लोग ऐसा बोल रहे हैं

1 comment
Reading Time: 10 minutes

हरिवंशराय बच्चनजींनी लिहिलंय आणि अमिताभने बुलंद आवाजात ते ऐकवलंय, मन का हो तो अच्छा, ना हो तो ज्यादा अच्छा। प्रामाणिक मेहनत-अथक परिश्रम कधीच वाया जात नाहीत. अर्थात ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जायचं नाही. वेळेचा अपव्यय झेपणारा नाही, पैशाची उधळपट्टी चालणार नाही, डिसिजन पॅरालेसिस होऊ द्यायचा नाही. डोळे उघडे ठेवूनडोकं शाबूत ठेवून सर्व परिणामांची खातरजमा करून वेळेत निर्णय घ्यायचे. चुकीचे निर्णय बरोबर करायचे.

गेल्या महिन्यात आमच्या तामिळनाडूच्या की सेल्स पार्टनरना आमची प्रोजेक्ट कम्प्लायंस  मॅनेजर भावना सावंतनं कामासंदर्भात फोन केला होता, तेव्हा बोलता- बोलता त्यांनी तिला विचारलं, मला सांगा तुमच्याकडे काय स्थिती आहे? तुम्हाला मार्केटमध्ये मंदी आलीय असं जाणवतंय का? स्लो डाऊन झालेयत का? इंडस्ट्रीमध्ये तर बराच भीतीचा माहोल दिसतोय, थोडी काळजी वाटायला लागलीय. तेव्हा भावना म्हणाली, नाही, आमच्याकडे वीणा वर्ल्डमध्ये आज घडीला आम्ही एकोणीस टक्क्यांनी पुढे आहोत. गेल्या दोन वर्षांपेक्षा नंबर्सपण वाढलेत. तुमच्याकडे काय सांगताहेत तुमचे नंबर्स? भावनाने प्रतिप्रश्‍न केला. त्यावर चोलन टूर्सचे श्री.पंडियन म्हणाले, आमच्याकडेही नंबर्स पुढे आहेत. बिझनेस चांगला चाललाय. इनबाउंड डोमेस्टिक अशी दोन्ही मार्केट्स वाढताना दिसताहेत. लक्झरी टूर्सची बुकिंग्ज होत आहेत, प्रॉब्लेम दिसत नाहीये कुठे पण जिथे जावं तिथे मंदीची चर्चा, किती जॉब्स गेले, मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स कशी बंद पडली ह्याच गोष्टी ऐकायला मिळतात. सब जगह लोग ऐसा बोल रहे है। म्हणून काळजी वाटली आणि म्हटलं तुमची स्थिती काय आहे ते विचारूया. भावनाने हे संभाषण जेव्हा आमच्या एका मीटिंगमध्ये ऐकवलं तेव्हा त्यांचेही नंबर्स वाढताहेत आणि सर्वात म्हत्त्वाचं म्हणजे बाहेरच्या संभ्रम निर्माण करणार्‍या परिस्थितीतही ते खूप पॉझिटिव्ह आहेत हे बघून आम्हालाही हायसं वाटलं. अर्थात सभोवतालच्या वातावरणामुळे मनाच्या एका कोपर्‍यात भीती थोड्या प्रमाणात का होईना पण घर करून राहिलीय हे नाकारता येणार नाही. रोजचं वर्तमानपत्र उघडलं, इकॉनॉमिक टाईम्स हातात घेतला किंवा टि.व्ही वर जर एखादा बिझनेस चॅनल लावलाच तर बँकांचे घोटाळे, बँक्रप्टसी, ऑटो सेक्टरमधलं स्लो डाऊन, तीन शिफ्टमध्ये चालणारे मॅन्युफॅक्चरिंग प्लांट्स दोन शिफ्टमध्ये कसे करावे लागले ह्यावरच्या चर्चा, किती माणसांच्या नोकर्‍या गेल्या, ह्या बातम्या ठळकरित्या नजरेसमोर येतात आणि आपल्यालाही धसकायला होतं. ही स्थिती प्रत्येक उद्योजकाची आणि नोकरीचीही आहे त्यामुळे जपून पावलं टाकणं हा महत्त्वाचा भाग.

खरोखर मंदी येण्यापेक्षा मंदी येतेय ह्या सावटात राहणं, त्याची चिंता करणं, सभोवतालच्या वातावरणाने घाबरणं हे मंदीपेक्षा महाभयानक आहे आणि म्हणूनच त्या सावटाच्या कचाट्यात न सापडणं ह्याची खबरदारी आपण प्रत्येकाने घेतली पाहिजे. इथे तारेवरची कसरत असते. मंदी नो वे!, हू केअर्स असा अति-आत्मविश्‍वास किंवा मंदी येणार म्हणून अतिखबरदारी ह्या दोन्ही गोष्टी अतिरेकी आहेत. कुठेतरी समतोल साधता आला पाहिजे आपल्याला. आणि सध्याच्या दिवसातवातावरणात ते आपलं प्रत्येकाचं महत्त्वाचं काम आहे. गेले वर्षभर कुठे महापूर तर कुठे भुकंप, कुठे अतिरेकी कारवाया तर कुठे एअरलाईनच्या बंद पडण्याने बसलेला फटका ह्या गोष्टींना आम्ही सामोरे जात होतोच. काहीही झालं तरी आपल्या वीणा वर्ल्डवर कधीही अशी वेळ येऊ नये की आपण आपल्या टीमला एक दिवस सांगतोय, आता आपल्या उद्योगाचं काही ठीक दिसत नाहीये, उद्यापासून तुम्ही कामावर येऊ नका. टुरिझम इंडस्ट्री जगातली महत्त्वाची इंडस्ट्री आहे. अनेक देशात ती एखादा चमत्कार घडावा तशी मोठी होतेय, त्यांच्या देशाच्या जडणघडणीत महत्त्वाचं योगदान देतेय. भारतात ती खूप मोठ्या प्रमाणावर वाढू शकते, प्रचंड रोजगार निर्मिती करू शकते ही आपल्या भारताची भविष्यकालीन वस्तूस्थिती असणार आहे. त्यामुळे एक यशस्वी उद्योजक म्हणून टुरिझम इंडस्ट्री ही एक भरवशाची भक्कम इंडस्ट्री आहे हे भारताला आणि जगाला दाखवून देण्यात खारीचा वाटा उचलायचाय. आपल्याकडून कोणतंही असं काम होऊ नये की ज्यामुळे ह्या इंडस्ट्रीलाच डाग लागेल ह्याविषयी आम्ही सतर्क आहोत, जागरूक आहोत. सहा-आठ महिन्यांपूर्वी आम्ही निर्णय घेतला मुंबईत सेल्स ऑफिसेसच्या एक्सपांशनचा. मुंबई-पुण्याची मिळून वीणा वर्ल्डची आठ सेल्स ऑफिसेस होती. पुण्याला आमच्या प्रीफर्ड सेल्स पार्टनर्सना मिळून एकूण एकोणीस ऑफिसेस आहेत. बर्‍यापैकी वीणा वर्ल्डचा प्रेझेन्स तिथे दिसत होता पण मुंबईत आम्ही त्याबाबतीत थोडे मागे होतो. बरं ऑनलाईनच्या जमान्यात ऑफलाईन ऑफिसेस काढणं शहाणपणाचं नाही हे सांगायला तज्ञाची गरज नाही. तरीही आम्ही प्रामुख्याने ज्या ग्रुप टूर्सच्या बिझनेसमध्ये आहोत तिथे अजूनही पर्यटक त्यांच्या जवळच्या सेल्स ऑफिसेसना येऊन बुकिंग करण्यात, सर्व शंकांचं समोरासमोर निरसन करण्याला प्राधान्य देतात हे आमच्या डेटा सायन्समध्ये इंटरेस्ट असलेल्या धाकट्या चिरंजीवाने राजने आम्हाला एका वाक्यात सांगितलं, बेसिकली इफ यू हॅव अ ब्रांच, युवर बुकिंग्ज विल इन्क्रीज. डेटा हे सांगत असताना स्लो डाऊनच्या बातम्या डोकं वर काढत होत्या. आमच्याकडे टू बी ऑर नॉट टू बी च्या चर्चा-प्रतिचर्चांना वेग आला. आत्ताच एवढं धाडस करायचं का? थोडं थांबूया, काय होतंय ते बघूया, मग निर्णय घेऊया असंही वाटत होतं.  पण त्याचवेळी आणखी एक गोष्ट लक्षात आली की किंवा कल्पना सुचली म्हणूया. आम्ही आठ सेल्स ऑफिसेसची सोळा ऑफिसेस करायचं म्हणत होतो म्हणजेच आठ जास्त ऑफिसेस. प्रत्येक ऑफिसमध्ये कमीत कमी चार माणसं जरी पकडली तरी बत्तीस माणसं नव्याने लागणार होती. आत्तापर्यंत वीणा वर्ल्डची टीम हजारहून अधिक लोकांची झाली होती. असलेल्या ब्रांचेस पकडून एकोणतीस डीपार्टमेंट्स होती. प्रत्येक डीपार्टमेंटने त्यांच्याकडचा एक माणूस दिला तरी येणार्‍या सेल्स ऑफिसेसची गरज भागणार होती. वाढत्या बिझनेसला आमचा टेक्नॉलॉजी डीटेक्टर नील पाटील आणि त्याची टीम मोठा आयटी सपोर्ट देत असल्याने प्रत्येक डीपार्टमेंटमध्ये आलेल्या ऑटोमेशनमुळे गदामजदूरी टाईप काम कमी होणार होतं. तिथे कुठेतरी कदाचित माणसं जास्त झाली असती, किंवा होणार, आणि कुणाला जा म्हणून तर आपल्याला सांगायचं नाहीये. मग मंदीचा सामना करण्यासाठी सरकार जशी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटला गती देऊन रोजगार निर्मिती करते तशी मायक्रो व्यवस्था ह्या ब्रांचेसद्वारे होणार होती. एकंदरीत मनाच्या कोपर्‍यात कुठेतरी एक स्ट्राँग गट फीलिंग होतं की नवीन ब्रांचेस काढायला पाहिजेत, पर्यटकांच्या जवळ जायला पाहिजे. सध्या सर्वत्र रस्त्यांची-मेट्रोची कामं सुरू असल्याने एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी जाणं अडचणीचं झालंय त्यामुळे ते कसं रास्त आहे हे आम्ही नवीन कल्पनांनी आम्हालाच समजावीत होतो. आणि असलेल्याच मॅनपॉवरमध्ये आम्ही आठ ऑफिसेस सुरू केली. प्रत्येक ठिकाणी आम्हाला मोक्याच्या जागा फटाफट मिळत होत्या हा कदाचित दैवी संकेत असावा नाही का? आज ही नवीन ऑफिसेस सुरू होऊन दोन महिने झाले आणि तिथले सेल्सचे आकडे आपला निर्णय बरोबर असल्याचं दाखवून देताहेत. सुधीरला एका कार्यक्रमात त्याच्या एका इंडस्ट्रीतल्या मित्राने विचारलंही, अरे सब जगह स्लो डाऊन दीख रहा है और तू  ऑफिसेस खोल रहा है? ही नवीन ऑफिसेस करताना आम्ही अर्थातच मॅनपॉवर जशी कंट्रोल केली तसंच त्याच्या इंटिरियरचा खर्च आटोक्यात आणला आणि ऑफिस घेतल्यापासून ते सुरू होण्यापर्यंतचा टर्न अराऊंड टाईम मिनिमम ठेवला. त्यासाठी आमचे आर्किटेक्ट संदीप शिक्रे आणि असोसिएट्सनी मोलाचं सहकार्य केलं. जागेच भाडं सुरू होतानाच प्रॉडक्शनही सुरू झालं पाहिजे ह्यावर आमच्या ह्युमन रीसोर्सच्या अ‍ॅनी अलमेडा, रजिथा मेनन तसेच जी.एम शिल्पा मोरे आणि सेल्स मॅनेजर प्रियाका पत्कीने कटाक्ष ठेवला. थोडक्यात वेळेचं, पैशाचं, मॅनपॉवरचं वेस्टेज कंट्रोलमध्ये आणलं. हे कंट्रोल येणार्‍या मंदीच्या भीतीनेच आले हा मंदीचा फायदा, आणि एकदा का अशा कंट्रोलची सवय ऑर्गनायझेशनला लागली तर ती सर्वच दृष्टीने चांगली गोष्ट.

जगात सर्वत्र दोन हजार आठ सालातली स्थिती येणार, स्लो डाऊन होणार, आर्थिक मंदीचा फटका सर्वांना बसणार हे आपण रोज ऐकतोय, वाचतोय, बघतोय. काय करायचं त्याचं? मंदी खरोखरच येणार असेल तर तुम्ही आम्ही ती थोपवू शकणार आहोत का? त्याच्या बागुलबूवाने घाबरून जाऊन आजच हातपाय कशाला गाळायचे? मंदी आली तर येऊ दे, त्यातून संधी शोधूया आणि नाही आली तर आणखी दमदार पावलं टाकूया. सामना करूया सर्वशक्तीनिशी. मनःस्थिती बदलूया. परिस्थिती आपल्या हातात नाही, त्यावर आपला कंट्रोल नाही मग त्याच्या काळजीत आणि भीतीत आपला वेळ आणि शक्ती का वाया घालवायची? इथे मला हरिवंशराय बच्चन यांच्या कवितेतले बोल आठवले, मन का हो तो अच्छा और ना हो तो ज्यादा अच्छा एकतर सूर्यप्रकाशाइतकं स्वच्छ सत्य आहे की जगाने मुख्यत्वे चार ते पाच वेळा भयानक मंदीचा सामना केलाय. दुसर्‍या महायुद्धानंतर १९७५, १९८२, १९९१, २००८ मध्ये सर्वांनी तो अनुभवलाय. पण तीही मंदी संपली आणि जग त्यातून सावरलं आणि पुढे गेलंच नं. आयुष्यातल्या चढ-उतारासारखं हे आहे. त्यात अडकून पडायचं नाही, त्याच्या भीतीने गलितगात्र व्हायचं नाही, त्याची चिंता करायची नाही. उलट त्यातून काय काय संधी आपल्याला नव्याने मिळताहेत ते शोधायचं, आपली शक्ती तिथे लावायची. हे मी लिहितेय तेवढं सोप्पं नसणार आहे हे मलाही माहीत आहे कारण मीही एक उद्योजिका आहे आणि त्याचबरोबर मी ही वीणा वर्ल्डमध्ये नोकरीच करतेय त्यामुळे आमच्या टीम मेंबर्ससोबत माझंही भविष्य ह्या मंदीचं आपण काय करणार ह्यावर अवलंबून आहे. कोणासाठी अशी उदासीनता आणणार्‍या क्षणी आम्ही एक शस्त्र वापरतो, आम्ही आम्हालाच प्रश्‍न विचारतो, जादा से जादा क्या हो जायेगा? आता तर आपण खूप चांगल्या पोझिशनला आहोत. २०१३ ला जेव्हा वीणा वर्ल्डची मुहूर्तमेढ रोवली तेव्हा आपण शून्यच होतो की. मग आता का घाबरायचं. त्या परिस्थितीवर मात केली तशी आत्ताही करूया. सर्वांनी कंबर कसून कामाला लागूया. प्रामाणिक मेहनत-अथक परिश्रम कधीच वाया जात नाहीत. अर्थात ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जायचं नाही. वेळेचा अपव्यय झेपणारा नाही, पैशाची उधळपट्टी चालणार नाही, डिसिजन पॅरालेसिस होऊ द्यायचा नाही. डोळे उघडे ठेवूनडोकं शाबूत ठेवून सर्व परिणामांची खातरजमा करून वेळेत निर्णय घ्यायचे. चुकीचे निर्णय बरोबर करायचे. आत्तापर्यंतच्या आयुष्याच्या रणधुमाळीत खूप गोष्टी संस्थेसाठी, स्वतःसाठी, कुटुंबासाठी करायच्या राहून गेल्या असतील त्या करायला कदाचित हा वेळ आपल्याला मिळाला असेल, त्याचं जर मंदी आलीच तर सोनं करूया.

जाता-जाता एक गोष्ट आठवली. एक खूपच लोकप्रिय वडेवाला होता. त्या उद्योगावर त्याचा संसार व्यवस्थित आनंदात सुरू होता. त्यातूनच त्याच्या मुलाला तो उच्चशिक्षित करू शकला. मुलगा व्यवसायासंबंधी वडीलांना सल्ले द्यायला लागला. त्यातच २००८ची मंदी आली. मुलाने वडीलांना सावध केलं. मंदी येतेय, कंट्रोल करा. मुलाचं ऐकून वडीलांनी आठ माणसांची सहा माणसं केली. सर्व्हिस घसरली, त्याने त्यामुळे वस्तू म्हणजे बटाटा तेल कमी आणायला सुरूवात केली. हळूहळू बिझनेस ठप्प व्हायला लागला. आणि मुलगा म्हणाला, बघा मी तुम्हाला सांगितलं होतं न रीसेशन येणार म्हणून. वडीलांना मुलाचा अभिमान वाटला. त्या दोघांनाही कुणीतरी सांगण्याची गरज होती, अरे मंदी आली म्हणून तुमचा बिझनेस नाही कमी झाला. मंदीच्या भीतीने, त्याच्या बागुलबूवात अडकून तुम्ही जे काही केलंत त्याने तुमचा बिझनेस कमी झाला. मंदीपेक्षा मंदीची भीती धोकादायक आहे ती अशी. लोग ऐसा बोलते हैं। ते अनादीकाळापासून अनंतकाळापर्यंत चालत आलंय. त्यांना बोलू दे. त्या बोलांना उंबरठ्याबाहेर ठेवूया. आपण काय करतोय ते महत्त्वाचं. लेट्स डू अवर बेस्ट, नथिंग इज पर्मनंट, नॉट इव्हन धिस फेज. इफ इट कम्स विल ऑल्सो गो. ऑल द बेस्ट टू ऑल ऑफ अस!

Marathi

One Comment

  1. Sandeep Dilip Huprikar

    Hello Ma’am,

    this is probably your best article till date I have read.

    Regards
    Sandeep Huprikar

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

*