बाकु-पॅरिस ऑफ द ईस्ट

0 comments
Reading Time: 8 minutes

इथली लोकं सांगतात की, आमची नावे पर्शियन आहेत, आम्ही रशियन बोलू शकतो पण इतर सर्व राहणीमान हे टर्कीसारखे आहे, त्यामुळे आम्ही एकाच वेळी सर्व ट्रेडिशन्स पाळतो. असे वेगवेगळे कल्चर्स जेव्हा एकत्रित येतात तेव्हा काहीतरी अधिक उत्कृष्ट जन्माला येतं.

विच कंट्री आर यू फ्रॉम? हॉटेल चेक-इन केल्या केल्या मला हा प्रश्‍न विचारला गेला. पुढे जाऊन हॉटेलच्या बेलबॉय व हाऊसकिपिंगवाल्यानेच नाही तर हॉटेल मॅनेजरनेसुद्धा मला हाच प्रश्‍न केला.  हॉटेल चेक-इन केल्यापासून ते माझ्या रूममध्ये पोहोचेपर्यंत किमान पाच वेळा तरी मी या प्रश्‍नाचे उत्तर दिले. माझी नॅशनॅलिटी ओळखायची जेवढी उत्सुकता त्या सर्व लोकांना होती तेवढीच त्यांच्या संस्कृतीबद्दल सर्वकाही जाणून घ्यायची उत्सुकता मलाही होती. त्या लोकांच्या चेहर्‍याची ठेवण साधारण आपल्यासारखीच होती, केवळ नाकं थोडी अधिक टोकेरी व चेहरे थोडे अधिक रेखीव दिसत होते. आजकाल तर जगभर कपड्यांच्या फॅशन्स, इंटरनॅशनल ब्रॅन्ड्स व हेअर स्टाईल्ससुद्धा सारख्याच असल्याने नव्या पिढीत तर ग्लोबल सिटिझन्स तयार होत आहेत. सर्वांचे म्युझिक, टी.व्ही प्रोग्राम्स, भाषेतले बारकावे, बोलण्याची ढब, आणि इतकेच काय तर जेवणसुद्धा सारखेच होत चालले आहे. एका दृष्टीने हे चांगले आहे कारण आपली पुढची पिढी जगात कुठेही आरामात फिरू शकतील आणि आपले घर देखील बनवू शकतील. पण ह्या ग्लोबल सिटिझन्समुळे प्रत्येक देशाचे, तिथल्या ठिकाणांचे वैशि व कल्चर नेस्तनाभुत नाही ना होणार अशी उगाचच काळजी वाटली.

पण वेगवेगळे कल्चर्स जेव्हा एकत्रित येतात तेव्हा काहीतरी अधिक उत्कृष्ट जन्माला येतं आणि याचे प्रात्यक्षिक मला अझरबायजानची राजधानी बाकुमध्ये मिळाले. रशियाच्या दक्षिणेकडे कॅस्पियन समुद्राच्या पश्‍चिमेकडे, इराणच्या उत्तरेकडे स्थित असलेल्या अझरबायजानच्या पश्‍चिमेकडे अर्मेनिया व जॉर्जिया हे देश आहेत. अझरबायजानच्या पर्शियन राजाच्या राज्यात अनेक लोकांनी झोरोआस्ट्रेनिझम स्विकारले आणि त्यातल्या काहींनी नंतर ख्रिश्‍चन धर्म स्विकारला. मुस्लिम तुर्क लोकांनी अझरबायजानकडे धाव घेतली तेव्हा इस्लाम धर्माचा अझरबायजानमध्ये प्रसार झाला आणि अझरबायजानचे तुर्कस्थान झाले असे म्हणायला हरकत नाही. एकोणीसाव्या शतकाच्या सुरुवातीला रशिया- पर्शियाच्या युद्धानंतर इराणकडून अझरबायजानचे साम्राज्य रशियाकडे गेले व अझरबायजान हे १९९१ पर्यंत सोव्हिएत युनियनचा भाग होते. आजसुद्धा अझरबायजानमध्ये फिरताना ह्या सर्व कल्चर्सची एक मिसळ अनुभवायला मिळते. इथले लोक सांगतात की, आमची नावे पर्शियन आहेत, आम्ही रशियन बोलू शकतो पण इतर सर्व राहणीमान हे टर्कीसारखे आहे, त्यामुळे आम्ही एकाच वेळी सर्व ट्रेडिशन्स पाळतो, हे नक्की.

हे सर्व खरे असले तरी बाकुला भेट दिल्या दिल्या मला मी पॅरिसमध्ये असल्याचा भास झाला. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला जेव्हा मॉडर्न अझरबायजानची स्थापना झाली तेव्हा युरोपियन आर्किटेक्चरने प्रभावित होऊन बाकुच्या अनेक इमारती तयार झाल्या. ह्या युरोपियन शैलीवर आधारित बांधलेल्या बिल्डिंग्स्ची खरी शान बघायची असेल तर बाकू मध्ये नाईट टूर करायला हवी. बाकुचं फाऊंटन स्क्वेअर व निझामी स्ट्रीटवर रात्री फिरताना बाकूच्या युरोपियन दिसणार्‍या बिल्डिंग्स् अधिकच सुंदर दिसू लागतात. प्रत्येक बिल्डिंगचे दर्शनी भाग (फसाड) प्रकाशित केल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूला रात्रीच्या काळोखात चमचमणार्‍या बिल्डिंग्स् अतिशय प्रेक्षणीय दिसत होत्या. बाकुला येण्यापूर्वी गूगलवर रीसर्च केला आणि फोटोसुद्धा पाहिले, पण इथे केवळ रस्त्यांवर फेरफटका मारताना अशा उत्कृष्ट नजार्‍याने डोळे दिपतील असे वाटले नव्हते. त्यात इथले रस्ते व संपूर्ण शहरच इतके स्वच्छ आहे की पायी फिरण्याची मजाच काही वेगळी आहे.

बाकु शहराचे आर्किटेक्चर देखील वेगवेगळ्या सेंच्युरिजचे प्रतिनिधी ठरतात. बाकु शहराचा ऐतिहासिक गाभा म्हणजे इथली ओल्ड सिटी किंवा इनर सिटी. या प्राचीन शहराबरोबर त्यातले शिरवनशहा पॅलेस व मेडन टॉवर ह्या बाराव्या शतकातल्या इमारतींना युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट्सचा खिताब मिळालेला आहे. या जुन्या शहराच्या कॉबल्डस्टोन रस्त्यांवरून या फोर्टे्रसच्या भिंतींच्या आतमध्ये घरे, रेस्टॉरंट्स व दुकाने बघत फेरफटका मारताना मला काहीसं राजस्थानच्या जैसलमेर फोर्टची आठवण झाली. दिव्यांच्या मंद प्रकाशात या ऐतिहासिक शहरांचे रस्ते व त्याला लागलेले काही रेस्टॉरंट्स हे जणू एखादे छायाचित्र असल्यासारखे वाटत होते. मधूनच अझरबायजानी कार्पेट्स व सतरंज्या आणि सुवेनियर शॉप्समुळे Back In Time प्रवास केल्यासारखे वाटत होते. टर्कीसारखेच अलाद्दिनचे दिवे, कार्पेट्स, चहाचे पारदर्शक कप-बशी, अझेरी मध, केशर, कावियार बरोबरच फ्रिज मॅगनेट इत्यादि सुवेनियर्सची रंगबिरंगी दुकाने, शेजारीच अतिशय स्वादिष्ट बकलावाचे मिठाईचे दुकान इ. गोष्टी पाहत फिरताना जुन्या शहरातच ट्रेडिशनल अझरबायजानी रेस्टॉरंट्समध्ये ट्रेडिशनल डान्स व म्युझिक सोबत ट्रेडिशनल जेवणाचा आस्वाद मला घेता आला. लाल-पांढर्‍या-काळ्या रंगाचे आकर्षक अझरबायजानी कार्पेट्स फरशीवरच नव्हे तर भिंतीवरसुद्धा आकर्षक वॉल हँगिग्स् बनून त्या रेस्टॉरंट्सची शोभा वाढवत होते. या फोर्ट्रेस वॉल्सना पार करीत जेव्हा बाकु शहराच्या सुंदर निझामी स्ट्रीटवर पाय ठेवला तेव्हा एखाद्या परिकथेतून  अठराव्या-एकोणीसाव्या शतकातल्या युरोपमध्येच प्रवेश करतोय की काय असेच वाटले. बाकूच्या त्या अतिशय सुंदर तर्‍ह्ेने प्रकाशित केलेल्या बिल्डिंग्स्च्या आर्र्किटेक्चरमुळेच आणि सुंदर रूंद रस्त्यांमुळेच बाकू शहराला पॅरिस ऑफ द ईस्ट हे खिताब लाभलेले आहे.

बाकुच्या मेडन टॉवरच्या अनेक कथा प्रसिद्ध आहेत. शहरांवर अनेक हल्ले झाले तरी शहरांच्या मधोमध असलेल्या या टॉवरवर कुठल्याच शत्रूने कधीच हल्लाबोल केला नाही. म्हणूनच याचे नाव मेडन टॉवर पडले. पण एका दंतकथेप्रमाणे या टॉवरभोवती जेव्हा शत्रूने घेराव केला तेव्हा त्यात लपलेल्या लोकांनी त्यांना वाचवण्यासाठी अहुरा माझदा या झोरोआस्ट्रीयन देवाकडे प्रार्थना केली. तेव्हा त्या टॉवरच्या फायर टेम्पलमधून  एका मोठ्या पवित्र आगीतून एका अग्नीप्रमाणे लखलखणार्‍या केसांच्या युवतीचा जन्म झाला, जिने शत्रूला हरवून ते टॉवर वाचवले म्हणून त्याला मेडन टॉवर म्हणून ओळखले जाते.

मेडन टॉवर जर बाकुच्या इतिहासाचे प्रतिक आहे तर येणार्‍या भविष्याचे प्रतिनिधित्व करतात ते इथले फ्लेम टॉवर्स. अझरबायजानमधल्या गगनचुंबी इमारतीच्या त्या त्रिकुटामधल्या सर्वात उंच टॉवरची उंची आहे 597 फूट. या टॉवर्समध्ये ऑफिसेस्, घरे व केअरमाँट हे पंचतारांकित हॉटेल आहे. अझरबायजान हे प्रेफिट झोरोआस्टरचे जन्मस्थान असून, अझरबायजानी लोकांच्या अहुरा माझदा या देवतांचे प्रतिक म्हणजेच ज्वाला असल्याने या टॉवर्सचे बांधकाम हे अग्नीच्या ज्वालांच्या आकारात करून फ्लेम टॉवर म्हणून  ओळखू जाऊ लागले. बाकुमध्ये फिरताना सगळीकडूनच हे फ्लेम टॉवर्स दिसत राहतात आणि रात्री तर दहा हजारांहून अधिक LED लाईट्सने या तिन्ही टॉवर्सचे एका मोठ्या डिस्प्ले स्क्रीनमध्ये रुपांतर होऊन सुंदर लाईट्सने सजविले जाते.

अझरबायजानमध्ये अग्नीला खास महत्त्व तर दिलेच जाते आणि  मनुष्याला याची रोजच्या आयुष्यात आठवण रहावी म्हणून बाकु जवळच्या अ‍ॅबशेरॉन या भागात एक आश्‍चर्यचकित करणारे नैसर्गिक अद्भुत दृश्य दिसते. गेल्या 4000 वर्षांपासून इथे डोंगराच्या कडेला नैसर्गिक जळणारी आग दिसते. इथल्या नॅचरल गॅसच्या साठ्यामुळे नैसर्गिक ज्वाला गेल्या हजारो वर्षांपासून लोकांना चकित करत आहेत. अझरबायजानच्या या नैसर्गिक ज्वालांमध्ये अ‍ॅबशेरॉनमधल्या यानार दाग या भागात सर्वात उत्तमरित्या हे पाहता येते व हा भाग सर्वात महत्त्वाचा आहे. झोरोआस्ट्रियनिझमच्या स्थापनेमध्ये अग्नीचे महत्त्व व फायर टेम्पलची स्थापना ही याच नैसर्गिक अग्नीमुळे झालेली असून ती आजसुद्धा जळताना दिसते. गोबुस्तान हे बाकू शहरापासून केवळ 60 किलोमीटरच्या अंतरावर आहे पण इथल्या म्युझियममध्ये हजारो वर्षांपूर्वी वापरली जाणारी साधने व त्या काळातील मनुष्याची हाडे व सांगाडा बघता येतात. जवळच इथले मातीचे ज्वालामुखी बघता येतात. ज्वालामुखीमध्ये केवळ माती व चिखल बाहेर पडणार्‍या ज्वालामुखींची संख्या जगात सर्वात जास्त अझरबायजानमध्ये दिसते. अझरबायजानमधल्या गबाला येथे तुफानदाग माऊंटन रीसॉॅर्टवर 1660 मीटरच्या (5446फूट) उंचीवर बर्फात खेळायला आपण केबलकार घेऊन जाऊ शकतो.

बाकु शहरात राहूनसुद्धा ही सर्व आकर्षणे डे-ट्रिप्स करून बघता येतात हे उत्तम आहे, कारण बाकू शहराला सोडून जावेसेच वाटत नाही. दिवसभर फिरून संध्याकाळी समुद्राच्या काठी बांधलेल्या बुलेवार्ड ह्या 4 km च्या पार्कमध्ये फिरताना या शहराच्या सौंदर्याची अधिक जाणीव होते व इथल्या अमेझिंग स्कायलाईनचे कुतूहल वाटते. नव्या शैलीत बांधलेले अनेक स्कायस्केपर्सने बाकूचे स्कायलाईन सजलेले आहे. बाकूची आणखीन एक अद्भूत करणारी इमारत म्हणजे इराकी-ब्रिटीश आर्किटेक्ट झाहा हदिदने बांधलेले हायदर अलियेव कल्चरल सेंटर व बाकुच्या मॉडर्न शैलीचे आणखीन एक प्रतिक म्हणजे इथले फॉर्म्युला वन ग्रॅन्ड प्री मोटर रेसेस्. अझरबायजानच्या ऑईल इंडस्ट्रीमुळे बाकुच्या काही भागाला ब्लॅक सिटी म्हटले जायचे. आज या भागाचे नुतनीकरण होऊन याच भागाला व्हाईट सिटी म्हणून ओळखलं जाते. ब्लॅक असो की व्हाईट ही City Of Wind आपल्या अनुकूल हवामानामुळे हॉलिडेसाठी उत्तम ठरते हे मात्र नक्की! हायदर अलियेव सेंटर समोरील ग्राऊंडवर मोठ्या अक्षरात आय लव्ह बाकु ही साईन पाहून ही भावना केवळ तिथल्या रहिवाशांची नसून बाकूला भेट देणार्‍या प्रत्येक टूरिस्टच्या मनातलीच आहे हे मात्र माझ्या मनाला तेव्हा लगेच पटले.

 

Marathi

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

*