Language Marathi

समर इन नेपाळ

समर व्हेकेशनमध्ये नेमकं कुठे जावं हा प्रश्‍न आज घराघरात चर्चिला जातोय. पर्यटनाच्या कोणत्याही प्रश्‍नावर उत्तर देणं आमचं काम असल्याने आम्ही आमच्या पर्यटकांसाठी घेऊन आलोय हिमालयावर मालकी सांगणार्‍या देशाची एक अनोखी सहल-काठमांडू पोखरा चितवन. समर व्हेकेशनमध्ये फॅमिलीसोबत पर्यटन करणार्‍या पर्यटकांसाठी एक अफलातून हॉलिडे

मार्च आला म्हणजे अधिकृतपणे उन्हाळ्याचे आगमन झाले, आता हळूहळू तापमापकातला पारा वर वर चढू लागेल, उकाड्याने जीव हैराण होऊ लागेल आणि आकाशातून डोळे वटारणार्‍या सूर्याचा सर्वांना राग राग येऊ लागेल. मग लोकलच्या गर्दीत, बसच्या रांगेत किंवा ऑफीसमध्ये डबा खाताना सगळेजण मनापासून उन्हाळ्याला लाखोली वाहतील आणि नकोशा वाटणार्‍या या ऋतुपासून सुटका कशी करून घ्यावी यावर चर्चा करू लागतील. आणि मग उन्हाळ्याचा ताप दूर करणार्‍या, ऐन उन्हाळ्यात गारेगार हवामानाचा आनंद देणार्‍या आणि उन्हाळ्याची सुट्टी सत्कारणी लावणार्‍या वीणा वर्ल्डच्या हिमालय स्पेशल सहलीचा विषय येईल. हिमालय म्हटला की आपल्या सगळ्यांना वाटतं की हिमालय तर भारताचीच मक्तेदारी आहे. पुराणकाळापासून आणि पुराणकथांपासून भारतीय लोकजीवनावर आपला ठसा उमटवणारा हिमालय भारताचा आहेच पण त्याचबरोबर भारताच्या शेजारी देशांनाही ह्या हिमवंत पर्वताची छत्रछाया लाभलेली आहे. ‘हिमालय की गोद’ मध्येच उभा असलेल अवाढव्य हिमाचलाच्या छोटा मालक म्हणजे नेपाळ. भारताच्या उत्तर पूर्वेला नेपाळ पसरलेला आहे. नेपाळचा बराचसा भाग डोंगराळ आहे आणि या पर्वतरांगा हिमालयाच्या असल्याने त्या वर्षभर बर्फाच्छादित असतात, साहजिकच नेपाळचं हवामान एप्रिल-मे मध्येही आल्हाददायक असतं. जगातलं सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट, नेपाळी भाषेत ‘सागरमाथा’ हे नेपाळमध्ये आहे, त्याचबरोबर जगातल्या सर्वोच्च दहा शिखरांपैकी आठ नेपाळमध्येच आहेत. भारताकडून हिंदू धर्मपरंपरा घेऊन आपल्या संस्कृतीमध्ये सामावणार्‍या नेपाळला गोरखांच्या पराक्रमाचा, शौर्याचा इतिहास लाभलेला आहे. देव आनंदचा ‘हरे रामा हरे कृष्णा’, अमिताभचा ‘महान’ आणि ‘खुदागवाह’, अनिल कपूरचा ‘घरवाली बाहरवाली’, अक्षयकुमारचा ‘बेबी’ ह्या चित्रपटांमधून आपण नेपाळचं दर्शन घेतलं आहेच. तेव्हा या समर व्हेकेशनमध्ये चला वीणा वर्ल्डसोबत नेपाळला आणि मिळवा सुटकारा उन्हाळ्याच्या तापापासून.

वीणा वर्ल्डकडे नेपाळसाठी ‘काठमांडू पोखरा चितवन’ ही आठ दिवस सात रात्रींची मस्त सहल आहे. या सहलीसाठी मुंबई ते मुंबई वा पुणे ते पुणे असा बाय एअर पर्याय आहे. या सहलीचा आरंभ आपण नेपाळची राजधानी काठमांडू या ऐतिहासिक शहरामधून करतो. काष्टमंडपम या मंदिराच्या नावावरून या शहराला काठमांडू हे नाव मिळालं आहे. मध्ययुगातील लिच्छवी साम्राज्यापासून ते

वीसाव्या शतकात प्रस्थापित झालेल्या लोकशाही शासनापर्यंत नेपाळने अनेक चढ-उतार पाहिले आहेत आणि या प्रवासाच्या खुणा, वास्तूंच्या, स्मारकांच्या रुपाने आपल्याला इथे पाहायला मिळतात. दुसर्‍या दिवशी आपण काठमांडूहून प्रस्थान करतो ते ‘चितवन नॅशनल पार्क’ कडे. नेपाळच्या तराई भागात हा नॅशनल पार्क आहे. युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईट्समध्ये समाविष्ट करण्यात आलेलं हे जंगल इतिहासकाळात नेपाळच्या राजघराण्याचं शिकारीचं जंगल होतं. या अरण्याचं प्रमुख वैशिष्ठ्य म्हणजे दुर्मिळ होऊ लागलेल्या घरियाल मगरी, धोक्यात आलेला एकशिंगी गेंडा आणि संरक्षणाची गरज असलेला पट्टेरी वाघ, हे तीन महत्वाचे प्राणी इथे आहेत. त्याचबरोबर या जंगलात एकूण छप्पन प्रकारचे मॅमल्स आढळतात ज्यात हत्ती, बिबट्या, स्लॉथ बेअर्स, गवे, गोल्डन जॅकॉल, हॉग डीअर यांचा समावेश आहे. चितवन नॅशनल पार्कमध्ये पक्ष्यांच्या ज्या ५४३ जाती सापडतात. आपण चितवनच्या निसर्गरम्य परिसरात दोन रात्री राहातो आणि निवांतपणे इथल्या निसर्गाचा आनंद घेतो. जेंव्हा आपण ह्या दाट अरण्यामध्ये जंगल वॉक घेतो आणि पक्ष्यांचे अनोखे आवाज ऐकत, पायवाटेवरचे जनावरांचे पगमार्क न्याहाळत, गवतावर भिरभिरणार्‍या फुलपाखरांचा मागोवा घेत फॅारेस्ट गाईडकडून जंगल स्टोरीज ऐकतो तेंव्हा आपल्या रोजच्या शहरी आयुष्यात आपण काय मिस करतोय याची जाणीव होते. नंतर हत्तीच्या पाठीवर बसून जंगलात राजेशाही थाटात फिरण्याचा अनुभव आपल्या सहलीला वेगळाच डौल प्राप्त करून देतो. इथल्या नारायणी नदीमध्ये स्थानिक कनू होड्यांमधून जलविहार करण्याचा अनुभव रोमांचक असतो, कारण या नदीत मगरी आहेत आणि आपल्या जलविहारात काहीवेळा नदीच्या काठावर आराम करत पहुडलेली मगर अगदी जवळून पाहायला मिळते. या अरण्याचा असा विविध प्रकारे वेध घेतल्यानंतर ह्याचे ‘चितवन’ म्हणजे वनाचे चित्त, अर्थात अरण्याचे मर्म आपल्याला नक्कीच सापडते. चितवनहून पोखराकडे जाताना नेपाळमधील अन्नपूर्णा रांगेतील उत्तुंग पर्वत माउंट फिशटेलचं नयनमनोहर दर्शन घडतं. २२,९४३ फूट उंचीच्या ह्या शिखराला नेपाळी लोक शंकराचे स्थान मानतात आणि त्यामुळेच फिशटेलच्या शिखरावर चढाई करणं वर्ज्य आहे. हिमशिखरांच्या गराड्यात, हिरवाईचा लेवून वसलेलं पोखरा हे नेपाळमधील आकाराने दुसर्‍या क्रमांकाचं मोठं शहर आहे. अन्नपूर्णा रांगेतल्या हिमशिखरांचा बॅकड्रॉप लाभलेलं पोखरा आज पर्यटकांना शुध्द हवा, आल्हाददायक वातावरण आणि डोळे सुखवणारा निसर्ग ह्याने खूश करतं. पोखराला भेट दिल्यावर पाहायलाच पाहिजे असं ठिकाण म्हणजे ‘डेवीस फॉल’ हा धबधबा. या धबधब्याच्या जवळच गुप्तेश्‍वर महादेव आहे. नावाप्रमाणे हा महादेव-शंकर अनेक वर्ष जमिनीत गुप्त होता, आता त्याच्या गुहेतील मंदिराचे दर्शन घेता येते. नंतर आपण फेवा लेकमध्ये जलसफर करतो. पाच चौ.कि.मी.च्या परिसरात हे सरोवर पसरलेलं आहे. या सरोवराच्या शांत निर्मळ पाण्यात दिसणारे माउंट फिशटेल आणि इतर हिमशिखरांचे प्रतिबिंब पाहणार्‍याच्या मनाचा ठाव घेतात. या तलावातील बेटावर असलेल्या ताल बराइ मंदिरालाही आपण भेट देतो. हिमालयाच्या कुशीखांद्यावर वसलेल्या आणि जगातली अनेक उत्तुंग शिखरं मिरवणार्‍या नेपाळमध्ये ह्या पर्वतांबाबतचं, गिर्यारोहणाचा दस्तऐवज जपणारं आणि माउंटेनियर्सचं विश्‍व उलगडून दाखवणारं म्युझियम असायलाच हवं. पोखरामध्ये असं इंटरनॅशनल माउंटन म्युझियम आहे. ह्या म्युझियममध्ये आपल्याला माउंटन गॅलरीत नेपाळमधील उत्तुंग शिखरांची माहिती मिळते तर माउंटन अ‍ॅक्टिव्हिटी गॅलरीमध्ये गिर्यारोहणात वापरली जाणारी साधनं आपण बघतो.

आपल्या सहलीच्या सहाव्या दिवशी आपण पोखराहून विमानाने काठमांडूला परत येतो. हे राजधानीचं शहर ४६०० फूटांवर, शिवपुरी-फुलचुखी- नागार्जुन-चंद्रगिरी ह्या शिखरांच्या गराड्यात वसलेलं आहे. दोन हजार वर्षांचा इतिहास असलेल्या ह्या शहरात लक्ष वेधून घेणार्‍या अनेक ऐतिहासिक वास्तु आणि स्मारके आहेत. काठमांडूच्या ह्या संपन्न वारशाचं लक्षवेधी दर्शन घडतं ते इथल्या दरबार स्क्वेअरमध्ये. या चौकामध्ये कांतिपूर, भक्तपूर, ललितपूर आणि किर्तीपूर अशा चार राजवटीतल्या हेरिटेज वास्तु जतन करण्यात आल्या आहेत. याच चौकात शहराला नाव देणारं काष्टमंडपम मंदिर आहे आणि ह्याच चौकात मल्ला आणि शाह राजघराण्यांचे राजवाडे आहेत. काठमांडू शहराच्या पश्‍चिम भागात ‘स्वयंभूनाथ स्तुप’ आहे. आज नेपाळमधील आणि तिबेटमधील बौध्दधर्मियांसाठी अत्यंत पवित्र असलेल्या या स्थानावर सर्वात पहिल्यांदा स्तुप उभारण्यात आला होता तो पाचव्या शतकात. ह्या स्तुपावर भगवान बुध्दाचे डोळे रंगवण्यात आले आहेत आणि ह्या स्तुपाच्या आकारापासून ते रचनेपर्यंत प्रत्येक बाबतीत धार्मिक प्रतिकांचा वापर करण्यात आला आहे. भारतातून नेपाळला येणार्‍या प्रत्येक पर्यटकाला दर्शन घ्यायचं असतं ते काठमांडूच्या पशुपतीनाथाचं. इसवी सन ४०० पासूनचे ह्या मंदिराच्या अस्तित्वाचे पुरावे सापडतात, या स्थानाच्या म्हणजेच पशुपतीनाथाच्या उत्पत्तीबाबत वेगवेगळ्या कथा सांगितल्या जातात. नेपाळी पगोडा शैलीत बांधलेल्या या मंदिराला असलेली चार प्रवेशद्वारे चांदिने मढवलेली आहेत. या मंदिराचा कळस सोन्याचा आहे आणि गाभार्‍यातील शिवलिंग सुमारे सहा फूट उंचीचं आहे. काठमांडूमधील आवर्जून भेट द्यावी असं मंदिर म्हणजे ‘बूढा नीलकंठ मंदिर’. ह्या खुल्या मंदिरात शेषावर पहुडलेल्या श्रीविष्णूंची प्रतिमा पाहायला मिळते.  काठमांडूच्या जवळच असलेलं भक्तपूर हे शहर १५ व्या शतकात मल्ला राजघराण्याची राजधानी होतं. या राजवैभवाच्या खूणा इथल्या दरबार चौकातील वास्तुंच्या रुपानं आजही पाहायला मिळतात. या चौकात ५५ खिडक्यांचा राजमहाल आहे, तसेच सम्राट भूपतिंद्रमल्ला ह्याचा रेखिव पुतळा आणि शिल्पांनी सजवलेलं गोल्डन गेट हे या चौकाचं मुख्य आकर्षण मानलं जातं.

सो मंडळी, अनुपम निसर्गसौंदर्य, मन प्रसन्न करणारं वातावरण, ऐतिहासिक कलात्मक वास्तु यांनी समृध्द असलेला नेपाळ तुमचं स्वागत करायला सज्ज आहे. मग चलो, बॅग भरो, निकल पडो!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*