काहीतरी नक्की होईल!

1 comment
Reading Time: 9 minutes

काहीतरी मार्ग निघेल, देव असा वार्‍यावर सोडणार नाही हे सगळं वाटत होतं, पण वाटणं आणि ते होणं ह्यात प्रचंड अंतर होतं. लॉजिकली हे होणंच शक्य नव्हतं. पण चमत्कार घडाव्या तशा गोष्टी घडतात ह्याचं प्रत्यंतर आपल्याला आयुष्यात अनेकदा येतं. म्हणून उमेद बाळगायची, आशा कधीही सोडायची नाही. काहीतरी चांगल नक्कीच घडून जातं.

फक्त आकाशाकडे बघायचं आणि म्हणायचं, ने रे बाबा निभावून आता आणि मग फक्त तोच असतो तारून न्यायला. वर्षातून एकदा तरी अशी वेळ समोर येऊन ठाकते. सगळ्या बाजूंनी प्रयत्न सुरू असतात पण काही केल्या यश येत नसतं. मग मनाला समजवावं लागतं, सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत, आता शांतपणे रीझल्टची वाट बघ, काहीतरी नक्की होईल, चांगलं होईल. गेल्यावर्षी सात मे चा दिवस, उन्हाळ्याच्या सुट्टीतला हा कालावधी इतका सुपरपीक असतो की दिवसाला मुंबई एअरपोर्टवरून देशविदेशात वीणा वर्ल्डच्या ऐंशी ते शंभर सहली प्रस्थान करीत असतात. रात्री झोपताना आणि सकाळी उठल्यावर चेक करायचं की सगळी डीपाचर्स व्यवस्थित निघाली आहेत मुंबईहून आणि आपापल्या मार्गावर आहेत नं?  सगळं व्यवस्थित आहे असं कळलं की हुश्य म्हणायचं आणि दिवस सुरू करायचा. तसं बघायला गेलं तर हे रूटीनच झालंय. कारण वर्षाचे तीनशे पासष्ट, (यावर्षी तीनशे सहासष्ट) दिवस आम्ही पर्यटन सुरू ठेवतो. जगात कुठे ना कुठे असलेल्या सीझन-ऑफ सीझनचा फायदा घेत पर्यटन सर्वांसाठी अफोर्डेबल बनवायचं आणि व्यवसायाचं चक्र सुरू ठेवायचं. संस्था मोठी व्हायला लागते, टीम वाढायला लागते तेव्हा फक्त सीझन्सवर अवलंबून राहता येत नाही. ऑफ सीझन किंवा लो सीझनमध्ये आमची टीम, असोसिएट्स, सप्लायर्स, ट्रान्सपोटर्स, एअरलाइन्स ह्या सगळ्यांच्या हाताला काम असलं पाहिजे नाही का. असो.

तर ह्या सात मे च्या दिवशी अनेक फ्लाईट्सनी वीणा वर्ल्डचे पर्यटक अमेरिका, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, युरोप, स्कॅन्डिनेव्हियाला निघालेले. सर्व विमानं इथून व्यवस्थित मार्गस्थ झालेली त्यामुळे आम्ही शांतपणे निद्रेच्या अधीन झालो. दुसर्‍या दिवशी दुपारी कळलं की युरोपियन डिलाइट नावाच्या नऊ दिवसांच्या युरोप सहलीचं विमान इथून तर निघालं होतं पण ते लंडनला पोहोचण्याऐवजी मार्गात मध्येच व्हिएन्नाला उतरवलं गेलंय. टेक्नीकल इश्यूमुळे इमर्जन्सी लँडिंग अ‍ॅट व्हिएन्ना. अरे देवा!  हा मोठाच प्रॉब्लेम आला होता. व्हिएन्ना म्हणजे ऑस्ट्रियाची राजधानी. ऑस्ट्रिया येतं युरोपमध्ये ज्यासाठी लागतो शेंगेन व्हिसा. जो ह्या सहलीच्या दुसर्‍या दिवसापासून सुरू होणार होता. म्हणजे जर आज पर्यायी व्यवस्था झाली नाही आणि व्हिएन्नामध्ये रहावं लागलं तर व्हिसा नाही म्हणून एअरपोर्टवरच रात्र काढायची वेळ. इथून मुंबईहून एअरलाइनची टीम सर्वतोपरी सहाय्य करीत होती. दिवस जसजसा पुढे सरकत होता तसतसं लक्षात यायला लागलं की विमानात जो काही तांत्रिक बिघाड झालाय तो आज दुरुस्त होण्यासारखा नाही. व्हिएन्नाहून दुसर्‍या फ्लाइटने लंडनला घेऊन जाण्यासाठी एअरलाइन प्रयत्न करीत होती, पण त्या दिवसाची सर्व फ्लाइट्स चोकोब्लॉक. शेवटी व्हिएन्ना एअरपोर्ट ऑथॉरिटी-आपली एअरलाइन आणि आम्ही सर्वांनी सिक्यूरिटीच्या अखत्यारित (कारण व्हिसा नव्हता.) पर्यटकांना एका हॉटेलला घेऊन गेलो. दमलेल्या पर्यटकांना अ‍ॅटलीस्ट हॉटेल स्टे मिळाल्यावर अंशत: हायसं वाटलं असेल. आमचा टूर मॅनेजर प्रशांत सावे, व्हिएन्ना एअरपोर्ट ऑफिशियल्स, भारतातली एअरलाइनची मंडळी आणि आमची एअर रीझर्व्हेशन्स टीम कामाला लागले. बेचाळीस पर्यटकांचा ग्रुप, लंडनच्या कुठच्याही फ्लाइटमध्ये एवढ्या पर्यटकांना एकत्र किंवा विभागून सीट्स मिळेना. त्यांनी एक पर्याय सुचवला, पॅरिसची तिकीट्स पाच फ्लाइट्समधून विभागून मिळू शकतील दुसर्‍या दिवशी, घेणार का?  विचार करायला वेळ नव्हता. कारण तीही तिकीट्स गेली असती तर आणखी बिकट परिस्थिती ओढवली असती. पर्यटकांना व्हिएन्नामधून बाहेर काढणं महत्त्वाचं होतं. आम्ही हो म्हटलं. दुसर्‍या दिवशी फ्रान्सचा शेंगेन व्हिसा सुरू होणार होता त्यामुळे सर्वजण पॅरिसला ऑफिशियली उतरू शकत होते. पर्यटक पाच बॅचेसमध्ये विभागून पॅरिसच्या विमानात बसले. प्रशांतने एअरपोर्ट ऑथॉरिटीशी आमचं बॅगेज ह्या फ्लाईट्सना लोड झालंय नं ह्याची खात्री केली आणि सर्वजण पॅरिसकडे निघाले. थोडक्यात ह्या पर्यटकांचं लंडन बघायचं राहिलं. लंडनला जाणं हे प्रत्येकाचं आयुष्यभराचं स्वप्न असतं आणि लंडन होणार नाही हे म्हटल्यावर तिथे काय झालं असेल ह्याची कल्पनाच केलेली बरी. प्रशांत पर्यटकांशी बोलत होता, आमची गेस्ट रीलेशन टीम इथून संपर्कात होती. पर्यटकांचं कौतुक आणि आभार, कारण ते रागावले होते पण सपोर्टही करीत होते. सर्वांचाच भ्रमनिरास झाला. परिस्थितीचे बळी जाणं म्हणजे काय ते आम्ही अनुभवत होतो. अर्थात आता पॅरिसला उतरल्यावर निदान पुढची टूर व्यवस्थित होईल ह्या आशेने आम्ही थोडेसे हुश्य झाला होतो.

पण एवढ्यावरच ह्या सहलीची वाताहात थांबायला तयार नव्हती. सर्वजण पॅरिसला उतरले आणि लक्षात आलं की कुणाचंही बॅगेज आलं नाही. आता मात्र कळस झाला होता. पर्यटकांचाही संयम सुटणं स्वाभाविक होतं. आधीच लंडन राहिलं होत आणि हा नवीन प्रॉब्लेम समोर आला. ठरल्याप्रमाणे एखादी गोष्ट घडली नाही की त्यात असे आणखी प्रॉब्लेम्स येत राहतात तसं काहीसं झालं होतं. पर्यटकांकडे बदलायला कपडे नसताना कितीही सुंदर असलं तरी पॅरिस एन्जॉय करणार कसं हा प्रश्‍न होता. व्हिएन्ना एअरपोर्ट ऑथॉरिटी, पुढच्या फ्लाइटने बॅगेज पाठवतोय, अशी आश्‍वासनं देत होती. दोन वेळा पॅरिस एअरपोर्टच्या फेर्‍या झाल्या. तीन बॅगा एअरलाईनने हॉटेलवर पाठवल्या आणि सात बॅगा पर्यटक आणि प्रशांतने जाऊन एअरपोर्टवरून घेतल्या. थोडक्यात सामान आता विखूरलं गेलं होतं. बॅगा मिळेपर्यंत पर्यटकांना प्रत्येकी काही पैसे देऊन तात्पुरत्या जुजबी गोष्टी घ्यायला सांगितल्या. रोज बॅगा इथे येतील, तिथे येतील करत ग्रुप स्वित्झर्लंडपर्यंत पोहोचला. तिथे आणखी दहा बॅगा मिळाल्या हॉटेलला आणि तेरा बॅगा झ्युरिक एअरपोर्टवरून आमच्या ल्युसर्नमधील तंदूर रेस्टॉरंटच्या सईद भाईंनी स्वत: जाऊन ताब्यात घेतल्या व पर्यटकांना नेऊन दिल्या. पर्यटकांना बॅगांच्या बाबतीत प्रचंड मनस्ताप झाला होता. माझ्यासोबतही त्यांचा ईमेल व्यवहार सुरू झाला होता. प्रशांतला पर्यटकांनी ह्या सर्व गोंधळात खूप चांगली साथ दिली. स्थलदर्शनही चालू होतं. आता टूर मॅनेजर प्रशांतची बॅग आणि अजून सहा बॅगा व एक बेबी प्रॅम मिळायचे राहिले होते.

पर्यटकांनी लंडनची आशा जवळजवळ सोडली होती पण आम्हाला तीच गोष्ट प्रचंड दु:खदायक वाटत होती. पंधरा मे ला रोमहून सहल परत येणार होती. टूर संपत आली होती, आम्हाला त्यांचं लंडन व्हावं असं वाटत होतं पण बेचाळीस पर्यटकांना रोमहून लंडनला न्यायचं आणि लंडनहून मुंबईला आणायचं हे शक्यच नव्हतं. त्या पीक सीझनमध्ये कुठून मिळणार एवढी तिकीट्स? कोण करणार एवढा खर्च? पण त्यावेळी आपली नॅशनल कॅरियर मदतीला आली. झालेली गोष्ट हा सर्वांचाच नाईलाज होता. पण नंतर आपण काय करतो ते महत्त्वाचं होतं. आमच्या कळकळीच्या विनंतीला त्यांनी खूप चांगल्या तर्‍हेने मान्य केलं आणि त्या पीक सीझनमध्ये एअर इंडियाने आम्हाला रोम ते लंडन आणि त्यानंतर लंडन-मुंबई अशी बेचाळीस सदस्यांची सोय करून दिली. हे सर्व झाल्यावर डोळ्यात आनंदाश्रु उभे राहिले. आता आमचे पर्यटक लंडन बघू शकणार होते. ह्या गोष्टीचा आनंद खरोखर शब्दातित होता. अजून आम्ही पर्यटकांना काहीही सांगितलं नव्हतं, सांगणार तरी काय होतो म्हणा. मनापासून प्रार्थना करीत होतो लंडन व्हावं म्हणून. काहीतरी मार्ग निघेल, देव असा वार्‍यावर सोडणार नाही हे सगळं वाटत होतं, पण वाटणं आणि ते होणं ह्यात प्रचंड अंतर होतं. लॉजिकली हे होणंच शक्य नव्हतं पण चमत्कार घडाव्या तशा गोष्टी घडतात ह्याचं प्रत्यंतर आपल्याला आयुष्यात अनेकदा येतं. म्हणून आशा कधीही सोडायची नाही. चौदा मे ला तिकीट्स आमच्या हातात आली, आणि सहल संपण्याच्या एक दिवस आधी रात्री आम्ही पर्यटकांना, तुम्ही लंडनला जाताय ही खुशखबर दिली. नव्याने लंडनचं रीझर्व्हेशन केलं आणि सगळे पर्यटक लंडन बघून भारतात परत आले. त्या सहलीला ह्यासाठी जादा खर्च किती आला ते बघण्याचं धाडस मला झालं नाही. काही गोष्टी त्याच्या पलीकडच्या असतात. आणि हो टूर मॅनेजरची बॅग लंडनच्या हॉटेलमध्ये मिळाली.

ह्या सर्व घडामोडीत पर्यटकांना मनस्ताप झाला तसाच आम्हालाही, काहीवेळा अक्षरश: हताश व्हायला झालं. आशा निराशेचा खेळ सुरू होता. लंडन बघण्याची पर्यटकांची दूर्दम्य इच्छाशक्ती इथे काम करून गेली असेल. प्रयत्न सगळेच करतात पण असं काही घडायला सगळ्यांच्या आशा एका ठिकाणी एकवटाव्या लागतात. आपली नॅशनल कॅरियर, वीणा वर्ल्ड आणि पर्यटक ह्या तिघांच्या एकत्रित प्रार्थनेचं हे फळ होतं असं मला अगदी खात्रीने म्हणावसं वाटतं. ह्यासाठी एअर इंडियाचे जनरल मॅनेजर (कमर्शियल) वेस्टर्न इंडिया-रवि बोदडे ह्यांच्यासोबत नेहा पेडमकर, वैशाली आचरेकर आणि त्यांच्या सर्व टीमचे मला मनापासून आभार मानायचेत. थँक्यू! काय योगायोग! गेल्या वर्षीच्या सात मे ची गोष्ट मी यावर्षी सात जानेवारीला लिहिली आणि माझ्या डेस्कवरचं कॅलेंडर मला सांगत होतं, म्हणजे त्यावर लिहिलं होतं, संसार में भयंकर तुफान-आंधी के समय एक भगवान ही श्रेष्ठ सेवक है।

तुम्ही म्हणाल मे मध्ये घडलेली गोष्ट आज सांगायचं काय कारण, तर ज्या सहा बॅगा राहिल्या होत्या त्यातील चार बॅगा पंधरा दिवसांपूर्वी पॅरिसला मिळाल्या, आठ महिन्यांनी. त्या बॅगा तिथे असलेल्या आमच्या टूर मॅनेजर राजेश साळवीने मागच्या आठवड्यात मुंबईपर्यंत आणल्या. हुश्यऽऽऽ तरीही अजून दोन बॅगा आणि प्रॅम आम्ही शोधतोच आहोत. केल्याने देशाटन मनुजा चातुर्य येतसे फार!…

Marathi

One Comment

  1. Veena Tai tumcha organisation simply great. Vachun mazhya dolyat pani ala

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

*