लँड ऑफ सिल्व्हर

0 comments
Reading Time: 9 minutes

एक छान स्लीवलेस जॅकेट, टाय व हॅट घातलेला युवक माझ्याकडे हात पुढे करत आला आणि अचानक मला त्या संगीताच्या तालावर नाचवू लागला. त्याच्या असिस्टंटने माझ्या कानामागे एक फूल लावले, गळ्यात एक सुंदर स्कार्फ बांधला आणि बघता बघता मी चक्क रस्त्यावर डान्स करू लागले, माझ्या ह्या दोन मिनिटांच्या परफॉर्मन्सची मलाच खूप मजा वाटली.

सभोवती रंगीबेरंगी बिल्डिंग्स् फारच सुंदर दिसत होत्या. गुलाबी, पिवळा, निळा, हिरवा अशा ब्राईट कलर्समध्ये सजविलेल्या त्या इमारती, त्यात उभे केलेले मोठे-मोठे लाईफ साईझ पुतळे आणि तिथल्या हवेत दरवळणारे म्युझिक सर्व काही फारच रोमांचक वाटत होते. तितक्यात एक छान स्लीवलेस जॅकेट, टाय व हॅट घातलेला युवक माझ्याकडे हात पुढे करत आला आणि अचानक मला त्या संगीताच्या तालावर नाचवू लागला. त्याच्या असिस्टंटने माझ्या कानामागे एक फूल लावले, गळ्यात एक सुंदर स्कार्फ बांधला आणि बघता बघता मी चक्क रस्त्यावर डान्स करू लागले. त्या युवकाने अतिशय कुशलतेने मला डान्स स्टेपमध्ये फिरवत म्युझिक थांबताच एक फोटोची पोझ दिली व त्याच्या असिस्टंटने आमचा फोेटो घेऊन टिपसाठी स्वतःची हॅट माझ्यापुढे ठेवली. टूरिस्ट स्पॉट्समध्ये पैसे कमविण्याचा हा अनोखा अंदाज मला भावून गेला. संध्याकाळी टँगो शो हा अर्जेंटिनामधील डान्स शो बघायला तर मी जाणारच होते, पण ह्या दोन मिनिटांच्या माझ्या परफॉर्मन्सची मला मजा वाटली. दक्षिण अमेरिकेतील अर्जर्ंेंटिना देशातल्या ब्युनॉस एअर्स या शहरातील ला बोका भागात मी फिरत होते. तेथील कॅमिनिटो ह्या छोट्याशा गल्लीत घडलेला हा छोटासा पण संस्मरणीय प्रसंग.

अर्जेंटिना ह्या देशाची मला कमाल वाटली कारण इथे जवळ-जवळ प्रत्येक जण दिसायला एकदम देखणा आणि प्रत्येकाच्या अंगात जणू डान्स उपजतच असावा. पहावे ती व्यक्ती अगदी सहजपणे गाण्याच्या बोलावर अतिशय एलीगंट डान्स सुरू करते,अगदी कुठेही आणि कधीही. या देशात आपण कसे दिसतो यावर फार विचार केला जातो. बर्‍याचदा स्वतःला सुंदर बनविण्यासाठी कृत्रिम पद्धतींची मदत घेण्यातही हे अर्जेंटिनियन लोकं मागे-पुढे पाहत नाहीत. कॉस्मेटिक सर्जरी करून का होईना पण आपण सुंदर दिसलेच पाहिजे यावर सगळ्यांचा बर्‍यापैकी जोर असतो. जे काही मोजके लोक जन्मतः सुंदर नसतील त्यांच्यावर चांगले दिसायचा किती दबाव इथे असेल ह्याचं उदाहरण म्हणजे गोनझॅलो ओटालोरा या व्यक्तीनं मांडलेला ठराव. २००७ मध्ये या इसमाने देशाच्या प्रेसिडेन्टसमोर एक ठराव मांडला की, आपल्या देशात इतके चांगले दिसणारे लोक आहेत की साहजिकपणे नोकर्‍या मिळण्यात ह्या सुंदर लोकांना प्राधान्य दिले जाते, तर मग आमच्यासारख्या सर्वसामान्य दिसणार्‍या व्यक्तींची मदत करण्यासाठी या सुंदर दिसणार्‍या लोकांनी इतरांपेक्षा जास्त टॅक्स भरावा.

ब्युनॉस एअर्समध्ये पीपल वॉचिंग हा जणू दिवसातला एक महत्त्वाचा उपक्रम. बहुतेक लोक कॉनफिटेरियास् म्हणजे कॉफी हाऊसेसमध्ये चहा-कॉफी घेत आपला वेळ घालवतात ह्या कॅफेस्ना भेट देऊन. अर्जेंटिनियन लोकांच्या आयुष्यामध्ये या कॉनफिटेरियास्चे महत्त्व किती आहे ते ह्यावरून कळते. या काही छोट्याशा कॅफेस् दीडशे वर्ष जुन्या आहेत. कॉफी हाऊसेसप्रमाणेच ब्रेडच्या बेकरी म्हणजे पॅनाडेरियाससुद्धा प्रसिद्ध आहेत. सत्तरहून अधिक कॉनफिटेरियास्ना हेरिटेज कॅफेस् असण्याचा किताब मिळालेला आहे. अशाच एका कॅफेमध्ये बसून अतिशय सुंदर कॉफी घेताना लक्षात आले की लोकं इथे फक्त खाद्यपदार्थांसाठी नव्हे तर पत्ते, डॉमिनोस्, बिलियर्डस्सारखे खेळ खेळत सुख-दुःख वाटण्यासाठी भेटतात. माझी कॉफी संपत नाही तोवर कॉफी हाऊसच्या मागच्या रस्त्यावर म्युझिक ऐकू आले आणि बघता-बघता सूट जॅकेट घातलेला एक युवक व सुंदर लाल गाऊन घातलेली एक मुलगी एकमेकांच्या मिठीत अगदी भावपूर्ण पण तरीही अतिशय पावरफुल डान्स करू लागले व त्यांना बघण्यासाठी रस्त्यावर गर्दी जमू लागली. अरे वा! आपल्याला तर दररोज हा टँगो शो बघायला मिळणार वाटते हा विचार करत मी सुद्धा त्या गर्दीत शामिल झाले. टँगो हा अर्जेंटिनाचा प्रसिद्ध डान्स फॉर्म. ह्याची सुरुवात झाली ती अर्जेँटिनाच्या अप्रतिष्ठित ठिकाणी. एकोणीसाव्या आणि विसाव्या शतकात अनेक युरोपियन लोकांचे अर्जेंटिनामध्ये मायग्रेशन सुरू झाले. ह्यात स्पॅनिश, पोर्तुगीज, इटालियन, ब्रिटिश सर्व लोकांचा समावेश होता. तसे साधारण सोळाव्या शतकातल्या स्पॅनिश व पोर्तुगीज एक्सप्लोरर्सनी अर्जेंटिनामधल्या पाराग्वे नदीजवळ राहणार्‍या गुआयनी जमातींना लुटून त्यांच्याकडून अनेक चांदीचे दागिने लुटले होते. त्यामुळे पाराग्वे नदीचे नाव रीओ डीला प्लाटा म्हणजेच चांदीची नदी असे पडले आणि त्यावरुनच या देशात चांदीचे डोंगर असल्याचा समज झाला. अशा देशाला लॅटिन भाषेत अर्जेंनटम म्हणजेच चांदीची भूमी असे ओळखले जाऊ लागले आणि अजर्ंेनटमचे काळाच्या ओघात अर्जेंटिना झाले. स्पॅनिश आणि पोर्तुगीज लोकांनंतर इथे बरेच इटालियन लोकं येऊन राहू लागले. ह्या युरोपियन इमिग्रंट्समुळे हा देश घडत गेला व आज या देशाची मातृभाषा स्पॅनिश आहे तर जवळ-जवळ 37% लोकं ही इटालियन वंशाचे आहेत. असे म्हणतात की, अर्जेंटिनाची लोकं म्हणजे दुसरे कुणी नाही तर स्पॅनिश बोलणारे इटालियन आहेत. जेव्हा हे इमिग्रंट्स अर्जेंटिनामध्ये स्थायिक होऊ लागले तेव्हा इथल्या बंदरावरच्या शहरांमध्ये हे आपली वस्ती जमवू लागले व इथल्या ब्रॉथेल्समध्ये वावर करू लागले. तेव्हा आफ्रिकन, स्पॅनिश व अर्जेंटिनाच्या पामपास भागातील मिलोंगा म्युझिकचे भन्नाट कॉम्बिनेशन होऊन या ठिकाणी काम करणार्‍या महिलांची दुःखद कथा संागण्याचे माध्यम हे टँगो डान्स ठरले. अतिशय जवळीक ठेऊन केला जाणारा हा टँगो सुरुवातीला लोकांनी नाकारला व तो अश्‍लील समजला जायचा. पण हळूहळू त्यातली भावना व कला दिसू लागली आणि युरोप-अमेरिकेतसुद्धा हा डान्स प्रसिद्ध झाला. या डान्सवरूनच It takes two to tango ह्या प्रसिद्ध वाक्प्रचाराचे उगम झाले. जसे एखादे भांडण दोन लोकांशिवाय होऊ शकत नाही तसेच दोन व्यक्ती  असल्याशिवाय टँगो डान्स होऊ शकत नाही. थोडक्यात काय तर, टाळी एका हाताने वाजत नाही.

अर्जेंटिनाचा स्वतःचा जसा डान्स फॉर्म आहे तसाच त्यांचा एक स्वतःचा धर्मसुद्धा आहे. इगलेसिया मॅराडोनियाना हा धर्म प्रसिद्ध फुटबॉल स्टार मॅराडोनाच्या फॅन्सने त्याला अर्पण करीत बनविला. अर्जेंटिनाचे फुटबॉल वेड तर जगप्रसिद्ध आहेच पण मॅराडोनियन या धर्माने या फुटबॉल प्रेमाला एक नवीनच पैलू पाडला आहे. अर्जेंटिनामध्ये हॉलिडेवर असताना इथल्या फुटबॉल स्टेडियम्स टूरवर नक्की जाऊन पहा आणि इथल्या प्रसिद्ध फुटबॉल टीम्सची माहिती मिळवा. आजसुद्धा फुटबॉल विश्वातील सर्वात प्रसिद्ध फुटबॉल पट्टू अर्जेंटिनाचेच आहेत. लायोनेल मेसी हा फुटबॉलच्या जगात इतका प्रसिद्ध आहे की जपानी दागिने बनविणार्‍या गिंझा तानाका या ज्वेलरने लायोनल मेसीच्या डाव्या पायाची छबी सोन्यात बनवून २५ किलोचा गोल्डन फूट बनविला. ह्या गोल्डन फूटची किंमत म्हणे 52 लाख डॉलर इतकी आहे. आज मेसीच्या होमटाऊन म्हणजे रोसारियो या शहरात आपल्या मुलाचे नाव मेसी ठेवण्यास कायद्याप्रमाणे बंदी घातली आहेे. अर्थात हे बरोबरच आहे कारण मॅराडोना काय किंवा लायोनल मेसी काय हा जगात एकच होऊ शकतो ना.

ब्युनॉस एअर्समधले सर्वात प्रसिद्ध स्थलदर्शनसुद्धा जगावेगळेच आहे. जगातल्या सर्वात अद्भुत सीमेटरी ह्या इथेच बघायला मिळतात. रिकोलेटा सीमेटरीमध्ये 6400 हून अधिक दफनपेट्या बघायला मिळतात. ह्यातील काही ग्रीक शैलीने बनविल्या आहेच. काही घरांसारख्या दिसतात आणि बहुतेक सगळ्यांवरच उत्कृष्ट कोरीव काम केलेले आहे. आपल्या मृत्युनंतर या सीमेटरीमध्ये आपले शेवटचे स्थान बनविणे हे सुद्धा फार मानाचे मानले जाते. अनेक सुप्रसिद्ध व महत्त्वाच्या लोकांना इथे दफन केले गेले आहे, त्यात सर्वात महत्त्वाचे स्थान आहे ते अर्जेंटिनाच्या लाडक्या इवा पेरॉनचे. इवा म्हणजे अर्जेंटिनाचे प्रेसिडंट राहिलेल्या जुवा पेरॉनची पत्नी, त्याअर्थाने ती अर्जेंटिनाची फर्स्ट लेडी,तीसुद्धा लोकप्रिय ठरलेली फर्स्ट लेडी होती. त्या कालावधीत इवाने गरीबांसााठी व महिलांसाठी जीव तोडून मेहनत केली, पण कॅन्सरमुळे केवळ 33 वर्षांच्या इवाचा मृत्यु झाला तेव्हा तिला गूडबाय करायला अर्जेंटिनाच्या लोकांची तयारीच नव्हती. मृत्युनंतर इवा किंवा लाडाने एविटा या नावाने ओळखल्या जाणार्‍या इवाच्या मृतदेहाला ममीफाय करण्यात आले व राजकीय घडामोडींपासून लांब ठेवण्यासाठी इटली, स्पेन असे फिरत फिरत शेवटी वीस-पंचवीस वर्षानंतर इवा पेरॉनला रीकोलेटा सीमेटरीमध्ये दफन करण्यात आले.

अर्जेंटिना हे खर्‍या अर्थाने मॅनमेड आणि नैसर्गिक वंडर्सचे उत्तम कॉम्बिनेशन आहे. रंगीबेरंगी आयुष्याची झलक जर ब्युनॉस एअर्ससारख्या वर्ल्ड क्लास शहरात मिळत असेल तर इग्वासू फॉल्ससारखे नॅचरल वंडर हे सुद्धा इथेच दिसते. ब्राझिल आणि अर्जेंटिनाच्या बॉर्डरवरचे इग्वासू फॉल्स हे खरंतर 275 वॉटरफॉल्सचा समूह आहे. इग्वासू फॉल्समधला सर्वात उंच वॉटरफॉल हा 262 फुटांवर आहे. हे वॉटरफॉल इथे बांधलेल्या अनेक ऑब्झर्वेशन डेकवरुन पायी चालत बघणे म्हणजे डोळ्याचे पारणे फिटणे. इग्वासू नॅशनल पार्कसारखेच अर्जेंटेनाचे दुसरे सर्वात महत्त्वाचे नॅशनल पार्क म्हणजे लॉस ग्लेशियर्स नॅशनल पार्क. इथे उभे राहून समोर दिसणार्‍या पेरितो मोरेनो ग्लेशियरच्या भव्य-दिव्य दृश्याला आपण कधीच विसरू शकत नाही. पेरितो मोरेनो ग्लेशियर हे अंटार्क्टिका आणि ग्रीनलँड नंतर सर्वात मोठे हिमखंड असल्याने, ते जगातल्या फ्रेश वॉटर सोर्समध्ये तिसर्‍या क्रमांकावर आहे. आपण हे ग्लेशियर्स पायी, बोटीने तर बघू शकतोच पण आपण त्यावर ट्रेकिंगसुद्धा करू शकतो.

अर्जेंटिना हा अंटार्क्टिकाला पोहोचण्यासाठी सर्वात उत्तम देश आहे. इथले उशुआया शहर हे जगातले सर्वात दक्षिणेकडचे शहर समजले जाते व इथून अंटार्क्टिकासाठी कु्रझेस किंवा फ्लाईट्ससुद्धा घेता येतात. अंटार्क्टिकाला जाणे शक्य नसेल तर अर्जेंटिनामध्येच ग्लेशियर्सबरोबरच पेंग्विन्सनाही पाहता येईल. एकीकडे बर्फ तर दुसरीकडे मेंडोझा भागात अतिशय उत्कृष्ट वाईनची लागवड असल्याने विनीयर्ड्समध्ये वाईन टेस्टिंग करणे शक्य आहे. तर पामपास म्हणजे अर्जेंटिनाच्या फ्लॅट लॅन्डस्मध्ये काऊबॉयस् ज्यांना गाऊचो म्हणतात ते कॅटल रँचेस सांभाळताना दिसतात. इथूनच अर्जेंटिनाचे प्रसिद्ध बीफ जगभर नेण्यात येते. काऊबॉय लक्झरी अनुभवायची असेल तर या रँचेसवरच्या एखाद्या कोलोनियल शैलीतल्या लक्झरी रँचवर राहून बघा. या एस्टान्सियामध्ये हॉर्स रायडिंग, शीप शिअरिंगसारख्या अ‍ॅग्रिकल्चरल गोष्टींबरोबर उत्तम फूड आणि वाईनचा आनंद आपण घेऊ शकता.

९ जुलै या आपल्या स्वातंत्र्य दिवसाला मान देण्यासाठी ब्युनॉस एअर्समधल्या सर्वात मोठ्या रस्त्याचे नावंच एवेन्यु दी नाइन ज्युलिओ ठेवण्यात आले आहे. इथे एकावेळी चौदा लेनमध्ये गाड्यांची वाहतूक होऊ शकते इतका हा एवेन्यु रुंद आहे. सर्वात रुंद रस्ता म्हणूनही हा प्रसिद्द आहे. अशा विविध आकर्षणांनी भरलेलं अर्जेंटिना भारतापासून भले लांब आहे, पण ह्या लँड ऑफ सिल्व्हरला एक हॉलिडे तो बनता ही हैं।

Marathi

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

*