पाऊल पडे पूर्वेकडे

0 comments
Reading Time: 8 minutes

‘टू बी ऑर नॉट टू बी?’ हा खेळ जसा आपल्या मनात सतत सुरू असतो तसाच तो प्रत्येक ऑर्गनायझेशनमध्येही असतो. लोकांपर्यंत पोहोचायचं कसं? हा प्रत्येक उद्योजकाचा किंवा उद्योगधंद्यापुढचा जटील प्रश्‍न. वीणा वर्ल्डने ऑनलाईन बुकिंग सुरू केल्यावर आता आपल्याला अनेक ठिकाणी ऑफिसेस काढावी लागणार नाहीत हा विचार करून आम्ही असलेल्या दहा सेल्स ऑफिसेस व दीडशे प्रीफर्ड सेल्स पार्टनर्स ऑफिसेसवर शांत राहिलो. ऑनलाईन बुकिंगने जगभरात स्थायिक झालेल्या आपल्या भारतीयांची सोय झाली असली तरी भारतातला पर्यटक खासकरून ग्रुप टूर्सद्वारे देशविदेशात फिरणारा पर्यटक वीणा वर्ल्डच्या ऑफिसमध्ये येऊन चर्चा करून, कधी तुलनाही करून बुकिंग करीत असतो. भारतातला पर्यटक अजूनही ऑनलाईन बुकिंग करीत नाही म्हणजे त्याचं प्रमाण हे पाच टक्क्यांपेक्षाही कमी आहे. आपलं स्टॅटिस्टिक्स जर हे सांगत असेल तर आपण छोटी छोटी सेल्स ऑफिसेस काढायची का? पर्यटकांच्या जवळ जायचं का? ह्यावर चर्चासत्र सुरू झाली. थोडक्यात ‘टू बी ऑर नॉट टू बी’चा खेळ सुरू झाला. डावे-उजवे गट पडले. प्रत्येकाचंच म्हणणं बरोबर असतं अगदी नाण्याला दोन बाजू असतात तसं. शेवटी आपण मुंबईत सात-आठ ऑफिसेस काढून बघूया असा विचार करून आम्ही कामाला लागलो. पर्यटकांच्या जवळ जायचा निर्णय कदाचित देवालाही भावला असावा कारण या आठ-नऊ ऑफिसेसच्या जागा इतक्या मोक्याच्या ठिकाणी मिळाल्या की आम्हीही आश्‍चर्यात पडलो. ह्या ऑफिसेसना आता सहा एक महिने झाले असतील आणि पर्यटकांच्या बुकिंगच्या संख्येने दाखवून दिलं की त्या-त्या एरियामध्ये राहणार्‍या पर्यटकांना त्यांच्याजवळ वीणा वर्ल्ड हवं होतं. आता पुढच्या फेजमध्ये आम्ही मुंबईत आणखी काही ठिकाणी सेल्स ऑफिसेस काढून तेथील पर्यटकांच्या आणखी जवळ जाऊ. मुंबई-पुणे महाराष्ट्रात तसं बघायला गेलं तर ऑफिसेस आणि प्रीफर्ड सेल्स पार्टनर्सचं जाळं आता बर्‍यापैकी आहे. ब्रांचेस आणि पीएसपी मिळून एकूण 180 ऑफिसेसद्वारे आम्ही पर्यटकांपर्यंत पोहोचलोय.

महाराष्ट्राबाहेर आपली ऑफिसेस असावीत की नाही? दिल्लीपासून चेन्नईपर्यंत आणि गुजरातपासून नॉर्थ ईस्टपर्यंतचे पर्यटक वीणा वर्ल्डच्या ग्रुप टूर्समध्ये वाढीस लागले होते. त्यांच्या व्हिसा प्रोसेससाठी प्रत्येक राज्याच्या मुख्य शहरात वीणा वर्ल्डचं किमान एक ऑफिस असावं ही गरज दिसू लागली. त्यातच आमचा कॉर्पोरेट टूर्स डिव्हिजनचा बिझनेस मोठा व्हायला लागला होता. मोठमोठ्या कॉर्पोरेट कंपन्या त्यांच्या टूर्ससाठी वीणा वर्ल्डला प्राधान्य द्यायला लागल्या होत्या. डीलर्स ग्रुप्स, इन्सेंटिव्ह टूर्स, टीम बिल्डिंग ट्रेनिंग अ‍ॅक्टिव्हिटीज्, अ‍ॅवॉर्ड फंक्शन्सच्या देशविदेशातल्या टूर्स वाढल्या होत्या आणि त्यांचे पर्यटक भारताच्या कानाकोपर्‍यातून येत होते. त्यांना त्या-त्या ठिकाणी सर्व्हिस देण्यासाठी त्या राज्याच्या मुख्य शहरात वीणा वर्ल्डचं ऑफिस हवं होतं. तशी आमच्या माईस टीमची मागणी होती. वुमन्स स्पेशल किंवा सीनियर्स स्पेशलच्या काही सहलींवर जाऊन तेथील पर्यटकांना जेव्हा मी भेटते तेव्हा बाहेरच्या राज्यातून आलेले पर्यटक हीच मागणी करायचे की ‘आमच्या शहरात तुमचं ऑफिस असायलाच हवं. आम्हाला नाही म्हटलं तरी बुकिंग करताना बरचसं फोनवर आणि ईमेलवरच अवलंबून रहावं लागतं’. म्हणजे आता इतर राज्यातल्या पर्यटकांची गरज आणि वीणा वर्ल्डचा व्यवसाय विस्तार ह्याची सांगड घालावी लागणार होती. बाहेरच्या कोणकोणत्या राज्यांतून पर्यटक आपल्याकडे येतात ह्याचा म्हणजे स्टॅटिस्टिक्सचा परामर्श घेऊन पहिल्या फेजमध्ये आम्ही कोलकाता, कर्नाटक, गुजरात, तामिळनाडू, तेलंगणा, राजस्थान आणि मध्यप्रदेश ह्या राज्यांची निवड केली. त्यातल्या पहिल्या कार्यालयाचा शुभारंभ आम्ही गेल्या आठवड्यात कोलकाताला केला. कर्नाटकमधील दुसर्‍या कार्यालयाचा शुभारंभ पुढच्या महिन्यात करतोय. एकंदरीत वीणा वर्ल्डचं महाराष्ट्राबाहेरचं पहिलं पाऊल हे पूर्वेकडे पडलंय.

कोलकाताला मी आणि सुधीर बर्‍याच वर्षांनी गेलो. आम्हाला आत्ता दिसलं ते कोलकाता पूर्वीच्या कलकत्त्यापेक्षा खूपच बदललेलं होतं. मोठे रस्ते आणि स्वच्छता बघून आम्ही आश्‍चर्यात पडलो. दोनच दिवस होतो आणि ऑफिशियल ड्युटीवर त्यामुळे स्थलदर्शन आणि हँगआऊटला वेळ नव्हता पण ही कोलकाताची शॉर्ट ट्रीप निश्‍चितच सुखावून गेली. मुंबईहून निघालो तेव्हा मनावर थोडं दडपण होतं. जरी कितीही विचार करून निर्णय घेतलेला असला तरी जोपर्यंत रीझल्ट मिळणार नाही तोपर्यंत बॅक ऑफ द माईंड थोडं ओझं राहणारच आहे. दुसरी गोष्ट होती ती म्हणजे कोलकातामधील आमचे पर्यटक, आमची दोन-तीन मित्रमंडळी आणि वीणा वर्ल्ड ब्रँडला ओळखणारा एअरलाईन व ट्रॅव्हल कंपन्यांमधला गोतावळा सोडला तर आम्हाला कोलकाता पूर्ण नवीन होतं. ‘इथे लोकं आपल्याला स्विकारतील का?’ हा प्रश्‍न कुणी एकमेकांना बोलून दाखवित नसलं तरी तो होता आणि आहेच. अर्थात विश्‍वासही आहे की वीणा वर्ल्ड टीम आपल्या कार्यपद्धतीच्या जोरावर महाराष्ट्राप्रमाणेच कोलकाता वेस्ट बंगालमध्येही आपला ठसा उमटवेल आणि भक्कम पाय रोवील.

दुपारी कोलकाता एअरपोर्टला उतरल्यावर आधी वीणा वर्ल्डच्या नव्या कोर्‍या ऑफिसला गेलो. ते बघण्याची उत्सुकता होती कारण सध्या पुढची पिढी जास्त वेगाने काम करायला लागलीय. नील, शिल्पा, अ‍ॅनी, भावना, प्रणोती ह्यांनीच जाऊन ऑफिसचं सिलेक्शन आणि इंटिरियरची जबाबदारी पार पाडली होती. एरिया कसा आहे? ऑफिसला फ्रंटेज व्यवस्थित आहे का? इंटिरियर बरोबर झालं असेल का?पूर्वी ही सगळी कामं मी हिरिरीने केल्यामुळे ते सगळं बघायची एक अ‍ॅन्झायटी होती. ली रोडवर हे ऑफिस आहे. थोर व्यक्तीमत्त्व श्री सत्यजीत रे ह्यांच्या घराच्या अगदी जवळ. हे ऐकल्यावर तर मला आशीर्वाद मिळाल्यासारखंच वाटलं. जसा ली रोड आला तसं आम्ही शोधू लागलो कुठे आपलं ऑफिस दिसतं ते. आणि टू अवर सरप्राईज लांबूनच वीणा वर्ल्डच्या पिवळ्या काळ्या मोठ्या बोर्डने लक्ष वेधलं. लोकेशन एक नंबर होतं. फ्रंटेज तर त्याहूनही छान. एवढं मोठं फ्रंटेज आमच्या इतर कोणत्याही ऑफिसला नाही. ब्राईट लाइट, फुल्ली ओपन ट्रान्सपरंट. संदीप व अल्पा शिक्रे अ‍ॅन्ड असोसिएट्सनी ते इतकं छान बनवलं होतं की आम्ही बघतच राहिलो. आणखी महत्त्वाची गोष्ट की हे ऑफिस फक्त चोवीस दिवसांत तयार झालं होतं. विश्‍वास बसत नाही नं, पण हे खरं आहे आणि त्याला कारण आमच्या टीमला आणि शिक्रे असोसिएट्सना आता पक्कं माहीत झालंय नेमकं काय हवंय ते. फंडाज आर क्लीअर त्यामुळे वेळेची बचत होते. क्लॅरिटी ऑफ थॉट्स इज द की. प्रोजेक्ट व मार्केटिंग टीमने काम परफेक्ट केलं होतं. टर्न अराऊंड टाईम फक्त एक महिन्याचा घेतल्याने कोलकाताला बिझनेस लागलीच सुरूही झाला. मुख्य प्रश्‍न होता तो मॅनपावरचा. तिथली चांगली मॅनपावर मिळणं महत्त्वाचं होतं आणि आमची डायरेक्टर सुनिला पाटीलने तिची चांगली मैत्रीण कम आमची बिझनेस असोसिएट रेणूका नातूच्या मदतीने अमित चट्टोपाध्याय नावाची व्यक्ती वीणा वर्ल्ड टीममध्ये सहभागी केली, आणि मग एच आर आणि अमितने चांगली टीम जुळवून आणली. सेल्स कंट्रोल टीम व दिपक जाधवने ट्रेनिंगची जबाबदारी घेतली. एकूणच कोलकाता की गाडी चल पडी. गेस्टेशन पीरियेड संपल्यावर हे पूर्वेकडचं पाऊल खूप चांगल्या तर्‍हेने दमदार पडेल ह्याची खात्री आहे आणि विश्‍वासही.

कोणताही शो-शा न करता आम्ही साध्या पद्धतीने नेहमीप्रमाणे या कोलकाता ऑफिसचं उद्घाटन केलं आणि येणार्‍या पर्यटकांना आणि असोसिएट्सना भेटत होतो. त्यांच्याकडून बरीच माहीती मिळत होती. इथले पर्यटक, लोकांच्या आवडीनिवडी, लोकं नॉर्मली पर्यटन कसं आणि कधी करतात, आम्हाला जाहिरात द्यायची असली तर ती कुठे द्यावी यासंबंधी बरीच इनसाइट मिळाली. विजय अशरा नावाची एक तरूण उच्च मध्यम वर्गीय व्यक्ती संध्याकाळी आपल्या सहचारिणीबरोबर आली आणि ‘मला तुमच्याबरोबर पूर्वीपासून यायचं होतं, मागे रीस्पॉन्स मिळाला नाही पण ह्यावेळी जरूर येईन’ असं म्हणत ‘ऑल द बेस्ट’देऊन निघून गेली. अर्ध्या तासाने पुन्हा येऊन म्हणाली, ‘तुमचा ब्रँड इथे वाढायला हवा त्यासाठी तुम्ही इथल्या अनेक कम्युनिटीज्शी संपर्क करा. त्यांची काही मॅगझीन्स असतात त्यात अधून मधून अ‍ॅडर्व्हटाईज करा’असा सल्ला देऊन गेली. कोणतीही ओळखपाळख नसताना दोन वेळा ऑफिसला यायचे कष्ट घेणारी आणि आपलेपणाने मदतीचा हात पुढे करणारी ही व्यक्ती आम्हाला खूप मोठा दिलासा देऊन गेली. ‘ऑफिसमध्ये थोडे आर्टेफॅक्ट्स आणू’ ह्या अमोलच्या सुचनेने आम्ही बाहेर पडलो. आमच्यासोबत एचआरच्या दर्शना आणि मिथिला होत्या. बाहेरच्या राज्यातलं ऑफिस त्या सेट करीत असल्याने त्यांचा उत्साह मी म्हणत होता. होमटाऊनमध्ये आम्ही खरेदी करीत होतो तेवढ्यात राखी मोंडल नावाच्या एक बाई जवळ आल्या आणि म्हणाल्या, ‘आपने वीणा वर्ल्ड का ऑफिस यहॉ शुरू किया है ना, आज ही हमने अ‍ॅडर्व्हटाईज देखी आपकी, हमें भी आना है, कॉन्टॅक्ट करेंगे आपको’. वीणा वर्ल्डचे टी-शर्ट बघून त्यांनी आमच्याशी संवाद साधला. त्यांच्यासाठी ती छोटीशी गोष्ट होती पण आम्ही तिथे खूशीने नाचायचेच बाकी होतो. या नव्या शहरात कुणीतरी आपल्या ब्रँडला ओळखणारं आहे ह्याचा तो आनंद अक्षरश: अवर्णनीय आहे. विजय आणि राखी ह्या दोन्ही व्यक्ती आमच्या कायम स्मरणात राहतील. संपूर्णपणे अनोळखी असलेल्या ह्या दोघांनी आमची उमेद वाढवली.

गेली वीस वर्ष ह्या लेखाद्वारे तुमचा आमचा संवाद सुरू आहे. जेव्हा वीणा वर्ल्ड सुरू झालं तेव्हा तुम्ही भरभरून शुभाशीर्वादासह पाठीशी उभे राहिलात. त्याच पाठिंब्याच्या जोरावर आता राज्याबाहेर पाऊल टाकलंय. तुमचे शुभाशीर्वाद हक्काने मागून घेतेय. बाकी आमचं काम आम्ही मन:पूर्वक करीत राहू आणि आपली प्रत्येक सहल आनंददायी करण्यासाठी कटिबद्ध आहोत, वचनबद्ध आहोत, काळजी नसावी. हॅव अ वंडरफूल संडे!

Marathi

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

*