पन्नास देश आणि पंचवीस लाख

0 comments
Reading Time: 7 minutes

पर्यटन हे आता थांबणार नाहीये पण त्याच पर्यटनाला जर चॅनलाईज केलं तर प्रत्येकाच्या भटकंतीला एक शिस्त येईल. कमी पैशात जग बघता येईल. कोणते देश आधी बघायचे, कोणते नंतर ह्याची व्यवस्थित मांडणी होईल. ऐनवेळी कुठे जायचं म्हणून धावपळ उडणार नाही.

वीणा वर्ल्ड सुरू झालं तेव्हा भांडवलाचा प्रश्‍न सोडवला आमच्या पर्यटकांनीच. आमचे ‘एंजल इन्व्हेस्टर्स’ म्हणजे आमचे पर्यटक. अनेक मंडळींना आम्हाला मदत करायची होती पण त्याच्या बदल्यात आमच्याकडे टूर्स देण्याव्यतिरिक्त दुसरं काहीच नव्हतं. पर्यटकांनीही टूर्सच घेतल्या आणि वीणा वर्ल्ड उभं राहिलं. कुणी एकाच वेळी तीन-तीन सहली बूक केल्या तर कुणी म्हटलं, ‘आम्हाला पुढच्या वर्षी जायचंय सहलीला पण पैसे आज भरून ठेवतो, कोणती सहल ते नंतर ठरवू’. हे असं काही करायला त्यावेळी आमच्याकडे सिस्टिमचा सपोर्टही नव्हता, मग आम्ही पुढच्या वर्षीच्या सहली आधीच जाहीर करून ठेवल्या आणि ते पैसे स्विकारले. पर्यटकांनी विश्‍वास टाकला आणि गेल्या पाच वर्षात आम्ही त्यास पात्र ठरलो म्हणायला हरकत नाही. मोस्ट अफोर्डेबल प्राइसमध्ये पर्यटकांना जग दाखवलं अगदी सप्तखंडांची वारी घडवली. कुठे आमची कॅल्क्युलेशन्स चुकली, कधी एअरफेअर्सनी दणका दिला. ‘चुकीची आणि अतिशय कमी किंमत लागली गेलीय ज्यामध्ये कंपनीला प्रचंड तोटा होणारेय’ हे लक्षात येईपर्यंत सहली फुल्ली पॅक्ड झाल्या होत्या. पण आम्ही शब्द पाळला आणि पर्यटकांना जाणीवही होऊ दिली नाही, ना कुठे कॉस्ट कटिंग प्रकार केला. अर्थात ह्या सगळ्याच्या बदल्यात पर्यटकांचं भरभरून प्रेम मिळालं आणि तो तोटा ही इन्व्हेस्टमेंट बनली. आमच्या एंजल इन्व्हेस्टर्सच्या उपकाराची अंशत: परतफेड.

वीणा वर्ल्डच्या सुरूवातीला आम्ही अशीच एक अ‍ॅम्बिशियस गोष्ट जाहीर केली होती, ती म्हणजे ‘पंचवीस लाख भरा आणि पाच वर्षात पन्नास देश बघा’. शुन्यातून उभी राहू इच्छित असलेल्या संस्थेला कोण एक रकमी असे पैसे देणार? बरं, एअरफेअर्स आणि फॉरिन एक्स्चेंजमध्ये होणार्‍या बदलाची जिम्मेदारी आमची होती त्यामुळे त्यावेळी चाळीस लाखाहून अधिक किमतीच्या सहली अशा पंचवीस लाखात देण्यात आम्हालाही जोखीम होती. तरीही आम्ही ‘बघूया तर पर्यटक आपल्यावर विश्‍वास ठेवतात का?’ ह्या विचारातून याच लेख मालिकेतून ही योजना जाहीर केली. आणि काय आश्‍चर्य, गोव्याचे  श्री. दिगंबर अमृसकर आणि मुंबईचे श्री. देवेंद्र खडसे ह्यांनी त्यावेळच्या आमच्या माहीमच्या कार्यालयात ह्या योजनेचे चेक्स आणून दिले. हा चेक हातात घेताना डोळ्यात पाणी होतं, एक-एवढा विश्‍वास आपल्यावर आहे ह्याचं आणि दुसरं म्हणजे आपल्याकडून ह्या पैशाच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची गडबड होऊन चालणार नाही ह्या जबाबदारीची जाणीव. पाच वर्ष भराभर सरली आणि मला अभिमानाने सांगावसं वाटतंय की आज अमृसकरांनी पाच वर्षात वीणा वर्ल्डसोबत अठरा सहली केल्या. पाच खंड पालथे घातले. परवा अमृसकरांचं अतिशय सुंदर पत्र आलं, ज्यात जग पाहिल्याचं समाधान होतं, आनंद होता आणि वीणा वर्ल्डचं प्रेम होतं. ‘दिलेला शब्द पाळता येणं’ ही संस्कृती ह्याद्वारे वीणा वर्ल्डमध्ये रूजली हा सर्वात मोठा फायदा होता ह्या योजनेचा. संस्कृतीची रुजवात व्हायला दशकं जावी लागतात असं म्हणतात. आम्हीतर पर्यटकांसाठी एक योजना आणून त्याद्वारे कोणत्याही परिस्थितीत दिलेला शब्द पाळण्याची सवय ऑर्गनायझेशनच्या अंगी बाणवली. कोणत्याही चांगल्या गोष्टीत फायदा असतो तो असा, तसंच चांगलं काहीही वाया जात नाही हेही सिद्ध झालं. पंधरा दिवसांपूर्वी

श्री. अमृसकरांचं हे पत्र संपूर्ण ऑर्गनायझेशनला आणि प्रीफर्ड सेल्स पार्टनर्सना सर्क्युलेट केलं तेव्हा पुन्हा एकदा आमच्यासोबत सतत जाणार्‍या पर्यटकांकडून विचारणा व्हायला लागली की, ‘असं आम्हालाही काही द्यानं जेणेकरून आमचं पर्यटनाचं कॅलेेंडर फिक्स होऊन जाईल’. ह्या दोन कुटुंबांनी ही योजना घेतल्यानंतर अ‍ॅक्च्युअली सगळ्या धावपळीत आम्ही विसरून गेलो होतो या योजनेच्या बाबतीत. पण हे दोनही पर्यटक खूश आहेत, त्यांच्या सहली व्यवस्थित पार पडताहेत, आणि पाच वर्षात पन्नास देश बघण्याचं त्यांचं स्वप्न पूर्ण होतंय हे बघून आज वाटतंय की ही योजना आणली म्हणून एवढ्या कमी कालावधीत त्यांचे पन्नास देश पूर्ण झाले. कारण आम्हालाही हा पल्ला गाठायला पंधरा ते वीस वर्ष लागली होती. थोडक्यात ह्या अमृसकरांच्या पत्रामुळे ह्या योजनेने पुन्हा एकदा माझ्या डोक्यात विचारांना चालना दिली होती.

आजच्या पर्यटकांना पन्नास नव्हे तर शंभर देश पालथे घालायचेत आणि तेसुद्धा दहा पंधरा किंवा फार फार तर वीस वर्षात. आमच्याकडेच बघानं. टूर मॅनेजर्सचीही चढाओढ लागलीय देशांची संख्या वाढवायची. वीणा वर्ल्डकडे असलेल्या पाचशे टूर मॅनेजर्सपैकी पंधरा जणांनी पन्नासहून अधिक देश पूर्ण केलेयत, पस्तीसहून अधिक जणांनी चाळीसपेक्षा अधिक देशांमध्ये सहली मॅनेज केल्या आहेत टूर मॅनेजर्स म्हणून. पंचवीसहून अधिक देश पूर्ण करणारे तर खूपच टूर मॅनेजर्स आहेत. देशांची संख्या वाढविण्याची संधी प्रत्येक टूर मॅनेजरला तेव्हाच मिळते जेव्हा तो प्रत्येक सहलीवर ‘परफॉर्मन्स’ अगदी उत्कृष्टरित्या देतो. त्यामुळे देशांची संख्या पूर्ण करतानाच खणखणीत परफॉर्मन्स द्यायची चढाओढही आमच्या टूर मॅनेजर्समध्ये लागलेली असते. हा ऑर्गनायझेशनचा फायदा आणि अर्थातच पर्यटकांचाही कारण टूर मॅनेजर कसा आहे ह्यावर सहलीचा हॅप्पीनेस इंडेक्स अवलंबून असतो. आणि त्यावर कडकडीत नजर आम्हीही ठेवून असतो. कधी जर वीणा वर्ल्ड संस्कृतीत नं बसणारी गोष्ट घडली तर त्यावर लागलीच उपाययोजना केली जाते. कारण ‘मनापासून’ चांगली सेवा देणे हे जर एखाद्याच्या रक्तातच नसेल तर अ‍ॅक्च्युअली त्या माणसाने ह्या इंडस्ट्रीत राहणं म्हणजे वेळेचा अपव्यय. ‘मे बी, राईट पर्सन अ‍ॅट राँग प्लेस’. मग तिथे सर्वांच्या भल्यासाठी शाल श्रीफळ द्यावं लागतं. ह्यासाठी आम्ही ‘रीक्रुट-रीव्ह्यू-रीलोकेट-रीलीज’ ही पद्धत वापरतो. असो, थोडसं विषयांतर.

तर पर्यटन हे आता थांबणार नाहीये पण त्याच पर्यटनाला जर चॅनलाइज केलं तर प्रत्येकाच्या भटकंतीला एक शिस्त येईल. कमी पैशात जग बघता येईल. कोणते देश आधी बघायचे, कोणते नंतर ह्याची व्यवस्थित मांडणी होईल. ऐनवेळी कुठे जायचं म्हणून धावपळ उडणार नाही. जेव्हा जेव्हा अशी धावपळ होते किंवा पॅनिक व्हायला होतं तेव्हा आपण कदाचित चुकीचं पर्यटनस्थळ निवडतो किंवा निश्‍चितपणे जास्त पैसे भरतो. गेली जवळजवळ पस्तीस वर्ष पर्यटनक्षेत्रात कार्यरत राहिल्यानंतर पर्यटन कसं करावं ह्यासाठी आमच्या पर्यटकांना व्यवस्थित मार्गदर्शन करणं ही आमची नैतिक जबाबदारी आहे असं मला वाटतं. आणि म्हणूनच सर्व प्रकारच्या पर्यटकांसाठी सर्व काही आम्ही वीणा वर्ल्डमध्ये उपलब्ध केलंय. ग्रुप टूर्स, इंडिपेंडंट कस्टमाईज्ड हॉलिडेज्, कॉर्पोरेट टूर्स, वुमन्स स्पेशल, सीनियर्स स्पेशल, सिंगल्स स्पेशल, हनिमून स्पेशल, वीकेन्ड स्पेशल, फेस्टिव्हल टूर्स, वाइल्ड लाईफ स्पेशल, परदेशस्थ नागरिकांना भारत दाखविणार्‍या इनबाऊंड टुर्स आणि लवकरच दाखल होतेय स्पेशली एबल्ड जनरेशनसाठी दिव्यांग स्पेशल. ह्या झाल्या कॅटेगरीज. ज्या पर्यटकाची जशी आवड त्यानुसार त्याचं पर्यटन सुरू आहे. आता पर्यटकांनी आणखी मागणी जोर लावून धरलीय ती सहलींच्या खर्चाबाबतची. ‘अशा काही काही योजना आणा की आम्हाला भारही पडणार नाही आणि आम्ही सुरळीतपणे पर्यटन करीत राहू तसंच भारतासह जगाचं पर्यटन शक्य तितक्या लवकर आणि जेवढं होईल तेवढ्या कमी पैशात करू शकू‘. आम्ही आता तेही मनावर घेतलंय आणि त्यामुळे एचडीएफसी बँकेच्या सहकार्याने EMI इंटरनॅशनल टूर्स जाहीर केल्या आहेत. आधी सहल करा आणि नंतर पैसे भरा हप्त्या हप्त्याने ही योजना कार्यवाहीत झालीय. काहींचं म्हणणं असं आहे की, ‘एक रकमी पैसे भरणं खूप अवघड जातं, आम्ही पुढच्या वर्षीच्या सहलीचे पैसे दर महिन्याला हप्त्या हप्त्याने भरू असं काहीतरी आहे का?’ सो तिही योजना आम्ही एक जुलैपासून आणीत आहोत. सो ज्याला जसं हवं तसं वीणा वर्ल्ड पर्यटनविश्‍व आकार घेतंय.

तुमची भारतातल्या राज्यांची संख्या आणि जगातील देशांची संख्या वाढविण्याची जबाबदारी आमची आहे कारण आता दर चार-पाच महिन्यांनी आपली पर्यटनाची इच्छा उचंबळून येतेच आणि नकळत आपण म्हणतो,

चलो, बॅग भरो, निकल पडो!

Language, Marathi

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

*