वन पर्सन वन बॅग!

0 comments
Reading Time: 6 minutes

आत्ताच क्रोएशियाच्या सहलीला गेलेले आमचे मित्र गिरिश आणि सुप्रिया करंदीकर ह्यांच्या बॅगा त्यांना डेस्टिनेशला पोहोचल्यावर मिळाल्याच नाहीत. दोन दिवसांनी विमान कंपनीने त्यांना बॅगा पोहोचविल्या. पण तोपर्यंत त्यांना आहे त्या कपड्यांवर आणि थोडं शॉपिंग करून वेळ निभावावी लागली. गिरिशचं म्हणणं, ‘आपण बॅगा नेतोच कशाला? दोन-तीन दिवस असेच गेल्यामुळे माझे अर्धे कपडे तर परत आले घडीही न विस्कटता. आपण उगाचंच एवढं सामान नेतो. अगदी सडाफटिंग जायचं, काही गोष्टी म्हणजे टी शर्टस् वैगेरे तिथेच खरेदी करायच्या. आठवण पण राहते, फोटोही त्या डेस्टीनेशनच्या नावाच्या टी-शर्टसह येतात’

‘प्रवासात बॅग हरवणं’ हे नेहमी दुसर्‍याच्याच बाबतीत घडतं किंवा आपल्या बाबतीत कधी घडणारच नाही असं आपणं समजत असतो. मला वाटतं जर आपण प्रवासी असू, जगाची भ्रमंती हे आपलं स्वप्न असेल, पर्यटनाची आपल्याला आवड असेल तर आयुष्यात एकदातरी आपल्याला ‘बॅगा हरवणं’या प्रकाराला सामोरं जावं लागणार आणि एकदातरी आपण आयुष्यात तो अनुभव घेणं आपल्या पर्यटनाचा एक भाग आहे असं समजावं. त्याने घाबरून जाऊ नये किंवा ‘प्रवासात माझी बॅग हरवली तर काय होईल’ ह्याची काळजीही करू नये. जसं आपण बंजी जंपिंग, रॉक क्लाइंबिंग, राफ्टिंग, बोटिंग,… असे एक एक अनुभव आपल्या पर्यटनात घेत असतो तसाच हा एक अनुभव असं समजायचं आणि हो पर्यटनसंस्था म्हणून हा अनुभव तुम्हाला मिळेलच ह्याची ग्वाही आम्ही देऊ शकत नाही बरं का! पण बॅगा हरवल्या तर तो एक वेगळा अनुभव आपल्याला मिळेल हे जरी असलं तरी आपण त्यासाठी तयारीत असणं महत्वाचं. आपल्या छोट्याशा हँडबॅगेत काही गरजेच्या गोष्टी ठेवणं म्हणजे जर सुदैवाने आपल्याला ह्या अनुभवाला सामोरं जावं लागलं तर शांततेने आणि संयमाने आपण हसत हसत त्याचा सामना करू शकू.

आता येतोय पर्यटनाचा सुट्टीचा मोठा सीझन. दिवाळीची सुट्टी, देश-विदेशात भरपूर पर्यटन तुम्ही करणार. ह्यावेळी एक कानमंत्र मला द्यायचाय आणि तो म्हणजे ‘वन पर्सन, वन बॅग’ स्मार्ट ट्रॅव्हलरच्या प्रवासासाठी हे अगदी मस्ट. मी ह्यावर बर्‍याचदा लिहिलंय पण तरीही सुट्टीचा मोसम आला की माझी लेखणी सरसावते ‘स्मार्ट ट्रॅव्हलर’ ह्या विषयाकडे.

सहल सात दिवसांची असो की पंधरा दिवसांची आपली बॅग ही आकाराने छोटी आणि वजनाला हलकी असायलाच हवी. कारण बसमधलं लोडिंग-अनलोडिंग जरी ड्राईव्हर करीत असला तरी बहुतेक फॉरिन टूर्सवर एअरपोर्टवर, बसमधून रूमपर्यंत तसेच रूमपासून बसपर्यंत आपल्या बॅगा आपल्यालाच घेऊन जाव्या लागतात. विमान कंपन्यांनी बहुतेक ठिकाणी कार्गो बॅगेच्या वजनाची मर्यादा वीस किलोची केल्यामुळे (ह्यापुढे ही मर्यादा पंधरा किलोवर येणार आहे. काहींनी ऑलरेडी केलीय) सामान आपसूकच कमी झालं. आत्ता जरी वीस किलोची मर्यादा असली तरी ह्यापुढे आपण जणू पंधरा किलोची मर्यादा असल्यासारखं सामान घेऊन सहलीवर येऊया. त्याचे किती फायदे आहेत बघा तर. पंधरा किलो वजनाची चाकांवाली स्ट्रोलर बॅग एअरपोर्टला, बेल्टवरून खेचायला, रूमवर न्यायला-आणायला खूप सोप्पी जाईल. बरं, बॅगेचा आकार छोटा, वजन छोटं, त्यामुळे हॉटेलच्या रूममध्येही अडचण नाही. ज्यांनी खूप मोठा प्रवास केलाय त्यांना माहीतीय की युरोपमध्ये किंवा हाँगकाँग-लंडन सारख्या बिझी शहरांमध्ये हॉटेल्स मोठी असली तरी रूमची साईझ लहान असते. अशावेळी मोठ्या आकाराच्या बॅगा फार अडचणीच्या ठरतात. बॅगेची साईजच छोटी झाली की पर्यायाने कपडेही कमी घ्यावे लागतात, आणि जेव्हा कमी कपड्यांमध्ये आठ-पंधरा दिवसांची सहल करायची असेल तर आपण कोणकोणते कपडे घ्यायचे ह्याबाबतीत जास्त ऑर्गनाईज्ड बनतो. ठरलेले कपडे असल्यामुळे आणखी मोठा फायदा होतो तो सहलीवर रोजच्या आवराआवरीला. जास्त कपडे-जास्त वस्तू म्हणजे मग रूममध्ये गेल्या गेल्या आपण पसारा करायला मोकळे, मनुष्य स्वभावच आहे तो. आणि दुसर्‍या दिवशी सकाळी पुन्हा तो पसारा आवरणं, घाई धावपळीत मग त्यात वस्तू विसरणं, चीडचीड होणं हेही प्रकार होतात. त्यामुळे ‘छोटी बॅग-कमी वजन-कमी कपडे-कमी पसारा-कमी आवराआवर-कमी त्रास-मोठ्ठा आराम’ ही ‘ऑर्गनाईज्ड वे ऑफ ट्रॅव्हलिंग’ची प्रणाली आपण लक्षात घेऊया आणि त्या बरहुकूम आचरण करूया आणि ‘स्मार्ट ट्रॅव्हलर’ बनूया.

प्रवासात आपले कपडे स्मार्ट असले पाहिजेत, आपली चाल व्यवस्थित म्हणजे फ्री अ‍ॅन्ड ईझी असली पाहिजे. हात फ्री असले पाहिजेत. पिशव्यांच्या ओझ्याने आपण दबलेलं नसायला पाहिजे. ही सगळी बंधनं आहेत बरं का आपण स्मार्ट ट्रॅव्हलर बनण्याची आणि आपण तसं बनायचंच आहे. आता ह्यापुढे झोकात-एकदम स्टाईलमध्ये प्रवास करायचाय.

चला आता सामानाच्या पॅकिंगला सुरुवात करूया. पहिल्यांदा जेवढ्या लागणार तेवढ्याच वस्तू एकत्र करूया. आपल्या समोर ठेवूया. ह्यात काय काय येतं तर दोन हलक्या वजनाच्या डार्क जीन्स, मोस्टली ब्लॅक आणि ब्लू किंवा ब्राऊन, सहा टी-शर्टस् वा कुडते ज्यांची घडी अतिशय छोटी होईल अशा मटेरियलचे, थंडीपासून संरक्षणासाठी बॉडी-टाइट लेगीन, व इनर-टॉप वा थर्मल. एक लाइट स्वेटर आणि एक जॅकेट, अंडरगार्मेंट्स-जिथे दोन दिवसांचं वास्तव्य असतं तिथे आपण अंडरगार्मेंट्स धुवून वाळवू शकतो हे लक्षात घेऊन त्यांची संख्या ठरवावी. जेव्हा छोट्या बॅगेत जास्त कपडे माववायचे असतात तेव्हा कपड्यांच्या नेहमीसारख्या घड्या न करता, गोल गोल गुंडळी करायची त्यामुळे खाचेत कपडे मावतात आणि निश्‍चितपणे जास्त कपडे राहतात. टॉयलेटरीज्- पाऊचसुद्धा छोटा व नेमक्या गोष्टींचाच असावा. उगाच मोठमोठ्या बाटल्या घेऊ नयेत. सहलीला चांगले वॉकिंग शूज घ्यावे, काळे असतील तर उत्तम. सगळ्या ड्रेसवर जातात किंवा जर मुलींना फॅशन करायची असेल तर काळ्या शूजला वेगवेगळ्या रंगाच्या शू लेसेस घेऊन जायच्या, त्यामुळे जसा टॉप वा कुर्ता असेल, त्या रंगाला शूज मॅचिंग होऊन जातात. शूजची दुसरी जोडी न घेता ते अशा तर्‍हेने आपण मॅचिंग करू शकतो. महिलांनी प्रवासात पंजाबी ड्रेस-ओढणी वा साडी ह्यांची साथ सोडलेलीच बरी. सांभाळावे लागतील असे कपडे आणि ओढण्याही नको. अगदी ज्यांना जीन्स घालायचीच नाहीये त्यांनी जीन्सप्रमाणेच डार्क कलरच्या दोन सलवारी आणि पाच-सहा टॉप्स सोबत घ्यायचे अर्थात घडी छोटी होईल असंच त्याचं मटेरियल असावं. ह्या व्यतिरिक्त वुमन्स स्पेशल असेल तर फॅशन शोसाठी एक ठेवणीतला-स्टाईलिश ड्रेस व स्लीक सॅन्डल. झालं, एवढंच सोबत घ्यायचं. एवढ्या वस्तू आरामात त्या बॅगेत राहतात. त्याचसोबत तुम्हाला थोडी जागा ठेवायचीय, एअरपोर्टला मिळणार्‍या स्नॅक्स-हॅम्पर व इतर काही गोष्टींसाठी. आता तुम्ही म्हणाल, ‘अहो, आमची बॅग जॅकेटनेच भरली! तर सर्वात महत्वाचं म्हणजे जॅकेट व स्वेटर बॅगेत ठेवायचाच नाही. अंगावर घालून घ्यायचं आणि उतरल्यावर आपल्या कोचमध्ये बसलो की आपल्या सीटवरच्या रॅकमध्ये ठेवून द्यायचं. स्मार्ट ट्रॅव्हलरला असे स्मार्ट पर्याय सतत शोधायला हवेत. मंडळी! विश यू अ हॅप्पी जर्नी! एन्जॉय, लेट्स सेलिब्रेट लाइफ!

Language, Marathi

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

*