Customized Holidays Marathi

बीहाइंड द सीन्स!

Reading Time: 5 minutes

हॉटेल चेकइन करताच तिने माझ्या डोक्यावर गन धरली, तेव्हा नकळत आपोआपच माझे हात वर जाऊ लागले. माझी रीअ‍ॅक्शन बघून हॉटेलमध्ये चेकइन करणार्‍या त्या फ्रन्ट डेस्कवरच्या मुलीला गम्मत वाटली, आणि तिने लगेच माफी मागत ‘सॉरी मॅडम बट दिस इज प्रोसीजर’ असे म्हणत आकाराने गनसारख्या दिसणार्‍या त्या थर्मामीटरने माझ्या शरीराचं तापमान चेक केलं,आणि नम्रपणे हसत मला वेलकम ड्रिंक व चावी दिली. गेल्या आठवड्यातच मी सिंगापूरला भेट दिली तेव्हाचा हा प्रसंग. हो, गेल्याच आठवड्यात! हल्ली चायनामधून पसरलेल्या कोरोना वायरसच्या काळजीमुळे सिंगापूरच्या मरिना बे सॅन्ड्स हॉटेलमधील या प्रतिबंधात्मक प्रक्रिया सोडल्या तर इतर कुठेही या वायरसचा काहीच प्रभाव जाणवला नाही.  सिंगापूरने तर चायनाला भेट देऊन परतणार्‍या सर्व व्यक्तिंना सरळ चौदा दिवस मेडिकल सेंटरमध्ये वेगळं ठेवलं, आणि ते रोगमुक्त आहेत अशा मंजुरीची पोचपावती मिळाल्यानंतरच त्यांना सिंगापूमध्ये एंट्री दिली. त्यामुळे सिंगापूरमध्ये फिरताना सुरक्षित तर वाटतच होतं शिवाय एरव्ही दिसणारी चायनीज पर्यटकांची गर्दी नसल्याने सर्व पर्यटनस्थळांवर गर्दी देखील जाणविली नाही. अगदी ह्याचवेळी आपल्या पर्सनल हॉलिडेसाठी वीणा वर्ल्डचा डायरेक्टर नील पाटील आपला भाऊ राजसोबत जपानमध्ये होता आणि त्याचाही अनुभव सकारात्मक होता.

सिंगापूरला भेट देण्याचा प्रोग्राम तसा बराच आधी ठरला होता. सिंगापूर एअरलाईन्स तर्फे भारतातल्या टॉप दहा ट्रॅव्हल एजन्सीज्ना अ‍ॅवॉर्डस् देण्यासाठी या प्रोग्रामचं आयोजन करण्यात आलं होतं.  सिंगापूर एअरलाईन्सने या प्रोग्रामसाठी आयकॉनिक ‘मरिना बे सॅन्ड्स’ या हॉटेलची निवड केली होती. यासाठी सिंगापूर एअरलाईन्सचे भारताचे जनरल मॅनेजर श्री. डेव्हिड लिम तसेच वेस्टर्न इंडियाच्या सेल्स मॅनेजर रीना मोतिहार, ह्यांसोबत भारतातल्या टॉप दहा ट्रॅव्हल कंपन्यांच्या डायरेक्टर्सनी सिंगापूरला भेट दिली. एअरपोर्टला उतरताच आम्ही आमच्या हॉटेलकडे निघालो. होडीच्या आकारात बांधलेले गगनचुंबी ‘मरिना बे सॅन्ड्स’ हे हॉटेल लवकरच दिसू लागले. काही इमारती इतक्या उठावदार असतात की  त्या कुठूनही ओळखू येतात आणि स्वतःचीच नव्हे तर चक्क त्या देशाची ओळख ठरतात. आज आपण ‘मरिना बे सॅन्ड्स’च्या होडीच्या आकारात बांधलेल्या इमारतीसमोर फोटो काढला की कुणालाही पटकन कळते की आपण कुठल्या देशाला भेट देत आहोत. ‘मरिना बे सॅन्ड्स’ हॉटेलच्या मॅनेजर बरोबर त्या हॉटेलच्या अनेक सोयींचे निरीक्षण करत असताना हॉटेलच्या रूम्समधून दिसणार्‍या नजार्‍याकडे माझे लक्ष गेले. एका बाजूला ‘सिटी व्ह्यू’ होता तर दुसरीकडे ‘गार्डन्स बाय द बे’ हे सिंगापूरचे सुंदर आकर्षण दिसत होते. एका बाजूला सिंगापूरचे प्रतिक म्हणजेच ‘मर्लायन’ दिसत होते तर दुसरीकडे ‘गार्डन्स बाय द बे’ चे अत्याधुनिक फ्लॉवर डोम,क्लाऊड फॉरेस्ट डोम आणि सोलर पॅनल लागलेल्या सुपर ट्रीज. एक पारंपरिक शिल्प आणि दुसरे अगदी अत्याधुनिक. दोन्हीही सिंगापूरचे प्रतिक ठरणारी आयकॉनिक आकर्षणे. १९६५ मध्ये स्वतंत्र देश म्हणून घोषित झाल्यानंतर जणूकाही सिंगापूर राष्ट्राचे ध्येयच होते अत्याधुनिक बिल्डिंगस् व मॉन्युमेंट्सने भरलेली स्कायलाईन तयार करणे. हे जरी खरे असले तरी अनेक पारंपरिक रितीरिवाज यात दडलेले आहेत हे जाणविते. अनेक वेळा सिंगापूरला भेट दिली असूनसुद्दा दरवेळी काहीतरी नविन इथे बघायला मिळते व शिकायला मिळते याचे मला नेहमीच कुतूहल वाटते. याआधी सिंगापूरमध्ये कधीही न घेतलेले वेगळे अनुभव मला घेता आले. त्यातले माझे सर्वात आवडते म्हणजे सिंगापूरची ‘ट्रायशा राईड’. ही सायकल रिक्षा चालवणार्‍या व्यक्तिला प्रेमाने  ‘ट्रायशा अंकल’ म्हणून ओळखतात. आमची ट्रायशा राईड ही सिंगापूरच्या चायनाटाऊन मधून जात असल्याने तिथल्या चायनीज् न्यू ईयरसाठी उभे केलेले अनेक सुंदर लँटर्नस् बघायला मिळाले. हे लुनर ईयर ‘ईयर ऑफ द रॅट’ असल्याने मनुष्याच्या उंचीचे उंदरांचे अनेक लँटर्नस् रस्त्याच्या मधोमध उभारले होते आणि संध्याकाळी रोशणाई केल्याने संपूर्ण रस्ता इल्युमिनेटेड लँटर्नस्ने सजलेला होता. संध्याकाळच्या संधीप्रकाशात प्रसन्न हवेत त्या ट्रायशामधून प्रकाशित झालेल्या सिंगापूरची सैर फारच प्रसन्न वाटली.

असेच दुसर्‍या दिवशी सिंगापूरच्या दुसर्‍या भागांची सैर आम्ही सिंगापूर साईडकार्सने केली. इटालियन मेकच्या वेस्पा स्कूटरला साईडकार जोडलेल्या दहा स्कूटर्स आमच्यासाठी तयार होत्या. त्यात सुंदर पिवळ्या रंगाची स्कूटर दिसताच अर्थातच मी त्यावर माझा हक्क गाजविला आणि पिवळा रंग निवडला.  वीणा वर्ल्डचा पिवळा टी शर्ट घातल्यानंतर आम्ही सगळे अगदी नैसर्गिकपणे पिवळ्या रंगाकडे आकर्षित होतोच. मग ती स्कूटर का असेना. या साईडकार्स मध्ये फिरताना अमिताभ-धर्मेंद्रच्या प्रसिद्ध ‘ये दोस्ती हम नही छोडेंगे’ या जय-वीरूच्या गाण्याची आठवण आली. अशा छोट्या वाहनावर बसून शहराची सैर करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे एरव्ही मोठ्या बसेस् व कोच पोहचू शकत नाही अशा अनेक छोट्या गल्ली-बोळ्यांमध्ये अगदी सहजपणे आपण पोहचू शकतो. आणि ज्यात बर्‍याच वेळा अनेक लपलेल्या खजिन्यांचा आविष्कार पाहता येतो. असाच एक सिंगापूरचा रस्ता म्हणजे ‘हाजी लेन’. छोट्या-छोट्या सुबक दुकानं-रेस्टॉरंट्सनी भरलेल्या या लेनमध्ये भिंतीवर अनेक रंगीबेरंगी ग्राफिटी व म्युरल्स पाहिले की सिंगापूरच्या वेगळ्या चेहर्‍याची ओळख होते. एकाच वेळी अत्याधुनिक शॉपिंग मॉल्स, ऑर्चड स्ट्रीटवरच्या मॉडर्न बिल्डिंग्स् बरोबर या हाजी लेनची सैर अगदी काँट्रास्ट, पण सुंदर वाटली. या पुढचा स्टॉप होता तो सिंगापूरची स्कायलाईन दिसेल असा. तिथे सिंगापूच्या अनेक आयकॉनिक बिल्डिंग्स्च्या बांधकामाची माहिती देताना आमच्या गाईडने एक सुंदर कल्पना मांडली आणि परत एकदा सिंगापूरच्या मॉडर्न आणि पारंपरिक मुल्यांची ओळख झाली. सिंगापूरमध्ये इंग्रजी, मलय, मँडरिन (चायनीज) आणि तामिळ अशा चारही भाषा बोलल्या जातात. सर्वधर्मसमाविष्ट असा हा देश आहे. त्यात सिंगापूरची बांधणी होताना फेंगशुई या प्राचीन चिनी वास्तुशास्त्राचा अनेक ठिकाणी वापर केलेला जाणवतो. फेंगशुई विषयी अधिक माहिती देताना आमच्या गाईडने सांगितले की, आपल्या जीवनात समतोल आणि गूडलक आणण्यासाठी फेंगशुईचा वापर केला जातो. ‘फेंग -शुई’ चा शब्दश: अर्थ म्हणजे ‘वारा’ आणि ‘पाणी’. हा ठीकठिकाणी सिंगापूरच्या जीवनाचा एक भाग आहे हे निरखून पाहिल्यास दिसून येते. सिंगापूरचे पहिले पंतप्रधान ली कुआन येव हे खर्‍या अर्थाने सिंगापूरचे शिल्पकार ठरले. केवळ एका जनरेशनमध्ये त्यांच्या नेतृत्त्वाखाली सिंगापूरचे ‘थर्ड वर्ल्ड’ देशापासून ‘फर्स्ट वर्ल्ड’ देशामध्ये रुपांतर झाले. त्यांच्या नेतृत्वाबरोबरच अनेक सिंगापोरियन्सचा समज आहे की फेंगशुईच्या छुप्या तत्त्वांचा सिंगापूरच्या प्रगतीत बराच हातभार आहे पण त्याबद्दल काही पुरावे मिळणे कठीण आहे. तरीही इथल्या इमारतींच्या लोकेशन्स, डायरेक्शनपासून बांधकामापर्यंत प्रत्येक गोष्टीत ही तत्त्वे दडलेली दिसतात हे मात्र नक्की. ह्याची झलक मिळते ती सिंगापूरच्या बीहाइंड द सीन्स टूरवर.

बहुतेक प्रगत देशांमध्ये त्यांच्या नद्यांचा उत्तम वापर केलेला जाणवतो आणि या गोष्टीला सिंगापूरसुद्धा अपवाद नाही. सिंगापूर नदीच्या काठावर वसलेल्या त्याच्या ‘फायनान्शियल आणि बिझनेस डिस्ट्रिक्ट’मध्ये सिंगापूर नदीचा आकार एका कार्प माशाच्या आकाराचा दिसतो. जो मासा पकडू शकेल त्याची उन्नती होईल या पार्श्‍वभूमीवर इथले संपूर्ण फायनान्शिअल व बिझनेस डिस्ट्रिक्ट या कार्प माश्याच्या आकारासारख्या नदीभोवती बांधलेले आहे. काही फेंगशुई एक्सपर्टस्चा असा समज सुद्धा आहे की ‘सिंगापूर फ्लायर’ हे इथले ऑब्झर्व्हेशन व्हील अशा प्रकारे बांधलेले आहे की ते सिंगापूरच्या बिझनेस डिस्ट्रिक्टकडे सर्व पॉझिटिव्ह शक्ती फेकते. समुद्रापासून बरीचशी जमीन रीक्लेम करून सिंगापूर बांधण्यात आल्यामुळे इथल्या नद्यांचे संतुलन बिनसले आणि ते परत व्यवस्थित करण्यासाठी सिंगापूर फ्लायरचे असे लोकेशन निवडले  गेले की हे कायम फिरणारे चक्र शहराकडे पाण्याची पॉझिटिव्ह एनर्जी पाठवत राहते. ‘मरिना बे सॅन्ड्स’ हे सुद्धा शहराच्या आर्थिक डिस्ट्रिक्टच्या समोर असल्याने  शहरासाठी हे एक समृद्ध चिन्ह मानले जाते. मरिना बे सॅन्ड्सचा प्रसिद्ध इन्फिनिटी स्विमिंग पूल, स्वत: एका विशाल डोंगरावर असलेल्या सरोवराचे प्रतिनिधित्त्व करत आपल्या सभोवतीच्या निसर्गाशी एकरूप आहे असे समजले जाते. मरिना बे सॅन्ड्स समोरचे ‘आर्ट-सायन्स संग्रहालय’ तर एक आर्किटेक्चरल मास्टरपीस समजले जाते. कमळाच्या फुलांची आठवण करून देणारी ही इमारत ज्ञान वाढविण्याचे आणि भविष्याचे प्रतिक आहे. तसेच सिंगापूरचे सर्वात चांगले लेटेस्ट आकर्षण म्हणजे ‘रेन वॉरटेक्स धबधबा’. एअरपोर्टला लागून बांधलेला ज्वेल मधला हा धबधबा आकाशाकडून सर्व पॉझिटिव्ह एनर्जी ओढून घेत आहे असा समज आहे. पण माझी सर्वात आवडती कथा म्हणजे ‘सिंगापूरच्या नाण्याची’. सिंगापूरमध्ये त्यांच्या ‘मेट्रो ट्रेन्स’ म्हणजेच MRT साठी रस्त्याखाली MRT टनेल्स बांधल्यामुळे संपूर्ण शहराचे संतुलन बिनसले आहे ही समजूत होती. हे संतुलन परत आणण्यासाठी चिनी बगुआ म्हणजेच फेंगशुईमधल्या आठ बाजू असलेला एनर्जी मॅप घराघरामध्ये पोहोचणं गरजेचं होतं. मग कुठल्याही धर्माच्या व्यक्तीची भावना न दुखवता ही शक्ती प्रत्येकापर्यंत पोहोचावी या उद्देशाने सिंगापूरच्या नाण्यावरच हा ऑक्टागॉन काढण्यात आला.

एवढी सगळी पॉझिटिव्ह एनर्जी लाभलेल्या देशाला कुणाचीच नजर नाही लागू शकत असे आमचे मत पक्के झाले. त्यादिवशी संध्याकाळी अ‍ॅवॉर्ड फंक्शनच्या वेळी टॉपिक परत कोरोना व्हायरसकडे वळला तेव्हा शहरात काही वेगळे जाणवले नाही असे आम्ही म्हणताच मरिना बे सॅन्ड्सची मॅनेजर ऑलिंपिया मला म्हणाली की, ‘तुम्ही भारतीय मंडळी नक्की काय खाता,कारण हे आजार तसे भारतात आत्तापर्यंत तरी कधी पटकन पसरले नाहीत. तुमच्या जेवणाच्या फोडणीतच जादू असावी’. जादू नाही पण प्राचीन भारतीय संस्कृती, परंपरा व आयुर्वेदामुळे आणि आपल्या जेवणातल्या मसाल्यांमुळे कदाचित खरंच इतर लोकांपेक्षा आपली इम्युनिटी अधिक शक्तिशाली असावी.

सिंगापूरकडनं  संकेत घेऊन आपणसुद्धा ‘फर्स्ट वर्ल्ड कन्ट्री’ बनण्याकडे वाटचाल करत असताना आपल्या परंपरेला नक्कीच लक्षात ठेवायला हवे.

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

*