Marathi

पार्टी बीफोर पार्टी

Reading Time: 5 minutes

ज्ञान विज्ञान तंत्रज्ञान तसंच पायाभूत सुखसुविधांमुळे येणारा भविष्यकाळ सुंदर असणार आहे. अर्थात त्या काळाची वेगळी आव्हानं असणार आहेत. जगाच्या वेगाशी स्पर्धा करताना संस्कृतीशी असलेली नाळ तुटणार नाही आणि नीतीमूल्यांची पायमल्ली होणार नाही ह्याची खबरदारी आपल्याला घ्यायचीय. त्यासाठी आपलं तसंच सभोवतालचं शारिरिक आणि मानसिक आरोग्य ठणठणीत राहण्यासाठी दक्ष राहणं गरजेचं आहे.

हॅप्पी न्यू इयर! नवीन वर्षातली आपली ही पहिलीच भेट असल्याने आपल्याला मनापासून शुभेच्छा देते. आपणा सर्वांना हे वर्ष शारिरिक-मानसिक खंबीरतेचं जावो! कोणत्याही वर्षीचा डिसेंबर सुरू झाला की, ‘थर्टी फर्स्टला काय प्लॅन्स आहेत?’ ही विचारणा होते. पर्यटनात असल्यामुळे आम्हीही, ‘कुठे आहात न्यू इयर सेलिब्रेशनसाठी?’चा घोषा आपल्यापाठी लावतो. प्रत्येक जण आवडीप्रमाणे न्यू इयरचं सेलिब्रेशन करीत असतो. ‘आमच्या सर्वांच्या मागे लागता पण तुम्ही कुठे करता नवीन वर्षाचं स्वागत? कोणत्या देशात?’ हा प्रश्‍न विचारला जातोच. आपल्या देशात, स्वत:च्या घरात पहाटे उठून नवीन वर्षाचं स्वागत करावं ही माझी मनोमन इच्छा, जी नेहमीच साध्य होते असं नाही पण आवड मात्र ती आहे.

एकतीस डिसेंबर म्हणजे कुणाच्यातरी घरी, रेस्टॉरंट किंवा क्लब्ज-पब्जमध्ये, एखाद्या इव्हेंटमध्ये पार्टीत सहभागी व्हायचं ही सर्वसाधारण पद्धत. पण सध्या खासकरून यंगस्टर्समध्ये ‘पार्टी आफ्टर पार्टी’चं फॅड आहे. निमित्त शोधत असतात ह्या सध्याच्या ‘इन’ गोष्टीसाठी. आणि वर्षाची अखेर म्हणजे ह्या ‘पार्टी आफ्टर पार्टी’ साठीची सर्वात मोठी संधी. आमच्याही घरात सगळे यंगस्टर्स ‘तू कुठे? मी कुठे? आपण कुठे’ ह्याची खलबतं करीतच असतात. आपल्याला सुगावा लागतोच असं नाही, दुसर्‍या दिवशी लंच टेबलवर कळतं किती पार्टीज अटेंड केल्या ते. आम्हीही गेली पाच वर्षं एकतीस डिसेंबरला एक पार्टी करतो, अर्थात ही पार्टी आफ्टर पार्टी नसते तर ही असते पार्टी बीफोर पार्टी.

आम्ही सहाजणं म्हणजे वीणा, सुधीर, नील, राज, सारा, सुनिला एकतीसच्या सकाळी दहा वाजता भेटतो, एक मीटिंग रूम बूक करतो कारण ही मीटिंग घरात किंवा ऑफिसच्या मीटिंगरूममध्ये नाही करायची हे सगळ्यांनी जेव्हा पहिली मीटिंग झाली तेव्हाच ठरवलेलं. ह्या मीटिंगचा अजेंडा असतो, ‘लेट्स कम ऑन द सेम पेज’. वर्षभरात खूप काही घडामोडी झालेल्या असतात, वैयक्तिक आणि व्यवसायिक आयुष्यात बदल घडलेले असतात. कधी सुसंवाद विसंवादात गेलेला असतो किंवा तो असं का बोलला? तिच्या म्हणण्याचा नेमका अर्थ काय? ह्यातून गैरसमजूतीचं जाळं निर्माण व्हायची सुरुवात झालेली असते. मला एखादी गोष्ट बरोबर वाटते पण दुसर्‍यांना ती बरोबर वाटते का? हे आपण खुलेपणाने एकमेकांशी बोललेलो नसतो. एखादी गोष्ट मनात खात असते पण सर्वांसमोर बोलली गेलेली नसते असं सगळं काही त्या दिवशी प्रत्येकाने मनातून बाहेर काढायचं. घरातली कपाटं साफ करतो, हव्या असलेल्या गोष्टी व्यवस्थित रचून ठेवतो, नको असलेल्या बाहेर काढतो तसंच काहीसं हे. मनात साचलेलं- खास करून नको असलेलं काढून टाकलं तरच नवीन गोष्टींची रूजवात तिथे होईल ह्या विचारातूनच ह्या मीटिंगला सुरुवात झाली आणि आता पाच वर्षांपर्यंत सर्वांना ती मीटिंग असावीच असं वाटतेय ह्यातच त्याच्या यशस्वितेचं सार आहे.

आम्ही चार तासंच भेटतो, जास्त ताणण्यातही अर्थ नसतो विषय न संपणारे असले तरी. कारण त्यानंतर सर्वांनाच वेध लागतात संध्याकाळच्या पार्टीचे. फक्त त्या चार तासातला वेळ व्यवस्थित वापरूया ह्यावर कटाक्ष असतो सुधीरचा. यंग जनरेशनमध्ये आमच्यातलं मुलांचं आवडतं व्यक्तिमत्त्व म्हणजे सुनिला, तिच्याच हातात ह्या मीटिंगची सूत्रं असतात. पहिल्यांदा एक व्यक्ती म्हणून पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफमध्ये माझं काय चाललंय? मला येत्या वर्षात काय करायचंय? गेल्या वर्षात माझ्याकडून काय चुका झाल्या? मी त्यात काय सुधारणा करणार आहे?… ह्याविषयी प्रत्येकजण बोलतो. हा मीटिंगचा पहिला भाग. दुसर्‍या भागात एका व्यक्तिविषयी दुसर्‍यांनी बोलायचं. काय चांगलं? काय वाईट? काय सुधारणा करायला पाहिजेत असं त्यांना वाटतं हे खुले आम सांगायचं. ह्यावेळी प्रत्येकाने आपला इगो बाजूला ठेवायचा, आणि तोही मनापासून. असा फीडबॅक मिळणं हे खरंतर भाग्य असतं, त्यावेळी खुल्या दिलाने कोणताही पुर्वग्रह न धरता ते ऐकणं, त्यावर विचार करणं, त्यातलं महत्त्वाचं जे आहे ते अंगिकारणं आणि समोरच्याला ते लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद देणं. मी कशी चुकते किंवा माझं काय चुकतं हे आपली माणसं जेव्हा कोणत्याही वेस्टेड इंटरेस्टशिवाय आणि आपल्यात चांगली सुधारणा व्हावी म्हणून सांगतात ते अ‍ॅक्च्युअली एखादा खजिना मिळाल्यासारखं. बाहेरची माणसं एवढ्या उघडपणे हा फीडबॅक आपल्याला देणार नाहीत. पहिले दोन भाग व्यक्तिगत आयुष्यावर जास्त भर देतात तर तिसरा भाग असतो तो पूर्णपणे व्यवसायाचा. अजूनही आम्ही मोठे चौघं संबंधित आहोत एकाच व्यवसायाशी-वीणा वर्ल्डशी. त्यामुळे मीटिंगच्या ह्या भागात त्याविषयीची चर्चा आणि संवाद केला जातो. भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळावर झोत टाकला जातो. आपण काय करतोय आणि आपल्याला काय करायला पाहिजे ह्याविषयी प्रत्येकजण मत मांडतो. प्रामाणिकपणा, सुसंस्कृतपणा, नीतीमूल्यांची जपणूक, पारदर्शकता ह्या बाबतीत आपली कुठे डीरेलमेंट तर झाली नाही नं हे तपासतो. वेगळं काही आणणार असू, करणार असू तर त्याचीही नोंद करतो. चौथ्या भागात आत्तापर्यंत चर्चा केलेलं सगळं समोर ठेवून त्याची उजळणी करतो, त्यावर शिक्कामोर्तब करतो आणि वळतो मीटिंगच्या पाचव्या व अखेरच्या आनंदी भागाकडे. फॅमिली मीटिंगमध्ये ठरतो आमचा फॅमिली हॉलिडे. वीणा वर्ल्ड झाल्यानंतर तिसर्‍या वर्षापासून आम्हीही फॅमिली हॉलिडे घ्यायला सुरुवात केली. त्याची निश्‍चिती होते ह्या मीटिंगमध्ये त्यामुळे एव्हरीबडी लूक्स फॉरवर्ड टू धिस पार्ट ऑफ द मीटिंग. सो अशा तर्‍हेने आम्ही ह्यावर्षीची मीटिंग छान तर्‍हेने पार पाडली आणि आता सज्ज आहोत, एका पेजवर, एका डीरेक्शनमध्ये, भविष्यातल्या आव्हानांचा सामना करण्यासाठी.

आपल्या भारतात आणि जगातही सर्वत्र छोट्या-मोठ्या फॅमिली बिझनेसेसचं प्रचंड मोठं जाळं आहे. जगाची अर्थव्यवस्था बर्‍यापैकी त्यावर अवलंबून आहे. काही फॅमिली बिझनेसेस पिढ्यान पिढ्या प्रगतीपथावर असतात, सुपर डुपर यशस्वी होतात तर काही अपयशाच्या गर्तेत खेचले जातात. जगभरातले मॅनेजमेंट गुरू जेव्हा ह्या फॅमिली बिझनेसेसच्या अपयशाचा अभ्यास करतात तेव्हा त्यातून समोर येतात त्या कारणामध्ये असणारी महत्वाची कारणं म्हणजे ‘हम करे सो कायदा’ अ‍ॅटिट्यूड, सिस्टिम्स व प्रासेसेसच्या साह्याने न केलं गेलेलं इन्स्टिट्युशनलायझेशन, खुल्या वातावरणाअभावी वाढणारी इर्षा, स्पर्धा, मत्सर आणि स्पिरिच्युअल बेसच्या अभावाने वाढणारा हव्यास. खरंतर कुटुंब ही मोठी शक्ती आहे जर त्या शक्तीला आपल्याला व्यवस्थित चॅनलाइज करता आलं तर. नशीबाने आम्हीही फॅमिली बिझनेसमध्ये आहोत. एकमेकांच्या कौशल्याचा योग्य वापर करणं आणि त्याद्वारे बिझनेस वाढवणं तसंच ‘आपल्या कुटुंबालाच सर्व कळतं’ ह्या भ्रमात न राहता ‘आपल्याला अनेक गोष्टी कळत नाहीत’ हे मर्म जाणून त्यातील एक्सपर्टस्ना शिरकाव करू देऊन त्यांच्याद्वारे येणार्‍या वेगवान जगाच्या जीवघेण्या स्पर्धेचं आव्हान पेलण्यासाठी सज्ज व्हायचं ह्यात शहाणपणा आहे आणि ते अंगिकारलं पाहिजे.

गेल्या पाच वर्षांतून चार वेळा आम्ही ही मीटिंग घेतली, एकदा चुकली. पण ह्यावेळी ठरवलं की काहीही झालं तरी ही मीटिंग करायचीच. ही मीटिंग आमचं ब्रेनचाइल्ड नाही बरं का. वीणा वर्ल्ड नुकतच सुरू झालं होतं, आम्ही माहीमच्या टेंपररी कार्यालयात होतो. वीणा वर्ल्ड का झालं त्याची चर्चा सर्वत्र होती. आमचे एक सप्लायर त्यावेळी भेटायला आले होते जर्मनीहून. त्यांचा कुकू क्लॉक्स तसेच हॉटेल्स आणि रेस्टॉरंटचा मोठा व्यवसाय. चर्चा सुरू असताना म्हणाले, ‘इट्स एव्हरीव्हेअर. आम्हीपण तीन भाऊ, तिघं व्यवसायातली वेगवेगळी कामं बघतो. त्यात वाद विवाद होतात. पण त्याचवेळी हेही महत्वाचं असतं की एवढा मोठा बिझनेस चालवायला जरी सगळीकडे माणसं असली तरी आपल्या तिघांचीही गरज आहे. आम्ही काय करतो, वर्षाच्या शेवटी एका माऊंटनवर जातो, तीन दिवस राहतो, सकाळी स्किइंग करतो, तन-मन फ्रेश झालं की रोज दुपारी मीटिंग करतो. पहिल्या दिवशी एकमेकांवर जे काही शाब्दिक शरसंधान करायचं असेल ते करतो. दुसर्‍या दिवशी ज्या गोष्टी सुधारायला हव्यात त्याच्या सोल्युशनवर चर्चा करतो आणि तिसर्‍या दिवशी जे काही करायचंय त्यावर शिक्कामोर्तब करून एकमेकांविषयी कोणतेही ग्रजेस न ठेवता खुल्या दिलाने, स्वच्छ मनाने घरी परत जातो. अनेक वर्ष आम्ही हे करतो आणि म्हणूनच आज आम्ही असे एकत्र तुमच्याकडे दिसतोय. त्यांना तिथेच धन्यवाद दिले वैयक्तिक गोष्ट आम्हाला सांगितल्याबद्दल आणि प्रॉमिसही केलं की आम्हीही हे अमलात आणू. जे चांगलं आहे ते आत्मसात करायचं ही संस्कृती बनतेय वीणा वर्ल्डची, त्याचाच परीपाक ही एकतीस डिसेंबरची मीटिंग. फॅमिलीने चालविलेला बिझनेस आधी फॅमिली नीट असेल तर व्यवस्थित चालू शकेल आणि ती तशी राहण्यासाठी मन:पूर्वक प्रयत्न करीत राहिलं पाहिजे. त्याच दिवशी संध्याकाळी आमच्या ऑफिसमध्ये आलो आणि सर्वांना येणार्‍या नववर्षाच्या शुभेच्छा देताना हेच सांगितलं की आपल्या घरातही आपल्याला असा इनिशिएटिव्ह घेऊन समज-गैरसमजाच्या ज्या भिंती निर्माण व्हायला लागतात त्या मिटवता आल्या पाहिजेत. आनंदाची, शांततेची, संयमाची पेरणी करणार्‍या ह्या मीटिंगला मी पार्टी म्हणते ते एवढ्याचसाठी.

भविष्यकाळाला झेलण्यासाठी स्थिर मन आणि शांत चित्त खूप गरजेचं ठरणार आहे आणि ते बाहेरची माणसं येऊन करू शकणार नाहीत. ते आपल्याला स्वत:लाच करावं लागणार आहे, त्यासाठी प्रयत्न करीत राहूया. यश मिळणारच. वन्स अगेन हॅप्पी, हेल्दी अ‍ॅन्ड प्रॉस्परस न्यू इयर!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*