सेव्हिंग्ज

0 comments
Reading Time: 7 minutes

‘ऑडिट’ हा शब्द एक-दुसर्‍यांच्या मदतीपेक्षा संशय जास्त वाढवतो म्हणजे, ‘अरे माझ्यावर विश्‍वास नाही? किंवा तू कोण मला शिकवणार? असा दृष्टीकोन असतो’. प्रत्येक गोष्टीचं ऑडिट होणं हे अपरिहार्य आहे नो डाऊट, पण बर्‍याचदा त्याचा धसका घेतला जातो किंवा त्यांना स्विकारायलाच मानसिक आडकाठी असते.

समर ऑफर लाँच होतेय आणि त्यामुळे सर्व सेल्स टीम्सची मीटिंग आहे दरवर्षीप्रमाणे, तीन दिवस सलग रोज किमान चार तास द्यायचे आहेत. वेगवेगळ्या ऑफिसेसमधल्या टीम्स येतील, त्यावेळी त्यांची त्या ऑफिसमधली कामं इतर लोक सांभाळतील. ओके, आता हे वर्षभराच्या कॅलेंडरमध्ये होतं, आम्हीच सर्वांनी मिळून ते केलं होतं त्यामुळे त्याच्यात बदल करणं किंवा सुचवणं योग्य नव्हतं. पण असं वाटत होतं की, ह्या तीन दिवसांच्या मीटिंग्जमध्ये काहीतरी बदल करायला हवा. आपण दोन वर्ष हे केलं ठरल्याप्रमाणे. बरं, ह्याचा सर्वात मोठा फायदा पुणे ऑफिसच्या रीलोकेशनमध्ये झाला होता. विद्याविहारच्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये आम्ही ‘फॅमिली डे’ केला होता दोन वर्षांपूर्वी, त्यावेळी संपूर्ण पुणे टीम मुंबईला आली होती आणि मुंबईच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटमधल्या पंचवीस टीम मेंबर्सनी जाऊन पुणे ऑफिस जे त्यावेळी जंगली महाराज रोडवर संभाजी पार्कसमोर होतं ते एक दिवस सांभाळलं होतं. अ‍ॅकच्युअली हा एक प्रयोग होता. पुणं ऑफिस पुरत नाही, पर्यटकांची गैरसोय होतेय अशी कुणकूण होती. संस्था नवीन होती, नव्या ऑफिसचा खर्च झेपणारा नव्हता. पण टीमची मागणी वाढत होती. ‘फॅमिली डे’चं निमित्त साधून आम्ही टीम्स इंटरचेंज केल्या आणि दोन दिवसांनी इथून पुण्याला गेलेल्या वेगवेगळ्या टीम मेंबर्सची मीटिंग बोलावली. त्यांनी दिलेला अहवाल किंवा फीडबॅक डोळ्यात अंजन घालून गेला. मीटिंगच्या सुरुवातीलाच त्यांनी पुणे टीमला साक्षात दंडवत घालत, ‘हॅट्स ऑफ टू पुणे टीम! कसं ते मॅनेज करतात माहीत नाही पण एवढे प्रॉब्लेम्स आम्हाला जाणवले की त्यांना जेवढं होईल तेवढं लवकरात लवकर शिफ्ट करा अशी शिफारस आम्ही करतोय’ असं अगदी ठणकावून सांगितलं सर्वांनी मिळून. आणि आम्ही पुणे ऑफिस लागलीच भांडारकर रोडला शिफ्ट केलं. (आता दीड वर्षात ते ऑफिसही कमी पडायला लागलं ही गोष्ट वेगळी.) वीणा वर्ल्ड सुरु झाल्यापासून आमच्या पुण्याच्या पर्यटकांनी असा जो काही पाठिंबा दिलाय त्याचं ऋण कधीही फिटणार नाही. ‘मनापासून धन्यवाद आमच्या पुण्याच्या पर्यटकांना’.

‘एखाद्या डिपार्टमेंटमध्ये संपूर्ण नवीन टीम आणणं, एका मॅनेजरने दुसर्‍या मॅनेजरच्या टीमचा ताबा घेणं, दरवर्षी मॅनेजर्सना कंपल्सरी एक वा दोन महिन्यांची सुट्टी देणं’… ह्या सगळ्या गोष्टी ऑर्गनायझेशन लेव्हलवर जगभरात केल्या जातात जेणेकरून संपूर्णपणे वेगळा व्ह्यू मिळू शकतो, त्रुटी लक्षात येतात, आधीचे सर्वजण रोज रोज त्याच गोष्टी करून रूटीनमध्ये ब्लाईंड (‘ब्लाईंड स्पॉट’ हा मार्केटिंगमधला शब्द) झालेले असतात त्यामुळे पटकन वेगळा विचार केला जात नाही. तो वेगळा विचार नवीन आलेला माणूस देऊ शकतो त्यामुळे पुण्याला गेलेल्या संपूर्ण टीमने जो फीडबॅक दिला तो विचार करायला लावणारा होता आणि त्यानंतर त्यावर लागलीच कार्यवाहीसुद्धा झाली. आता आम्ही काही स्पेशल टीम्सना हे काम दिलंय की, ‘जा बसा त्या डीपार्टमेंटमध्ये आणि शोधून काढा कुठे प्रोसेसमध्ये टाइम वेस्टेज आहे, कुठे आपण सिस्टिममध्ये नवीन बदल करुन देऊन त्यांचं काम कमी करु शकतो’. ह्या टीम्स आधी आम्ही ऑडिट टीम म्हणून आणल्या होत्या पण ‘ऑडिट’ हा शब्द एक-दुसर्‍यांच्या मदतीपेक्षा संशय जास्त वाढवतो म्हणजे, ‘अरे माझ्यावर विश्‍वास नाही? किंवा तू कोण मला शिकवणार? असा दृष्टीकोन असतो’. प्रत्येक गोष्टीचं ऑडिट होणं हे अपरिहार्य आहे नो डाऊट, पण बर्‍याचदा त्याचा धसका घेतला जातो किंवा त्यांना स्विकारायलाच मानसिक आडकाठी असते त्यामुळे आम्ही ह्या टीम्स सर्वांना किती मदतीच्या आहेत हे सप्रमाण सिद्ध केलं आणि हळूहळू ह्या टीम्स ‘सर्व हिताय’ स्विकारल्या जाताना दिसताहेत. असो.

तर सेल्स मीटच्या निमित्ताने सर्वांना पर्सनली भेटणं होतं, संवादाचं, आयडियाजचं आदानप्रदान होतं हाही एक भाग होता. सर्वांना कॉर्पोरेट ऑफिसला बोलावण्याचा आणि भेटण्याचा. पण तरीही मी थोडी अस्वस्थ होते की आता दोन वर्षानंतर काहीतरी वेगळं करूया. टीम्स आता सेट झाल्या आहेत. सगळ्यांना बोलवायचं म्हणजे खूप वेळ जाणार होता. ‘इज इट रिअली निडेड?’ आता मला आमच्या नेक्स्ट जनरेशनचा आधार घ्यावा लागणार होता. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, स्काईप, लाइव्ह स्ट्रिमिंग हे सगळं अधूनमधून वापरलं जात होतं पण मोठ्या पातळीवर असं केलं नव्हतं. आणि पूर्वी मीटिंग्ज घेण्याचा मुद्दा वेगळा होता. पण आता रुटीन सेट झाल्यावर सर्वांचा एवढा वेळ जाण्या-येण्यात, ते सगळं ऑर्गनाईझ करण्यात घालवणं हा ऑर्गनायझेशनच्या वेळेचा अपव्यय होता. नीलला म्हटलं, “अरे आम्हाला सर्वांचा वेळ वाचवणारं काही द्या”. आणि त्यांनी म्हणजे उमेश घुडे आणि भुषण बागवे ह्या टीमने लाइव्ह स्ट्रिमिंग दिलं जेणेकरून प्रत्येक माणसाने त्या सकाळी आपल्या डेस्कवर बसून ते लाइव्ह बघितलं आणि ऐकलं. सकाळची प्रसन्न वेळ, सर्व सेल्स टीम्सचा प्रसन्न मूड ह्यामध्ये माझा मेसेज जास्त चांगल्या तर्‍हेने रिसिव्ह झाला आणि एक तासात टीम आपल्या कामाला लागली. वीणा वर्ल्ड पुणे संभाळणारे संदीप जोशी, शर्वरी शिंदे, श्रद्धा मांडके, रुजुता नातू आणि टीमने ह्या गोष्टीला नावं दिलं ‘मनकी बात’. त्यांना म्हटलं, “अरे असं बोलायचं नाही”.  तर म्हणे, ‘हो तुमच्या मनाला येईल ते तुम्ही बोलता म्हणून आम्ही म्हटलं’. आता ही प्रशंसा होती की तिरकस शेरा होता मला कळलं नाही पण मी आपलं चांगल्या अर्थाने म्हणजे प्रशंसा म्हणून घेतलं. आदतसे मजबूर.

वीणा वर्ल्ड काय किंवा कोणतीही पर्यटन संस्था किंवा एअरलाईन इंडस्ट्री ही खूप कमी मार्जिनवर काम करतेय कारण ‘प्राइस वॉर’. अर्थात जागतिक स्पर्धेच्या वावटळीत फक्त ट्रॅव्हल कंपन्याच नाहीत तर सर्वच व्यवसायांवर प्राइस वॉरचा हातोडा पडलाय. मार्जिन्स कमी झालीयेत, काही जणं ‘नो लॉस नो प्रॉफिटवर’ काम करताहेत, ऑनलाइन कंपन्यातर त्यांच्या भाषेत ‘ब्लीड’ किंवा ‘ कॅश बर्निंग’ ह्या तत्वाने, ठरवून तोट्यात जाऊन काम करताहेत. ऑनलाइन ट्रॅव्हल कंपन्या किंवा एअरलाईन्सच्या तोट्याची टक्केवारी किंवा आकडे ऐकले की आपल्याला गरगरायला होतं. मार्केट शेअरच्या नादात ही रॅटरेस सुरू आहे, आणि आपल्याला चॉइस नाहीये, कळत नकळत आपणही त्याचा हिस्सा बनतोय. अशावेळी जेव्हा प्राइस वॉर मध्ये आपण प्राइस वाढवू शकत नाही, म्हणजे बघानं गेली तीन वर्ष आमच्या सहलींच्या किमती आम्ही वाढवू शकलो नाही, महागाई एवढी वाढत असूनही. अर्थात ह्यात पर्यटकांचा फायदा होतो आणि आम्हाला व्हॉल्यूम मिळतो ही गोष्ट वेगळी. पण आजच्या ह्या परिस्थितीत इतर सर्व खर्च आटोक्यात ठेवणं ही मोठी जबाबदारी येते. आता आमच्याकडे असं झालंय की एका बाजूला पर्यटकांच्या वाढत्या पाठिंब्यामुळे सतत एक्स्पांशन करावं लागतंय तर दुसरीकडे खर्च आटोक्यात ठेवण्याचा प्रयत्न सुरु आहे. आणि त्याला यश येतंय बरं का. पैसे वाचवणं, वायफळ खर्च कमी करणं ह्या गोष्टी तर कराव्या लागणारच आहेत पण आपल्या टीमचा वेळ वाचवणं, त्यांचा स्ट्रेस कमी करणं, त्यांचा मूड आणि त्यांचा उत्साह टिकवणं हे काम आम्हा सर्व मॅनेजर्स आणि इन्चार्ज टीमचं आहे त्यासाठी काय काय करतोय आणि काय काय करायला पाहिजे ह्यावर विचारमंथन पुढच्या पंधरवड्यात, तो पर्यंत ‘हॅप्पी संडे’!

Language, Marathi

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

*