Language Marathi

साध्या साध्या गोष्टी भाग 5

प्रत्येक माणसाची, समाजाची, राज्याची देशाची प्रतिमा तयार होत असते ती अशी. आणि मला वाटतं की आपली काय प्रतिमा आहे ह्याचा आपण सतत विचार केला पाहिजे. अर्थात प्रतिमा चांगली राहावी म्हणून देखाव्यासाठी चांगल्या गोष्टी कराव्या हे ही अलाऊड नाही बरं का. आपण जे काही आहोत ते आंतर्बाह्य असलं पाहिजे.

खाऊ गल्ली मग ती कोणत्याही शहरातली, राज्यातली किंवा देशातली असो, प्रत्येकाला मग तो स्थानिक वा परप्रांतीय वा परदेशी असो तिथे जावंसं वाटतच. वुमन्स स्पेशलसाठी मी इन्दौरला चाललेय म्हटल्यावर सुनिला म्हणाली, ‘अगं तिथली खाऊ गल्ली फेमस आहे तिथे जाऊन ये’. आता मी दुपारी पोहोचणार, संध्याकाळी गाला इव्हिनिंगला सगळ्यांना भेटणार आणि पहाटे निघणार, वेळ कुठे आहेे. विषय तिथेच थांबला पण इन्दौरला उतरले. विमान वेळेआधीच पोहोचलं होतं. कारमध्ये बसल्यावर थोडासा वेळ आहे दिसल्यावर आमच्या टूर मॅनेजरला सारंगला म्हटलं ‘अरे एक काम कर, गाडी खाऊ गल्लीवरून घे, मला बघायचंय फक्त’. तो हसला आणि म्हणाला, ‘अहो, खाऊ गल्ली रात्री सुरू होते आणि दोन वाजेपर्यंत असते. कार्यक्रम संपल्यानंतर जर शक्य झालं तर जाऊन येऊया’ हूँऽऽऽ आपल्यालाही बर्‍याच गोष्टी माहीत नाहीत तर. संध्याकाळी दे दणादण गाला इव्हिनिंग, फॅशन शो पार पडला. कार्यक्रमात गप्पांचं आदान-प्रदान होताना चर्चेचा आणि कौतुकाचा विषय होता तो म्हणजे खाऊ गल्ली. सहलीच्या कार्यक्रमात रात्रीच्या भोजनानंतर झोप हा एवढाच भाग असतो. पण सगळ्यांच्या आग्रहाखातर वुमन्स स्पेशलच्या बर्‍याच जणी टूर मॅनेजरला सोबत घेऊन खाऊ गल्लीला भेट देऊन आल्या होत्या. तिथे काय काय धम्माल केली, काय खाल्लं, स्मोक पान, दहा प्रकारची पाणीपूरी, जोशींचा दहीवडा, जिलेबी, गजक, फिरनी, शिकंजी, मालपोवा, कोकोनट क्रश… प्रत्येक प्रकाराविषयी किती बोलू आणि किती नको असं त्यांना होऊन गेलं होतं. पुन्हा एकदा खाऊ गल्ली ह्याविषयी माझ्या मनात उत्सुकता निर्माण झाली. कार्यक्रम संपला. साडेदहा पावणे अकरा झाले होते. वुमन्स स्पेशलचे टूर मॅनेजर्स संदीप काशिद आणि विनोद देशमुखला मी म्हटलं, ‘जाऊया का खाऊ गल्लीला?’ आमच्या सहलीवरच्या काही सख्याही होत्या तिथेच त्यांना म्हटलं, ‘तुम्ही एवढं सांगितलंय तर राहवत नाही जाऊन येते’. आम्ही तिथे पोहोचलो. खाऊ गल्लीत रस्त्याच्या दुतर्फा वेगवेगळ्या खाद्यपदार्थांच्या गाड्या लागलेल्या होत्या आणि बरीच गर्दी होती पण एक जाणवलं की त्या गर्दीला एक शिस्त होती. गर्दीचा फायदा घेऊन मुलींना धक्के मारणारे त्या गर्दीत नव्हते. खाऊ गल्लीत फिरण्याची, हँग आऊटची, प्रत्येक गाडीवर जाऊन तिथला पदार्थ चवीने खाणार्‍या फूड लव्हर्सची ती गर्दी होती. त्यांना सगळ्यांना बघून आम्हीसुद्धा प्रत्येक ठिकाणी जाऊन एक एक डीश घेऊन चौघांमध्ये शेअर करीत होतो. प्रत्येक गोष्टीची चव घेणं हा अजेंडा होता. पण एक एक घास करता करता पोट कधी तुडूंब भरलं हे कळलंच नाही. ‘बस हो गया’ म्हणत आम्ही हॉटेलला आलो. खूप दिवसांनी असं काहीतरी हटके मी केलं होतं त्यामुळे मलाच माझा अभिमान वाटला. संदीप आणि विनोदला म्हटलं, असं जर कुणाला रात्री खाऊ गल्लीला यावंस वाटलं तर तुम्ही एक दिवस ठरवून पर्यटकांना ही खाऊ गल्ली सुचवू शकता.

ही खाऊ गल्ली म्हणजे इन्दौरचा सराफा बाजार, सकाळी नऊ ते रात्री साडेनऊपर्यंत इथे सोन्या चांदीच्या दुकानात लाखो करोडोची उलाढाल होत असते. छोट्या मोठ्या सोन्या चांदीच्या दुकानांची ही भाऊगर्दी आणि अशातर्‍हेचा तो ट्रॅडिशनल बाजार आता खूप कमी ठिकाणी बघायला मिळतो. एकदा का ही दुकानं रात्री साडेनऊला बंद झाली की पंधरा मिनिटात हा सराफा बाजार खाऊ गल्लीत रूपांतरीत होतो. गाड्या लागतात, खाणार्‍यांची गर्दी सुरू होते आणि रात्री दोनपर्यंत तिथला हा आगळा आनंद ओसंडून वाहत असतो. पहाटे ह्या गाड्या आणि त्यांचे मालक आपापल्या घरी पोहोचतात पण जायच्या आधी प्रत्येक जण ती जागा साफसुथरी करून जातो जेणेकरून सकाळी सुरू होणारा सराफा बाजार व्यवस्थित सुरू व्हावा. एकमेकांच्या साथीने एकमेकांना समजून घेत हा दिनक्रम अखंड सुरू आहे. माझा प्रत्येक प्रवास अशी अनुभवांची शिदोरी देत असतो. ह्या इन्दौरच्या सहलीत स्वच्छता आणि त्या स्वच्छतेत स्थानिकांचा सहभाग ही गोष्ट मला प्रकर्षाने जाणवली. इन्दौर हे आपल्या भारतातलं सर्वात स्वच्छ शहर आहे, ‘क्लिनेस्ट सिटी ऑफ इंडिया’ आणि त्यांनतर भोपाळ हे दुसर्‍या क्रमाकाचं स्वच्छ शहर. एकाच राज्याने पहिले दोन क्रमांक मिळवणं म्हणजे खरोखरंच कौतुकाची गोष्ट आहे आणि ही स्वच्छता, नीटनेटकेपणा आपल्याला जाणवतो. अ‍ॅक्चुअली ह्या राज्याला स्वच्छतेचा रोग जडलाय, प्रशासकांना, प्रशासनाला आणि स्थानिकांनाही. पण हा रोग चांगला आहे. मॅनेजमेंटच्या भाषेत ह्याला पॅशन म्हणतात. क्लिनलीनेस पॅशन. हॅट्स ऑफ टू इन्दौर आणि भोपाळ अर्थातच मध्यप्रदेश.

एक चांगला पर्यटकसुध्दा क्लीनलीनेसचा भोक्ता असतो किंवा त्याने तसं असावं कारण जे काही आपण करतो त्याचा एक शिक्का आपल्यावर उमटत असतो. ‘इंडियन टाइम’ ही आपणच आपल्या कलेक्टिव्ह कर्तृत्वाने मिळवलेली जगप्रसिद्ध उपाधी. मात्र क्लिनलीनेस संदर्भात अशी काही उपाधी आपण लावून घेतली नाहीये ही आनंदाची गोष्ट आहे आणि त्यात आणखी आनंद म्हणजे अतिशय गलिच्छ पर्यटक म्हणून जर कुणाला नावाजलं जात असेल तर ते आपल्या शेजारी असलेल्या जगाची महासत्ता बनायला निघालेल्या देशाला. मागे स्वित्झर्लंडच्या काही हॉटेलियर्ससोबत चहापान करता करता कोणता पर्यटक कसा ह्यावर चर्चा सुरू झाली. मी समोर बसलेय म्हणून नव्हे पण एकंदरीतच महाराष्ट्र, गुजरात, साउथ इंडिया साइडने येणारे पर्यटक खूप डिसिप्लिन्ड असतात, वेल बिहेव्ड असतात हे इम्प्रेशन ऐकायला मिळालं तर ह्या शेजारच्या देशातून येणारे पर्यटक हे खूप मोठा बिझनेस देतात पण एकदाका त्यांनी रूम सोडली हॉटेलची की त्या रूममध्ये जायला आमची हाऊस किपिंगवाली मंडळी प्रचंड नाखूष असतात. इट्स टू बॅड अँड टेरिबल! प्रत्येक माणसाची, समाजाची, राज्याची देशाची प्रतिमा तयार होत असते ती अशी. आणि मला वाटतं की आपली काय प्रतिमा आहे ह्याचा आपण सतत विचार केला पाहिजे. अर्थात प्रतिमा चांगली राहावी म्हणून देखाव्यासाठी चांगल्या गोष्टी कराव्या हे ही अलाऊड नाही बरं का. आपण जे काही आहोत ते आंतर्बाह्य असलं पाहिजे. स्वच्छता हा प्रकारसुध्दा तसाच आहे, मनापासून असायला पाहिजे, त्यांची सवय असली पाहिजे, त्याचं व्यवस्थापन करता यायला पाहिजे. माझा लिखाणाचा आणि व्यवसायाचाही विषय पर्यटन असल्यामुळे पर्यटक आणि स्वच्छता, टापटीप, नीटनेटकेपणा ह्याविषयीच मी लिहिणं बरं, बाकीच्या गोष्टीत नाक खुपसू नये नाही का.

एक पर्यटक जेव्हा कोणत्याही छोट्या मोठ्या प्रवासाला निघतो तेव्हा काही गोष्टींचं अवधान ठेवलं की प्रवास हा जास्त सुखावह करता येतो. पर्सनल हायजिन आणखी एक महत्वाची गोष्ट. जेव्हा आपण प्रवासाला निघतो तेव्हा नॅचरली आपण एकटे नसतो. विमानात बसमध्ये सर्वत्र आपण एका सहप्रवाशाची भुमिका बजावत असतो त्यामुळे आपण व्यवस्थित ग्रुम्ड आहोत नं हे तपासून बघितलं पाहिजे. आपल्या तोंडाला वास येत नाही नं, आपले कपडे स्वच्छ आहेत नं, आपण झोपेतून उठून आल्यासारखे तर वाटत नाहीयोत नं ह्या सगळ्या गोष्टी सोशल डेकोरम व्यवस्थित ठेवण्यासाठी महत्वाच्या आहेत. तोंडाचा वास ही माझ्यामते काही काही देशांची समस्या आहे. अहो दोन फुटांवर वास येतो. नको वाटतं बोलायला. विमानात तर त्या भितीने मी बोलायलाच जात नाही. आपण भले आपला प्रवास भला, विमानप्रवासातल्या टॉयलेट्स हा एक मोठा प्रश्‍न आणि त्यात जर तो अमेरीका ऑस्ट्रेलियासारखा लांबचा प्रवास असेल तर बघायलाच नको. आपण आपल्याला ह्या अशा प्रवासासाठी ऑर्गनाइज्ड नाही केलं तर प्रवास अतिशय कंटाळवाणा आणि नको तो प्रवास असं होऊन जातं. आज ‘जागा समाप्तीची घोषणा’ झाल्याने टॉयलेटपुराण पुढच्या वेळी…

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*