थानिकांशी जोडले जाण्याचा हा उत्तम आणि सोपा मार्ग आहे. प्रत्येक खेळ तुम्हाला काही ना काही शिकवतो. संथ खेळ संयम आणि दूरदृष्टी शिकवतात, तर जलद खेळांमध्ये उर्जा आणि स्पर्धात्मक वातावरण याचा अनुभव मिळतो. एखादा खेळ मनात भरला तर अवश्य विकत घ्या. कारण तुम्ही फक्त बोर्ड गेम सोबत नेत नाही, तर त्या प्रदेशातील संस्कृतीचा हिस्सा सोबत आणता. मग सहल संपली तरी त्या देशाशी तुमचं नातं तुटत नाही. आणि तसंही बोर्ड गेम खेळणं म्हणजे एका परीने आयुष्याचा उत्सव साजरा करणंच नाही का?

August 01, 2025

Author

Neil Patil
Neil Patil

Founder & Director, Veena World

More Blogs by Neil Patil

Please let me know your thoughts on this story by leaving a comment.

Post your Comment

Please let us know your thoughts on this story by leaving a comment.

Similar Romantic Blogs

Read all
insert similar tours here

Explore Topics, Tips & Stories

Balloon
Arrow
Arrow

Get in touch with us

Share your details for a call back and subscribe to our newsletter for travel inspiration.

+91

Listen to our Travel Stories

Most Commented

Veena World tour reviews

What are you waiting for? Chalo Bag Bharo Nikal Pado!

Scroll to Top