IndiaIndia
WorldWorld
Toll free number

1800 22 7979

Business hours

10am - 6pm

बदलतं जग

9 mins. read

‘बेटर-बिगर-फास्टर-चीपर-डिफरंट-न्यू-अनकॉमन-हटके-कूल’... हे परवलीचे शब्द झालेयत. आम्ही फेसबूकवर अ‍ॅक्टिव्ह होण्याआधीच तरुणाईसाठी ते ‘ओल्ड फॅशन्ड’ झालंय. इन्स्टाग्रामवर नव्हे, तर इन्स्टावर नसणं म्हणजे ‘यू आर आऊटडेटेड’चा शिक्का आमच्या पुढच्या जनरेशनने आमच्यावर बहाल केलाय. पूर्वी परदेश प्रवास म्हटला की एक प्रकारचा उत्सव असायचा घरात. व्हिसा करणं, कपड्यालत्त्याची तयारी, शेजार्‍यापाजार्‍यांच्या, आप्त-स्वकियांच्या सूचना-सल्ले अशा साग्रसंगिताने वातावरण दुमदुमून जायचं. परदेश दौरा म्हटलं की किमान पंधरा दिवस हे गणित होतं. पण आता...

मागच्या महिन्यात ‘गो एअर’ बरोबर मीटिंग होती. ह्या एअरलाईनविषयी आमच्या मनात नेहमीच कृतज्ञतेची भावना, कारण पाच वर्षांपूर्वी जेव्हा वीणा वर्ल्ड शून्य होतं तेव्हा ह्या एअरलाईनने पुढे येऊन ‘वुई आर देअर फॉर यू’ असा जो काही मन:पूर्वक पाठिंबा दर्शविला होता तो आमच्यासाठी खूप महत्त्वाचा होता, प्रेरणादायी होता आणि त्याचं विस्मरण होण्यासारखं नाही. व्यवसाय करताना पारदर्शी व्यवहाराने जुळून आलेले नातेसंबंध दीर्घायुषी असतात, ते आपोआप जपले जातात, टिकवले जातात, तसंच काहीसं आमचं आणि

गो एअरचं नातं. गेल्या पाच वर्षांत पर्यटकांच्या पाठिंब्याने आम्हीही देशात श्रीनगर-लेहलडाखपासून ते चंदिगड-दिल्ली, अगदी अंदमानपर्यंत भरभरुन विमानं पाठवली आणि अडी-अडचणीच्यावेळी मग तो काश्मिर प्रश्‍न असो वा केरळचा पूर... गो एअरने बुकिंग दुसरीकडे वळविण्यासाठी जमेल ती मदत केली. संकटाच्यावेळी खरा कस लागतो आणि त्या प्रत्येकवेळी त्यांची साथ मिळत गेली. मनापासून थँक्यू  म्हणायला आणि जाहीररित्या ते प्रकट करायला संकोच वाटत नाही ते ह्या नातेसंबंधांमुळेच. गो एअरचे विशाल लगड आणि आदित्य देवधर आले होते आणि त्या मीटिंगचा विषय होता, गो एअरने सुरू केलेली इंटरनॅशनल फ्लाइट्स. पहिल्या फेरीत त्यांनी स्वारी केली होती ती मालदिव्ह आणि फुकेत-थायलंडला. त्यांची ही झेप स्तुत्य आहे, पर्यटनाला चालना देणारी आहे. तसं बघायला गेलं तर ही जवळची पर्यटनस्थळं किंवा देश, पण तिथे आजपर्यंत डायरेक्ट फ्लाइट्स नसल्याने व्हाया-व्हाया प्रवास करायला लागायचा. नॅचरली भारतीय पर्यटकांचं खासकरून महाराष्ट्र-गुजरात ह्या सर्वात जास्त पर्यटक असणार्‍या राज्यांमधून जाणार्‍या पर्यटकांचं प्रमाण ह्या दोन्ही ठिकाणी तुलनेनं कमी होतं, जे आता वाढेल. विशालना म्हटलं, तुम्ही योग्य वेळी योग्य ठिकाणी कूच केलंय कारण आम्हालाही फॉरिन टूर्ससाठी वीकेन्ड डेस्टिनेशन्स हवी होती. आमची मीटिंग पुढे सुरू राहीली आणि त्यातूनच फुकेत आणि मालदिव्हज्च्या वीकेन्ड स्पेशल फॉरिन टूर्स जाहीर झाल्या.

वीकेन्ड स्पेशल म्हणजे तीन ते चार दिवसांच्या छोट्या टूर्स. रोजच्या धकाधकीतून पूर्णपणे सुटका. आणि अशा टूर्सना आम्हाला शक्यतोवर डायरेक्ट फ्लाइट्स हवी असतात. कमी वेळात जास्त आनंद देणार्‍या ह्या सहलीमध्ये आत्तापर्यंत सिंगापूर, बँकॉक-पट्टाया, दुबई, हाँगकाँग-मकाव, बाली ह्या शॉर्ट अ‍ॅन्ड स्वीट फॉरिन टूर्सचा समावेश झाला होताच. आता त्यात मालदिव्हची तीन दिवसांची आणि फुकेत क्राबीची चार दिवसांची टूर दाखल झालीय. तसंच ह्या डायरेक्ट फ्लाइट्समुळे पर्यटकांना फुकेत वा मालदिव्हसाठी हवा तसा कस्टमाईज्ड हॉलिडेही वीणा वर्ल्डकडून बनवून घेता येईल. माईस म्हणजे मीटिंग्ज, इन्सेंटिव्हज्, इव्हेंट्स, कॉन्फरन्सेस अवॉर्ड फंक्शन्स इत्यादींसाठी वीणा वर्ल्डतर्फे जाणार्‍या कॉर्पोरेट टूर्सनाही ह्या डायरेक्ट फ्लाइट्सचा उपयोग होईल. ‘यू नेम इट वुई हॅव इट’ ह्या कॅटॅगरीजमध्ये फुकेत आणि मालदिव्हज्साठी ग्रुप टूर्स, कस्टमाईज्ड हॉलिडे, कॉर्पोरेट टूर्स हे सर्व प्रकार उपलब्ध झाले आहेत, तेही अफोर्डेबल किमतीत. शेवटी ‘मेकिंग द वर्ल्ड अफोर्डेबल’ हाच तर ध्यास आहे वीणा वर्ल्डचा.

आमचे स्नेही आणि हितचिंतक, आर्किटेक्ट श्री.रमेश एडवणकर आणि रत्ना एडवणकर हे मोठे पर्यटनप्रेमी. शंभर देश पूर्ण करण्याचा त्यांचाही मानस असावा. लहान असल्यापासून त्यांचा जगाचा प्रवास आम्ही बघत आलोय. पर्यटन व्यवसायात येण्याआधी त्यांच्या गप्पांतून आम्हाला जगाची ओळख झाली म्हणायला हरकत नाही. त्यांचं एक वाक्य मला आठवतं ते म्हणजे, ‘वीणा अगं परदेश प्रवासाला निघायचं, विमानाचं तिकीट, व्हिसा, बुकिंग्ज ह्या गोष्टी पार पाडायच्या, मग त्या सगळ्याला न्याय देण्यासाठी किमान पंधरा दिवस तरी फॉरिन टूर असावी असा आमचा मानस असतो’. रमेशकाका आणि त्यांच्या मित्रमंडळींनी हा ट्रेंड आजतागायत पाळलाय, हे खरोखरंच कौतुकास्पद आहे. आमच्याकडे तेवीस दिवसांची युरोपची एक सहल आहे, ‘युरोपीयन ड्रीम’ म्हणून, त्यातील एक गुजराती पर्यटक मला स्वित्झर्लंडला भेटले. पर्यटकांच्या संवादात मला नेहमीच फीडबॅक घ्यायला आवडतो. पन्नाशीचं जोडपं होतं, नेमकं नाव आठवत नाही. त्यांना विचारलं की, एवढी तेवीस दिवसांची सहल तुम्ही करताय त्यामागचं कारण काय? तर म्हणाले, ‘वीनाबेन आम्ही व्यवसाय करणारे, सारखं बाहेर पडता येत नाही. पण वर्षातले तीस दिवस बाजूला काढतो. त्यात देशातली एक छोटी सहल करतो किंवा देवदर्शनाला जातो आणि दुसरी मोठी सहल असते परदेशातली. वीस-पंचवीस दिवस तरी आमची सहल असतेच असते. आम्हाला ब्रेक मिळतो, जग बघून होतं आणि तिथे आमच्या पुढच्या पिढीला आम्ही नसताना व्यवसाय सांभाळायला मिळतो, त्यांचपण ट्रेनिंग होऊन जातं, आहे की नाही दुहेरी फायदा?’. मला वेगळा ट्रेंड समजला कारण कधीकधी आमच्या चर्चांमध्ये असाही एक मुद्दा असतो की सध्या लाँग टूर्सचा ट्रेंड आहे की शॉर्टर ड्युरेशनवाल्या टूर्सचा. बर्‍याच उहापोहनंतर, आम्ही महिनाभराची सहलपण पाहिजे आणि पाच दिवसात युरोपचे पाच देश दाखवणारी सहलही पाहिजे, ह्या निर्णयावर येऊन थांबतो. आणि हे चर्चासत्र वर्षातून दोनदातरी घडतं, आणि ह्याच पद्धतीने संपतं.

मलाही पूर्वी वाटायचं की परदेशवारी ही दहा-पंधरा दिवसांची, एकावेळी बर्‍याच देशांना भेट देणारी असावी पण गेल्या पंधरा वर्षांत एवढे बदलते कल पाहिलेत की त्यानुसार आमच्या स्ट्रॅटेजीमध्ये, सहलींमध्ये बरेच बदल करावे लागले. वर्षाला युरोपच्या पाच सहली असायच्या, त्या आता वीणा वर्ल्डमध्ये पंचाहत्तर झाल्या आहेत. कस्टमाईज्ड हॉलिडेतर्फे तर युरोपची हरतर्‍हेची शेकडो हॉलिडे पॅकेजेस् आहेत. पूर्वी युरोप एकदाच व्हायचं, आता युरोपला पर्यटक सात ते आठ वेळा जायला लागलेत. स्वित्झर्लंडला दुसर्‍यांदा जाणार्‍या पर्यटकांच्या मागणीनुसार यावर्षी आम्हाला स्वित्झर्लर्ंडचा संपूर्ण नवीन कार्यक्रम घेऊन यावा लागला. आठ-दहा देशांना भेट देणारी लंडनपासून इटलीपर्यंतची पंधरा-वीस दिवसांची सहल ही मोस्ट डिमांडमध्ये असणारी, पहिल्यांदा युरोपल्या जाणार्‍या पर्यटकांची पहिली पसंती. मग मात्र युरोपच्या अप्रतिम आणि अद्वितीय असण्यामुळे युरोपची अक्षरश: नशा चढते. कधी नॉर्दन युरोप तर कधी सर्दन युरोप, कधी मेडेटरेनियन युरोप तर कधी स्कॅन्डिनेव्हियन युरोप, कधी ईस्टर्न युरोप तर कधी सेंट्रल युरोप, कधी नुसतं इटली तर कधी फक्त क्रोएशिया, कधी स्विस पॅरिस तर कधी स्कॉटलंड आयर्लंड, कधी स्कॅन्डिनेव्हियन मिडनाइट सन तर कधी आईसलँडिक नॉर्दन लाइट्स. युरोप पर्यटनाची लिस्ट संपतच नाही. खरंतर युरोप आकाराने छोटा खंड पण जगभरातून येणार्‍या पर्यटकांचे लोंढे युरोपला टूरिझममध्ये सगळ्यात मोठा खंड बनवून टाकतात. युरोपमधले अनेक देश तर फक्त टूरिझमवर जगताहेत. ऐतिहासिक वारसा, भौगोलिक अनुकूलता, लोकपरंपरा, खाद्यसंस्कृती ह्या सगळ्याचा टूरिझमसाठी सर्वात चांगला उपयोग कुणी केला असेल तर तो युरोपने. ‘कधीही तुलना करायची नाही’ हे म्हणताना ह्या एका बाबतीत मात्र मन तुलना करतंच आणि वाईटही वाटतं, कारण युरोपमध्येच काय तर जगात जे-जे काही आहे ते सगळं आपल्या भारतात एकवटलं आहे. इथेही अगदी ‘यू नेम इट, वुई हॅव इट’. हिमाच्छादीत पर्वतरांगांपासून मैलोन मैल पसरलेल्या वाळवंटापर्यंत, शेकडो मैल पसरलेल्या समुद्रकिनार्‍यांपासून ते सह्याद्री-निलगिरीच्या दर्‍याखोर्‍यांपर्यंत, पाच हजार वर्षांच्या ऐतिहासिक वारशापासून असंख्य लोककला, परंपरा आणि संस्कृतीने सजलेल्या आपल्या देशात आत्तापर्यंत पर्यटनाचा विकास का होऊ शकला नाही ह्याची जखम मनाच्या कोपर्‍यात सततच भळभळत राहते. अर्थात, सध्या सरकार सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसतंय. आपण आशावादी राहून आपला भारत लवकरात लवकर युरोपसारखे पर्यटक आपल्याकडेही खेचू शकेल ह्यासाठी प्रार्थना करणं जास्त चांगलं.

काही वर्षांपूर्वी डोंबिवलीच्या एका डॉक्टरांनी सतरा दिवसांच्या युरोप टूरमधून फक्त चार दिवसांची आणि तीन रात्रींंची स्वित्झर्लंडची पार्ट टूर घेतली होती, तेव्हा मला कसलं आश्‍चर्य वाटलं होतं. मी डॉक्टरांना म्हटलं की, तुम्ही आठ तासांचा प्रवास करणार, व्हिसासाठी एवढा वेळ देणार मग निदान आठ दिवस तरी जा तर म्हणाले, ‘अगं, आम्हाला हॉस्पिटल एवढे दिवस बंद ठेवणं अशक्य आहे, पण असं करूनच इतक्या वर्षात कुठेही जाऊ शकलेलो नाही. हॉस्पिटलही महत्त्वाचं आहे कारण लोकांच्या आयुष्याचा प्रश्‍न आहे. इमर्जन्सी कधीही येते तेव्हा आपण इथे असणं गरजेचं आहे. आता चार दिवस बाहेर जाऊन आम्ही अ‍ॅक्च्युअली सुरुवात करतोय आम्हाला आणि हॉस्पिटललाही, डीटॅचमेंटची’. त्यावेळी मला जाणवलं, की फॉरिन टूर करण्यापूर्वी बर्‍यापैकी सोपस्कार करावे लागतात त्यामुळे फक्त तीन-चार दिवस जाणं हे तसं न्याय्य नाही पण ती गरज आहे किंवा गरज बनतेय. दिवसाचे चोवीस तास, महिन्याचे तीस दिवस, वर्षाला बारा महिने हे पूर्वीही होते आणि आत्ताही आहेत, पण जग जवळ आलंय आणि वेगाने बदलायलाही लागलंय. जागतिक स्पर्धा आजूबाजूला घोंघावतेय अशावेळी वर्षाचं काम महिन्यात, महिन्याचं काम दिवसात आणि दिवसाचं काम तासात पूर्ण करायची वेळ आलीय. आयुष्याचं चक्र इतकं गतिमान झालंय की गरगरायला लागलंय. ह्या गरगरण्यावरचा एक उतारा म्हणजे पर्यटन. पण ते करायला पूर्वी होता तसा वेळ आता तरुणाईतल्या कुणाकडेच नाहीये आणि त्यांच्यासाठी एक दिवसापासून चार दिवसांपर्यंतच्या देश-विदेशातल्या सहली आयोजित करणं हे आमचं एक पर्यटनसंस्था म्हणून कर्तव्य आहे.

काळाप्रमाणे आणि कलाप्रमाणे बदलत राहणं हे प्रत्येक व्यवसायाला आणि व्यावसायिकाला अपरिहार्य आहे. जो बदलला नाही तो लयाला गेल्याची अनेक छोटी-मोठी उदाहरणं आपल्याला आपल्या सभोवताली आणि देश-विदेशात बघायला मिळताहेत. त्यापासून आपण प्रत्येकाने शिकायला हवं. ‘थांबला तो संपला’ हे कधीही नव्हे इतकं सत्य आहे आणि झपाट्याने तसं घडतंय. आमच्या पर्यटन व्यवसायातल्या बदलत्या ट्रेंडप्रमाणे आम्ही आमच्यात सतत बदल घडवत असतो. बदल अपरिहार्य आहे पण तो स्वागतार्ह्यही आहे. सतत बदल, सततचं नाविन्य आपल्याला जिवंत ठेवतं आणि आनंदही देतं. आम्ही स्वतःच्या आणि संस्थेच्या रोमारोमात बदलाची मानसिकता निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय आणि मला वाटतं, वीणा वर्ल्डच्या प्रवासातला तो एक महत्त्वाचा टप्पा आहे. ‘चेंज नथिंग अ‍ॅन्ड नथिंग चेेंजेस’हे सत्य आहे, हा कम्फर्ट झोन सोडून देऊन काहीही चेंज करणं-कोणताही बदल करणं कितीही अवघड असलं तरी ते सातत्याने करण्याचा सराव व स्वभाव बनवणं अशक्य नाही. लेट्स लूक फॉरवर्ड टू द चेंज एव्हरी डे अ‍ॅन्ड ऑलवेज्!

October 28, 2018

Author

Veena Patil
Veena Patil

‘Exchange a coin and you make no difference but exchange a thought and you can change the world.’ Hi! I’m Veena Patil... Fortunate enough to have answered my calling some 40+ years ago and content enough to be in this business of delivering happiness almost all my life. Tourism indeed moulds you into a minimalist... Memories are probably our only possession. And memories are all about sharing experiences, ideas and thoughts. Life is simple, but it becomes easy when we share. Places and people are two things that interest me the most. While places have taken care of themselves, here are my articles through which I can share some interesting stories I live and love on a daily basis with all you wonderful people out there. I hope you enjoy the journey... Let’s go, celebrate life!

More Blogs by Veena Patil

Post your Comment

Please let us know your thoughts on this story by leaving a comment.

Looking for something?

Embark on an incredible journey with Veena World as we discover and share our extraordinary experiences.

Balloon
Arrow
Arrow

Request Call Back

Tell us a little about yourself and we will get back to you

+91

Our Offices

Coming Soon

Located across the country, ready to assist in planning & booking your perfect vacation.

Locate nearest Veena World

Listen to our Travel Stories

Veena World tour reviews

What are you waiting for? Chalo Bag Bharo Nikal Pado!

Scroll to Top