हे विश्वची माझे घर

0 comments
Reading Time: 6 minutes

आपल्या महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांच्या फिरण्याचं प्रमाण वाढलंय. दर आठवड्याला देशातकिंवा परदेशात कुठे ना कुठे मी ज्येष्ठ पर्यटकांना भेटत असते. पुढच्या आठवड्यात सीनियर्स स्पेशल टूरच्या पर्यटकांना काठमांडूनेपाळमध्ये भेटेन. सर्वांचा उत्साह बघितल्यावर असं वाटतं की खूप उशीरा आपण सीनियर्स स्पेशलच्या सहली सुरू केल्या. ह्या उत्साहवर्धक सहलीचं टॉनिक जरा आधी सुरू केलं असतं तर महाराष्ट्र खूप आधी आणखी तरूण झाला असता.

“इथे कुणीही कुणाच्या ओळखीचं नाही तरीही सगळे एकमेकांसाठी आहेत”, हे वाक्य कोणत्या सिनेमातलं किंवा कांदबरीतलं नाही तर हा सवांद घडला होता गेल्या वर्षीच्या ज्येष्ठ नागरिकांच्या मॉरिशसच्या सहलीवर. मेरीटीम क्रिस्टल्स बीच रीसॉर्टमध्ये सहलीच्या पाचव्या दिवशी मी सीनियर्स स्पेशल मॉरिशस सहलीच्या पर्यटकांना ब्रेकफास्टच्या वेळी भेटले. नॅचरली आमच्या गप्पा सुरु झाल्या. मी काय बोलतेय हे त्यातलेच एक ज्येष्ठ नागरिक दुसर्‍या एका ज्येष्ठ नागरिकांना समजावून सांगत होते. पटकन माझ्या लक्षात आलं नाही तेव्हा बाजूलाच बसलेल्या एक ताई म्हणाल्या, “अगं वीणा, त्यांना जरा कमी ऐकायला येतं पण बाकी एकदम तन्दुरुस्त आहेत. इथे आम्ही सगळेच अशी एकमेकांना मदत करतोय. तसं बघायला गेलं तर ह्या सहलीला येताना कुणीही कुणाच्या ओळखीचं नव्हतं. पण आता ह्या चार-पाच दिवसांत जणू एका कुटुंबातले असल्यासारखे झालोय. एकमेकांच्या स्ट्रेंथ्स आणि विकनेसेस लक्षात घेऊन आम्ही एकमेकांना मदत करतोय, त्यामुळे सहल आरामात सुरु आहे. ‘हे विश्‍वची माझे घर’ असं काहीसं वाटायला लागलंय.” त्यांना मी म्हटलं, “तुम्ही मला विषय दिलात लिहायला, किती मस्त संकल्पना आहे.” विषय असेच मिळत जातात, ‘आता काय लिहू?’. हा प्रश्‍न पडत नाही कारण हे विश्‍वची माझे घर असल्याने अखंड प्रवासात मला अनंत गोष्टी मिळत राहतात.

सीनियर्स स्पेशलच्या सहली म्हणजे आशिर्वाद स्पेशल सहली असं मी म्हणते. जगाच्या कानाकोपर्‍यात ह्या सहली आम्ही घेऊन जात असतो आणि आमचे टूर मॅनेजर्स अशी काही काळजी घेत असतात प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाची की काही विचारू नका, आणि बहुतेक करून प्रत्येक सहलीला गाला इव्हिनिंगसाठी मी ह्या पर्यटकांना भेटत असल्याने मला फर्स्ट हॅन्ड रीपोर्ट मिळतो. पर्यटकांच्या चेहर्‍यावरूनच कळंत की आमची ही ज्येष्ठ नागरिक मंडळी खूश आहेत की नाहीत. आत्तापर्यंत कधीही अशी वेळ आली नाही की मी गेल्या गेल्या पर्यटकांनी काही तक्रारवजा गोष्टी सांगितल्यात. क्रेडिट गोज टू अवर मोस्ट केअरिंग एक्सपर्ट टूर मॅनेजर्स आणि त्यांना सपोर्टला असणारी सर्व वीणा वर्ल्ड टीम. आत्ताच सप्टेंबरमध्ये मी युरोपमध्ये तीन आणि अमेरिकेत दोन अशा पाच सीनियर्स स्पेशलच्या टूरवरील ज्येष्ठ नागरिकांना भेटले. प्रत्येक ठिकाणी माहोल तोच. आनंदाचा, समाधानाचा आणि आत्मविश्‍वासाचा.

वुमन्स स्पेशलच्या सहली जेव्हा मी सुरु केल्या तेव्हा त्याची मुळ संकल्पना होती ‘स्वतःला वेळ द्या’ ही. सीनियर्सच्या सहली जेव्हा सुरु केल्या तेव्हा त्याची संकल्पना होती ‘कॉन्फिडन्स बिल्डिंग’. तसं बघायला गेलं तर ह्या दोन्ही प्रकारच्या सहली एका पर्यटन संस्थेच्या कमर्शियल सहली आहेत पण कॉमर्सच्या परीघाच्या बाहेर ह्या कधी पडल्या ते आमच्या आणि पर्यटकांच्याही लक्षात आलं नाही. इथे पैशाच्या व्यवहाराच्या पलिकडे बरंच काही आहे पर्यटाकांसाठी आणि आमच्यासाठीही. ज्या वयात ‘हे करू नका’, ‘ते करू नका’, ‘हे तुम्हाला झेपणार नाही’, ‘ते करायचं काय तुमचं वय आहे का?’ अशा घरातल्या तरुणाईच्या सरबत्तीला सामोरं जावं लागतं तेव्हा ह्या सीनियर्स स्पेशलच्या सहली ‘येस, आय कॅन’ ‘आम्ही हे करू शकतो’चा आत्मविश्‍वास प्रत्येकामध्ये जागवतात. इथे स्टेशनवर पाठवायला घाबरणारी घरातली मंडळी जेव्हा ज्येष्ठांना युरोप अमेरिका ऑस्ट्रेलिया स्कॅन्डिनेव्हियाच्या सहलीला जाऊन ताजतवानं होऊन परत आलेले बघतात तेव्हा तोंडात बोट घालायची वेळ येते त्यांची.

‘आपण हे करू शकतो’ हा आत्मविश्‍वास किंवा ती स्ट्राँग विलपॉवर बरंच काही करून जाते. फक्त मनात त्याचा वावर असला पाहिजे बस्स. सीनियर्स स्पेशलच्या ह्या सहलींवर उदास-निराशाजनक म्हणजे, ‘आली साठी हाती घेतली काठी’ किंवा ‘आता आम्ही उरलो नावापुरते…’ अशा कवितांना मी बंदी आणलीय. हो हिटलरशाहीच म्हणानं, नो प्रॉब्लेम. पणा ह्या असल्या कविता वाचून वैचारिक उदासिनता आणण्याला माझा पूर्ण विरोध आहे कारण तीच नंतर आपल्या आचारात येते आणि आपण आपल्या माथी वृध्दापकाळाचा शिक्का मारून संपलं सगळं आता अशी हार मानतो. व्हाय? नॉट अलाऊड अ‍ॅट ऑल! सगळं आयुष्य कुटुंबासाठी, आई-वडीलांसाठी, मुलाबाळांसाठी कष्टानं घालविल्यावर आत्ता कुठे वेळ आलीय आयुष्याचा खर्‍या अर्थाने आनंद घ्यायची मग त्यावेळी मागे हटायचं नाही, नांगी टाकायची नाही. उलट मोठ्या डौलाने दिमाखात आयुष्यातल्या राहून गेलेल्या आनंदाचा आस्वाद घ्यायला सुरुवात करायची. मग जग काहीही म्हणो, आपण आपल्या मनाचे राजे. काय बिशाद आहे कुणाची आपल्या आनंदावर शिंतोडे उडवायची. आणि कुणी असलंच सभोवती तरी चिंता करायची नाही. असंही होईल कदाचित, तुमचा वाढता उत्साह बघून आज टर खेचणारे ‘ते’ उद्या तुमच्या आनंदात सहभागी होतील किंवा तुमच्या जीवनशैलीला आत्मसात करतील. ‘मीच माझी राणी’ किंवा ‘मीच माझा राजा’ हे आपल्या जीवनाचं तत्व.

सीनियर्स स्पेशल सहलींचा वाढता प्रतिसाद बघून काही टीप्स मला ह्या देश-विदेशातल्या सहलीला येणार्‍या पर्यटकांना द्यायच्यात त्या आहेत स्मार्ट ट्रॅव्हलरच्या. शक्य असेल तर आपलं वजन कमी करायचं पण सहलीला निघताना आपल्या सोबतचं वजनही कमी करायचं, हे अगदी मस्ट. कमी वजनाच्या छोट्या बॅगेत आपल्याला आपल्या प्रवासासाठी लागणार्‍या गोष्टींना माववता आलं पाहिजे, आणि तरीही आपण स्मार्ट दिसलं पाहिजे. जमाना बदललाय. साडी आणि पंजाबी ड्रेसला बाद करा प्रवासातून. पुरुष असो वा महिला, जीन्स आणि टी शर्ट आणि स्पोर्टस् शूज हा पहेराव आत्मसात करा, बॅगेतील वस्तुंची संख्या एकदम कमी होईल. घरातल्या तरुण मंडळींनी ह्या बाबतीत ज्येष्ठांना सहकार्य करायचंय बरं का. आपली ज्येष्ठ मंडळी सहलीवर स्मार्ट दिसली पाहिजेत, प्रवासात स्मार्ट दिसण्याचा मक्ता फक्त तरूणांनी किंवा परदेशी मंडळींनी नाही घेतलाय. पुढे अजून बरंच असं छोटं छोटं काही सांगायचंय ते पुन्हा कधीतरी. हॅव अ हॅप्पी संडे!

Language, Marathi

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

*