बदलते कल, बदलता आसमंत

0 comments
Reading Time: 9 minutes

‘हवाई सुंदरी’चा एक जमाना होता. एअर होस्टेस हे एक आगळं स्टेट्स होतं. सुंदर, सडपातळ, नाकी डोळी नीटस, स्मार्ट, अमूक एक वय-वजन, चालण्यात डौल, बोलण्यात अदब, हसण्यात जग जिंकण्याची ताकद हे सगळं एका ठिकाणी एकवटलेलं दिसायचं. एअर होस्टेस बाजूने गेली तर सर्वांच्या नजरा तिच्याकडे वळायच्या आणि त्या नजरांमध्ये एअर होस्टेसच्या रुबाबाविषयी-आत्मविश्‍वासाप्रती आदर असायचा.

पंधरा-वीस वर्षांपूर्वी आपल्या भारतात एअरलाईन्स काढणं किंवा एखाद्या बिझनेस हाऊसची एअरलाईन असणं ही क्रेझ होती. फक्त एअर इंडिया किंवा इंडियन एअरलाईन्सची चलती असणार्‍या भारतीय आकाशात अचानक ईस्ट-वेस्ट एअरलाईन, दमानिया एअरवेज, सहारा एअरलाईन्स, जेट एअरवेज, राज एअर, एअरवेज इंडिया, भारत एअरवेज, हिमालयन एव्हिएशन, कलिंगा एअरलाईन्स, एनइपीसी, पॅरामाऊंट एअरवेज, किंगफिशर, जेट कनेक्ट, किंगफिशर रेड, जेट लाईट अशा नावांनी ट्रॅफिक जाम करून टाकलं. त्यानंतर इंडिगो एअरलाईन्स, गो एअरवेज, स्पाईसजेट सारख्या एअरलाईन्स आल्या आणि बर्‍यापैकी स्थिरावल्या. ‘स्पर्धा कशी असू शकते? ती तारक की मारक? स्पर्धेला तोंड कसं द्यावं? स्पर्धा सवार्थाने जीवघेणी कशी ठरू शकते?’ ह्यावर विचार करायचा असेल तर एअरलाईन इंडस्ट्रीचा अभ्यास करावा. ‘तुम्हाला अब्जाधिशावरून कोट्याधिश आणि कोट्याधिशावरून लखपती व्हायचं असेल तर एअरलाईनच्या बिझनेसमध्ये या’ असं म्हटलं जातं ते उदाहरणासहीत तंतोतंत बरोबर असल्याचं जगभरातील अनेक एअरलाईन्सनी दाखवून दिलं. वर दिलेल्या अनेक दिग्गज नावांपैकी बहुतेक नावं तर आपल्या आठवणींच्या कप्प्यातूनही नाहीशी झालीयेत. ‘राईज अँड फॉल’ चे केस स्टडीज् सर्वात जास्त कुठे वाचायला मिळत असतील तर ते ह्या एअरलाईन इंडस्ट्रीमध्ये. खरंतर प्रत्येक बिझनेसमनने आणि व्यवसाय सुरू करणार्‍या प्रत्येक व्यक्तीने ह्याचा अभ्यास करावा नाऊमेद होण्यासाठी नाही तर, ‘काय असू शकतं? काय घडू शकतं? काय करायला पाहिजे? काय खबरदारी घ्यायला पाहिजे? झीरो टू हिरो टू हिरो टू झीरो…’ हे जाणून घ्यायला. एअरलाईन इंडस्ट्री म्हणजे वणवा लागलेलं एखादं जंगल, रोजचं कॅश बर्निंग. खरंतर जगभरात प्रवाशांचा महापूर आला आहे. किमान वीस ते कमाल तीस टक्क्यांनी दरवर्षी हा बिझनेस वाढेल असं संख्या शास्त्र सांगतंय. सर्वत्र प्रचंड डिमांडमध्ये असलेली ही इंडस्ट्री एक दिवसासाठी जरी थांबली तर जग अपंग बनून जाईल, महायुद्धांपेक्षाही प्रचंड नुकसान घडून येईल. अशी पावरफुल इंडस्ट्री असूनही सतत अशी नुकसानीत का? असा प्रश्‍न साहजिकच आपल्याला पडतो. कुणाचंतरी कुठेतरी काहीतरी चुकतंय हे निश्‍चित, कारण ह्या अतिशय धोकादायी दिसणार्‍या आसमंतात अमेरिकन एअरलाईन्स, डेल्टा एअरलाईन्स, लुफ्तांझा, युनायटेड कॉन्टिनेंटल, फेडेक्स, एमिरेट्स, एअर फ्रान्स, साउथ वेस्ट, चायना सदर्न तसंच आपल्या भारतात इंडिगो एअरलाईनने ‘एअरलाईन प्रॉफिटमध्ये असू शकते’ हे दाखवून दिलंय. ह्या एअरलाईन्स नेमकं काय करतात हे अभ्यासायला हवं. नुकसानीचा वणवा लागलेल्या ह्या जंगलातून सहीसलामत बाहेर येणार्‍या आणि ‘ही इंडस्ट्री चुकीची नाही’ ही उमेद जागविणार्‍या ह्या एअरलाईन्सकडे बघून एक सुभाषित आठवलं ते म्हणजे ‘मी वाचलो कारण माझ्यात लागलेली अस्तित्त्व तग धरून ठेवण्याची आग बाहेर लागलेल्या वणव्यापेक्षा जास्त तीव्र होती’. एकूणच एअरलाईन इंडस्ट्री हा आपल्या प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनत असतानाच आपल्याला मनन आणि चिंतनासाठी बरंच खाद्य देऊन जाते.

परवा एक व्हॉट्सअ‍ॅप फॉरवर्ड पाहिला ज्यामध्ये एका एअरलाईनचा पायलट अतिशय खुमासदार पद्धतीने, हास्यविनोदाचा तडका देऊन, मध्येच खट्याळ जोक्स करीत इन्स्ट्रक्शन देत होता, आणि एअर होस्टेसही हसतहसत डेमॉन्स्ट्रेशन देत होती. संपूर्ण फ्लाईटमधले प्रवासी त्या कॉमेंट्रीवर दिलखुलास हसत होते. कदाचित हा रेकॉर्डेड मेसेज असेल आणि अशातर्‍हेचे अनेक रेकॉर्डेड मेसेजेस त्यांनी करून ठेवले असतील पण मग प्रश्‍न पडला, ‘व्हाय नॉट?’ चिडीचूप किंवा अळीमिळी-गूपचिळी असा तो विमानप्रवास थोडासा रीलॅक्स्ड पद्धतीने हसत-खेळत झाला तर हवेतला ताण थोडासा कमी नाही का होणार? आता अशातर्‍हेने सूचना देण्याचं पेव फुटू शकेल. तुम्हाला आठवत असेल तर सुरुवातीला विमानातल्या सूचना कशा द्यायच्या, किती सीरियसली द्यायच्या, ह्याचे मापदंड अगदी कसोशीने पाळले जायचे, म्हणजे अमूक एका एअरलाईनने त्यावेळी सूचना न पाळल्याने त्यांची विमानं ग्राउंडेड केल्याची उदाहरणं आपण पाहिलीयेत. एकदा एका धाडसी एअरलाईनच्या एअर होस्टेसेसनी मोठ्या सणाच्या दिवशी फ्लाइटमध्ये अतिशय सुंदर ग्रुप डान्स करून प्रवाशांना कौतुकमिश्रीत आनंद दिला होता, त्यांच्यावरही कारवाई झाली होती. ‘फ्लाईंग इज अ सीरियस बिझनेस अ‍ॅन्ड नो नॉनसेन्स’ अशी ही सर्वच एअरलाईन्सनी अंगिकारलेली पद्धत. पण हळूहळू त्यात बदल होत गेले किंवा होताहेत. पहिल्यांदा एअर होस्टेसेसनी अमूक एका पद्धतीनेच द्यायच्या त्या सूचना, विमानात टी.व्ही स्क्रीन्स लावले गेले तेव्हा व्हिडीओ रेकॉर्डिंगच्या सहाय्याने एअर होस्टेसद्वारे किंवा प्रत्येक एअरलाईनने त्यांचा एक मॅस्कॉट तयार करून त्याच्याद्वारे अ‍ॅनिमेशनने द्यायचा प्रयत्न केला. आपल्याकडे त्यावेळी किंगफिशर एअरलाईनने नाविन्यपूर्ण सेवा देण्यामध्ये पुढचं पाऊल टाकलं होतं. एअर होस्टेेस न घेता बॉलीवूडच्या एका अभिनेत्रीद्वारे त्यांनी हे सूचनांचे व्हिडीओज् तयार केले होते, जे निश्‍चितपणे प्रवाशांना नेत्रसुख देणारे होते त्यावेळी त्या बोअरिंग प्रवासात. माणसाला सतत नवीन काहीतरी हवं असतं, हळूहळू विमानकंपन्यांना वेगळं काही करावसं वाटलं आणि बिझनेस टायकून रिचर्ड ब्रॅनसनच्या व्हर्जिन अटलांटिक ह्या एअरलाईनने ह्या सूचनांची एक आगळीवेगळी फिल्मच तयार केली, सुरुवातीपासून चालत आलेल्या प्रथांना फाटा देऊन. असं म्हणतात की, एअरलाईन इंडस्ट्रीमध्ये तीन मिनिटांत कोणतीही गोष्ट कॉपी केली जाते. म्हणजे एखाद्या एअरलाईनने जर एखाद्या मार्गावरचं विमानाचं भाडं कमी केलं किंवा कोणतीही ऑफर आणली तर दुसरी एअरलाईन त्यात कुरघोडी करत त्यांची ऑफर आणते आणि ती इंटरनेटवर लाँच करते तीन मिनिटांत. कॉपी कॅटच्या एवढ्या फास्ट युगात ही नाविन्यपूर्ण फिल्म कॉपी झाली नसती तरंच नवल. एकापाठोपाठ एक एअरलाईन्सनी त्यांच्या त्यांच्या कल्पना आणि संकल्पनांनी वेगवेगळ्या फिल्मस् तयार केल्या आणि हल्ली विमानातला पहिला काहीवेळ त्या सूचना बघण्यामध्ये चांगल्यातर्‍हेने व्यथित व्हायला लागला. मग प्रश्‍न पडतो की, ‘व्हाय इट वॉज सो बोअरिंग बीफोर?’ आता कदाचित इन्स्ट्रक्शन्स आणखी ह्युमरस होतील. एअर होस्टेसेस-फ्लाइट पर्सर आणखी वेगळ्यातर्‍हेने वागतील. अदरवाईज बोअरिंग वाटणारा प्रवास आणखी इंटरेस्टिंग कसा करता येईल ह्यावर तर सगळा रीसर्च सुरू आहे.

पूर्वी विमानातलं जेवण हा एक सेरेमनी असायचा. भारतीय विमानकंपन्या त्यात अग्रेसर होत्या. चांगल्यात चांगलं जेवण देण्यासाठी त्यांच्यात चढाओढ लागायची, अशावेळी कमीत-कमी किमतीत विमान तिकीट देऊनही नफ्यात चालणार्‍या अमेरिकेतील काही एअरलाईन्सकडून प्रेरणा घेऊन कॅप्टन गोपीनाथांनी ‘डेक्कन’ एअरवेजद्वारे क्रांती घडवली. ‘नो फ्रिल एअरलाईन’त्यांची एक जाहिरात मला आजही आठवते ती म्हणजे, ‘तुम्हाला आम्ही सेवेबाबत तक्रार करण्याची संधीच देत नाही कारण आम्ही ती देतच नाही’ असं जाहीररित्या सांगायला एक धाडस लागतं ते त्यांनी केलं आणि भारतात लो-कॉस्ट एअरलाईन आणण्यात आणि ते प्रवाशांच्या मनात रुजवण्यात त्यांना यश आलं. मग क्रेझ आली लो-कॉस्ट एअरलाईन्सची. ह्या एअरलाईन्समध्ये जेवण नाही हे पर्यटकांना पटवतानाही आमची दमछाक व्हायची. भारतात एअरलाईन्समध्ये पूर्वी मिळणार्‍या पाहुणचाराची अदबीने वागणार्‍या एअर होस्टेसची सवय झालेल्या पर्यटकांना अमेरिकेतल्या सहलीला गेल्यावर तिथल्या अंतर्गत विमान प्रवासात काहीच कसं देत नाहीत किंवा किती बेदरकारपणे वागतात ह्याचा त्रास व्हायचा आणि आम्हाला त्या तक्रारींना तोंड द्यावं लागायचं. अर्थात आता आपल्या सर्वांनाच ह्या ‘फुल्ल सर्व्हिस्ड’ किंवा ‘नो फ्रिल’ किंवा ‘लो-कॉस्ट’ म्हणजे एलसीसी कॅरियर्सची सवय झालीय. हवाई सुंदरी म्हणजे सुंदर, तरुण मुलगीच असली पाहिजे ह्या गोष्टीला आव्हान दिलं एअर होस्टेसेसनी, आणि पंचवीस वर्षाची वयोमर्यादा नव्वदीमध्ये पस्तीस, नंतर पंचेचाळीस, नंतर पन्नास आणि दोन हजार तीनमध्ये ती चक्क अठ्ठावन्नपर्यंत पोहोचली. एअर होस्टेसेसना ह्यासाठी लढा द्यावा लागला पण स्त्री-पुरुष समानता आली रीटायरमेंटच्याबाबतीत. खरंतर वयाची मर्यादा नसायलाच हवी होती, मर्यादा किंवा अट हवी ती वजन ह्या गोष्टीवर आणि ती स्त्री-पुरुषांना दोघांनाही लागू असली पाहिजे. अडनीड्या वेळा, जागरणं, प्रवाशांचे वेगवेगळे टॅन्ट्रम्स किंवा विचित्र तर्‍हा सहन करण्यासाठी शारिरीक चपळता-मानसिक सबलता-आत्मविश्‍वासातील सहजता आणि वागण्यातील नम्रता ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, ज्या वजन आटोक्यात असल्यावर बर्‍यापैकी साध्य करता येतात, वन ऑफ द कंट्रोल्स वुई कॅन से.

वजनावरून आठवलं, एअरलाईन्समध्ये सामानाच्या वजनाची मर्यादा आहे. तुमच्या बॅगेचं वजन मर्यादेबाहेर असेल तर एक्सेस चार्ज भरावा लागतो. विमान कंपन्यांनी आजवर जे-जे काही बदल घडवलेत त्यात इकॉनॉमी, प्रीमियम इकॉनॉमी, बिझनेस क्लास, फर्स्ट क्लास, रेसिडेन्स किंवा स्वीट इत्यादी कॅटॅगरीज केल्या आहेतच. पण आता पुढची सीट पाहिजे, विंडो सीट पाहिजे, एकत्र सीट पाहिजे ह्या सर्वांवर एक्स्ट्रॉ चार्ज लावायला सुरुवात केलीय. त्यामुळे आता माणसाच्या वजनावर ‘एक्सेस वेट’चा चार्ज लावणं तेवढं बाकी आहे आणि तो दिवस दूर नाही, सो आत्तापासूनच वजन आटोक्यात ठेवण्याची शिकस्त करूया. सर्वार्थाने फायद्याची गोष्ट.

पूर्वी प्रवासाला निघताना खासकरून विमान प्रवासाला निघताना लोकं फॉर्मल कपडे घालूनच निघायचे. ‘थ्री पीस सूट टाय’ असा सरंजाम असायचा. ते बदललं आणि आता कुणीही काहीही घालतं, बरं त्याचं घालणार्‍याला आणि बघणार्‍यालासुद्दा काही सोयरंसूतक नसतं. फॉर्मलऐवजी कम्फर्टेबलकडे मानसिकता वळली विमान प्रवासातल्या पेहेरावाची. फॅशन डीझायनर्सनी त्याचा फायदा घेऊन ‘इनफ्लाइट कम्फर्टेबल सॉफ्ट क्लोदिंग लाईन’ आणली. इनफ्लाइट लक्झरी वेअर्स सध्या स्टेट्स सिम्बॉल बनले आहेत. विमान प्रवासातला लेडी गागाचा मोस्ट फॅशनेबल ड्रेस किंवा शकीराचा अतिशय साधा ड्रेस किंवा बॉलीवूड स्टार्सचे इनफ्लाइट कपडे हा मीडियावाल्यांसाठी चर्चेचा विषय असतो सतत. कधी-कधी आपण बातम्या वाचतो की, अमूक एका एअरलाईनने प्रवाशाला अश्‍लील कपडे घातल्याबद्दल बाहेर काढलं, प्रवास करू दिला नाही. ऐकावं ते नवलंच अशी परिस्थिती, पण जमाना झपाट्याने बदलतोय हे मात्र खरं.

जगात बदल घडत राहणार, त्याप्रमाणे सतत आपल्याला बदलत राहावं लागणार हे वास्तव आहे. चेंज इज रीअली अ मोस्ट कॉन्स्टंट थिंग!

Marathi

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

*