मी कुठे आहे?

0 comments
Reading Time: 8 minutes

बी देअर विथ युअर हार्ट अ‍ॅन्ड सोल हे तंत्र आचरणात आणण्याचा भाग आम्ही आमच्या वीणा वर्ल्ड कल्चरचाच भाग केलाय. व्यवसाय असो वा नोकरी, सर्वत्र तारेवरची कसरतच असणार आहे त्यामुळे मानसिक संतुलन अबाधित राखणं हा महत्त्वाचा भाग असणार आहे भविष्यात.

मागच्या रविवारी सेल्स मीट होती. वर्षांतून दोनदा अशी मीट घेतली जाते जेणेकरून वेगवेगळ्या डिव्हिजन्समध्ये तसंच वेगवेगळ्या ब्रांच ऑफिसेस्मध्ये वीणा वर्ल्डचं प्रतिनिधित्व करणारी टीम पूर्ण दिवसभरासाठी एकत्र येते. येणार्‍या वर्षात काय काय करायचंय, कसं करायचंय, का करायचंय, कधी करायचंय, कुठे करायचंय, कुणी करायचंय ह्याचा सगळ्याचा परामर्श घेतला जातो. येणारी आव्हानं काय-काय असतील, त्याचा मुकाबला कसा करायचा ह्याविषयी सांगितलं जातं. एखादी नवीन गोष्ट येऊ घातली असेल तर त्याविषयीची माहिती देऊन त्यावर फीडबॅक घेतला जातो. थोडक्यात कोणत्याही ऑर्गनायझेशनमध्ये जशी सेल्स मीट असते तशीच ही एक सेल्स मीट. अर्थात प्रत्येक मीटमध्ये एखादा नवीन विचार आपल्याला आणखी विचार करायला लावतो तसंच काहीसं झालं.

आमची डायरेक्टर सुनिला पाटील वेगवेगळ्या डेस्टिनेशन्स विषयीची माहिती, तेथील अनोखे एक्स्पीरियन्सेस ह्याविषयीचं सेशन घेत होती. तिचं म्हणणं, जर तुम्ही कोणत्याही सहलीची वा पर्यटनस्थळाची माहिती पर्यटकांना समोरासमोर बसून वा फोनवर वा ईमेलद्वारे देणार असाल तर प्रथमत: तुम्ही स्वत:ला त्या डेस्टिनेशनवर न्या, स्वत: कन्व्हिंन्स व्हा, त्यावेळी स्वत:ला चेक करा की, अ‍ॅम आय इन अ राईट फ्रेम ऑफ माईंड?  तिने एक उदाहरण दिलं, वीणा वर्ल्ड प्रोजेक्ट मॅनेजर भावना आणि तिचे अहो अमित सावंत जो वीणा वर्ल्डचा एक कार्यक्षम व पर्यटकांचा आवडता टूर मॅनेजर आहे, त्यांनी त्याच दिवशी फेसबूकवर एक फोटो अपलोड केला होता. नवनवीन कॅमेरे आणि त्यातलं दिवसागणिक बदलणारं तंत्रज्ञान ह्याद्वारे ज्या काही गोष्टी अदरवाईज जादूई वाटतील अशा करता येतात त्याचा वापर करून दोघांचा छानसा लव्हबर्ड स्टाईल पॅनोरामिक फोटो ज्यात लेफ्ट साईडला ते बसलेत व बघताहेत राइट साईडला बसलेल्या त्याच दोघांकडे. थोडक्यात अमित आणि भावना बघत होते, अमित आणि भावनाकडे. पॅनोरामिक फोटोची ती कमाल असली तरी असं जर आपण स्वत: आपल्या स्वत:कडेच अंतरावरून बघू शकलो, आपल्याला चेक करू शकलो तर प्रत्येक ठिकाणी आपण फक्त तनानेच नाही तर मनानेही हजर राहू आणि जे काही काम हातात असेल, जी गोष्ट आपण करायला घेतली असेल त्यावर एकचित्त होऊ, आधिक चांगल्या तर्‍हेने ती गोष्ट करू, त्याला लागणारा वेळही कमी होईल कदाचित, कारण पूर्णपणे चित्त तिथे एकवटलेलं असेल. इथे पर्यटकांना माहिती देण्याचा विचार केला तर एकाग्रतेमुळे अधिक चांगले पर्याय आपण पर्यटकांना देऊ शकू. माझा मूड खराब आहे, माझं घरी कुणाशी भांडण झालंय, ट्रेनमध्ये कोणाबरोबर बाचाबाची झालीय म्हणून मी माझ्या पर्यटकांचा हॉलिडे नाही नं खराब करू शकत. सो, स्वत: स्वत:ला अंतरावरून बघा, चेक करा आणि जे काही करतोय तिथे स्वत:ला घेऊन या. सुनिलाचं सेशन सुरू राहिलं, पण तिने सांगितलेला विचार माझ्या मनात घोळत राहिला.

इंडिगो एअरलाईनने तुम्ही कधी प्रवास करीत असलात तर त्यांची प्रत्येक ठिकाणी लिहिलेली वेगवेगळी स्लोगन्स जरूर वाचा. हा एक खूप चांगला विरंगुळा होऊन जातो. व्हर्जिन अटलांटिक किंवा इंडिगो एअरलाईनने अ‍ॅक्चुअली खूप सीरियस अशा ह्या एव्हिएशन इंडस्ट्रीमध्ये थोडी मजा आणली. मी कुठे आहे? ह्याचं सतत भान असलं पाहिजे ह्याविषयीचा इंडिगो एअरअलाईनचा एक सुविचार मला आवडतो. कॉकपिटच्या दारावर पायलटच्या आय लेव्हलला हे लिहिलेलं आहे म्हणजे होतं, आता आहे की नाही माहीत नाही, पण असावं बहुतेक. असो. तिथे लिहिलंय, फ्लाइंग इज अ सीरियस प्रोफेशन, डू नॉट कॅरी युअर वरीज् बीयाँड धिस पॉइंट. प्रत्येक पायलटवर असणारी जबाबदारी आणि त्यातली जोखीम ही किती आहे हे आपण सगळेच जाणतो. ज्यावेळी प्रत्येक पायलट हे वाचत असेल त्यावेळी कॉकपिटमध्ये एन्ट्री करताना खरोखर स्वत:ला तनाने आणि मनाने तिथे आणत असेल. एकचित्ताने पूर्णपणे तिथे असणं, सतत दक्ष असणं हाच त्यांचा जॉब आहे. ऑपरेशन थिएटरमध्ये असणारे डॉक्टर्स आणि सर्जन्स हे सुद्धा ऑपरेशन्स करताना पूर्णपणे एकाग्रतेने त्या थिएटरमध्ये असतात आणि तेव्हाच छोटी-मोठी-किचकटीची ऑपरेशन्स यथासांग पार पाडतात. पायलटच्या हातात विमानप्रवासात एकावेळी अनेकांची आयुष्य असतात तर डॉक्टरांच्या हातात ऑॅपरेशनच्या वेळी एक आयुष्य. त्याची किंमत काय असते हे ह्या दोघांएवढं कुणालाही कळलं नसेल नाही. आपल्याला जर एकाग्रता शिकायची असेल, एखाद्या ठिकाणी त्यावेळी तनामनाने कसं एकरूप व्हायचं ह्याचा पाठ घ्यायचा असेल किंवा मनातले इतर दुसरे विचार जर बाजूला सारायचे कसे हे शिकायचं असेल तर डॉक्टर्स आणि पायलट्स ही दोन इन्स्पिरेशन्स

पुरेशी आहेत.

बी देअर विथ युअर हार्ट अ‍ॅन्ड सोल हे तंत्र आचरणात आणण्याचा भाग आम्ही आमच्या वीणा वर्ल्ड कल्चरचाच भाग केलाय. जागतिक स्पर्धेच्या युगात कामं वाढतंच राहणार आहेत. व्यवसाय असो वा नोकरी, सर्वत्र तारेवरची कसरतच असणार आहे त्यामुळे मानसिक संतुलन अबाधित राखणं हा महत्त्वाचा भाग असणार आहे भविष्यात. कोणत्याही टीम मेंबरच्या वैयक्तिक आयुष्यात आपण ढवळाढवळ करू शकत नाही पण त्यांचं जे व्यावसायिक आयुष्य आहे ते आपल्यापरीने संस्थाचालक म्हणून सोप्प करायचं काम आपलं आहे, नव्हे ते कर्तव्य आहे. म्हणूनच ऑफिसमध्ये असताना पूर्णपणे ऑफिसच्या कामावर लक्ष केंद्रित करा आणि ऑफिसमधून बाहेर पडता तेव्हा ऑफिसच्या कामाचा विचार डोक्यातून काढून टाका. एखादी आणीबाणीची परिस्थिती ह्याला अपवाद, त्यावेळी मग दिवस रात्र-सुट्टी न बघता ती अडचण सोडवावी लागते. सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये आपण आहोत आणि त्याचा ढाचा तसा आहे. पण इतरवेळी ऑफिस आणि घर ह्यात गल्लत करायची नाही. ऑफिसमध्ये घरातले विचार नकोत. जेव्हा असं होतं ऑफिसमध्ये तेव्हा, मी कुठे आहे? हे जर चेक केलं तर लगेच आपण स्वत:ला थोडं ठाकठिक करीत मनानेही पूर्णत: ऑफिसमध्ये येतो, कामाला लागतो, एकचित्त होऊन कामं केल्याने ती पटापट होतात व वेळेत घरी जाता येतं. आम्ही ही गोष्ट बर्‍यापैकी अचिव्ह केलीय पण अजून बहौत कुछ बाकी हैं। एक्सलन्स कोसो दूर हैं।

वर्क फ्रॉम होम ह्या कल्चरला आम्ही अजिबात स्विकारलं नाहीये जरी बर्‍याच जणांना तेच फ्यूचर असणार आहे असं वाटत असलं तरी. वर्क-लाईफ बॅलन्सचा बट्ट्याबोळ करायचा असेल तर असं घरून काम करावं असं मला अगदी ठामपणे वाटतं. स्वत:ला अजागळ, आळशी आणि थोडं बेशिस्तही बनवायचं असेल त्यांनी वर्क फ्रॉम होम करावं. ह्याला अपवाद आहे ज्यांचं ऑफिसच घरी बनवलंय, त्यासाठी वेगळी जागा केलीय, ऑफिसचं कल्चर निर्माण करून त्याबरहुकूम कामं चालताहेत आणि चलता है अ‍ॅटिट्यूड ला प्रवेशच दिला नाही अशांची होम ऑफिसेस्. इंग्लंड अमेरिका ऑस्ट्रेलियात मी बर्‍याच मुलामुलींना पाहिलंय जे असं घरून काम करतात. एकतर घरीच असल्याने अघळ-पघळ पद्धतीने म्हणजे लिटरली कुठेही-कसंही बसून ही मुलं काम करतात. मध्ये-मध्ये घरातलीही कामं करतात. आणि हे दोन्ही सांभाळताना होणारी त्यांची तारेवरची कसरत बघून वाटायचं, अरे, कशाला असं दिवसभर त्या ऑफिसमध्ये गुरफटवून घेताय. ना धड ऑफिसमध्ये-ना धड घरी. त्यापेक्षा ऑफिसला जा, ठरलेल्या वेळेत व्यवस्थित काम करा आणि पडा त्यातून बाहेर. फ्री व्हा. कुटुंबासोबत एन्जॉय करा. बाहेरच्या देशांमध्ये वर्क फ्रॉम होम कल्चर बर्‍यापैकी डेव्हलप झालंय. ऑफशोअर काम करणार्‍यांना किंवा ज्या कंपन्यांची ऑफिसेसच त्या शहरात नसतात त्यांचा नाईलाज असतो पण तरीही हा प्रकार मोठ्या प्रमाणावर स्विकारायला भारतीय मानसिकता कशी काय तयार होईल हा प्रश्‍नच आहे. आपण माणसांमध्ये राहणारी, माणसं आवडणारी माणसं. साधारणपणे नऊ तास ऑफिसमध्ये, तीन तास प्रवासात, सात तास झोप आणि जागेपणी पाच तास कुटुंबासोबत हे वेळापत्रक चांगलं आहे की. सारखं ऑफिस आॅफिस किंवा सतत घर अशा दोन्ही गोष्टी म्हणजे अतिरेक. माणसं भेटली पाहिजेत, माणसांपासून दूरही राहता आलं पाहिजे. सकाळी उठल्यावर वूई शूड लूक फॉरवर्ड टू द ऑफिस आणि संध्याकाळी ऑफिस सुटताना वूई शूड लूक फॉरवर्ड टू होम स्वीट होम हे एक मस्त समीकरण आहे, ज्याला ज्याला ते जमलंय त्याने आयुष्याची लढाई जिंकलीय. ऑफिसमध्ये असताना घराचे विचार आणि घरी असताना ऑफिसचे विचार ही गोष्ट म्हणजे तणावपूर्ण आयुष्याची गुरूकिल्ली. आम्हाला तरी ते नकोय आणि म्हणूनच नो वर्क फ्रॉम होम, एन्जॉय द मोमेंट, एन्जॉय द सराऊंडींग, एन्जॉय बीइंग देअर फुल्ली अ‍ॅट दॅट मोमेंट!

Marathi

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

*