Marathi

वीणा वर्ल्डसोबत जाताय? मग थोडं थांबाच!

Reading Time: 6 minutes

तुझं ईमेल आणि त्यात स्पष्ट मांडलेले विचार वाचून बरं वाटलं. आपल्या मनात असलेली खंत किंवा साशंकता सरळ बोलून किंवा लिहून दाखवावी. त्यामुळे गोंधळाचं धुकं विरून क्लॅरिटी येते. पण एक काम कर, जोपर्यंत तू स्वतः कन्व्हिंस होत नाहीस, तुमच्या मनाची खात्री पटत नाही, तुझ्या मनात शंभर टक्के विश्वास उत्पन्न होत नाही तोपर्यंत वीणा वर्ल्डकडे बुकिंग करू नकोस. धास्तावलेल्या मनाने आनंदाच्या हॉलिडेची सुरुवात करू नकोस.

एप्रिल-मे-जून म्हणजे भारतातील समर व्हेकेशन, अर्थात आपली उन्हाळ्याची सुट्टी. जगभरातील पर्यटन संस्थांचा हा सर्वात महत्त्वाचा मोसम. पीक सीझन किंवा सुपर-पीक सीझन ज्याला म्हणतात तो हाच. वर्षभरातील कामाची तसेच अनेक वर्षांच्या मेहनतीने कमावलेल्या विश्वासाची पोचपावती म्हणजे हा सीझन. आम्ही कमर्शियली ह्या समर सीझनकडे जरूर बघतो पण त्याचवेळी आमचे पर्यटक त्यांचा कष्टाने मिळविलेला पैसा गुंतवून त्यांच्या ह्या फॅमिली हॉलिडेकडे ज्या तर्‍ह्ेने डोळे लावून बसलेले असतात हे जाणल्यावर हा कमर्शिअल प्रकार एकदम इमोशनल होऊन जातो. कोणत्याही व्यावसायिकाला ग्राहकाची ही इमोशन कळणं आणि त्या इमोशनला जगण्यासाठी मनःपूर्वक प्रयत्नांची पराकाष्ठा करीत त्याच्याकडून काम होणं हा आहे यशस्वी उद्योग-व्यवसायाचा गाभा. ज्याला हे कळलं त्याची प्रगती कुणीच रोखू शकत नाही. ह्या दृष्टीने देशविदेशातील पर्यटनातलं वीणा वर्ल्डचं योगदान बघता तसेच कोणत्याही पर्यटनस्थळी दिसणार्‍या पर्यटकांची संख्या बघता वीणा वर्ल्ड टीम राइट ट्रॅकवर काम करतेय असं म्हणायला हरकत नाही. शंभर टक्के परफेक्शन अशक्य नसलं तरी कोणालाही ते कठीण आहे. पण छोट्या-छोट्या गोष्टीत सतत परफेक्शन आणण्याची, सुधारणा करीत राहण्याची सवय जर प्रत्येकाला लागण्याची संस्कृती आपण संस्थेत निर्माण करू शकलो तर नव्याण्णव टक्के परफेक्शनपर्यंत आपण शंभर टक्के पोहोचू शकतो. थोडक्यात हू केअर्स? ऐवजी वुई केअर! हे कल्चर निश्‍चितपणे निर्माण झालंय आणि ते फक्त वीणा वर्ल्डला उभं करणार्‍या-जगवणार्‍या पर्यटकांच्या बाबतीतच नव्हे तर वीणा वर्ल्डशी जोडल्या गेलेल्या प्रत्येक इंडिव्हिज्युअलप्रती आहे. कधी काळी आमच्याकडून चुका होतीलही, आयदर ह्युमन एरर ऑर आम्ही ज्या-ज्या गोष्टींवर अवलंबून असतो, ज्यावर आमचा कंट्रोल नसतो त्याठिकाणी काही बदल वा अचानक काही उद्भवलं तर त्याचा त्रास पर्यटकांना होऊ शकतो. पण अशावेळी वीणा वर्ल्ड बॅक ऑफिस टीम बाह्या सरसावून कामाला लागते. आपल्या हातात नसलेल्या पण आपल्यावर येऊन आदळलेल्या परिस्थितीवर त्वरीत तोडगा काढणं हे आमच्यातल्या प्रत्येकाच्या अंगवळणी पडलंय. त्यामुळेच आम्ही दुर्लक्ष केलंय असं कधीही होणार नाही, आणि ते वीणा वर्ल्डच्या भविष्यासाठीही चालणार नाही. पर्यटकांनी उभी केलेली संस्था पर्यटकच खाली खेचू शकतात ह्याची आम्हाला जाण आहे. आमच्या कॉर्पोरेट ऑफिसमधल्या एका वॉलवर आम्ही लिहिलंय, ह्या संस्थेत फक्त एकच बॉस आहे आणि तो म्हणजे पर्यटक.
एवढी सर्व प्रस्तावना करण्याचं कारण म्हणजे मार्च महिन्याच्या अखेरीस सोशल मीडियावर वीणा वर्ल्डविषयी एक पोस्ट व्हायरल झाली होती. त्याचं टायटल होतं, फिरायला जाताना वीणा वर्ल्डचा विचार करताय तर थांबाच! सध्याच्या सोशल मीडियाच्या भाषेत सांगायचं तर वीणा वर्ल्ड ट्रोल्ड. व्हिसा रीफ्युजल केस होती. आमच्या एका पर्यटकाला शेंगेन कॉनस्युलेटने व्हिसा नाकारला होता. यु.के व्हिसा मिळाला पण युरोपच्या सहलीसाठी जो दुसरा व्हिसा लागतो तो त्यांना ग्रँट झाला नाही. अशावेळी जो यु.के व्हिसा मिळालाय त्यावर ह्यावेळी इंग्लंड स्कॉटलंड आयर्लंड वेल्सची सहल आपण करूया, त्या टूरला ट्र्रान्सफर होऊया आणि पुढच्या वेळी युरोपची सहल करूयाअसा पर्याय ह्या पर्यटकांना देण्यात आला. युरोप हे आपल्याच नाही तर जगातल्या प्रत्येकाचं ड्रीम डेस्टिनेशन आहे. आयुष्यात एकदातरी युरोप बघायचंच हे प्रत्येकाने ठरवलेलं असतं. त्या सहलीचं स्वप्न बघताना, ते पूर्ण होतंय हे दिसत असताना एकच अडथळा कदाचित येऊ शकतो तो व्हिसाचा. कोणत्या पर्यटकाला व्हिसा द्यायचा? कोणत्या पर्यटकाला नाही? किंवा कोणत्या पर्यटकाला पर्सनल इंटरव्ह्युसाठी बोलवायचं? कुणाकडून अधिक स्पष्टीकरणासाठी आणखी डॉक्युमेंट्स मागवायचे? हे सर्व कॉनस्युलेटच्या अखत्यारित येतं. त्यामध्ये वीणा वर्ल्ड किंवा कोणतीही पर्यटनसंस्था ढवळाढवळ करू शकत नाही. काही कॉनस्युलेटमध्ये दुसर्‍यांदा व्हिसा अप्लाय करण्याची-तसा चान्स घेण्याची सोय असते पण व्हिसा दुसर्‍यावेळी ग्रँट होईलच ह्याची गॅरंटी कुणीही देऊ शकत नाही. कधी-कधी हा व्हिसा दुसर्‍यावेळी मिळूनही जातो बट कान्ट से, कान्ट गॅरंटी. नाही मिळाला दुसर्‍यावेळीही तर मात्र व्हिसा रीफ्युजलमुळे आपण ती सहल करू शकत नाही आणि व्हिसा फी दोनदा भरावी लागल्याने ते पैसे वाया जातात. अशावेळी निर्णय पर्यटकांचा असतो, अर्थात आमच्याकडे जी व्हिसाची नव्वद जणांची टीम आहे ती प्रत्येकवेळी मार्गदर्शन करायला पर्यटकांच्या दिमतीला असतेच. व्हिसा रीजेक्ट झाल्यामुळे ह्या पर्यटकांना वाईट वाटणं, त्यांनी त्यासंबंधी वीणा वर्ल्डवर तुमच्यामुळेच व्हिसा झाला नाही असा आरोप करणं, आमच्या गेस्ट रीलेशन टीमवर तो राग काढणं हे सगळं आम्ही समजू शकतो. एक म्हणजे आपलाच व्हिसा का रीफ्युज झाला हे रीफ्युजलचं दु:ख मोठं असतं आणि दुसरं म्हणजे आता आपल्या स्वप्नातली युरोप सहल होऊ शकत नाही हे वास्तव सहजासहजी स्विकारता येत नाही. जगभर भ्रमण करणारे आम्ही, एकदा यु.के. कॉन्स्युलेटनेे सुधीरचा व्हिसा नाकारला होता तेव्हा सुधीरने उच्चारलेलं वाक्य आजही जसंच्या तसं आठवतंय, हाऊ कॅन दे डीनाय माय व्हिसा? त्यामुळे नॅचरली ह्या पर्यटकाचा व्हिसा झाला नाही तेव्हा घरात काय परिस्थिती असेल ते आम्ही समजू शकतो. ही गोष्ट घरात, शेजारात, नातेवाईकांत चर्चिली गेली असणार. त्यातलीच कुणीतरी एक व्यक्ती जी एका सुप्रसिद्ध मराठी न्यूज चॅनलवर काम करीत होती तिने आमच्या गेस्ट रीलेशन टीमला त्या चॅनलच्या नावाने दम द्यायला सुरुवात केली. संपूर्ण परिस्थिती न जाणता ह्यामध्ये आपण एक छान इमोशनल स्टोरी बनवू शकतो हे त्याच्या प्रोफेशनल मनाने जाणलं अणि सोशल मीडियाचा आधार घेऊन अशी काही पोस्ट तयार केली की एखाद्या चित्रपटाची पटकथा वाटावी. दोन दिवसांनी सकाळी मी ऑफिसला पोहोचायच्या आत बरेच मॅनेजर्स माझ्या केबीनमध्ये जमा झालेले. सर्वांचं म्हणणं, आपल्याविषयी चुकीची पोस्ट मोठ्या प्रमाणावर व्हायरल झालीय. तुम्ही फेसबूकवर किंवा सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह नसता म्हणून तुम्हाला दाखवायला आलोय, ही पोस्ट रॉकेट स्पीडने व्हायरल होतेय, आपल्या बिझनेसवर त्याचा परिणाम होईल, त्यामुळे तुम्ही ती वाचा आणि त्याला जाहीर उत्तर द्या. त्यांना म्हटलं, आपल्यासमोर आत्ता बर्‍याच गोष्टी आहेत ज्या महत्त्वाच्या आहेत. आधी त्यावर लक्ष केंद्रित करूया. वेळ येईल तेव्हा ह्या पोस्टला आपण उत्तर देऊच.
हजारो पर्यटकांचे व्हिसा मिळवायला, भारतातून जास्तीत जास्त पर्यटकांना सतत गेले तीन वर्ष युरोपला नेण्यात अव्वल नंबर असताना, चूक होऊ शकत नाही ह्याची खात्री होती. त्यामुळे सर्वांना आल्या पावली परत पाठवलं. ह्यात उद्दामपणा नव्हता किंवा जे काही आपल्याविषयी ह्या व्हायरल पोस्टमध्ये लिहिलं गेलंय त्याविषयी काहीच वाटलं नाही ही भावनाशून्यताही नव्हती. मार्चची अखेर होती, समर सीझन समोर होता त्यावेळी प्रश्‍न होता, ह्या वेगाने पसरणार्‍या व त्यावर चांगल्या-वाईट ज्या काही प्रतिक्रिया मिळत होत्या त्याने डिस्टर्ब होत ऐन सीझनमधला वेळ वाया घालवायचा की ह्या तीन महिन्यात पर्यटन करणार्‍या पस्तीस ते चाळीस हजार पर्यटकांची सर्व व्यवस्था चोख आहे नं ह्यावर काम करायचं? त्याचवेळी जेट एअरवेजचा मोठ्ठा बाँब आमच्यावर पडला होता. दीड-एक हजार पर्यटकांना सर्व विमानं चोकोब्लॉक असताना सहली घडवायच्या कशा हा यक्षप्रश्‍न होता. सर्व एनर्जी तिथे लावणं हे आद्यकर्तव्य होतं. सर्वांना म्हटलं, डू नॉट डेव्हिएट, लेट्स फोकस ऑन द सीझन. तरीही जाता जाता एक जण म्हणालाच, की आपण जर ह्या पोस्टला उत्तर दिलं नाही तर सर्वांना वाटेल की ह्यात लिहिलंय ते खरं आहे. वुई मस्ट कम्युनिकेट अवर साईड. त्यांना म्हटलं, अरे, तुम्हाला जेवढं वाईट वाटतंय तेवढंच मलाही. मनापासून कष्ट करतोय, अहोरात्र परिश्रम घेतोय आपण आणि असंकाही वाचलं की वाईट वाटणारंच. पण एक लक्षात ठेवूया, की एका पोस्टने आपल्या ब्रँडला धक्का पोहोचत असेल, आणि तो कोलमडून पडत असेल तर वुई आर नॉट ऑन द राइट ट्रॅक! आमच्या टीमने त्या पोस्टवरचं लक्ष हटवून पुन्हा कामावर केंद्रीत केलं आणि ते रूटीनमध्ये गुंतून गेले. पण आणखी दुसराच प्रॉब्लेम उभा राहिला तो म्हणजे, कधी अप्रिसिएशन तर कधी एखादा इश्यु सॉल्व्ह करायचा असेल तर पर्यटकांच्या मेल्सनी भरणारा माझा मेलबॉक्स ह्या पोस्टने भरायला लागला. वीणा वर्ल्डवर प्रेम करणार्‍या आमच्या हितचिंतक पर्यटकांना जेव्हा-जेव्हा ही पोस्ट मिळायची तेव्हा ते काळजीने-कन्सर्नने मला पाठवायचे. त्या सर्व मंडळींना एक छोटंसं उत्तर मी पाठवत होते. त्यातली काही मंडळी त्या पोस्टला मिळालेल्या सकारात्मक प्रतिक्रियांचे फोटोही काढून पाठवत होते. कामाच्या व्यापात ही पोस्ट उदास करीत होती नो डाऊट, पण त्याचवेळी हे मेसेजेस मनाला उभारी देऊन जात होते. ह्या सर्व पर्यटकांचे- वाचकांचे ह्या लेखातून जाहीर आभार मानताना आज बरं वाटतंय. आमच्या टीमप्रमाणेच ह्यातल्या अनेक पर्यटकांनी तुम्ही जाहीर उत्तर द्या हा आग्रह धरला होता, आज त्यांनाही बरं वाटेल.
पस्तीस वर्ष पर्यटनक्षेत्रात आहोत, अनेक घडामोडी पाहिल्यात, तावून सुलाखून निघालोय, गॉड गिफ्टेड प्रचंड पॉझिटिव्हिटी ठासून भरलीय आणि प्रामाणिकपणे काम करतोय त्यामुळे आमचा आमच्यावर विश्वास आहे. अशी पोस्ट आम्हाला कोलमडून टाकू शकत नाही. पण लोकप्रियता मिळविण्याच्या हव्यासापायी, एका चांगल्या न्यूज चॅनलच्या नावाचा वापर करून, अपुर्‍या माहितीच्या आधारे अशी कहाणी रंगविणार्‍या व्यक्तीने जरा थांबावं, आवर घालावा असल्या सवंग लोकप्रियता मिळविण्याच्या हव्यासाला. आपण काय करतोय ह्याचं भान अशा व्यक्तीला असायला हवं ज्यावेळी ते एका प्रतिथयश न्यूज चॅनलचे प्रतिनिधी म्हणून काम करतात तेव्हा. एखादी नव्या उमेदिने उद्योग करायला लागलेली व्यक्ती पूर्ण कोसळू शकते अशा सोशल मीडिया पोस्टमुळे. तसं बघायला गेलं तर सोशल मीडिया हे एक शस्त्र आहे आणि शस्त्र कधीही वाईट नसतं, त्याचा वापर करणार्‍याला कळलं पाहिजे की त्याचा उपयोग कसा कधी कुठे सकारात्मक पद्धतीने करायचा.
ज्यावेळी सीझन यशस्वीरित्या पार पडला, जेट ऐअरवेजमुळे प्रॉब्लेममध्ये आलेल्या सर्व सहली दुसर्‍या एअरलाईन्सच्या सहकार्याने पूर्ण होऊन भारतात परत आल्या, मोठा सीझन असल्याने रोज उद्भवणार्‍या कोणत्या ना कोणत्या आव्हानांना यशस्वीपणे सामोरे गेलो तेव्हा म्हणजे (मीनव्हाईल ही व्हिसा रिफ्यूजलवाली पर्यटकमंडळी इंग्लंड स्कॉटलँड आयर्लंड वेल्स सहलीला जाऊनही आली.) सीझनची लगबग संपल्यावर आम्ही मोर्चा वळवला ह्या व्यक्तीकडे. कायद्याच्या कक्षेत राहून आम्ही काम करतो, कायद्याबरहुकूम चालतो आणि म्हणूनच रीतसर कायदेशीर नोटीस पाठवली. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन, आपली चूक मान्य करीत ह्या व्यक्तीने त्याच पब्लिक प्लॅटफॉर्मवर पोस्टच्या आधारे जाहीर माफी मागितली. पण असं म्हणतात नं, जो बूंद से गयी वो हौद से नहीं आती। त्या पोस्टने जे काही नुकसान करायचं ते केलंच.
मात्र ह्या सगळ्या प्रकारात एक आनंदाची बाजूही आम्हाला दिसली. कुणीतरी पर्पजली आपलं काही वाईट करायला जात असेल तिथेही एक चांगली बाजू असतेच असते. प्रत्येक प्रॉब्लेम अपॉर्च्युनिटी देऊन जातो. यावर्षी ह्या समर सीझनमध्ये जास्तीत जास्त प्रशंसापत्र आली, आम्ही आश्‍चर्यात पडलो. गेल्या सहा वर्षांत आली नसतील एवढी पत्र ह्यावर्षी आपल्याला आली, ह्याचं कारण काय असावं ह्यावर विचार केला तेव्हा वन ऑफ द रीझन्स होतं-ह्या पोस्टने आमच्यासोबत निघालेल्या पर्यटकांच्या मनात एक धाकधूक निर्माण केली होती. कशी होईल सहल ह्याविषयी चिंता असावी. थोड्या साशंक मनानेच ते सहलीला आले असावेत आणि तिथे सर्व नेहमीप्रमाणे बघून त्यांचा आनंद द्विगुणित झाला असावा.
अश्‍लेषा परब नावाच्या एका मुलीने ह्या व्हायरल पोस्टच्या कालावधीत खूप छानसं ईमेल पाठवलं होतं. तिने लिहिलं होतं, आम्ही बुकिंग करणार होतो पण ही पोस्ट वाचल्यावर घरातले म्हणताहेत की जायचं का वीणा वर्ल्डसोबत? मला यायचंय पण प्रश्‍नचिन्ह आहे सर्वांपुढे… तिला उत्तर लिहिलं, तुझं ईमेल आणि त्यात स्पष्ट मांडलेले विचार वाचून बरं वाटलं. आपल्या मनात असलेली खंत किंवा साशंकता सरळ बोलून किंवा लिहून दाखवावी. त्यामुळे गोंधळाचं धुकं विरून क्लॅरिटी येते. पण एक काम कर, जोपर्यंत तू स्वतः कन्व्हिंस होत नाहीस, तुमच्या मनाची खात्री पटत नाही, तुझ्या मनात शंभर टक्के विश्वास उत्पन्न होत नाही तोपर्यंत वीणा वर्ल्डकडे बुकिंग करू नकोस. धास्तावलेल्या मनाने आनंदाच्या हॉलिडेची सुरुवात करू नकोस. असो.
अशा पोस्टनी निराश न होता आणि प्रशंसेने शेफारून न जाता, डोक्यात हवा जाऊ न देता, पाय जमिनीवर ठेवून आम्हाला काम करीत रहायचंय आमच्या पर्यटकांसाठी आणि वीणा वर्ल्डच्या भविष्यासाठीही. वर म्हटल्याप्रमाणे चुका होतील, अडचणी येतील पण वीणा वर्ल्डकडून दुर्लक्ष कधीही होणार नाही. उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही.

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

*